अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

शिवषडाक्षर महामंत्राचा विनियोग, न्यास इत्यादी सहित जप

काही आठवडे आपण महाशिवरात्री बद्दल माहिती घेत आहोत. मागच्या लेखात आपण शिवषडाक्षर महामंत्राचे महात्म्य जाणून घेतले. पारंपारिक पद्धतीनुसार कोणत्याही मंत्राचा जप करतांना पंचोपचार पूजन, ध्यान, विनियोग, न्यास वगैरे गोष्टी केल्या जातात. आधुनिक काळात बरेच साधक हे सर्व सोपस्कार न करता फक्त मंत्राचा जपच करतात. ज्यांना ह्या गोष्टींत रस आहे आणि त्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी आजचा लेख उपयोगी पडेल अशी आशा आहे. तुमच्याकडे जर संपूर्ण शिवमहापुराण असेल किंवा एखादे चांगले पुजापाठाचे पुस्तक असेल तर त्यातही यातील बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सापडतील.

ॐ अस्य श्रीशिवषडाक्षर मन्त्रस्य वामदेव ऋषिः,
अनुष्टुप छन्दः, सदाशिवो देवता,
ॐ बीजम्, नमः शक्तिः, शिवाय इति कीलकम
[[श्रीसाम्बसदाशिव प्रीत्यर्थे]] जपे विनियोगः

ऋष्यादि न्यास --
ॐ वामदेव ऋषये नमः शिरसि
ॐ अनुष्टुप छन्दसे नमः मुखे
ॐ श्रीसदाशिवो देवताये नमः हृदये
ॐ बीजाय नमः गुह्ये
ॐ नमः शक्तये पादयोः
ॐ शिवाय इति कीलकाय नमः नाभौ
ॐ श्रीसाम्बसदाशिव प्रीत्यर्थे विनियोगाय नमः सर्वांगे

कर न्यास --
ॐ ॐ अंगुष्ठाभ्याम् नमः
ॐ नं तर्जनीभ्याम् नमः
ॐ मं मध्यमाभ्याम् नमः
ॐ शिं अनामिकाभ्याम् नमः
ॐ वां कनिष्ठिकाभ्याम् नमः
ॐ यं करतलकरपृष्ठाभ्याम् नमः

अंगन्यास --
ॐ ॐ हृदयाय नमः
ॐ नं शिरसे स्वाहा
ॐ मं शिखाये वषट्
ॐ शिं कवचाय हुं
ॐ वां नेत्रत्रयाय वौषट्
ॐ यं अस्त्राय फट
इति न्यासः

वरील विनियोगाच्या श्लोकात कंसातील शब्द पहा. भगवान शंकराने पार्वतीला जेंव्हा षडाक्षर मंत्राची दीक्षा दिली तेंव्हा तिला सांगितले की -- शिवषडाक्षर मंत्र धर्म-अर्थ-काम-मोक्ष अर्थात सर्वस्व प्रदान करण्यास समर्थ आहे परंतु एवढ्या-तेवढ्या भौतिक कामनांच्या पूर्तीसाठी तो सहसा वापरू नये. तो महान फल प्रदान करणारा असल्याने त्याच्या वापरातही तारतम्य बाळगावे. हा उपदेश लक्षात घेऊन विनियोगात म्हटले आहे की या मंत्राचा जप कशासाठी केला जातो आहे तर -- श्रीसाम्बसदाशिव प्रीत्यर्थे अर्थात सदाशिवाची कृपाप्राप्ती व्हावी म्हणून. आवश्यकतेनुसार या मागणीत वरील उपदेश ध्यानी ठेऊन बदल करण्यास हरकत नाही.

मंत्रशास्त्रानुसार प्रत्येक मंत्राला ऋषी, देवता, छंद, बीज, शक्ती, कीलक वगैरे गोष्टी असतात. त्यांचा उल्लेख तर या विनियोगात असतोच पण हा जप कशासाठी केला जात आहे त्या संकल्पाचा निर्देश सुद्धा त्यात असतो.

वरील विनियोग म्हणून न्यास करायचे असतात. न्यास कसे करायचे ते एखाद्या जाणकार व्यक्तीकडून प्रत्यक्ष शिकणेच जास्त योग्य राहील. लेखी दिलेल्या सुचना आणि कृती समजण्यात गल्लत झाली तर चुकीच्या पद्दह्तीने न्यास घडतील. त्यामुळे येथे विस्ताराने फार काही सांगत नाही.

वरील गोष्टींत ग्रंथाग्रंथांत थोडेफार पाठभेद असू शकतात. तुमच्या श्रद्धेनुसार शुद्ध पाठ निवडावा म्हणजे झाले.

वरील सर्व सोपस्कार पार पडल्यावर ठरलेल्या संख्येने षडाक्षर मंत्राचा जप रुद्राक्षांच्या जपमाळेवर करावा. स्वच्छ आसन टाकून त्यावर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख होऊन बसावे. संक्षिप्त शिवपूजन करून तुपाचा अथवा तेलाचा दिवा लावावा आणि शांत चित्ताने डोळे बंद करून जपाला सुरवात करावी. उपलब्ध वेळेनुसार आगोदर गुरुमंत्राचा आणि गणेश मंत्राचा जप करायलाही हरकत नाही.

षडाक्षर मंत्राची एक माळ करायला तुम्हाला घड्याळाची पाच मिनिटे लागतात असे गृहीत धरले तर एकवीस माळा पूर्ण करायला तुम्हाला साधारण दीड-दोन तास लागतील. ज्यांना मंत्र म्हणण्याची फारशी सवय नाही त्यांना अर्थातच जास्त वेळ लागेल. ज्यांना नित्य सवय आहे ते वेळेनुसार माळांची संख्या सहज वाढवू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला सुट्टी असेल आणि तुमचा संकल्प दृढ असेल तर ते अगदी सहज शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

असो.

सर्व काम्य मंत्र एका बाजूला आणि शिवमंत्र एका बाजूला असं केलं तरी शिवनामाची गोडी आणि थोरवी काही औरच. सर्व वाचक ती अवीट गोडी चाखण्यास तत्पर होवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 10 February 2023