अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

चहाचा कप आणि उंबराचे झाड -- श्रीदत्त जयंती २०२३

आज श्रीदत्त जयंती आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्व वाचक मंडळींना त्या प्रीत्यर्थ खूप खूप शुभेच्छा. आज फारसे निरुपणात्मक काही न लिहिता माझ्या आयुष्यातील एक-दोन जुने प्रसंग सांगणार आहे. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की मला योगमार्गावर आणण्याचे श्रेय जाते ते ज्ञानेश्वरीला. मग शंभू महादेवाने मला बोट धरून पुढचा मार्ग दाखवला. त्याच शंभू महादेवाने मला दत्तभक्तीची गोडी कशी लावली आणि मी पहिली दत्त उपासना कोणती केली त्या विषयी काही गोष्टी आज सांगणार आहे.

हे प्रसंग सांगण्या आगोदर थोडी पार्श्वभूमी आणि काही योगायोगां विषयी सांगणे आवश्यक आहे कारण ते कळल्यावर त्या प्रसंगांची संगती तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लावता येईल. आपण बहुतेक सण, धार्मिक दिवस, पर्व वगैरे हे तिथीनुसार साजरे करतो. श्रीदत्त जयंतीचेच सांगायचे झाले तर भगवान दत्तात्रेयांचे मंगलमय अवतरण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी झाले असे आपण मानतो. त्याच प्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे अवतरण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला झाले असे आपण मानतो. एवढेच नाही तर संत ज्ञानेश्वरांचे अवतरण सुद्धा श्रावण कृष्ण अष्टमीचेच. या दोन तिथी येथे मुद्दाम सांगितल्या कारण माझ्या आयुष्यात त्या मला गूढ आध्यात्मिक संकेत देऊन गेल्या आहेत.

माझ्या आई-वडिलांचा विवाह झाला तो तिथी प्रमाणे श्रीदत्त जयंतीचा दिवस होता आणि नंतरच्या काळात माझा जन्म झाला तो तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस होता. आता योगायोग बघा. ज्या श्रीकृष्णाने भगवत गीते सारखे अमुल्य तत्वज्ञान सांगितले तो प्रकटला श्रावण कृष्ण अष्टमीला. ज्या संत ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाची भगवत गीता अमृतापेक्षा गोड अशा मराठीत आणली त्या संत ज्ञानेश्वरांचा जन्म सुद्धा श्रावण कृष्ण अष्टमीचा. श्रावण कृष्ण अष्टमीला अवतरण झालेल्या या दोन दिग्गजांनी जी शिकवण दिली त्त्या शिकवणीने श्रावण कृष्ण अष्टमीलाच जन्मलेल्या माझ्यासारख्या एका यःकश्चित योग साधकाचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकले.

हा तिथीचा योगायोग एवढ्यावरच संपत नाही. ज्ञानेश्वरीमुळे जरी मी कुंडलिनी योगमार्गावर पहिले पाउल ठेवले असले तरी माझा इष्ट किंवा आध्यात्मिक मायबाप बनला तो मात्र शंभू महादेव. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायाचे गारुड माझ्यावर एवढे बसले होते की त्या दिवसापासून सांब सदाशिवाला मी अगदी घट्ट धरून ठेवले. भविष्य पुराणात प्रतिपदा ते पौर्णिमा-अमावस्या अशा सर्व तिथींचे स्वामी कोण-कोण देवता आहेत, त्यांची उपासना कशी करावी आणि त्या उपासनेची फलश्रुती काय त्यासंबंधी त्रोटक उल्लेख आढळतो. त्यानुसार अष्टमी तिथीचा स्वामी आहे भगवान शंकर. विपुल अध्यात्म ज्ञान, ज्ञानानंद आणि भवसागर पार करण्याचे सामर्थ्य अशी शिवउपासनेची फलश्रुती सुद्धा तेथे सांगितली आहे. अशा या अष्टमीचा स्वामी असलेल्या शंभू महादेवाने मला शक्तिपात-मंत्र-साधना-उपदेश देऊन नंतरच्या काळात श्रीदत्त उपासना सुद्धा करण्याची आज्ञा दिली आणि ती यथायोग्य करवूनही घेतली.

पुढे जे दोन प्रसंग मी सांगणार आहे त्यांची संगती कळण्यासाठी ही पार्श्वभूमी कदाचित उपयोगी पडेल म्हणून एवढे सगळे पाल्हाळ सांगत बसावे लागले. असो. पुढे जाऊ.

शंभू महादेवाने दीक्षा दिल्या नंतरच्या काळात माझी दैनंदिन साधना सुरु झाली होती. काही काळ असाच सरला होता. एक दिवस अचानक संकेत मिळाला की भगवान दत्तात्रेयांची साधना करावी. मला देव आणि गुरुतत्व म्हणून त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्तात्रेयांची ओळख होती परंतु साधना नेमकी काय करायची ते समजत नव्हते. साधारणतः दत्तात्रेयांची उपासना पूजा-पाठ, गुरुचरित्राचे पारायण, अन्य दत्त लीलाग्रंथांचे वाचन, दत्त मंत्राचा जप, नामस्मरण, स्तोत्रे वगैरे पद्धतीने करतात. सुरवातीपासूनच माझा ओढा हा कुंडलिनी योगाकडे असल्याने वरील प्रकारच्या उपासना मनाला तितक्याशा भुरळ घालत नव्हत्या. असेच काही आठवडे गेले आणि एक दिवस महादेवानेच साधना संकेत दिला. येथे फार काही सांगणे शक्य होणार नाही परंतु कुंभक युक्त प्राणायामा बरोबर करायचा एक विचित्र मंत्र, भूमिशयन, स्व-पाकी मिताहारी रहाणे असे साधनेचे साधारण स्वरूप होते. नेहमी प्रमाणेच हा मंत्र सुद्धा कोणत्याही पुस्तकात किंवा प्राचीन ग्रंथांत नव्हता. या मंत्राची अजून एक खासियत म्हणजे तो दत्तात्रेयांचा एक विशिष्ठ मंत्र आणि त्याला दुसऱ्या एका विशिष्ठ शिव मंत्राचे संपुट लावलेले अशा स्वरूपातील संयुक्त मंत्र होता. तुमच्यापैकी ज्यांना मंत्रशास्त्राची माहिती आहे त्यांना माहित असेल की मंत्राला संपुट लावले की मंत्राची ताकद कित्येक पटीने वाढते. या मंत्राच्या बाबतीत सुद्धा तसेच काहीसे होते. अतिशय तीव्र आणि काहीसा उग्र-तीक्ष्ण असा तो मंत्र होता.

पलंग किंवा कॉटवर न झोपता जमिनीवर चटई किंवा मॅट टाकून झोपणे आणि स्वतःचे जेवण स्वतः बनवणे हे काही माझ्यासाठी नवीन नव्हते. मी या गोष्टी नित्य करतच होतो. फक्त या नवीन मिळालेल्या साधनेचा नियम म्हणून या गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी आणि अल्पसे बदल करणे तेवढे आवश्यक होते. सगळ्यात कठीण होती ती कुंभकयुक्त मंत्रसाधना. कुंभकयुक्त प्राणायामात मंत्र म्हणणे हे वाचायला जरी अगदी सोपे वाटत असले तरी त्यावेळी प्रत्यक्ष करताना मला चांगलाच घाम फुटत असे. अंगात प्रचंड उर्जा वहात असे. बरीच आवर्तने केल्यावर प्राणायामाच्या स्थितीतच गुंगी आल्यासारखी अवस्था होत असे. भगवान दत्तात्रेयांची मी केलेली ही पहिली साधना.

सुरवातीचे सहा-आठ महिने वरकरणी काहीच घडले नाही. एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे माझ्या मनात भगवान दत्तात्रेयां विषयी अत्यंत प्रेम, भक्ती, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण झाला. आत्तापर्यंत दत्तात्रेयांची फक्त ओळख होती. आता दत्तचरणी प्रगाढ भक्ती जडली. शंभू महादेवा विषयी माझ्या मनात जो भाव होता अगदी तंतोतंत तोच भाव आता दत्तात्रेयां विषयी विकसित झाला. शिव आणि दत्त यांच्यातील एकत्व हळूहळू मनामध्ये अगदी घट्ट रुजले. असं वाटू लागलं की मी आणि दत्तात्रेय एकमेकांना जणू अनेक जन्मांपासून ओळखत आहोत. करता करता साधना मिळाल्या नंतरची पहिली श्रीदत्त जयंती आली. त्या दिवशी मी अन्य काही कामात अत्यंत व्यस्त होतो. नित्य साधना जेमतेम उरकली होती. देवळात जाऊन दर्शन घेणे तर सोडाच पण घराच्या घरी एखादे फुल किंवा पानही देवाला वहाता आले नव्हते. रात्री उशिरा घरी आल्यावर थकल्या-भागल्या अवस्थेत चहा केला आणि चहाचा कप हातात घेतलेल्या स्थितीत देव्हाऱ्यातील दत्ताच्या मूर्तीकडे पाहून म्हटले -- अरे देवा महाराजा! आज तुझा दिवस आहे पण तुझी विशेष काही सेवा करता आली नाही. आज तुला खडीसाखर किंवा गुळाचा खडा यांवरच समाधान मानावे लागणार आहे. एवढे म्हणून मी चहाचा कप ओठांना लावणार तोच जणू आकाशवाणी झाल्यासारखे धीरगंभीर शब्द आले -- "चहा दे."

आपल्याला येणारे काही अनुभव असे काही विलक्षण असतात की आपण त्यांना तर्काच्या कसोटीवर घासून बघूच शकत नाही. हा अनुभव सुद्धा तसाच होता. ही "आकाशवाणी" एवढ्या अनपेक्षित पणे कानांवर आदळली होती की ऐकल्याक्षणी हात थबकले. अंगाला हलका कंप सुटला. क्षणभर काय करावे ते कळेना. मी सगळा चहा माझ्या कपात ओतून घेतला होता. थरथरत्या हातांनी तोच चहाचा कप दत्तात्रेयांच्या पुढ्यात ठेवला आणि नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गारढोण झालेला चहा श्रीगुरुमंडलाचा प्रसाद समजून घटाघटा पिवून टाकला. त्या दिवसापासून मी रोज सकाळी पहिली गोष्ट काय करू लागलो तर गरमागरम चहा बनवून शंभू महादेव-दत्तात्रेय-गोरक्ष यांच्या पुढ्यात ठेवू लागलो. त्यांनीही माझ्या हातचा चहा मग तो अगोड होवो की अतिगोड, कमी दुधाचा असो की जास्त दुधाचा, मसाल्याचा असो वा साधा, आनंदाने स्वीकारला आहे.

पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे ती म्हणजे अध्यात्म मार्गावर चहा हा तसा तामसिक आणि निषिद्धच मानला जातो. मला दत्तात्रेयांचा आदेश होता म्हणून मी हा प्रघात सुरु केला आणि माझ्या श्रीगुरुमंडलानेही तो आनंदाने मान्य केला. परंतु केवळ माझा वरील अनुभव वाचून कोणी तसं काही करण्याच्या फंदात पडू नये. तुम्ही सात्विक आणि रूढ उपासना मार्गाला मान्य असलेले आचरणच करावे हे उत्तम.

या अनुभवानंतर श्रीदत्त योगोपासनेत मन अधिकच तल्लीन होऊ लागले. अजून काही महिने गेल्यावर हळूहळू साधनेतील अनुभव येऊ लागले. प्राणायामाच्या गुंगीत दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन होणे, दत्तात्रेयांच्या एखाद्या अवयवाचे जसे त्रिशूल धरलेला हात, रुद्राक्ष माला धारण केलेली मान वगैरे दर्शन होणे, अंगावरून पितांबर चादरी प्रमाणे ओढून घेतल्याचा आभास होणे, अंगावर दत्तात्रेयांच्या योगदंडाचा स्पर्श झाल्यासारखे वाटणे, भस्माचा शिडकावा झाल्यासारखे वाटणे वगैरे वगैरे अनेक अनुभूती येऊ लागल्या. हे अनुभव फार काही विस्ताराने येथे सांगणे उचित होणार नाही. या अनुभवां बरोबरच ध्यानाची प्रगाढता अत्यंत वाढली. दिवसभर एक प्रकारची आध्यात्मिक धुंदी जाणवू लागली. अशीच काही वर्षे सरली आणि एक दिवस दत्तात्रेयांची ही विशेष साधना पूर्णत्वास जाऊन माझ्या मुख्य साधनेत विलीन झाली. साधना पूर्णत्वास गेली, विलीन झाली म्हणजे नक्की काय झाले ते श्रीगुरुमंडलाने आखून दिलेल्या मर्यादेमुळे प्रकटपणे येथे सांगता येणार नाही. दोन भांड्यांमधील पाणी आता एकाच भांड्यात ओतले गेले असं समजा.

माझी साधना दृढावत असतांना अजून एक गोष्ट माझ्या नकळत समांतर पणे घडत होती. माझ्याकडे छोट्याशा कुंडीत लावलेले एक तुळशीचे रोप होते. तुम्हाला माहित असेल की तुळशीच्या रोपाचा बहर एकदा संपून गेला की मग ते रोप हळूहळू सुकू लागते. तसच या तुळशीच्या बाबतीत झाले होते. तुळस संपूर्ण सुकून गेल्यावर सुद्धा ते सुकलेले झाड त्या कुंडीत तसेच होते. थोड्या दिवसांनी मी दुसरे तुळशीचे रोप आणले आणि या पहिल्या कुंडीच्या शेजारीच ठेऊन दिले. रोज सकाळी तुळशीला पाणी घालत असतांना सवयीने त्या पहिल्या कुंडीत सुद्धा मी थोडे पाणी घालत असे. वास्तविक त्या कुंडीतील तुळस आता पूर्णपणे सुकून गेली होती. त्या झाडाच्या फांद्या सुद्धा वाळून तुटून गेल्या होत्या. तरी पण एवढ्या दिवसांच्या सवयीने म्हणा किंवा ईश्वरी इच्छा म्हणा मी त्या कुंडीत सुद्धा पाणी घालत असे.

एक दिवस त्या पहिल्या कुंडीत इवलेसे एक रोपटे उगवले. खूप लहान होते त्यामुळे मला काही ओळखता आले नाही. मी आपला रोजच्या रोज दुसऱ्या तुळशी बरोबर या पहिल्या कुंडीत पाणी घालत होतो. रोपटे थोडे वाढले. चांगले वितभर झाले. मग मात्र एके दिवशी ते कसले आहे ते पाहण्यासाठी कुतूहलाने मी कुंडी आत घेतली. मला खूप आश्चर्य वाटले कारण ते चक्क उंबराचे रोपटे होते. हे इथे कसे काय उगवले? मनाने उंबर-औदुंबर-दत्तात्रेय ही लिंक लगेच जोडली. उंबराचे झाड हे काही दुर्मिळ वगैरे अजिबात नाही परंतु मी न लावता हे उंबराचे झाड आपोआप उगवले होते. माझ्यासाठी ते झाड म्हणजे जणू दत्तात्रेयांचा प्रसाद होता. त्या रोपट्याच्या पानांवर अलगद हात फिरवत मी मनातल्या मनात म्हटले -- अरे माझ्या लाडक्या अवधूता! तू तुझ्या प्रसन्नतेचा संकेत असा दिलास तर. हे नवीन उंबराचे झाड आल्यावर मला एक वेगळाच छंद जडला. तुळशीला आणि त्या उंबराला पाणी घालत असतांना दत्तात्रेयांची स्तोत्रे किंवा स्तुती मी म्हणू लागलो. पुढील अनेक वर्षे माझा हा परिपाठ सुरु होता.

शांभवी विद्ये अंतर्गत येणारा योग, ध्यान, अजपा जप, शांभवी मुद्रा वगैरे उपासना या परमेश्वराकडे जाण्याचा थेट मार्ग आहे. तुम्ही जर झापडं लावून अन्य सरधोपट उपासना मार्ग निवडलात तर मग त्यात सफलता मिळेल याची काही शाश्वती नाही. शांभवी योगमार्गावर वाटचाल करण्यासाठी सर्वांचीच मनोभूमी तयार नसते हे जरी खरं असलं तरी कधी तुम्हाला या मार्गाविषयी आंतरिक ओढ वाटलीच तर तो ईश्वरी शुभसंकेत समजून या मार्गावर जरूर पाउल ठेवा. अगदी पूर्णपणे योगमार्गाला कवटाळले जरी नाही तरी एक गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच करू शकता ती म्हणजे जी काही ईश्वरोपासाना तुम्ही करत आहात त्याला ध्यानोपासनेची जोड देणे. ध्यानोपासनेनी तुमच्या मनाचा पोत सुधारतो आणि परिणामी इतर कोणतीही उपासना अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ लागते. त्यासाठी ध्यानोपासना सखोलपणे शिकली पाहिजे आणि शांभवी विद्या आत्मसात करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.

असो. आता लेखणी आवरती घ्यायला हवी. आशा आहे श्रीदत्त जयंती तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार उत्साहात साजरी कराल.

पौर्णिमेला अवतरलेले भगवान दत्तात्रेय पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सोळा कलांनी परिपूर्ण आणि शीतल असे अध्यात्मज्ञान सर्व योगप्रेमी वाचकांना प्रदान करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 26 December 2023