Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


श्रावण २०२३ -- या पाच शिव उपासना अवश्य करा

उद्यापासून महाराष्ट्रात श्रावण मास आरंभ होत आहे. या वर्षी अधिक मासामुळे श्रावण दोन महिने चालणार आहे. दिनांक १८ जुलै रोजी अधिक श्रावण सुरु होईल आणि दिनांक १७ ऑगस्ट रोजी निज श्रावण सुरु होईल. दिनांक १५ सप्टेंबर रोजी श्रावण संपणार आहे. अधिक माहितीसाठी अर्थातच पंचांग किंवा दिनदर्शिका पहावी म्हणजे नीट कळेल.

श्रावण म्हणजे भगवान शंकराचा महिना. कुंडलिनी योग, प्राणायाम, मुद्रा-बंध, अजपा जप, शांभवी मुद्रा, खेचरी मुद्रा, नादश्रवण वगैरे क्रियांनी युक्त अशी योगप्रणाली भगवान शंकरानेच मानवाच्या कल्याणासाठी प्रसृत केली असल्याने योगमार्गावर ज्यांना वाटचाल करायची आहे आणि लवकर सफलता मिळवायची आहे त्यांच्यासाठी श्रावणातील शिव उपासना महत्वाची आहे. त्या दृष्टीने आजच्या या लेखात पाच सोप्या उपासना सांगणार आहे. अर्थात या पाच उपासना तुमच्या मुख्य योगोपासनेच्या जोडीला करायच्या आहेत.

चला तर मग. सुरवात करुया.

या वेळी श्रावण दोन महिने चालणार आहे हे लक्षात घेऊन पहिली उपासना सांगणार आहे ती म्हणजे शिव महापुराणाचे वाचन. शिवभक्तांसाठी शिव महापुराण भक्ती वृद्धींगत करणारे आणि शिवलीलांचे अमृतमय सिंचन करणारे आहे. बाजारात सर्वसाधारण पूजेच्या किंवा पुस्तकांच्या दुकानात जे शिव महापुराण उपलब्ध होते ते तसे खूप छोटे असते. फक्त चित्रविचित्र गोष्टींचा संग्रह इतपतच त्याचे स्वरूप असते. संपूर्ण शिव महापुराणात सुमारे २४,००० श्लोक आहेत आणि ते सात संहितांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक संहितेत अध्याय आहेत. काही संहितांमध्ये एकापेक्षा अधिक खंड आहेत आणि प्रत्येक खंडांत अध्याय आहेत.

काही प्रकाशकांनी संपूर्ण २४,००० श्लोकांचे शिव महापुराण दहा-बारा खंडांत प्रकाशित केले आहे. त्याची किंमत अर्थातच खूप जास्त आहे. सर्वसाधारण वाचनासाठी एवढ्या समग्र खंडांची गरज नसते. धार्मिक पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीता प्रेस गोरखपूर यांनी माफक किमतीत संक्षिप्त शिव पुराण हिंदी भाषेत प्रकाशित केलेले आहे. मराठीतही संपूर्ण शिवपुराण काही प्रकाशकांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आपापल्या आवडीनुसार आणि बजेट नुसार शिवपुराण खरेदी करावे हे उत्तम. एक गोष्ट आवर्जून सांगीन ती म्हणजे -- उगाच उत्साहात जाडजूड ग्रंथ विकत आणला आणि मग कपाटांत किंवा फळीवर धूळ खात पडला असा प्रकार करू नका. आपली वाचनाची आवड आणि वेळेची सवड लक्षात घेऊनच ग्रंथ खरेदी करा.

शिवपुराण बाजारातून आणल्यानंतर भगवत गीता अथवा ज्ञानेश्वरी अथवा श्रीगुरुचरित्र जसे आपण पवित्र मानतो त्याचप्रमाणे या शिवपुराणाची सुद्धा काळजी घ्यावी. त्याचे पावित्र्य राखावे. त्याला सामान्य पुस्तक न मानता परम पवित्र अशा शिव आणि शिवा यांचे चरित्र आणि लीलावर्णन करणारा अध्यात्म ग्रंथ मानावे. वाचन करण्यास सुरवात करण्यापूर्वी ग्रंथाची अल्पशी पूजा करून वाचनास सुरवात करावी. रोजचे वाचन झाल्यावर ग्रंथ नीट कापडात गुंडाळून ठेवावा किंवा देवाजवळ ठेऊन द्यावा.

दुसरी उपासना जी तुम्हाला सहज करता येण्यासारखी आहे ती म्हणजे शिव यंत्रांचे पूजन. भगवान शंकराशी संबंधित अनेक यंत्रे शास्त्रात वर्णीत आहेत. त्यांतील तीन शिव यंत्रे अधिक प्रचलनात आहेत -- शिव पंचाक्षर यंत्र, शिव पंचदशी यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र. ही यंत्रे तांब्याच्या जाड पत्र्यावर उठवलेली किंवा फोटो फ्रेम स्वरूपात सुद्धा पूजेच्या दुकानांत उपलब्ध असतात. तांब्याच्या पत्र्यावर उठवलेली अथवा कोरलेली यंत्र उपासनेच्या दृष्टीने अधिक लाभकारी मानली जातात. अनेक साधक ही यंत्रे भूर्जपत्रावर सुद्धा अष्टगंध अथवा शाईने काढतात आणि मग पूजेत ठेवतात. या यंत्रांची नित्य पूजा करणे, त्यांना धूप-दीप दाखवणे आणि त्यांच्यापुढे शिव मंत्रांचा आणि स्तोत्रांचा जप / पाठ करणे असे यंत्र उपासनेचे सामान्य स्वरूप असते.

वर उल्लेख केलेल्या यांत्रांतील शिव पंचाक्षर यंत्र हे परम सात्विक असून भगवान शंकराची प्रसन्नता प्रदान करणारे मानले गेले आहे. अष्टदल, त्यामध्ये शिव आणि शक्ती त्रिकोण आणि मध्यभागी शिव पंचाक्षर मंत्र असे या यंत्राचे स्वरूप असते. शिव पंचदशी यंत्र थोडे निराळे असते. त्याच्या मध्यभागी एक आकड्यांनी बनलेली चौरसाकृती असते. त्यात आकडे भरलेले असतात. उभे, आडवे, तिरके अशी कशीही बेरीज केली तर ती पंधरा येते म्हणून त्याला पंचदशी यंत्र म्हणतात. या चौरसाच्या बाहेर शिव षडक्षर मंत्र विशिष्ठ प्रकारे अंकित केलेला असतो. तिसरे यंत्र म्हणजे महामृत्युंजय यंत्र. पारंपारिक मान्यतेनुसार आधी-व्याधी नष्ट होण्यासाठी या यंत्राची उपासना केली जाते.

तिसरी उपासना म्हणजे रुद्राक्ष पूजन. सर्वसाधारणपणे रुद्राक्षाचा वापर जपमाळेच्या स्वरूपात किंवा गळ्यात परिधान करण्याच्या माळेच्या स्वरूपात केला जातो. रुद्राक्ष शरीरावर धारण करणे हा जरी रुद्राक्षांचा सर्वात जास्त परिणामकारक उपयोग असला तरी रुद्राक्षाचा वापर पूजनासाठी सुद्धा केला जातो. श्रावणात एक गोष्ट करा. एखाद्या मान्यवर पुजापाठाचे साहित्य विकणाऱ्या दुकानातून पाच पंचमुखी रुद्राक्ष आणा. माळेसाठी वापरले जाणारे रुद्राक्ष आकाराने जरा लहान असतात. हे पाच रुद्राक्ष आणाल ते चांगले आकाराने मोठे असे आणा. त्याना गंगाजलाने, पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालून नीट कोरडे करा. त्यानंतर कोणत्याही श्रावणी सोमवारी किंवा प्रदोष दिनी हे पाच रुद्राक्ष घेऊन शिवमंदिरात जा. तेथे शिवलिंगावर हे रुद्राक्ष मनोभावे अर्पण करा. पाच-दहा मिनिटे तेथेच थांबून षडक्षर मंत्राचा जप करा. मग ते पाचही रुद्राक्ष परत गोळा करा आणि त्याना घरी घेऊन या. हे रुद्राक्ष आता लाल कपड्यात बांधा किंवा भस्माच्या / विभूतीच्या डबीत नीट झाकून ठेवा. इतर देवी-देवतां बरोबरच या रुद्राक्षांची पूजा करा.

वरील रुद्राक्ष उपासनेत मी पंचमुखी रुद्राक्ष सांगितले आहेत कारण ते सहज उपलब्ध होतात आणि किंमतीच्या दृष्टीने परवडणारे असतात. एकमुखी, सप्तमुखी, अष्टमुखी रुद्राक्ष सुद्धा अनेकवेळा पूजनात ठेवले जातात.

श्रावणात करण्यासाठी चौथी उपासना जी सांगणार आहे ती म्हणजे शिवलिंग पूजन. भगवान शंकराची पूजा मूर्ती किंवा चित्राच्या स्वरूपात जेवढी केली जाते त्यापेक्षा कितीतरी अधिक ती शिवलिंगाच्या स्वरूपात केली जाते. शिवलिंग हे अनेक गोष्टींपासून बनवता येते. पाषाण, पंचधातू, पारद, स्फटिक वगैरे गोष्टींनी बनलेल्या शिवलिंगा बरोबरच नर्मदेश्वर शिवलिंग सुद्धा लोकप्रिय आहे.

पारा हा भगवान शंकराचं वीर्य मानला गेला आहे. प्राचीन सिद्ध परंपरेत पारद विज्ञान किंवा रस सिद्धीला खूप महत्व होते. पारा आणि त्यासंबंधित इतर अनेक गोष्टी वापरून चमत्कारिक गोपनीय प्रयोग केले जात असत. पारद शिवलिंग अर्थातच पाऱ्या पासून बनवलेले असते. पाऱ्याबरोबर इतर काही वनस्पती आणि गोष्टी मिसळून ते तयार केले जाते. आजकालच्या भेसळीच्या जमान्यात शुद्ध पारद मिळणे कठीण आहे. त्यामुळे खात्रीलायक दुकानातूनच ते खरेदी करावे. स्फटिक शिवलिंगाच्या बाबतीतही हाच प्रकार घडू शकतो. स्फटीकाच्या ऐवजी काच किंवा अन्य काही गोष्टींचा वापर झालेला असतो. नर्मदेश्वर शिवलिंग नर्मदेतील गोट्यांपासून बनवले जाते. साधारणतः पंचधातू, पारद आणि स्फटिक शिवलिंगात लिंग आणि योनी / जलधारी / शाळुंका असा एकसंध साचा असतो. नर्मदेश्वर शिवलिंगाच्या बाबतीत मात्र लिंग दगडाचे आणि जलधारी स्वतंत्र धातूची बनवलेली असते. या सर्व गोष्टी केवळ एक ढोबळ मानाने कल्पना यावी म्हणून सांगत आहे. नीट माहिती घेऊन खात्रीलायक अशा दुकानातूनच ह्या गोष्टींची खरेदी करावी हे उत्तम.

शिवलिंग घरी आणल्यावर श्रावण काळात नित्य पंचोपचार पूजन करावे. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवैद्य अशा पाच गोष्टींनी केलेले पूजन म्हणजे पंचोपचार पूजन. हे पूजन घरोघरी केले जात असल्याने फार काही विस्ताराने सांगण्याची गरज नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ठ परंपरेशी अथवा पंथाशी जोडलेले असाल तर तुमच्या मार्गातील प्रथेनुसार पूजन करावे हेच श्रेयस्कर आहे. मला स्वतःला माझ्या श्रीगुरुमंडला कडून बाह्यपूजा भस्माने आणि अंतर्पुजा ध्यानाने करण्याचा आदेश झालेला आहे त्यामुळे मला फारसे काही साहित्य किंवा सोपस्कार करावे लागत नाहीत. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार याबाबतीत आचरण करावे.

पाचवी आणि शेवटची उपासना सांगणार आहे ती म्हणजे शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचे नित्य पाठ. अक्षय तृतीये निमित्त केलेल्या व्हिडीओ मध्ये मी त्याविषयी अधिक विस्ताराने सांगितले आहे. श्रावणात रोज आठ पाठ करण्याचा संकल्प करावा. हे पाठ ब्रह्ममुहूर्तावर अथवा प्रदोषकाळी अथवा दोन्ही वेळेला करता येतील. प्रथम षडाक्षर मंत्राचा किंवा दारिद्र्य दहन मंत्राचा एक माळा जप आणि त्यानंतर स्तोत्राचे पाठ असा उपक्रम श्रावणात नित्यप्रती करावा.

असो.

केवळ लोटाभर पाण्याने प्रसन्न होणारा भगवान सांब सदाशिव श्रावणातील उपासना करणाऱ्या सर्व वाचकांना मनोवांच्छित फळ प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 17 July 2023