अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

गोरक्षनाथांचा षडंग योग -- गोरक्ष शतक

योगमार्गाचे महत्व काय आहे ते आपण लेखमालेच्या मागील भागात जाणून घेतले. आता शंभूजती गोरक्षनाथ त्यांचा योगमार्ग प्रस्तुत करत आहेत. तोच आपण विस्ताराने समजून घेणार आहोत.

गोरक्षनाथांनी गोरक्ष शतकात प्रस्तुत केलेला योगमार्ग षडंग आहे. ते म्हणतात --

आसनं प्राणसंयामः प्रत्याहारोऽथ धारणा ।
ध्यानं समाधिरेतानि योगाङ्गानि भवन्ति षट् ॥

योगमार्गावर साधारणतः अष्टांग योग प्रचलित आहे. महर्षि पतंजली आपल्या योगसुत्रांतून अष्टांग योगच प्रस्तुत करतात. हठयोग प्रदीपिके सारख्या अधिक प्रचलित असलेल्या ग्रंथांमध्येही अष्टांग योगच आहे. अगदी गोरक्षनाथांच्या अन्य काही ग्रंथ रचनांमध्ये सुद्धा अष्टांग योगच आलेला आहे. गोरक्ष शतकामध्ये मात्र ते षडंग योग सांगत आहेत -- आसन, प्राणसंयम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.

गोरक्षनाथांच्या षडंग योगाकडे वळण्यापूर्वी अष्टांग योगातील कोणती दोन अंगे त्यांनी वगळली आहेत त्याबद्दल अल्पसे जाणून घेऊ म्हणजे त्यांनी ही दोन अंगे येथे का वगळली असावीत ते कळू शकेल. अष्टांग योग प्रणालीत प्रथम दोन अंगे आहेत यम आणि नियम जी येथे गोरक्षनाथांनी घेतलेली नाहीत.

योग उपनिषदांमध्ये आणि हठयोग प्रदीपिके सारख्या ग्रंथांमध्ये दहा यम आणि दहा नियम सांगितले आहेत. पतंजलि मुनींनी याच दहा-दहा गुणांचे वर्गीकरण अधिक सुसूत्र पणे पाच यम आणि पाच नियमांमध्ये केलेले आहे. हठयोग प्रदीपिकेत आलेले दहा यम म्हणजे -- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृति, दया, आर्जव, मिताहार आणि शौच. पतंजलि योगासुत्रांत सांगितलेले पाच यम असे आहेत -- सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.

हठयोग प्रदीपिकेत सांगितलेले दहा नियम म्हणजे -- ताप, संतोष, आस्तिक्य, दान, ईश्वरपूजन, सिद्धांतवाक्यश्रवण, ह्री, मति, जप आणि हवन. पतंजलि योगासुत्रांत सांगितलेले पाच नियम म्हणजे -- शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्राणिधान.

वरील यम आणि नियमांकडे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलेत तर तुम्हाला असे आढळेल की त्यांचा घनिष्ठ संबंध हा योग साधकाच्या आहार-विहाराशी आणि दिनचर्येशी आहे. योगमार्ग हा मनाला वेसण घालण्याचा मार्ग आहे. ही वेसण घालण्याची सुरवात दैनंदिन आहार-विहारापासून होते. जो व्यक्ति वरील यम-नियम झुगारून किंवा टाळून योगमार्गावर आरुढ होण्याचा प्रयत्न करतो त्याची सर्व मेहनत वाया जाते. केवळ अल्पशा शारीरिक आणि मानसिक फायद्या पलिकडे त्यांच्या हाती काही येत नाही.

यापूर्वी अन्य लेखांत आपण यम-नियमां विषयी जाणून घेतले आहे त्यामुळे या लेखात त्याची पुनरावृत्ति करत नाही. गोरक्ष नाथांनी आपल्या अन्य काही ग्रंथांत यम आणि नियम सांगितलेले आहेत. याचाच अर्थ असा की त्यांनाही ते मान्य आहेतच. आवश्यक वाटत आहेतच. गोरक्ष शतकामध्ये त्यांनी यम आणि नियमांचा उल्लेख केलेला नाही कारण गोरक्ष शतकाच्या अभ्यासकाकडे हे गुण असणे हे अध्यारुतच आहे. गृहीतच आहे. या गुणांचे महत्व निराळे पुन्हा सांगावे अशी गरज त्यांना वाटण नाही. दुसरे असे की गोरक्ष शतक हा केवळ शंभर श्लोकांचा छोटेखानी ग्रंथ असल्याने त्यात फार भारंभार विषयांचा अंतर्भाव करून चालणार नाही. ग्रंथाचे आटोपशीर स्वरूप राखण्यासाठी सुद्धा त्यांनी यम आणि नियम या ग्रंथांतून वगळले आहेत.

गोरक्ष नाथांनी जो षडंग योग सांगितला आहे तो पूर्णतः नवख्या साधकांसाठी नाही. ज्या साधकाने मनाला सात्विक बनवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, ज्याने ईश्वर पूजन, जप, शुचिता आदि गोष्टींचा अंगिकार केलेला आहे अशाच साधकांसाठी हा योग आहे. योगमार्गावर नवीन असलेल्या अनेक साधकांचा असं अनुभव असतो की ध्यानाला बसलं रे बसलं की शरीराची आणि मनाची चंचलता आपला खेळ दाखवू लागते. पायाला रग लागणे, शरीर अस्थिर होणे, एकाजागी फार वेळ बसण्याचा कंटाळा येणे, मनात अनेकानेक विचार येणे, षडरिपूंचा संसर्ग होणे असे प्रकार घडू लागतात. जे साधक यम-नियमांचा अवलंब करत नाहीत त्यांना ध्यानमार्गातील हे प्रारंभीक अडथळे पार करता येत नाहीत. यम-नियमांची गरज मग त्याना जाणवू लागते. खरंतर यम आणि नियम हे साधकांसाठी षडंग योगाच्या जोडीने अवलंबण्यासाठी आहेत.

ज्या साधकांनी यम-नियम रूपी पूर्वाभ्यास सुरू केलेला आहे त्यांना गोरक्ष नाथांचा षडंग योग चटकन फळणारा आहे. असा साधक प्रथम आसनाचा अभ्यास करतो. ध्यान साधनेत जरी मनाला स्थिर आणि विचारहीन करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी या स्थिरतेची सुरवात होते स्थूल शरीरापासून. शरीर स्थिर आणि अचल असेल तरच ध्यानाभ्यास नीट होऊ शकतो. त्यामुळे आसन आणि पर्यायाने आसन सिद्धी हे गोरक्ष नाथांच्या षडंग योगातील प्रथम अंग आहे.

आसनाद्वारे शारीरिक स्थिरता प्राप्त झाली की मग योगी प्राणांच्या स्थिरतेकडे वळतो. त्या दृष्टीने प्राणायाम हे अंग महत्वाचे ठरते. गोरक्षनाथांनी येथे प्राणायामाला प्राणसंयम असा शब्द वापरला आहे. गोरक्षनाथ हे हठयोगाचे पुरस्कर्ते होते. हठयोगात अनेकानेक प्राणायामचे प्रकार आपल्याला आढळून येतात. त्यातील कित्येक तर सर्वसामान्य साधकाच्या आवाक्याबाहेरचे असतात. सर्वच प्राणायाम प्रकारांचे मुख्य उद्दिष्ट हे पिंडाचे चलनवलन घडवणाऱ्या प्राणशक्तीचे नियंत्रण करणे हे असते. येथे अजपा जपाचे महत्व लक्षात घेणे आवश्यक आहे. अजपा जपामध्ये नैसर्गिक श्वसनाचा वापर प्राणशक्तीच्या नियंत्रणासाठी केला जातो. प्राण शक्ति जशी स्थूल पिंडाला चालवते तशीच ती मनाला सुद्धा इंधन म्हणून वापरली जाते. मन, मनातील विचार आणि प्राणशक्ती यांचा जवळचा संबंध आहे. एकदा का प्राणशक्ती ताब्यात आली की मग मनसुद्धा आपोआप ताब्यात येऊ लागते.

मनात उठणाऱ्या विचारांना दोन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत असतात. त्यांतील पहिली म्हणजे ज्ञानेंद्रिये. कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा इत्यादि ज्ञानेंद्रिये बाह्य जगतातून त्यांचे त्यांचे विषय ग्रहण करतात आणि मनाला खाद्य म्हणून पुरवतात. दुसरी गोष्ट म्हणजे संचित संस्कार. या दोन गोष्टींपैकी पहिली गोष्ट नियंत्रणात आणली जाते ती प्रत्याहाराच्या माध्यमातून. इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून तोडणे किंवा अलग करणे जेणेकरून ती मनाला खाद्य पुरवू शकत नाहीत. परिणामी मनातील विचार कमी होतात. प्रत्याहार साधला की मग बाह्य जगतातील ध्वनि, सुगंध, स्पर्श वगैरे गोष्टींनी ध्यानावस्था विचलित होत नाही. प्रत्याहार ही सुद्धा एक उच्च अवस्था आहे. ज्ञानेंद्रियांचे कार्य प्राणशक्तीच्या जोरावर चालत असते. प्राणायामाने प्राणशक्तीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता आले की मगच प्रत्याहार साधू लागतो.

एकदा का इंद्रिये अंतर्मुख झाली आणि आपापल्या विषयांपासून अलग झाली की मग मनाला ध्यानासाठी निवडलेल्या प्रतिकाचे आलंबन देणे सोपे जाते. सुरवातीला मनात ध्यान ज्या गोष्टीवर लावले आहे त्या गोष्टीच्या व्यतिरिक्त इतरही विचार उठत असतात. प्रधान विचार असतो ध्येय गोष्टीचा परंतु साथीला अन्य काही विचार असतातच. ह्या अवस्थेला म्हणतात धारणा. सर्वसाधारणपणे जेंव्हा कोणी म्हणतं की मी ध्यान करत आहे तेंव्हा प्रत्यक्षात ती व्यक्ति धारणेच्या स्तरावरच असते. धारणा ही अवस्था सुद्धा अभ्यासाने, सरावाने प्राप्त होत असते. साधकाचे प्रयत्न जेवढे अधिक आणि अचूक तेवढी धारणेची तीव्रता सुद्धा अधिक बनते.

धारणेचा अभ्यास बराच काळ केल्यानंतर ज्या गोष्टीवर ध्यान केले जात आहे ती आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील ध्यान करत असल्याची जाणीव एवढ्या दोनच गोष्टी शिल्लक रहातात. या दोन गोष्टींव्यतिरिक्त अन्य सर्व विचार थांबलेले असतात. ही अवस्था असते ध्यानाची. आता तुम्हाला ध्यान हा शब्द किती सरधोपटपणे वापरला जातो ते लक्षात येईल. ध्यान या शब्दाची योगशास्त्रीय व्याख्या आणि सर्वसाधारणपणे वापरला जाणारा ध्यान हा शब्द यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

ध्यानावस्था पराकोटीची प्रगाढ झाली की मी ध्यान करत आहे ही जाणीव सुद्धा नष्ट होऊन केवळ ध्यानाच्या प्रतिकाचे चैतन्यच मनात व्याप्त होऊन रहाते. मनातील विचार पूर्णतः थांबलेले असतात. सर्व संस्कारांचा उपशम झालेला असतो. या अवस्थेत मन जणू अ-मन झालेले असते. मनाची ही अवस्था म्हणजे समाधी. वरील तीन अवस्था -- धारणा-ध्यान-समाधी मी मुद्दामच अगदी ढोबळमानाने आणि त्रोटकपणे वर्णन केल्या आहेत. फार सखोल किंवा क्लिष्ट चर्चेची आजच्या या लेखात आवश्यकता नाही. यापूर्वीच्या अन्य काही लेखांमधून आपण त्यांच्या विषयी विस्ताराने जाणून घेतले आहे.

गोरक्ष नाथांचा षडंग योग हा असा आहे. एक लक्षात ठेवले पाहिजे की षडंग योगातील प्रत्येक अंग स्वतंत्र नाही. ते मागील आणि पुढील अंगांशी जोडलेले आहे. आत्मसाक्षात्काराची एक प्रणाली म्हणून जेंव्हा योगशास्त्राचा अवलंब केला जातो तेंव्हा ही सर्व अंगे अभ्यासावी लागतात. त्यांची जोडणी आणि एकमेकांशी असलेले नाते नीट समजून घ्यावे लागते. आता गोरक्षनाथ या षडंग योगातील प्रत्येक अंगाविषयी काही सांगणार आहेत. आपण ते पुढील भागांत जाणून घेऊ.

असो.

आजही योगी बनून योगमार्गाची वाटचाल करणारा शंभू महादेव सर्व वाचकांना गोरक्षनाथांच्या षडंग योगाची कास धारण्याची प्रेरणा देवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 04 March 2024