ध्यान आणि योगक्रियांच्या माध्यमातून शिवोपासना : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

मूलाधार, मणिपूर आणि आज्ञा चक्रांतील तेजोध्यान अथवा ज्योतीर्ध्यान

लेखमालेत आत्ता पर्यंत आपण घेरंड मुनींनी विषद केलेल्या स्थुलध्यानाच्या दोन पद्धती जाणून घेतल्या आहेत. आता घेरंड मुनी आपल्याला तेजोध्यानाच्या अथवा ज्योतीर्ध्यानाच्या काही पद्धती सांगत आहेत. नावावरून तुमच्या लक्षात आहे असेल की या पद्धतींत प्रकाश किंवा तेज हा ध्यानाचा प्रधान विषय आहे.

घेरंड मुनी तेजोध्यानाचा पहिला प्रकार विषद करतांना चंड कपालीला म्हणतात --

कथितं स्थूलध्यानं तु तेजोध्यानं श‍ृणुष्व मे ।
यद्ध्यानेन योगसिद्धिरात्मप्रत्यक्षमेव च ॥
मूलाधारे कुण्डलिनी भुजगाकाररूपिणी ।
जीवात्मा तिष्ठति तत्र प्रदीपकलिकाकृतिः ।
ध्यायेत्तेजोमयं ब्रह्म तेजोध्यानं परात्परम् ॥

हे चंड कपाली, मी तुला स्थूल ध्यान सांगितले. आता तेजोध्यान सांगतो ते ऐक. अशा प्रकारे तेजोध्यान केल्याने योगविद्येत सिद्धी अर्थात सफलता मिळते आणि आत्मा प्रत्यक्ष दिसतो. मूलाधार चक्रात सर्पाकार कुंडलिनी पहुडलेली आहे. तेथेच जीवात्मा एखाद्या ज्योतीच्या आकृती प्रमाणे तिष्ठत असतो अर्थात वास करत असतो. या ज्योतीला तेजोमय ब्रह्म समजून त्यावर ध्यान करणे म्हणजे तेजोध्यान होय.

वरील तेजोध्यानाचा प्रकार मूलाधार चक्राशी संबंधित आहे. घेरंड मुनींनी अजून तेजोध्यानाचा दुसरा प्रकार सुद्धा सांगितला आहे. तो खालील प्रमाणे --

नाभिमूले स्थितं सूर्यमण्डलं वह्निसंयुतम् ।
ध्यायेत्तेजो महद्व्याप्तं तेजोध्यानं तदेव हि ॥

याचा अर्थ असा की नाभीच्या मुळात अर्थात मणिपूर चक्रात अग्नी सहित सूर्यमंडळ विद्यमान आहे. या तेजाचे ध्यान करणे म्हणजे तेजोध्यान होय.

तेजोध्यानाचा तिसरा विधी सांगताना घेरंड मुनी म्हणतात ==

भ्रुवोर्मध्ये मनोर्ध्वे च यत्तेजः प्रणवाऽऽत्मकम् ।
ध्यायेज्ज्वालावलीयुक्तं तेजोध्यानं तदेव हि ॥

वरील श्लोकाचा अर्थ असा की भ्रूमध्यात अर्थात आज्ञाचक्रात मनाच्या वरच्या बाजूला ओंकाराच्या स्वरूपात प्रकाश विद्यमान आहे. या ओंकार ज्वालेच्या तेजावर ध्यान करणे म्हणजे तेजोध्यान होय.

घेरंड मुनींनी सांगितलेल्या तेजोध्यानाच्या तीनही पद्धती वरकरणी जरी सारख्या भासत असल्या तरी त्यांत सूक्ष्म भेद आहेत. त्याविषयी काहीशा विस्ताराने जाणून घेऊ.

प्रथम घेरंड मुनींनी तेजोध्यानाचे फळ काय सांगितले आहे ते पहा. तेजोध्यानाचे फळ आहे योगसिद्धी. येथे योगसिद्धी म्हणजे अणिमा, महिमा वगैरे अष्टमहासिद्धी नव्हेत. येथे योगसिद्धी म्हणजे योगविद्येतील सफलता किंवा योगारूढ स्थिती. हि योगसिद्धी म्हणजे कोणती ते सुद्धा त्यांनी लगेच सांगितले आहे -- आत्मा प्रत्यक्ष दिसणे किंवा होणे. आता आत्म्याचे प्रत्यक्षीकरण होणे म्हणजे काय तर आत्मसाक्षात्कार होणे. आपण जड देह नसून कूटस्थ आत्मा आहोत अशी प्रत्यक्ष खात्री होणे. तशी प्रत्यक्ष अनुभूती होणे.

आत्मा प्रत्यक्ष दिसू शकतो का? याचे जर पुस्तकी उत्तर शोधायला गेलात तर तुम्हाला "नाही" असे उत्तर मिळेल. परंतु योगगम्य उत्तर शोधायला गेलात तर "होय" असे उत्तर मिळेल. कधी ज्ञानेश्वरी वाचली असेल तर तुम्हाला माहित असेल की महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुनाला कृष्णाचे विश्वरूप सुरवातीला बिलकुल दिसले नाही. जेंव्हा कृष्णाने अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान केली तेंव्हा मात्र तो श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहू शकला. आत्मा दिसण्याच्या बाबतीतही हाच प्रकार होत असतो. सामान्य दृष्टीने तर आत्मा पहाण्याचा प्रयत्न केला तर तो अजिबात दिसणार नाही. परंतु जर योगदृष्टीने पाहिले तर मात्र तो जणूकाही दुष्टीगोचार झालेला दिसेल. त्याचे प्रकाशमय स्वरूप अंतःचक्षुना प्रत्यक्ष दिसेल. अर्थात हा शब्दांत मांडता येणारा विषय नाही. गुरुप्रदत्त साधना दीर्घकाळ ज्याने अंगिकारली आहे त्यालाच हे समजेल.

तेजोध्यानाच्या पहिल्या प्रकारात घेरंड मुनी मुलाधारातील कुंडलिनी शक्ती आणि जीवात्मा यांवर ज्योतीस्वरुपात ध्यान करण्याचा सल्ला देत आहेत. आता गंमत पहा. कुंडलिनी योगाविषयी सर्वसाधारण पुस्तकी ज्ञान तुम्हाला सांगेल की मूलाधार हे कनिष्ठ दर्जाचे चक्र असून तेथून कुंडलिनीला चालवून सहस्रार चक्रात नेणे हाच आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आहे. येथे घेरंड मुनी या पुस्तकी ज्ञानाला छेद देणारी प्रक्रिया सांगता आहेत. जे सर्वात कनिष्ठ दर्जाचे चक्र मानले जाते त्या मुलाधारातच ते प्रकाश स्वरूप जीवात्म्याचा वास आहे असे सांगत आहेत आणि त्यावर ध्यान धरण्याचा विधी सांगता आहेत.

कुंडलिनी योगाचे प्राचीन ग्रंथ समजून घेण्यासाठी, त्यांचे आकलन होण्यासाठी Reading between the lines अत्यंत आवश्यक असतं. ते जर जमलं नाही तर अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो. येथे जी कुंडलिनी सांगितलेली आहे ती अमृत प्रशनाने तृप्त झालेली ज्ञानवती कुंडलिनी आहे. ती सर्वसामान्य निद्रिस्त कुंडलिनी नाही. आत्म्याचा प्रकाश असलेली ती देवात्म शक्ती आहे. हा पूर्णतः गुरुमुखातून समजून घेण्याचा विषय आहे. त्यामुळे येथे फार खोलात जात नाही. आपापल्या सदगुरूंकडून तो समजावून घ्यावा हे उत्तम.

वरील श्लोकांवरून हे स्पष्ट आहे की तेजोध्यान एक तर मूलाधार करता येईल किंवा मणिपूर चक्रात करता येईल किंवा आज्ञाचक्रांत करता येईल. तुम्ही ते कशा प्रकारे करावे ते तुमच्या सद्गुंकडून नीट समजाऊन घ्यावे. प्रत्येक चक्रावर ध्यानाचे गुणधर्म आणि फळ यांत भिन्नता असते. तुम्हाला काय करणे आवश्यक आहे ते तुमचे सद्गुरूच सांगतील. एक सरधोपट विधी त्या बाबतीत सांगता येणार नाही. जो प्रकार तुमचे सद्गुरू सांगतील तो सर्वोपरी मानून साधना करावी हेच श्रेयस्कर आहे.

मूलाधार, मणिपूर आणि आज्ञा या चक्रांत जरी तेजोध्यानच करायचे असले तरी त्या प्रकाशात कशी भिन्नता आहे ते जरा नीट पहा. मुलाधाराताला प्रकाश हा ज्ञानवती कुंडलिनी आणि आत्माचा ज्योतीप्रकाश आहे. मणिपुरातील तेज हे सूर्यासारखे प्रखर आहे आणि ते अग्नीने संपुटीत झालेले आहे. आज्ञाचक्रातील तेज हे प्रणवयुक्त आहे आणि ते ज्वालावली सारखे आहे. हे सर्व भेद योगगम्य आहेत. दीर्घकाळ ध्यान साधना केलेल्यांनाच ते खऱ्या अर्थाने उमगतील आणि अनुभवास येईल.

स्थूलध्यान आणि तेजोध्यान वर्णन करून झाल्यावर घेरंड मुनी आता सूक्ष्म ध्यान विषद करतील. लेखमालेच्या पुढील भागात आपण ते जाणून घेऊ.

असो.

सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, अग्नीचा प्रकाश, प्रणवाचा प्रकाश, आत्म्याचा प्रकाश ज्या सदाशिवापासून स्फुरण पावतो तो श्रीकंठ सर्व योगप्रेमी वाचकांना योग्य दिशा दाखवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 24 March 2023