Ajapa Gayatri : Meditative breath for the modern mind. Rediscover the sacred rhythm of your breath. Awaken inner silence that guides, heals, and transforms.


गोरक्षनाथांच्या प्राणायामा संबंधी काही महत्वाच्या सूचना

गोरक्ष शतकावरील या लेखमालेच्या मागील भागात आपण गोरक्षनाथांच्या गोपनीय नाडीशोधन प्राणायमा विषयी जाणून घेतले. आता ते प्राणायाम साधने विषयक काही महत्वाच्या सूचना सांगणार आहेत. या लेखात आपण त्या विस्ताराने जाणिण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एखादा रोगी जेंव्हा डॉक्टरकडे जातो तेंव्हा डॉक्टर त्याला औषध तर देतातच पण काही पथ्यपाणी करायला सांगतात. जो रोगी डॉक्टरांनी दिलेल्या औषधा बरोबर त्यांनी सांगितलेले पथ्यपाणी पाळतो तो लवकर बरा होतो. या उलट जो रोगी फक्त औषधांचे सेवन करतो पण डॉक्टरांनी सांगितलेले पथ्यपाणी मात्र पाळत नाही तो बरा होत नाही अथवा त्याला बरे होण्यास खूप विलंब होतो. याचप्रमाणे प्राणायाम साधकाने प्राणायामासोबत काही पथ्यपाणी करणे आवश्यक आहे. गोरक्षनाथांनी सांगितलेले हे पथ्यपाणी म्हणजेच प्राणायाम साधनेच्या बाबतीतले नियम व सूचना आहेत.

अङ्गानां मर्दनं शस्तं श्रमसंजातवारिणा ।
कट्वम्ललवणत्यागी क्षीरभोजनमाचरेत् ॥
मन्दं मन्दं पिबेद्वायुं मन्दं मन्दं वियोजयेत् ।
नाधिकं स्तम्भयेद्वायुं न च शीघ्रं विमोचयेत् ॥
ऊर्ध्वमाकृष्य चापानं वातं प्राणे नियोजयेत् ।
मूर्धानं नीयते शक्त्या सर्वपापैः प्रमुच्यते ॥

वरील तीन श्लोकांत गोरक्षनाथांनी सहा महत्वाच्या गोष्टींकडे निर्देश केलेला आहे. एखाद्या वरवर वाचणाऱ्याला त्या सगळ्या जाणवणारही नाहीत कदाचित परंतु सखोल अभ्यास करणाऱ्याला मात्र त्यांतील सूक्ष्म निर्देश जाणवेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आता पाहूया.

प्राणायामाची साधना ही मोकळ्या आणि शुद्ध वातावरणात करायची असते. त्यामुळे तसं बघायला गेलं तर प्राणायाम करत असतांना घाम येण्याची शक्यता कमी असते. सामान्य प्राणायामात तो येतही नाही. गोरक्षनाथांनी जो नाडीशोधन प्राणायामाचा विधी सांगितलं आहे तो मात्र भिन्न आहे. पूरक, रेचक आणि कुंभक यांच्या जोडीला चंद्र आणि सूर्य बिंबाचे ध्यानही त्यात समाविष्ट आहे.

हा प्राणायाम करत असतांना मंद-मंद घाम येतो. माझ्या साधक दशेत मी दिवसांतील तीन संध्याकालात प्राणायाम करत असे. सुरवातीच्या काळात तो करत असतांना मला असा घाम येत असे. उष्णतेमुळे किंवा ऊन्हामुळे जो घाम येतो तो आपल्याला नकोसा वाटतो. प्राणसाधना करतांना आलेला घाम मात्र नकोसा वाटत नाही. संपूर्ण शरीरभर जणू घर्म बिंदूंची नाजुक जाळी विणावी तसा हा घाम येतो.

येथे गोरक्षनाथांनी पहिला सल्ला दिलेला आहे तो म्हणजे प्राणायाम साधना करत असतांना आलेला हा घाम शरीरावरच चोळून चोळून जिरवून टाकावा. आता हा प्रकार काही मंडळींना किळसवाणा वाटू शकतो पण या घामाची तुलना सामान्यतः जो घाम येतो त्यांच्याशी करून चालणार नाही. हा घाम प्राण उर्जेने जणू भारला गेलेला असतो. चार्ज झालेला असतो. हा घाम चोळण्याचा काही फायदा आहे का असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. येथे गोरक्षनाथांनी जरी फायद्या विषयी काही स्पष्टपणे सांगितले नसले तरी माझा अनुभव असा आहे की त्याने दिवसभर ऊर्जावान वाटते. जर तुम्हाला मिळालेल्या गुरुमंत्राचा अथवा इष्टमंत्राचा जप करत-करत तुम्ही जर तो चोळलात तर साधनेला अधिकच पुष्टी येते. प्राणायामा नंतर जर तुम्ही लगेचच ध्यानाला बसणार असाल तर ध्यानाला बसल्यावर आळस किंवा झोप बिलकुल येत नाही.

गोरक्षनाथांची दुसरी महत्वाची सूचना आहारा संबंधीची आहे. ते सांगतात की प्राणायाम साधकाने कटू, अम्ल आणि लवण या तीन रसंचा त्याग केला पाहिजे. आयुर्वेदात षडरसांची संकल्पना आहे. आहारातील हे सहा रस म्हणजे मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. या पैकी कटू रस म्हणजे तिखट आणि मसालेदार पदार्थ. कटू रसाचे अति सेवन झाले तर शरीर शुष्क बनते. अंगातील उष्णता वाढते. प्राणायामाने शरीरात आधीच पवनाभ्यासामुळे काहीशी उष्णता झालेली असते, शुष्काता आलेली असते. त्यामुळे तिखट पदार्थ तालायाला हवेत. अम्ल म्हणजे आंबट पदार्थ. आंबट पदार्थ शरीरातील कफ द्रव्य वाढवतात. हा कफ मग नाक, घसा, फुफुसे, सायनस अशा जागी साठतो. प्राणायाम करतांना श्वाशोच्छ्वास नीट घडत नाही. त्यामुळे आंबट पदार्थ सुद्धा टाळायला हवेत. लवण म्हणजे खारट पदार्थ. खारट पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्याने रक्त आणि पित्त यांचा प्रकोप होतो. त्यामुळे असे पदार्थही टाळायला हवेत.

काय खाऊ नका ते सांगितल्यावर गोरक्ष महाराज म्हणतात की प्राणायाम साधकाने क्षीरभोजन करावे. क्षीर म्हणजे दूध. क्षीरभोजन म्हणजे असे भोजन ज्यामध्ये गोदुग्ध आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश होतो. येथे लक्षात घ्यायला हवे की येथे अभिप्रेत असलेले क्षीरभोजन हे जुन्या काळातील पारंपरिक विधी नुसार बनवलेले असणे अपेक्षित आहे. आजकाल सर्वच गोष्टींत असणारी भेसळ आणि खालावलेला दर्जा लक्षात घेऊन या सल्ल्या कडे पहावे हेच योग्य ठरेल.

त्यानंतर गोरक्षनाथ महाराज सांगतात की प्राणायाम करत असतांना वायुपान हे मंद-मंद गतीने करावे आणि त्याच धर्तीवर वायु वियोजन सुद्धा मंद-मंद गतीने करावे. प्राणायाम करतांना होणारी एक सामान्य चूक म्हणजे श्वास आणि / किंवा प्रश्वास हे जलद गतीने करणे. एक लक्षात घ्या की श्वासांद्वारे तुम्ही प्राणशक्ती हाताळत आहात. ज्या प्रमाणे सर्कशीताला रिंगमास्टर वाघ-सिंह अशा हिंस्र प्राण्यांवर त्यांच्या काळाकलाने घेत हळूहळू ताबा मिळवतो त्या प्रमाणे प्राणशक्तीवर सुद्धा हळूहळू ताबा मिळवावा लागतो. त्यांत चूक झाली तर शरीरात रोग-व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गोरक्षनाथ सांगतात की श्वास अगदी सावकाश मंद-मंद गतीने आत घ्या आणि बाहेर सोडा. अर्थात पूरक आणि रेचक हे अतिशय हळुवारपणे, सावकाशपणे करा.

पूरक आणि रेचक मंद गतीने करावा असे सांगितल्यावर ते पुढे म्हणतात की वायु रोखून धारण्याची अथवा वायु स्तंभनाची क्रिया अर्थात कुंभक हा कधीही स्वतःच्या आवख्या बाहेर किंवा प्रमाणाबाहेर करू नये. कुंभक करत असतांना वायु स्तंभन घडत असते. शरीराला मिळणारा हवेचा पुरवठा काही काळासाठी थांबलेला असतो. त्याच बरोबर वायु स्तंभनामुळे शरीरानतर्गत दाब वाढतो ज्यामुळे डोळे, छाती, कान आणि अन्य अवयवांवर अतिरिक्त दाब पडत असतो. हे सर्व लक्षात घेऊन स्वतःची श्वास रोधनाची क्षमता ओळखले आणि त्यानुसार ती ओलांडली जाणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. कुंभक सोडतांना श्वास वेगाने बाहेर टाकण्याची प्रवृत्ती असते. ती सुद्धा कटाक्षाने टाळायला हवी.

पुढे गोरक्षनाथ सांगतात की प्राणायाम साधकाने प्राणायाम करत असतांना अपान वायु वरती खेचावा आणि त्याला प्राण वायुशी जोडावा. हे करण्यासाठी मूलबंध, उड्डियान बंध आणि जलंधार बंध उपयोगी पडतात. गोरक्षशतकात या बंधांचे वर्णन प्राणायामाच्या आधी का आलेले आहे ते आता तुमच्या ध्यानी येईल. प्राण आणि अपान यांचा नुसता संयोग करून थांबायचे नाहीये तर त्याही पुढे जाऊन कुंडलिनी शक्तीच्या सहाय्याने प्राण मुर्धा स्थानी अर्थात मास्तकार अर्थात सहस्रार चक्रात घेऊन जायचचा आहे. प्राणाला कुंडलिनी शक्तीच्या मदतीने सहस्रारात घेऊन गेल्याचा फायदा म्हणजे सर्व पापांचा नाश असे गोरक्ष महाराज सांगतात.

गोरक्षनाथांची ही शेवटची सूचना सर्वात कठीण आणि गुंतागुंतीची आहे. गुरुकृपा असल्याशिवाय हा विधी तुम्हाला कळणार नाही. विशेषतः प्राणायामाने पापनाश कसा काय होतो ते गुरुमुखातून नीट समजून घेतले पाहिजे. एखाद्या पवित्र नदीत किंवा सांगमावर स्नान केल्याने पापनाश होतो अशी श्रद्धा असलेले लाखो लोकं आहेत. या श्रद्धेमागील तत्वज्ञान आणि हेतु समजून न घेता फक्त डुबकी मारणे एवढाच उपक्रम हाती घेतला तर त्याने अपेक्षित लाभ होईल का? नाही. त्याच प्रमाणे केवळ नाडीशोधन प्राणायामाची आवर्तने करून सर्व पापांचा नाश होणारा नाही. त्या मागील सूक्ष्म अर्थ गुरुमुखातून समजाऊन घेतला पाहिजे. आज जगभरात प्राणायाम करणारे अक्षरशः लाखो अभ्यासक आहेत परंतु त्या सर्वांची पापे नष्ट होताहेत का? ते उच्चा आध्यात्मिक प्रगती करत आहेत का? नाही. ज्यांना प्राणायाम आणि पापनाश यांमधील गुढगम्य संबंध लक्षात आलेला आहे तेच केवळ असा पापनाश साधू शकतील.

असो.

प्राण आणि अपान ही जिची जणू लहान बाळे आहेत ती जगदंबा आदीशक्ती कुंडलिनी सर्व योग साधकांना ऊर्ध्वगामी बनून सहाय्यभूत होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ भगवान शिव प्रणीत योग विद्येचे आणि अजपा गायत्रीचे उपासक आणि मार्गदर्शक आहेत. व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 28 April 2025

Protected by Copyscape