Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


Untitled 1

कुंडलिनी स्वरूपा भगवतीची रहस्यमयी योनिमुद्रा

प्राचीन काळापासून योगी जशी भगवान शंकराची भक्ती आणि उपासना करत आले आहेत तशीच तो आदिशक्तीचीही करत आले आहेत. किंबहुना शास्त्रानुसार शिव उपासनेत सफलता मिळवण्यासाठी शक्तीची उपासना आणि शक्ती उपासनेत सफलता मिळण्यासाठी शिव उपासना अत्यावश्यक मानली गेली आहे. त्यामुळेच प्राचीन काळच्या मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आदी योग्यांमध्ये शिव-शक्ती यांची अभेदभावाने उपासना रूढ झालेली आपल्याला दिसते.

नाथ पंथात पार्वतीस्वरूप शक्तीला "उदयनाथ" असे नामाभिधान प्राप्त आहे. भगवान शंकराची अर्धांगिनी असल्याने शिव आणि शक्ती हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चंद्र आणि चांदणे, सूर्य आणि सूर्यकिरणे, ज्योती आणि प्रकाश यांप्रमाणेच त्यांचे "अद्वय" साधले आहे. मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्या सिद्ध केली ती भगवतीच्याच कृपाशीर्वादाने. भगवान शंकर, अवधूत दत्तात्रेय,   नवनाथ, चौरांशी सिद्ध यांपैकी सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भगवतीशी संबंध आलेला आहे. आज भगवती विषयी सांगण्याचे कारण म्हणजे चालू आठवड्यात सुरु होणारी गुप्त नवरात्र.

तुम्हा सर्वांना दक्ष प्रजापतीची आणि सतीची गोष्ट ठावूक असेलच. शंकराचा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन प्राणत्याग केला. सतीच्या विरहाने भगवान शंकर व्याकुळ झाला. सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन त्याने बेभान होऊन तांडव करायला सुरवात केली. शंकराला भानावर आणण्यासाठी आणि विश्वाला प्रलयापासून वाचवण्यासाठी विष्णूने सुदर्शन चक्राने देवीच्या कलेवराचे तुकडे तुकडे केले. हे तुकडे भारतभर जिथे जिथे पडले तेथे देवीची शक्तिपीठे निर्माण झाली. त्यांतीलच एक अत्यंत महत्वाचे शक्तीपीठ म्हणजे कामाख्या पीठ. या ठिकाणाला एवढे महत्व येण्याचे कारण म्हणजे विष्णूने तुकडे केल्यावर या ठिकाणी देवीच्या शरीराचा परम पवित्र भाग अर्थात महायोनी पडली.

पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी या योगसिद्धांताला अनुसरून मानवी शरीरातही शिव आणि शक्तीचा वास आहे. देवीची परमपूज्य महायोनी जशी बाह्य जगतात आहे तशी ती सूक्ष्म प्राणमय कोषात सुद्धा आहे. येथे महायोनी म्हणजे संपूर्ण विश्वाचे उगमस्थान असा सांकेतिक अर्थ आहे. योगी एका परम गोपनीय आणि गूढ क्रियेद्वारे आदिशक्तीची ही महायोनी जाणून घेत असतो. ती क्रिया म्हणजे सर्व योग-आगम-निगम ग्रंथांनी गौरवलेली योनिमुद्रा. योनिमुद्रा दोन भागात विभागता येईल. एक म्हणजे शारीरिक स्थिती आणि दुसरी म्हणजे आंतरिक स्थिती. सर्व प्राचीन ग्रंथांत योनिमुद्रा ही अत्यंत गोपनीय ठेवलेली आहे. त्यामुळेच ही काय प्राचीन ग्रंथांत ही मुद्रा सुस्पष्टपणे विषद केलेली नाही. घेरंड संहितेसारख्या काही ग्रंथांत योनिमुद्रेची शारीरिक स्थिती सांगितली आहे परंतु आंतरिक स्थिती गोपनीय ठेवलेली आहे. शिवसंहितेतही योनिमुद्रेकडे गूढ परिभाषेत निर्देश केलेला आहे पण सखोल विवेचन टाळले आहे.  सर्वच शास्त्रग्रंथांत योनिमुद्रेची अतिशय थोरवी गायली आहे. मंत्रयोगात सफलता देणारी, महापातकांचा आणि सर्व छोट्या-मोठ्या पातकांचा नाश करणारी आणि निवृत्ती मार्गावरून चालण्याची इच्छा असणाऱ्या साधकांसाठी सुयोग्य अशी ही मुद्रा मानली गेली आहे.

योनिमुद्रा ही उच्च कोटीची साधना आहे. अर्थात एक अभ्यास म्हणून किंवा एक सराव म्हणून योनिमुद्रेची बाह्य क्रिया करायला काही हरकत नाही. त्यामुळे येथे योनिमुद्रेचे बाह्य शारीरिक घटकच त्रोटक स्वरूपात सांगत आहे. योनिमुद्रा करण्यासाठी तुम्हाला खालील उप-क्रियांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

१. षण्मुखी मुद्रा

२. काकचंचू अथवा अन्य एखादा पूरक-रेचक विधी

३. अजपा जप संपूर्ण विधान

४. मूलबंधासहित सिद्धासन    

सिद्धासनात बसून षण्मुखी मुद्रा धारण करावी. काकचंचूच्या सहाय्याने प्राण आणि अपानाचे मिलन घडवून आणावे. हंस ध्यानाद्वारे चक्र अनुसंधान साधावे आणि मग कुंडलिनी शक्ती चालवून शिव-शक्ती सामरस्य साधावे. मुद्दामच ह्या एवढ्याशा त्रोटक विवरणावर थांबतो. या छोट्याशा लेखातून योनिमुद्रेची बाह्य आणि आंतरिक क्रिया असे दोन्ही भाग विस्ताराने विषद करणे हा उद्देश अजिबात नाही.  त्यातील बारकावे आणि खाचाखोचा लक्षात घेता सरसकट ती प्रकट करणे उचितही होणार नाही. योनिमुद्रेची आंतरिक स्थिती नेमकी कशी साधायची हा साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवाचा भाग आहे. तेंव्हा लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे फक्त बाह्य क्रिया करता आली म्हणजे आपल्याला संपूर्ण योनिमुद्रा साधली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे येथे उल्लेखलेली योनिमुद्रा म्हणजे हाताच्या बोटांनी करायची हस्तमुद्रांमधील योनिमुद्रा नव्हे. या दोन वेगवेगळ्या मुद्रा आहेत. तेंव्हा त्या गोंधळात पडू नये.

जगदंबा कुंडलिनी स्वरूप योनिमुद्रेपुढे नतमस्तक होऊन सर्व योगाभ्यासी वाचकांना योनिमुद्रारुपी योगप्रसाद प्राप्त होवो अशी प्रार्थना करतो आणि लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 01 July 2019