अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

शांभवी मुद्रेद्वारे कुंडलिनी शक्तीचे सूक्ष्म ध्यान

मागील लेखात आपण घेरंड मुनींनी विषद केलेला तेजोध्यानाच्या तीन पद्धती जाणून घेतल्या. स्थूल आणि तेजोध्यान कथन केल्यावर घेरंड मुनी आता आपल्याला सूक्ष्म ध्यानाविषयी सांगत आहेत.

सूक्ष्म ध्यान विषद करण्यापूर्वी घेरंड मुनी चंड कपालीला म्हणतात --

तेजोध्यानं श्रुतं चण्ड सूक्ष्मध्यानं श‍ृणुष्व मे ।
बहुभाग्यवशाद्यस्य कुण्डली जाग्रती भवेत् ॥

हे चंड कपाली ! तू तेजोध्यानाचा विधी श्रवण केलास आता सूक्ष्म ध्यानाविषयी सांगतो. ऐक. साधक अतिशय भाग्यवान असेल तरच त्याची कुंडलिनी जागृत होते.

आता जरा घेरंड मुनी काय सांगत आहेत त्याकडे नीट लक्ष द्या. वरकरणी हे वाक्य अगदी साधे वाटेल परंतु त्यात घेरंड मुनींनी एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणतात की कुंडलिनी जागृत व्हायला साधकाचा भाग्य बलवत्तर असावं लागतं. कुंडलिनी जागृती अनुभवण्यासाठी गुरुकृपा, गुरुप्रदत्त साधना, निरंतर योगाभ्यास अशा गोष्टी तर आवश्यक असतातच परंतु साधकाचे प्रारब्ध सुद्धा अनुकूल असावे लागते.

आधुनिक अध्यात्म जगतात तुम्हाला असे साधक आढळतील की बरीच वर्षे अथक प्रयत्न करून मगच त्यांची कुंडलिनी जागृत झालेली आहे. तुम्हाला असेही काही साधक आढळतील की ज्यांची कुंडलिनी तर त्यामानाने लवकर जागृत झाली परंतु आध्यात्मिक दृष्ट्या कुंडलिनी अग्रेसर व्हायला मात्र अनेक वर्षांचा काळ लागला. तुम्हाला हाताच्या बोटावर मोजता येतील अशी काही मंडळी आढळतील की ज्यांची कुंडलिनी जागृतीही लवकर झाली आणि कुंडलिनी आध्यात्मिक दृष्टीने अग्रेसर सुद्धा अल्प कालावधीत झाली.

वरील भेद का बरं निर्माण झाले? प्रत्येक साधकाच्या प्रयत्नांची तीव्रता तर भिन्न-भिन्न असतेच परंतु प्रत्येक साधकाचे प्रारब्ध सुद्धा भिन्न-भिन्न असते. त्यामुळे कोणी दोन-पाच वर्षात अध्यात्म मार्गावर बराच पुढे गेलेला आढळतो तर कोणी तीस-चाळीस वर्षे परिश्रम करून सुद्धा फारशी प्रगती करू शकत नाही.

ज्याप्रमाणे एखाद्या खाद्यपदार्थात सर्व घटक यथायोग्य पडले परंतु मिठाचे प्रमाण चुकले तर तो बिघडतो त्याचप्रमाणे गुरुकृपा, साधना, स्वाध्याय इत्यादी सर्व घटक पुरेशा प्रमाणात असून सुद्धा जर प्रारब्धात नसेल तर कुंडलिनी जागृती होत नाही किंवा कुंडलिनी जागृत होऊन देखील ती हव्या त्या प्रमाणात उर्ध्वगामी बनत नाही.

येथे घेरंड मुनी प्रारब्धाच्या या खेळाकडे निर्देश करत आहेत. कुंडलिनी जागृत होऊन ती उर्ध्वगामी बनणं ही किती मौल्यवान आणि महत्वाची गोष्ट आहे याकडे साधकांचे लक्ष वेधणे हा त्यामागील उद्देश आहे. सर्वसामान्य आयुष्यात मौल्यवान गोष्टीची आपण काळजी घेतो. त्याच प्रमाणे जागृत झालेल्या कुंडलिनीची सुद्धा काळजी घ्यावी लागते. चुकीच्या आचरणाने जागृत कुंडलिनी परत सुप्तावस्थेत जाणार नाही किंवा तिच्या उर्ध्वगामीत्वाला अडथळा येणार नाही याची काळजी प्रत्येक साधकाला घ्यावीच लागते.

पुढे घेरंड मुनी म्हणतात --

आत्मना सह योगेन नेत्ररन्ध्राद्विनिर्गता ।
विहरेद्राजमार्गे च चञ्चलत्वान्न दृश्यते ॥

उर्ध्वगामी झालेली कुंडलिनी आत्म्याबरोबर संयोग होऊन नेत्ररंध्रांतून निघून राजमार्गात विचारण करते. ती अतिशय सूक्ष्म असल्याने आणि चंचल असल्याने तिला पहाणे दुष्कर असते.

घेरंड संहितेवरील बहुतेक भाषांतरकारांनी आणि भाष्यकारांनी या श्लोकाचा सरधोपट अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेत्ररंध्र म्हणजे दोन डोळ्यांची छिद्रे आणि राजमार्ग म्हणजे त्यांपुधील अवकाश असा काहीसा अर्थ बहुतेकांनी लावलेला आहे. मला हा प्रचलित अर्थ फारसा पटत नाही. मला माझ्या श्रीगुरुमंडलाच्या कृपेने उमगलेला अर्थ पूर्णतः वेगळा आहे. परंतु प्रचलित मताशी तो जुळणारा नसल्याने मुद्दामच येथे देत नाही. येथे वर दिलेला प्रचलित अर्थच ग्राह्य धरून चालू.

कुंडलिनीचा आत्म्याशी संयोग होतो म्हणजे काय? कुंडलिनी ही आत्म्याची शक्ती आहे. शिव-शक्ती चे हे नाते चंद्र आणि चांदणे, ज्योत आणि प्रकाश असे अभेद पणाचे आहे. अशी ही ज्ञानवती शक्ती जेंव्हा चक्रांचे सोपान ओलांडून आज्ञाचकक्रापाशी पोहोचते तेंव्हा काय होते? तर ती नेत्र रंध्रांतून राजामार्गाद्वारे वरच्या बाजूला जाते.

आज्ञाचक्रापुढील प्रवासातील अडचणी कोणत्या तर सूक्ष्मता आणि चंचलता. जन्मोजन्मींचे सूक्ष्म संस्कार भल्या-भल्या योग्यांच्या ध्न्यानात चंचलता आणतात. पंचमहाभुतांच्या पलीकडले मानस तत्वही कुंडलिनी आता ओलांडलेले असते त्यामुळे ती साहजिकच अत्यंत सूक्ष्म अवस्थेला प्राप्त झालेली असते. त्यात परत प्रारब्ध संस्कारांनी ती चंचल झालेली असते. तात्पर्य हे की सूक्ष्म झालेली चंचल कुंडलिनी निग्रहाने पुढे रेटणे अवघड असते.

मग आता ह्या सूक्ष्म आणि चंचल कुंडलिनीला तिच्या गंतव्य स्थानी कसे न्यायचे. घेरंड मुनी आता तो मार्ग सांगतात --

शाम्भवीमुद्रया योगी ध्यानयोगेन सिध्यति ।
सूक्ष्मध्यानमिदं गोप्यं देवानामपि दुर्लभम् ॥

योग्याने शांभवी मुद्रद्वारे द्यान करत या (कुंडलिनीला स्थिर करण्याच्या) उपक्रमात सफलता मिळवावी. यालाच परम गोपनीय सूक्ष्म ध्यान असं म्हणतात. हे देवाना देखील दुर्लभ आहे.

येथे घेरंड मुनी आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी शांभवी मुद्रा हा सूक्ष्म ध्यानाचा उपाय सांगत आहेत. योगशास्त्रात शांभवी मुद्रा करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही पद्धतींत डोळ्यांची बुबुळे वरच्या दिशेला करून (नेत्र उफराटे करून) भ्रूमध्य स्थानी ध्यान लावले जाते. काही पद्धतींत नाकाच्या शेंड्यावर अर्थात नासिकाग्रावर ध्यान लावले जाते. काही पद्धतींत डोळे अर्धोन्मीलित करून अवकाशात ध्यान लावले जाते. काही पद्धतींत डोळे बंद करून केवळ अंतर्चक्षुद्वारे आज्ञाचक्राचे ध्यान केले जाते.

वर उल्लेखिलेल्या शांभवी मुद्रेच्या विविध पद्धतीमधून तुमच्यासाठी कोणती आवश्यक आहे हे अर्थातच तुम्ही निवडलेल्या ध्यान पद्धतीवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ एखादा हठयोगाचा अभ्यासक "उफराटी दृष्टी" असलेली शांभवी अन्गीकारेल तर एखादा ध्यानमार्गी "आंतरिक शांभवी" धारण करेल. येथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की अजपा योगातील चतुर्थ क्रीया सहज शांभवी स्थितीच आहे. किंबहुना शांभवी मुद्रेत अजून काही गोष्टींचा समावेश करून ती अधिक परिणामकारक बनवलेली आहे.

शांभवी मुद्रा कोणत्याही पद्धतीने करा ती एक दिवस तुम्हाला उच्च कोटीची ध्यानावस्था प्राप्त करून देईल. भगवान सदाशिव स्वतः नित्य शांभवी मुद्रेत स्थित असतो यावरूनच तिची महत्ता स्पष्ट आहे. शांभवी मुद्रा प्राप्त होणे हे देवांनाही दुर्लभ मानले गेले आहे. आजकालच्या इंटरनेट युगात घेरंड मुनींचे हे विधान जरा अतिशयोक्त वाटण्याची शक्यता आहे परंतु शांभवी मुद्रेचा शारीरिक विधी प्राप्त होणे आणि शांभवी अवस्थेची प्राप्ती होणे यात बराच फरक आहे.

आतापर्यंत घेरंड मुनींनी स्थूलध्यान, तेजोध्यान आणि सूक्ष्मध्यान असे ध्यानाचे तीन प्रकार विषद केले आहेत. त्यांची एकमेकाशी तुमाला करतांना ते म्हणतात --

स्थूलध्यानाच्छतगुणं तेजोध्यानं प्रचक्षते ।
तेजोध्यानाल्लक्षगुणं सूक्ष्मध्यानं परात्परम् ॥
इति ते कथितं चण्ड ध्यानयोगं सुदुर्लभम् ।
आत्मा साक्षाद्भवेद्यस्मात्तस्माद्ध्यानं विशिष्यते ॥

स्थूलध्यानापेक्षा तेजोतेजोध्यान शंभर पट श्रेष्ठ आहे. तेजोध्यानापेक्षा सुक्ष्मध्यान लाखपटीने श्रेष्ठ आहे. हे चंड कपाली, असा हा अतिशय दुर्लभ ध्यान योग मी तुला सांगितला. ध्यानयोगाचा अभ्यास सिद्ध झाल्याने आत्मसाक्षात्कार होतो.

वरील श्लोकात ध्यानयोगाचे आणि विशेषतः सूक्ष्मध्यानाचे महत्व अधोरेखित केलेले आहे. वरील सूक्ष्म ध्यानाचे महत्व आणि "लाखपटीने" असलेलं श्रेष्ठत्व लक्षात घेता मग स्थूलध्यान आणि तेजोध्यान हवेतच कशाला असा प्रश्न कदाचित पडेल. सूक्ष्मध्यान श्रेष्ठ असले तरी ते साधण्यास स्थूल-तेजो-सूक्ष्म अशा प्रक्रियेतून जाणेच श्रेयस्कर ठरते. आधी स्थूल ध्यानाद्वारे पाया मजबून बनवून मग त्यावर तेजोध्यानाच्या बळकट भिंती उभारून शेवटी त्यावर सूक्ष्मध्यानाचा कळस चढवणे हाच उत्तम उपाय आहे.

येथे एक लक्षात घ्यायला हवे की तुम्ही कोणताही ध्यानविधी आचरणात आणा शेवटी एक दिवस तो तुम्हाला आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाईल. हे घडण्यास किती कालावधी लागेल हे अर्थातच तुमचे प्रारब्ध, तुमचे प्रयत्न आणि गुरुकृपा यांवर अवलंबून आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा घेरंड मुनींनी उल्लेखालेल्या "बहुभाग्यवशाद्यस्य" या पहिल्या श्लोकाकडे पहावे. आत्मसाक्षात्काराच्या दिशेनी केलेली वाटचाल ही मुळातच एक अतिशय संथ प्रक्रिया आहे. जन्मोजन्मींच्या संस्कारांची पूर्णतः आटणी झाल्याखेरीज आत्मा त्याच्या मूळ स्वरूपात दृग्गोचर होऊ शकणार नाही हे उघड आहे.

असो.

योग्यांना दिग्दर्शन करण्यासाठी शांभवी मुद्रा धारण करून योगाचरण करणारा भगवान सदाशिव सर्व ध्यानाभ्यासी साधकांना "राजमार्गावर" अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 April 2023