अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

महाशिवरात्री २०२३ निमित्त षडाक्षर महामंत्रा विषयी सहा बिंदू

घेरंड संहितेवरील लेखमालेला अल्पसा विराम देऊन आपण महाशिवरात्री बद्दल काही गोष्टी जाणून घेत आहोत. सर्व शिवभक्त महाशिवरात्री २०२३ साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत. पंचाक्षर अथवा षडाक्षर मंत्र हा भगवान शंकराचा मूलमंत्र. या मंत्राचा महिमा वर्णन सरस्वतीही पूर्णपणे करू शकणार नाही तेथे सामान्य माणसाची तर गोष्टच सोडा. तरीही आजच्या माघ पौर्णिमेच्या आणि रवि पुष्य योगाच्या शुभ दिनी शिव षडाक्षर मंत्राविषयी हे सहा बिंदू सदाशिवाला स्मरून सांगत आहे.

बिंदू १ -- निर्गुण निराकार शिवतत्वात नादाचा एक स्पंद अलगद उमटला. तो नादाचा मूळ स्पंद म्हणजे ओंकार. सृष्टी रचना करण्यासाठी पंचमहाभूतांची निर्मिती आवश्यक होती. त्या साठी ओंकारातून नमः शिवाय ह्या पंचाक्षरी विद्येचे स्फुरण झाले. पंचाक्षर मंत्रातून पुढे परम कल्याणकारी अशा त्रिपदा गायत्रीचे स्फुरण झाले. गायत्री पासून चार वेद निर्माण झाले. या वेदांच्या असंख्य शाखा निर्माण झाल्या आणि त्या शाखाशाखांत अगणित मंत्रांची निर्मिती झाली. मंत्रांच्या या "उत्क्रांती" वरून शिव षडाक्षर मंत्र हा सर्व मंत्रांचे मूळ आहे हे स्पष्ट आहे.

बिंदू २ -- शिव षडाक्षर मंत्र म्हणायला अत्यंत सुलभ आहे. त्याचे उच्चारण अबाल-वृद्ध-स्त्री-पुरुष कोणीही सुखपूर्वक करू शकतो. तो मनात शांती उत्पन्न करणारा आहे. शिव म्हणजे शुभ आणि कल्याणकारी. त्याला नमः या समर्पणात्मक पदाची जोड दिलेली आहे आणि मोक्ष प्रदायक प्रणवाची जोड आरंभी दिलेली आहे. असा हा तीन पदांचा महामंत्र सर्व शिवभक्तांसाठी परम हितकारक आहे. शिव षडाक्षर मंत्र भगवान शंकराने स्वतः प्रकट केलेला आहे. पुस्तकात वाचलेले किंवा इतरत्र ऐकलेले चैतन्य रहित मंत्र म्हणजे असिद्ध मंत्र. चेतन अथवा जागृत मंत्र म्हणजे सिद्ध मंत्र. सिद्ध मंत्र जेंव्हा एखाद्या जाणकार, ज्ञानी आणि मंत्रविद व्यक्तीकडून विधिवत ग्रहण केला जातो तेंव्हा त्याला सुसिद्ध मंत्र म्हणतात. तात्पर्य हे की शिवमंत्र मूलतः सिद्ध मंत्रच आहे कारण तो शिवाच्या मुखातून बाहेर पडला आहे. एखाद्या जाणकार व्यक्तीकडून "कर्णवेध" मिळाल्यास अतिउत्तम अन्यथा मनोमन सदाशिवाला शरण जाऊन, त्याचा आशीर्वाद घेऊन जपावा.

बिंदू ३ -- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते अनुक्रमे न-म-शि-वा-य या अक्षरांमध्ये सामावलेली आहेत. परीणामी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्धी ही पाच चक्रेसुद्धा या पाच अक्षरांच्या अधिपत्याखाली येतात. आरंभीचा ओंकार पंचमहाभूतांच्या पलीकडला कूटस्थ आत्मा आणि परमात्मा यांकडे निर्देश करतो. हा प्रणव आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र यांचे संचलन करतो. तात्पर्य हे की शिव षडाक्षर महामंत्राच्या सहाय्याने सातही महत्वाच्या चक्रांचे उन्मीलन सहजच घडून येते. परमशिवाने प्रत्येक जीवाला पाच शक्ती प्रदान केलेल्या आहेत -- इच्छा शक्ती, ज्ञान शक्ती, क्रीया शक्ती, निग्रह शक्ती आणि अनुग्रह शक्ती. सहावी शक्ती अर्थात स्वतंत्र शक्ती फक्त त्या परमशिवाकडेच आहे. शिव षडाक्षर मंत्रात या सर्व शक्तीसमुहाचे जागरण करण्याचे सामर्थ्य आहे. कुंडलिनी जागरणाचे रहस्य यातच अगदी चपलखपणे सामावलेले आहे.

बिंदू ४ -- मानवी आयुष्य सुखदु:खाच्या जात्यावर अहोरात्र भरडलं जात असतं. अडी-अडचणींशी लढायला, त्यांच्याशी दोन हात करायला त्याला हवे असते मनःसामर्थ्य, मनःशांती, मनःशक्ती . शिव उपासनेमुळे हे सामर्थ्य प्राप्त होण्यास मदत होते. शिव उपासना तीन स्थरावर केली जाते -- विग्रह, विधी आणि वाणी. शिवलिंग, शिवयंत्र, शिवप्रतिमा म्हणजे विग्रह. शिवमंत्र आणि शिवस्तोत्र म्हणजे वाणी. पुष्प-बिल्वपत्र इत्यादी उपचारांनी केलेले विशिष्ठ पूजन म्हणजे विधी. अजपा साधनेत प्रामुख्याने परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी वाणीची श्वासांशी जोडणी केली जाते. श्रद्धेनुसार स्थूल उपचारांनी उपासना करा अथवा करू नका पण अजपा ध्यानात्मक योगोपासना मात्र अवश्य करावी. चक्रे आणि कुंडलिनी म्हणजे जणू शिवविग्रह, शिवमंत्र म्हणजे जणू चत्वार वाणी आणि विशिष्ठ पद्धतीने केले जाणारे अजपा ध्यान म्हणजे जणू विधी. अशी ही सूक्ष्म उपासना परम पवित्र आणि शीघ्र फलदायी आहे.

बिंदू ५ -- अजपा योगसाधकांसाठी शिव षडाक्षर महामंत्र म्हणजे मूलविद्या. श्वासांबरोबर अजपा विधीने ह्या विद्येचे अनुसंधान ठेवावे. जपमाळेवर याच विद्येचा जप करावा. श्रीगुरुमंडलाने गोपनियतेच्या आणि प्रकटीकरण्याच्या काही मर्यादा आखून दिल्यामुळे हे साधण्याच्या प्रत्यक्ष विधीविषयी फार काही येथे सांगता येणार नाही. मंत्रयोग-हठयोग-लययोग-राजयोग अशा सर्व योगमार्गांचे फळ अतिशय सुलभपणे प्रदान करणारी अशी ही शिवमुखातून कथन केली गेलेली साधना प्रणाली आहे. ढीगभर मंत्रांचा काय उपयोग, ढीगभर साधनांशी काय देणं घेणं. शिवविद्या श्वासांत बसवावी, मनात ठसवावी आणि रोमारोमात भिनवावी. मानवी आयुष्याचे सार्थक त्यातच आहे. परंतु अजपा ध्यानविधी प्रामाणिकपणे, मनात श्रद्धा जोपासत ग्रहण केला पाहिजे.

बिंदू ६ -- अजपा साधने व्यतिरिक्त शिवमंत्राचा मानस जप चालता-फिरता सदासर्वदा करावा. विशेषतः झोपायला जाण्यापूर्वी, झोपून उठल्यावर, देवदर्शन करत असतांना, अन्नग्रहण करत असताना, जलपान करत असतांना आणि स्नान करत असतांना हा मंत्र अवश्य मनातल्या मनात जपावा. अद्भुत पुण्य प्रदान करणारे आणि तीव्र गतीने पापक्षालन करणारे असे हे शिवस्मरण अजपा साधकांनी अवश्य आत्मसात करावे.

शिव षडाक्षर मंत्रा विषयीचे हे सहा बिंदू परम पवित्र आहेत. दुष्ट, खळ, दुर्जन, निंदक अशा लोकांना ते आवडणार नाहीत. शिवभक्तीत तल्लीन झालेल्यांना मात्र त्यांतील रहस्य शिवकृपेने साधनारत झाल्यावर सहज उमगेल.

असो.

अजपा गायत्रीचे योगविज्ञान ज्या शंभू महादेवाने प्रकट केले आणि पार्वतीच्या कानांत अलगद फुंकले तो आदीगुरु सर्व वाचकांना अजपा पथावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 05 February 2023