अजपा योग आणि शांभवी मुद्रा ध्यान : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

देहातील कामरूप पीठ आणि कामाख्या देवी

मागील लेखात मी तुम्हाला योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे कसे समांतर परिभाषेत व्यक्त केलेले आहेत ते थोडक्यात सांगितले. या दोन भिन्न मार्गातला समान दुवा म्हणजे शक्ति हे ही सांगितले. आता गोरक्ष शतकातील पुढच्या महत्वाच्या भागाकडे वळूया.

नाथसिद्ध गोरक्ष महाराज आता शरीरस्थ कामरुप पीठ आणि कामाख्या देवी यांच्या विषयी काही सांगणार आहेत. ते सांगत असतांना त्यांनी तांत्रिक परिभाषा कशी गुंफली आहे ते नीट पहा --

आधारं प्रथमं चक्रं स्वाधिष्ठानं द्वितीयकम् ।
योनिस्थानं द्वयोर्मध्ये कामरूपं निगद्यते ॥
आधाराख्ये गुदस्थाने पङ्कजं यच्चतुर्दलम् ।
तन्मध्ये प्रोच्यते योनिः कामाख्या सिद्धवन्दिता ॥
योनिमध्ये महालिङ्गं पश्चिमाभिमुखं स्थितम् ।
मस्तके मणिवद्भिन्नं यो जानाति स योगवित् ॥
तप्तचामीकराभासं तडिल्लेखेव विस्फुरत् ।
चतुरस्रं पुरं वह्नेरधोमेढ्रात्प्रितिष्ठितम् ॥

याचा अर्थ असा की पहिले चक्र आहे आधार चक्र अर्थात मूलाधार चक्र आणि दुसरे चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. या दोन चक्रांच्या मध्ये योनिस्थान आहे जेथे कामरूप पीठ विद्यमान आहे. गुदद्वाराच्या परिसरात जे चार पाकळया असलेले आधारचक्र आहे त्यामध्ये योनी विद्यमान आहे. त्या योनीलाच कामाख्या असे म्हणतात. ही योनी सिद्धांना वंदनीय आहे. या योनीच्या मध्यभागी एक महालिंग आहे जे पश्चिमाभिमुख आहे. त्या महालिंगाचे मस्तक अतिशय लखलखीत आहे. हे जो जाणतो तो योगज्ञानी समजावा. या महालिंगाच्या तळाशी एक तप्त सुवर्णा प्रमाणे आणि विजेप्रमाणे तळपणारे अग्निकुंड आहे.

मी मागील लेखात सांगितल्या प्रमाणे तुम्ही जर योग आणि तंत्र यांमधील परस्पर संबंध जाणत नसाल तर मग वरील श्लोक तुम्हाला नीटसासे कळणार नाही. त्यातील संकल्पना नीट उलगडणार नाहीत. कुंडलिनी योगाच्या बाबतीत हे रीडिंग बीटवीन द लाईन्स खूप महत्वाचे आहे कारण त्या शिवाय प्राचीन योगग्रंथ काय म्हणत आहेत ते नीट कळत नाही.

वरील श्लोकातील योनि, लिंग आणि कामरूप / कामाख्या या संकल्पना नीट समजावून घ्यायला हव्यात. त्यांचा शाब्दिक अर्थच जर घेतला तर गडबड होईल आणि गोरक्षनाथांना अभिप्रेत असलेला अर्थ बाजूला पडेल.

प्राचीन तंत्रग्रंथांत योनि आणि लिंग हे शब्द असंख्य ठिकाणी वापरले गेले आहेत. त्यांच्या अर्थछटा सुद्धा भिन्न-भिन्न आहेत. येथे आपल्या विवेचनाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर लिंग म्हणजे सृष्टीतील पुरुष तत्व किंवा पॉझिटिव्ह पोलॅरिटी आणि योनि म्हणजे समस्त सृष्टीतील स्त्री तत्व किंवा निगेटिव्ह पोलॅरिटी. ज्या प्रमाणे कोणतेही विद्युत सर्किट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्यवस्थित जोडले गेल्याशिवाय पूर्ण होत नाही त्याच प्रमाणे सृष्टीतील कोणतीही रचना लिंग आणि योनि अर्थात पुरुषतत्व आणि स्त्रीतत्व यांच्या संयोगानेच घटित होत असते. सगुण स्वरूपात सांगायचे झाले तर हे पुरुषतत्व म्हणजे शंकर आणि स्त्रीतत्व म्हणजे पार्वती.

परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ, सर्वगुणसंपन्न आणि सृष्टीचा स्वामी आहे. या सर्वश्रेष्ठतेला भग म्हणतात. असे सहा भग विशेष आहेत -- ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य आणि मोक्ष. या भगांनी जो युक्त आहे तो पुरुष म्हणजे भगवान आणि अशी स्त्री म्हणजे भगवती. त्याच धर्तीवर भगलिंग आणि भगयोनी हे शब्द तंत्रशास्त्रात वापरले जातात. तात्पर्य हे की लिंग आणि योनी हे सामान्य भाषेत तरी शरीरावयव दर्शक शब्द असले तरी तंत्रशास्त्रात त्यांना फार पवित्र आणि सांकेतिक अर्थ आहे.

आता मानव पिंडात हे योगशास्त्राला अभिप्रेत असलेले लिंग आणि योनी कोठे आहेत? गुदद्वारच्या परिसरात जे मूलाधार चक्र आहे त्यांच्या मध्यभागी योनी आहे आणि त्या योनीच्या मध्यभागी महालिंग विद्यमान आहे.

गोरक्षनाथ म्हणतात की चार पाकळ्यांच्या मूलाधार चक्रात योनी विद्यमान आहे. योगशास्त्रात आणि तंत्रशास्त्रात ही योनी त्रिकोणाकृती मानली जाते. आता हा त्रिकोण कसा असतो, त्यांचे टोक कोणत्या दिशेला असते, त्याच्या तीन बाजू आणि तीन कोन कशाचे प्रतीक आहेत, या योनीची उपासना कशी करावी वगैरे वगैरे अनेक बारकावे त्यांत आहेत. येथे विषयांतर टाळण्यासाठी फार खोलात जात नाही. तुम्ही तुमच्या गुरुकडून विस्ताराने त्याबद्दल माहिती घेऊ शकाल.

आपल्या विषयाच्या दृष्टीने एवढे पुरेसे आहे की मूलाधार चक्राच्या मध्यभागी ही योनी विद्यमान आहे आणि त्या योनीच्या मध्यभागी एक लिंग आहे. या लिंगाला गोरक्षनाथ महाराज महालिंग असे म्हणतात. काही योगग्रंथांत या लिंगाला स्वयंभू लिंग अर्थात स्वयमेव प्रकट झालेले लिंग असे म्हटले आहे. या महालिंगाचे मुख पश्चिमेला आहे. येथे पश्चिम म्हणजे शब्दशः पश्चिम दिशा असा अर्थ घेऊन चालणार नाही. मेरूदंडातून जी सुषुम्ना नाडी वहाते त्या नाडीला योगशास्त्रात पश्चिम मार्ग असे म्हटले जाते. हे महालिंग या सुषुम्ना नाडीच्या प्रवेशद्वाराकडे विद्यमान आहे असा याचा अर्थ आहे. या महालिंगाचे पावित्र्य अधोरेखित करण्यासाठी गोरक्षनाथांनी त्याच्या तेजाचे वर्णन केले आहे. ते म्हणतात की या लिंगाचे मस्तक अर्थात अग्रभाग अत्यंत तेजस्वी आणि लखलखीत आहे. या महालिंगाच्या तळाशी एक प्रदीप्त आणि तप्त सुवर्णाप्रमाणे दैदीप्यमान असे अग्निकुंड आहे. योगशास्त्रात या अग्नीलाच कालाग्नी असे म्हणतात.

मूलाधार चक्रांतील ही योनी आणि लिंग जो जाणतो तो खरा योगज्ञानी असे गोरक्षनाथ म्हणतात. आपली आजची शिक्षणपद्धती किंवा एकूणच ज्ञान मिळवण्याची पद्धती अतिशय पुस्तकी झाली आहे. लोकं असं समजतात की पुस्तक वाचले म्हणजे आपल्याला ज्ञान मिळाले. सर्वसामान्य जगतात ते खरे असेलही परंतु योगमार्गावर मात्र ते खरे नाही. वाचल्याने मिळते ती माहिती आणि प्रत्यक्ष साधनात्मक अनुभवाने जे प्रकट होते ते ज्ञान. त्यामुळे जेंव्हा गोरक्षनाथ म्हणतात की "यो जानाति स योगवित्" तेंव्हा त्यांना पुस्तकी माहिती वाचणारा व्यक्ति अभिप्रेत नसतो. त्यांना गुरुचरणी बसून योगसाधनेद्वारे वरील गुढगम्य ज्ञान प्रत्यक्ष अनुभवणारा योगसाधक अभिप्रेत असतो. तेंव्हा भगलिंग आणि भगयोनी यांचे पवित्र ज्ञान गुरुचरणी बसून, विनयाने त्यांनी दिलेली साधना अंगिकारूनच प्राप्त करायला हवे.

आता शरीरात हे लिंग आणि योनी कोठे आहेत ते कळल्या नंतर आता बाह्य जगतात ते कोठे आहेत ते माहीत असायला हवे कारण "यथा पिंडे तथा ब्रह्मांडे" किंवा "पिंडी ते ब्रह्मांडी" हा योगसिद्धांत सुप्रसिद्धच आहे. त्याकडे सूक्ष्म संकेत गोरक्षनाथांनी कामरूप आणि कामाख्या या दोन शब्दांनी केलेला आहे.

मागील लेखात मी तुम्हाला विष्णूने सतीच्या कलेवरची सुदर्शन चक्राने तुकडे केले तो कथाप्रसंग सांगितला. हे तुकडे भारतात जागोजागी विखुरले आणि त्या-त्या ठिकाणी शक्तीपीठे निर्माण झाली. तुकडे केल्यानंतर सतीच्या कलेवरचा योनी भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजे आसाम मधील कामरूप किंवा कामाख्या. गुवाहाटी पासून जवळ असलेले नीलांचल पर्वत परिसरातील हे शक्तीपीठ भारतातल्या तमाम शाक्त तांत्रिकांचे आणि देवी भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

गोरक्षनाथांनी वरील श्लोकांमध्ये दोन वेगवेगळे शब्द वापरले आहेत -- कामरूप आणि कामाख्या. कोणत्याही देवाच्या ठिकाणी आपण गेलो को दोन गोष्टी असतात. एक असते त्या देवतेचे मंदिर आणि त्या मंदिरातील प्रत्यक्ष स्वरूप किंवा मूर्ती किंवा विग्रह. दुसरे असते त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किंवा क्षेत्र. मूलाधार आणि स्वाधिष्ठान यांच्या मधला परिसर म्हणजे कामरुप पीठ किंवा कामरुप क्षेत्र आणि मूलाधारातील योनी म्हणजे कामाख्या देवी.

कामाख्या देवी ही खरंतर दशमहाविदयांपैकी तीन महाविदयांचे एकत्रीत स्वरूप मानले जाते -- काली, तारा आणि षोडशी. या मंदिरात देवीची स्थापना योनी विग्रहाच्या स्वरूपातच आहे. दर वर्षी जून महिन्यात या देवीचा एक अतिशय महत्वाचा आणि लोकप्रिय असा मेळा भरतो. त्याला म्हणतात अंबुवाची मेळा किंवा अंबुवाची पर्व. या दिवसांत देवी रजस्वला असते अशी मान्यता आहे. त्यामुळे देवीच्या योनीवर वस्त्र पांघरून मंदिर बंद केले जाते. अशीही मान्यता आहे की यावेळी गर्भगृहाचे दार आपोआप बंद होते. एवढेच नाही तर या काळात जवळच्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी देवीच्या रजोस्त्रावाने लाल होते असे मानले जाते. देवीचा रजोस्त्राव संपल्यावर मंदिर उघडले जाते आणि देवीच्या रजोस्त्रावाने भिजलेले वस्त्र आणि कामिया सिंदूर प्रसाद म्हणून वाटला जातो.

कामाख्या देवी ही भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी असली तरी प्रामुख्याने तांत्रिक षटकर्मे, तांत्रिक सिद्धी, भौतिक कामनांची पूर्तता, गोपनीय आणि गुप्त मानल्या गेलेल्या तिरियाराज किंवा स्त्रीराज्यातील साधना वगैरे वगैरे च्या अनुषंगाने तिची उपासना करणारेच अधिक आहेत. या भोग प्रधानते मुळेच तिचे शरीरातील स्थान हे मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्र हे आहे. ही दोन्ही चक्रे भोग-विलास, भौतिक कामना आणि त्यासंबंधीच्या सिद्धी यांच्याशी संबंधित आहेत. येथे गोरक्षनाथांना हे ही सांगायचे आहे की बाह्य कामाख्या देवीची उपासना करून जे फळ मिळते तेच फळ मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्र साधनेने मिळवता येणे शक्य आहे.

असो.

मूलाधारातील स्वयंभू लिंगावर साडेतीन वेटोळे घालून बसलेली सर्व शक्तिपीठांची अधीष्ठात्री जगदंबा कुंडलिनी सर्व वाचकांच्या शुभकामना पूर्ण करो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 28 May 2024