अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

अजपा साधनेद्वारे महायोग प्राप्ती

अजपा साधना विशद करताना एके ठिकाणी मी असं सांगितलं आहे की अजपा साधनेद्वारे मंत्र-हठ-लय-राज असे चारही योग साधता येतात. काही वाचकांनी त्याविषयी अधिक माहिती विचारली म्हणून हा लेख.

अजपा साधनेद्वारा सर्व योग कसे साधले जातात हे समजून घेण्यागोदर आपल्याला महायोग म्हणजे काय ते समजावून घेणे आवश्यक आहे. प्राचीन शास्त्रग्रंथांत मंत्र-हठ-लय-राज या चार योगमार्गांच्या समन्वयाला महायोग अशी संज्ञा देण्यात आली आहे. महायोग हा शब्द अजून एका अर्थाने वापरला जातो. शक्तिपात मार्गावर साधकाला ज्या उत्स्फूर्त क्रिया होतात त्यांमध्ये साधकाच्या जडणघडणी नुसार आपोआप मंत्र-हठ-लय-राज योगांमधील क्रिया होत असतात. त्यामुळे शक्तिपातमार्गालाही काही वेळा महायोग असं म्हटले जाते. तात्पर्य हे की महायोग ही संज्ञा मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग या चारही मार्गांचे एकीकरण दर्शवते. असो.

अजपा साधनेचा नियमित सरावादवारे साधकाला महायोग साधता येतो. आपण जर महायोगाचे चार घटक बघितले तर आपल्याला असे आढळून येईल की या प्रत्येक मार्गावर साधना जरी अनेक असल्या तरी त्या सर्व साधनांमागे एक समान धागा आहे. त्या समान धाग्याच्या आधारावरच ह्या चार योगांचे वर्गीकरण केलेले आहे.

मंत्रयोगात एखाद्या मंत्राच्या आधाराने कुंडलिनी जागृती घडविली जाते. मंत्र म्हणजे असा शब्द समूह जो काही विशिष्ट स्पंदने निर्माण करतो. असा मंत्र भाषेच्या दृष्टीने अर्थहीनही असू शकतो. उदाहरणार्थ  बीजमंत्रांना कोणताही शाब्दिक अर्थ असत नाही पण स्पंदने मात्र तीव्र स्वरूपाची असतात. मंत्र हा शेवटी "अक्षरांपासून" बनलेला असतो. अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे. याला मंत्रशास्त्रात फार खोल अर्थ आहे. विस्तारभयास्तव येथे सर्वच स्पष्टीकरण देता येणार नाही पण साधकांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मंत्र हा स्पंदनाद्वारे दैवी चैतन्य अभिव्यक्त करत असतो. हे स्पंदनातून प्रगट होणारे चैतन्य हाच मंत्रयोगाचा गाभा आहे.

हठयोगात शुद्धीक्रिया, प्राणायाम, बंध, मुद्रा अशा अनेक अंगांचा समावेश होतो. असे जरी असले तरी हठयोगाचा गाभा म्हणजे प्राणायाम. प्राणायामाशिवाय हठयोग केवळ अपूर्णच नाही तर अर्थहीन आहे. प्राणशक्तीवर हळूहळू ताबा मिळवायचा आणि एक दिवस केवळ कुंभक किंवा सहज कुंभक साधायचा हा हठयोगाचा मुख्य मार्ग आहे. बाकीच्या साधना ह्या केवळ प्राणसाधना बळकट करण्यासाठी उपयोगात आणल्या जातात.

लययोगात मनाचा लय केला जातो. लय म्हणजे विरघळणे किवा लुप्त होणे. लययोगात मन (अर्थात विचार) "कशाततरी" लुप्त होतात. उदाहरणार्थ षणमुखी मुद्रेद्वारे नादश्रवण करणे ही लययोगाची एक महत्वाची साधना आहे. नादश्रवणामध्ये शरीराची छिद्रे (नाक, कान, डोळे वगैरे) बंद करून शुषुम्नांतर्गत नाद ऐकण्याचा सराव केला जातो. मन हळूहळू सूक्ष्म कंपनांवर केन्द्रित होत जाते आणि एक दिवस अनाहत नाद एकू येतो. याचाच अर्थ लययोगात मनातील विचारांचा ह्रास करवून मन अ-मन करण्याचा प्रयत्न असतो. तोच लययोगाचा गाभा आहे.

राजयोग हा शुद्ध ध्यानमार्ग आहे. राजयोगामध्ये मनाला निरालंब करण्याचा सराव केला जातो. मन काही प्रमाणात लय होऊ लागले की मगच राजयोगाचा अभ्यास जास्त परिणामकारक ठरतो. त्या दृष्टीने लययोग ही सुरवात आणि राजयोग हा शेवट आहे.

आता अजपा साधनेद्वारे वरील चारही गाभा घटक साधकाला कसे प्राप्त होतात ते पाहू.

अजपा साधनेत "सोहम" किंवा "हंस" या सूक्ष्म मंत्राचे वारंवार मानसिक उच्चारण होत असते. त्याच बरोबर सोहम मंत्राचा तात्विक अर्थही साधक मनात घोळवत असतो. परिणामी अजपा साधना मंत्रयोगाचे फळ मिळवून देते.

अजपा साधनेत साधक श्वासांवर मन ठेवत असतो. हा एक प्रकारे प्राणायामच आहे. नैसर्गिक घडणारे श्वासप्रश्वास अनुभवत असताना असा प्रत्यक्षानुभव येतो की श्वास हळूहळू कमी-कमी होत आहेत. अत्यंत प्रगत साधकाच्या बाबतीत तर ते पुर्णपणे थांबतात किंवा अतिशय कमी होतात. हा केवल कुंभकच आहे. नियमित सरावाने दोनही स्वर समान वाहू लागतात, प्राण आणि अपान समरस होतात परिणामी प्राण शुषुम्ना नाडीत प्रवेश करतो. याचाच अर्थ अजपा साधना हठयोगाची प्राप्ती करवून देण्यास सक्षम आहे.

योगशास्त्राचे हे प्रसिद्ध तत्व आहे की जेंव्हा प्राणाचा लय होतो तेव्हा मनाचा लय होतो आणि जेंव्हा मनाचा लय होतो तेव्हा प्राणाचा लय होतो. अजपा साधनेत प्राणायाम आपसूक साधला जात असल्याने माणाचाही लय होऊ लागतो. अर्थात लययोगाचे फळ साधकाला मिळते.

ज्यावेळेस प्राणलाय आणि मनोलय सुरू होतो त्याचवेळेस खरे ध्यान सुरू होत असते. केवल कुंभक किंवा अमनस्क स्थिति साधल्यावर अर्थातच राजयोग साधला जातो.

वरील विवेचनावरून तुमच्या लक्षात आले असेल की अजपा साधना साधकाला महायोग अर्थात मंत्रयोग-हठयोग-लययोग-राजयोग प्राप्त करून देते. अजपा साधना करत असतांनाच साधक कुंडलिनी जागृती अनुभवतो. एकदा कुंडलिनी जागृत झाली की मग आवश्यक त्या उत्फुर्त क्रियाही घडून येतात. अर्थात प्रत्येक साधकाचे या बाबतीतले अनुभव भिन्न असतात. श्रद्धापूर्वक अजपा साधनेची कास धरली की प्रत्यक्ष अनुभवाद्वारे साधक या सर्व अवस्था जाणू शकतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 27 December 2014