अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

महाशिवरात्री २०२३ निमित्त अजपा ध्यानसाधना

या वर्षी महाशिवरात्री दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी होणार आहे. एखादा सण, उत्सव किंवा पर्व साजरे करण्याच्या विविध पद्धती असतात. जो-तो आपापल्या श्रद्धेनुसार मार्ग चोखाळत असतो. योगमार्गी साधकांसाठी योगक्रियांचा वापर करून हे पर्व कसे साजरे करता येईल त्याविषयी दोन शब्द.

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सर्वसाधारण भक्त कर्मकांडात्मक स्थूल पूजेच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. सदाशिवाला अभिषेक, श्वेतपुष्प, बिल्वपत्र, जायफळ, भस्म, रुद्राक्ष वगैरे वगैरे गोष्टी अर्पण करून तो शिवाराधना करत असतो. या गोष्टींनी भगवान शिव खरोखर प्रसन्न होतो का हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि अनुभवाचा विषय आहे पण ध्यानमार्गी साधकांनी जरा अधिक खोल विचार करावा. जर अशा पुष्प-बिल्वपत्रादी गोष्टी अर्पण करून शिव प्रसन्न होत असेल तर मग योगीराज भगवान शंकराच्या आवडीच्या ध्यान, अजपा जप, शांभवी मुद्रा, शक्तीचालन, अनुलोम-विलोम मंत्र वगैरे योगक्रिया त्याला अर्पण केल्या तर तो किती प्रसन्न होत असेल?!

कर्मकांडात्मक गोष्टींच्या पुढची पायरी म्हणजे जप, स्तोत्र वगैरे मार्गांनी केलेली मंत्रयोगात्मक उपासना. तुम्हाला मंत्राच्या माळाच्या माळा ओढणारे, नित्यप्रती स्तोत्रांचे ढीगभर पाठ करणारी मंडळी दिसतील. कल्पना करा की कर्मकांडात्मक गोष्टींपेक्षा श्रेष्ठ अशा उपासनात्मक मार्गांनी आता या लोकांची शिवोपासना घडत आहे. असं समजा की या उपासनेतून त्यांना x एवढा फायदा होत आहे. जर काही उपायांनी हा फायदा 10x करता आला तर? ध्यानाने हे साधता येऊ शकते. कोणत्याही मंत्र-स्तोत्रात्मक उपासनेचा फायदा वृद्धींगत होण्यासाठी ध्यानसाधना अत्यंत उपयोगी पडू शकते. जो मंत्र, जी स्तोत्र तुम्ही करत आहात त्याला काही महिने ध्यानाची जोड देऊन बघा म्हणजे पटेल मी काय म्हणतोय ते.

आध्यात्मिक गोष्टींची आवड असणारे अनेकजण एखाद्या संत-सत्पुरुषाची भक्ती करत असतात. एखाद्या मठात जाणे, नामस्मरण करणे, त्या सत्पुरुषाच्या लीला वर्णन करणारा एखादा ग्रंथ वाचणे वगैरे गोष्टींनी ते भक्तीमार्ग चोखाळत असतात. बहुतेक वेळा अशा मंडळींच्या भक्ती करण्यामागे आपल्या भौतिक इच्छा आकांक्षांची पूर्तता हे महत्वाचे कारण असते. सर्वसाधारतः निष्काम भक्तीच्या तुलनेने अशी सकाम भक्ती ही कनिष्ठ मानली जात असली तरी अशी सकाम भक्ती हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा असतो. हा टप्पा ओलांडून एक दिवस साधक निष्काम भक्ती सुद्धा आत्मसात करतो. सकाम भक्तीच्या या टप्प्यावर आपल्या प्रयत्नांना जर धानमार्गाची जोड दिली तर प्रयत्नांत तीव्रता येते आणि आपले ईप्सित साधण्याची शक्ती प्राप्त होते.

कोणत्याही संत-सत्पुरुषाची भक्ती करणारी मंडळी जर बघितली तर तुम्हाला असे आढळेल की त्यातील काहींना त्यांची भक्ती अत्यंत चांगला फायदा देत आहे. याउलट काहींना बरेच प्रयत्न करून सुद्धा त्या सत्पुरुषाची कृपा प्राप्त होत नाहीये. असं का बरं? अनेकानेक थक्क करणारे चमत्कार त्या सत्पुरुषाच्या नावे कोरले गेलेले असतात मग सर्वाना त्याच्या सामर्थ्याची प्रचीती का येत नाही? याचे उत्तर असे की संत-सत्पुरुष त्यांच्या सर्व भक्तांवर सारखाचं कृपेचा वर्षाव करत असले तरी त्या-त्या भक्ताच्या प्रारब्धानुसार आणि मानसिक जडणघडणी नुसार त्याला कृपेचा लाभ प्राप्त होत असतो. जमिनीच्या दोन तुकड्यांवर जरी सारखाचं पाऊस पडत असला तरी त्यातील खडकाळ जमिनीच्या तुकड्यावर चांगले पिक येत नाही. याउलट सुपीक जमिनीत तोच पाऊस भरघोस पिक देऊन जातो. साधकाच्या निकृष्ट मनोभूमीला जर उत्कृष्ट मनोभूमीत परावर्तीत करायचे असेल तर ध्यानसाधना हा एक उत्तम मार्ग आहे.

मला वाटतं ध्यानाच्या मनःशांती, एकाग्रता, आत्मसाक्षात्कार अशा सर्वज्ञात फायद्यांबरोबरच वरील गोष्टी सुद्धा सर्वसाधारण साधकांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत.

ध्यानाचे महत्व माहिती असले तरी अनेकांचा ध्यानसाधने बद्दलचा दृष्टीकोन चुकीचा असतो. ध्यान लावणे म्हणजे केवळ डोळे मिटून बलपूर्वक विचार बंद करण्याचा प्रयत्न करणे किंवा मनातल्या मनात काहीतरी visualize करणे नव्हे. अशी चुकीच्या धारणा बनली की मग ध्यान कंटाळवाणे आणि निरस वाटू लागते. ध्यानसाधनेत अनेक सूक्ष्म गोष्टी असतात. बारकावे असतात. या सर्वच गोष्टी काही लेखाच्या माध्यमातून सविस्तरपणे मांडता येत नाहीत. महाशिवरात्रीच्या परम पवित्र मुहूर्तावर काही निवडक लोकांना ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून सविस्तरपणे अजपा ध्यान शिकवण्याचा मानस आहे. हा कोर्स म्हणजे मला माझ्या सिद्ध श्रीगुरुमंडला कडून जो काही योगप्रसाद लाभला त्यातील काही कण इतरांबरोबर वाटण्याचा अल्पसा यत्न आहे. तारखा, वेळ, शुल्क आणि अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

असो.

भोळी भक्ती करणाऱ्या आपल्या भक्तांनी अर्पण केलेल्या लोटाभर पाण्याने सुद्धा जो संतुष्ट होतो तो भगवान शिवशंकर सर्व वाचकांना ध्यानमार्गाची कास धरण्यास प्रवृत्त करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 30 January 2023