अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

समाधी साधना करत असतांना "या" गोष्टींची काळजी घ्या

लेखमालेच्या मागील भागात घेरंड मुनींनी चंडकपालीला दिलेली समाधी साधनेची फलश्रुती आणि महात्म्य आपण जाणून घेतले. खरंतर या लेखात माझे समाधी साधनेचे काही व्यक्तिगत अनुभव सांगण्याचा मानस होता. परंतु माझ्या श्रीगुरुमंडलाकडून अनुमती मिळाली नाही. त्यामुळे आज समाधी साधने विषयक काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्यांचा अंगीकार केल्याने तुम्हाला तुमची साधना परिपक्व करण्यासाठी निश्चित फायदा होईल अशी मला आशा आहे.

पुढे जाण्या आगोदर हे सांगणे आवश्यक आहे की लेखमालेचा हा भाग सर्वसाधारण ध्यान साधना करणाऱ्या लोकांसाठी नाही. ज्यांची ध्यान साधना उच्च स्तरावर पोहोचलेली आहे आणि जे आता समाधी साधनेची तयारी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी आहेत. दिवसातील अर्धा-एक तास एवढाच वेळ ध्यानाभ्यासासाठी जे देत आहेत त्याना या गोष्टी फारशा उपयोगी पडणाऱ्या नाहीत.

घेरंड मुनींनी ध्यान साधना आणि समाधी साधना अशा दोन स्तरांवर त्यांच्या क्रियांची विभागणी केलेली आहे. समाधी साधनेला हात घालण्या आगोदर तुमची ध्यानावस्था अगदी भक्कमपणे घटीत होत असणे आवश्यक आहे. प्रथम ध्यान म्हणजे काय त्याची नीट उजळणी करून घ्या. हे मी मुद्दाम अशासाठी सांगतोय कारण अध्यात्ममार्गावर ध्यान हा शब्द एवढ्या सर्रासपणे आणि सरधोपटपणे वापरला जातो की सर्वसाधारण बोली भाषेतील "ध्यान" आणि योगशास्त्र संमत "ध्यान" यांची अनेकदा गल्लत होऊन बसते. एखादा नवखा साधक जेंव्हा डोळे मिटून बसलेला असतो तेंव्हा "तो ध्यान करत आहे" असं बोली भाषेत म्हटलं जातं परंतु योगशास्त्रात याला ध्यान म्हटले जात नाही. त्यामुळे योगशास्त्राला अभिप्रेत असलेली "ध्यान" शब्दाची व्याख्या नीट समजून करून घ्यायाला हवी. येथे फक्त एक धावती ओळख तेवढी करून देतो.

राजयोगात मनाची स्थिती धारणा-ध्यान-समाधी या क्रमाने उन्नत होत असते. मन एकाग्र करण्याच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये तीन घटक असतात -- ध्याता, ध्येय आणि ध्यान. जो ध्यान करत आहे तो ध्याता. ज्या गोष्टीचे ध्यान केले जात आहे ते म्हणजे ध्येय. ध्येयावर मन एकाग्र करण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान. धारणेच्या स्तरावर ध्येया व्यतिरिक्त अन्य विचार अल्प प्रमाणात का होईना मनात उठत असतात. ते अन्य विचार थांबवून मनाला यत्नपुर्वक ध्येयावर वारंवार केंद्रित करावे लागते. जेंव्हा ध्येया व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार मनात उरत नाही तेंव्हा धारणा संपून ध्यान सुरु होते. सर्वसाधारण ध्यानाभ्यासी जेंव्हा "मी ध्यान करत आहे" असे म्हणत असतो तेंव्हा प्रत्यक्षात तो धारणा करत असतो. कित्येक साधक धारणेलाच ध्यान समाजतात असतात आणि आपण ध्यान करत आहोत अशा भ्रमात असतात. धारणा स्तरावारून ध्यान स्तरावर जाणे ही सुद्धा एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. अनेक वर्षांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो. जेंव्हा ध्यान प्रगाढ आणि प्रगल्भ होतं तेंव्हा ध्येयाचा विचार सुद्धा गळून पडतो आणि मन पूर्णतः निर्विचारी होते. ही मनाची अवस्था म्हणजे समाधी. समाधी अवस्थेच्या सुद्धा अनेक श्रेण्या किंवा स्तर आहेत. क्षणभर थांबून समाधी अवस्था किती उच्च कोटीची आहे ते मनात ठसवा / उजळणी करा. हे सर्व मी अगदीच सोप्या भाषेत सांगतोय कारण फार तात्विक आणि क्लिष्ट विश्लेषणाची येथे आवश्यकता नाही. येथे मला एवढंच अधोरेखित करायचं आहे की समाधी साधना ही काही "पी हळद अन हो गोरी" अशी झटपट प्रक्रिया नाही. अशा भ्रमात बिलकुल राहू नये. धारणा ते ध्यान आणि ध्यान ते समाधी या प्रवासासाठी अनेक वर्ष लागतात. ऋषी-मुनी-योग्यांनी आपले आयुष्य वेचले या प्रवासासाठी हे नेहमी लक्षात ठेवावे.

समाधी साधनेला सुरवात करायला तुम्ही तयार झाला आहात की नाही हे कसे ओळखायचे? खरंतर प्राचीन योगग्रंथांत यासंबंधी कोणतीही सुस्पष्ट व्याख्या नाही. साधारणतः एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली ही साधना केली जात असल्याने गुरु शिष्याची पारख करून त्याची तयारी झाली आहे अथवा नाही ते ठरवत असे. येथे केवळ एक अंधुक कल्पना यावी म्हणून मी असे सांगीन की वर दिलेल्या योगशास्त्र संमत ध्यानाच्या व्याख्येनुसार कमीतकमी चार ते सहा तास एवढा कालावधी जर तुम्ही ध्यानमग्न राहू शकत असाल तर तुम्ही आता समाधी साधनेच्या सुरवातीच्या पायऱ्यांचा अभ्यास करण्यास सुरवात करू शकाल असे म्हणायला हरकत नाही.

समाधी साधना हा जरी राजयोगाचा विषय असला तरी या कामी मंत्रयोग, हठयोग आणि लययोग यांचा सुद्धा बराच उपयोग साधकाला होत असतो. विशेषतः गुरुमंत्र आणि इष्ट दैवतेचा मंत्र जर सिद्ध केलेला असेल तर अत्यंत लाभदायी ठरतो. समाधी साधनेत प्रदीर्घ काळ एकाजागी बसावे लागते त्यासाठी हठयोगातील आसने अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायाम हा तर अष्टांग योगातील महत्वाचा घटक आहे. प्राणशक्ती ताब्यात असल्याशिवाय मन ताब्यात येऊ शकत नाही. समाधी साधना हा जरी मनाशी संबंधित विषय असला तरी पंचमहाभूतांचा त्याच्याशी घनिष्ठ संबंध आहे. त्या अनुषंगाने भूतशुद्धी, तत्वशुद्धी, चक्रशुद्धी बरोबरच अनाहत नादाचा उद्भव सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. लययोग हा त्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. तात्पर्य हे की राजयोग करायचा म्हणजे बाकीच्या प्रणाली टाकून द्यायच्या असं नाही. आवश्यकते नुसार मंत्र-हठ-लय योगातील साधनांची बैठक सुद्धा साधकाला भक्कम करावी लागते.

अजून एक महत्वाचा मुद्दा. समाधी साधना करत असतांना तुम्हाला मिताहाराचा अवलंब करावाच लागतो. एक लक्षात घ्या की अन्नग्रहण केले की अन्नपचनाची क्रिया सुरु होते. अन्नपचनाची क्रिया सुरु झाली की प्राणशक्तीचा एक मोठा भाग त्यात खर्ची पडत असतो. शारीरिक क्रिया मोठ्या प्रमाणावर सुरु असतील तर कुंडलिनी सुद्धा खालच्या चक्रांवरच अडकून पडते. त्यामुळे समाधी साधना करण्यापूर्वी चांगले दहा-बारा तास अन्न-पाण्या शिवाय रहायची सवय करा. समाधी साधनेच्या अभ्यासाला बसताना पोटात अन्नाचा कणही असायला नको.

दैनंदिन जीवनात आपल्या अवती-भवती अनेक लोकांचा वावर असतो. ही संसारिक इच्छा-आकांक्षांनी बरबटलेली लोकं तुमच्यावरही एक अदृश्य ठसा उमटवत असतात. समाधी साधना करत असतांना पाळायचे एक पत्थ्य म्हणजे जनसंगपरित्याग. लोकांच्या संपर्कात अजिबात राहू नका किंवा किमान स्वतःला त्यांच्यापासून शक्य तेवढे दूर ठेवा. हा नियम स्वतःला अध्यात्मिक म्हणवणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की -- Do not argue with a fool. He will drag you down to his level and beat you with his experience. असाच काहीसा प्रकार या मंडळींबरोबर राहिल्याने होतो. ज्यांची स्वतःची साधनेची बैठकही नीट बसलेली नाही अशी मंडळी पुस्तकी ज्ञान पाजळण्याच्या बाबतीत फार तत्पर असतात. तुम्हालाही अक्कल शिकवायला ही मंडळी मागेपुढे पहात नाहीत. अशा लोकांना दुरूनच नमस्कार करावा आणि आपल्या समाधी साधनेत मग्न व्हावे. समाधी साधनारत असतांना तुमचा जिवलग मित्र असतो मौन. दिवसभर गप्पाटप्पा, परिचित-अपरिचित लोकांमध्ये उठबस करण्याने चित्त तर विखुरतेच पण प्रचंड उर्जासुद्धा वाया जात असते. त्यामुळे शक्य तेवढे मौन पाळा. गरज असेल तरच बोला. मोजकेच बोला.

एक लक्षात ठेवा की मनाची निर्विचार अवस्था ही मानवी शरीराची नैसर्गिक अवस्था नाही. केवळ मनःशांतीसाठी आणि शिथिलतेसाठी मनातील विचार कमी करणे आणि आत्मसाक्षात्कासाठी मन पूर्णतः निर्विचारी करणे यात फरक आहे. निसर्गतः ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार यांची जुपडी परमेश्वराने केलेली आहे. दैनंदिन जीवन जगण्यासाठी मन आणि मनातील विचार हा एक महत्वाचा आणि आवश्यक असा घटक आहे. समाधी साधनेत मनाला जणू मारले जात असते. एका अर्थी ही मनाची अनैसर्गिक स्थिती असते. त्यामुळे समाधी साधनेच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये ध्यानावस्थेतून भानावर आल्यावर शरीर-मनाकडून एक प्रकारची रीएक्शन येते. समांतर उदाहरण द्यायचे झाल्यास काहीवेळा स्ट्रोंग औषधे घेतल्यावर शरीर कशी एकदम रीएक्शन फेकते तसाच काहीसा प्रकार. या रीएक्शन पासून स्वतःचा बचाव कसा करावा हे माहित असावे लागते. हे बचावतंत्र एक तर तुम्ही अनुभवातून शिकू शकता किंवा तुमचा कोणी गुरु असल्यास त्याच्याकडून त्यासंबंधी अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. हा थोडा उच्च स्तरावरचा विषय असल्याने आणि काहीसा व्यक्तीसापेक्ष असल्याने फारशा खोलात जात नाही.

घेरंड मुनींनी गुरुभक्ती आणि गुरुकृपा यांचे महत्व अधोरेखित केलेलं आहे. विशेषतः समाधी साधना करत असतांना या दोन्ही गोष्टींचा अतिशय उपयोग होतो. आजकाल केवळ दीक्षा घेण्यासाठी किंवा मंत्र घेण्यासाठी किंवा योगक्रिया शिकण्यासाठी गुरु धारण केला जातो. त्यात भक्ती अशी काही नसते. भक्तीचा अभाव असेल तिथे गुरुकृपेचा सुद्धा अभाव निर्माण होतो. घेरंड मुनींना असा गुरु धारण करणे अभिप्रेत नाही. ज्या गुरु कडून गुरुमंत्र, योगसाधना आणि योगोपदेश प्राप्त झाला आहे आणि ज्याच्या शिकवणीचे प्रत्यक्ष आचरण साधका कडून केले जात आहे असा गुरु येथे त्यांना अभिप्रेत आहे. समाधी साधनेत जर गुरुचा वरदहस्त मस्तकी असेल तर सूक्ष्म स्तरावर आणि अदृश स्वरूपात फार मोठे सहाय्य मिळत असते. तुमचा गुरु मानवौघ असो अथवा सिद्धौघ असो अथवा दिव्यौघ असो तो समाधी साधनेत तुमचा भक्कम पाठीराखा असतो. तुमची साधना वेगाने पूर्णत्वाकडे जाईल याची काळजी घेतो. अध्यात्मामार्गावर गुरु हा शब्द सुद्धा अगदी सरधोपटपणे वापरला जातो. पूजा-पाठ, मंत्र-तंत्र, कर्मकांडात्मक उपासना वगैरे गोष्टींमधील गुरु, आरोग्यासाठी योग शिकवणारे सर्टिफाईड योग शिक्षक / गुरु आणि घेरंड मुनींना अभिप्रेत असलेला कुंडलिनी योगमार्गावरील गुरु या तीनही प्रकारांत बराच फरक आहे. तो नीट लक्षात घ्यावा. हे मार्ग भिन्न-भिन्न आहेत. साधनेच्या दृष्टीने सुद्धा आणि उद्देशाच्या दृष्टीने सुद्धा. तुम्हाला पारंपारिक कुंडलिनी योग साधनेद्वारे आणि समाधी साधनेद्वारे आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर तुम्हाला त्याच साधना प्रणाली मध्ये जाणकार असलेला गुरु करावा लागेल. बऱ्याचदा नवख्या साधकांची या भिन्न-भिन्न प्रकारांत गल्लत होते म्हणून येथे मुद्दाम सांगितलं.

आता शेवटचा मुद्दा. घेरंड मुनींनी समाधी साधना विषद करत असतांना भाग्य अथवा प्रारब्ध हा महत्वाचा घटक सांगितला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर चालू आयुष्यात आपल्याला जी सुख-दु:ख भोगायची आहेत ती म्हणजे आपले प्रारब्ध. प्रारब्धाचा गुणधर्म असा की ते ज्याचे त्याला भोगावेच लागते. प्रारब्धातील सुखकारक गोष्टी अनुभवायला सर्वचजण तयार असतात परंतु प्राराब्धातील दुःखकारक गोष्टींपासून सर्वसाधारण माणूस पळ काढतो. किंबहुना सर्वच जीवांची ती सहज प्रवृत्ती आहे. त्यात लाज वाटण्यासारखे असे काही नाही. संत-सत्पुरुष मात्र त्यांच्या प्रारब्धातील दुःखकारक गोष्टी हसतहसत स्वीकारतात. प्रारब्ध एकदा का भोगून संपवले की ते पुन्हा त्रास देऊ शकत नाही आणि मुक्तीमार्ग प्रशस्त होतो अशी संत-सत्पुरुषांची भूमिका असते. समाधी साधनेवरील प्रत्येक साधकाने अगदी संत-सत्पुरुषांच्या तोडीची भूमिका जरी स्वीकारली नाही तरीही प्रारब्धाकडे सकारात्मकपणे पहाणे आवश्यक ठरते. आवश्यकतेनुसार काही प्रमाणात प्रारब्धाचे शोधन करणे शक्य असते. त्या साठी अनेक उपाय शास्त्रात आहेत परंतु चार योगशास्त्र संमत जालीम उपाय म्हणजे शांभवी मुद्रा, योनिमुद्रा, गुरुमंत्र आणि इष्ट मंत्र. वेगवेगळ्या लेखांमधून आपण त्यांविषयी जाणून घेतले आहे. त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही.

या लेखात तुम्हाला सात-आठ मुद्दे सांगितले. बऱ्याच वाचकांना हे मुद्दे खूप हेवी ड्युटी वाटण्याची शक्यता आहे. खरंतर ते हेवी ड्युटीच आहेत. आगोदर सांगितल्या प्रमाणे जर तुम्ही केवळ शिथिलता आणि मनःशांती करता ध्यान-धारणा करत असाल तर या मुद्द्यांची तुम्हाला फारशी गरज भासणार नाही. समाधी साधना हा विषय सर्वांसाठी नाही. तयारीच्या साधकांसाठीच हा मार्ग आहे. त्यांना वरील सर्व मुद्दे हमखास उपयोगी पडतील अशी आशा आहे.

वरील सर्व सिरीयस गोष्टींच्या चर्चेनंतर आता या लेखाचा शेवट काहीशा गमतीशीर प्रसंगाने करतो.

ही खूप जुनी घटना आहे. माझ्या परिचयातील एक जण खूप मागे लागला होता की त्याच्याबरोबर एखाद्या तीर्थस्थळाला भेट द्यावी म्हणून. मी त्याला स्पष्ट सांगितले की धार्मिक स्थळांना भेटी, धार्मिक परिक्रमा, तीर्थ यात्रा वगैरे वगैरे गोष्टीत मला विशेष रस नाही. योगाभ्यासी साधकाने अंतरीची यात्रा करावी हेच त्याच्यासाठी उत्तम आहे. मेरुदंडरुपी पर्वत चढावा. इडा-पिंगला-सुषुम्नारुपी नद्यांची परिक्रमा षटचक्रांच्या साक्षीने यथासांग करावी. अजपा जपरुपी श्वास-प्रश्वासांचा प्राणयज्ञ करावा. अनाहतरुपी मंजुळ घंटानाद श्रवण करावा. भृकुटीरुपी त्रिवेणी संगमावर स्नान करावे. खेचरी मुद्रेद्वारे स्रवणारे चंद्रामृत तीर्थ म्हणून प्राशन करावे. सहस्राररुपी सर्वोच्च शिखरावर शिवचरणांचे मनोभावे दर्शन घ्यावे. योग्यासाठी हा परिपाठच योग्य आहे. परंतु तो काही केल्या ऐकेना. शेवटी हो-नाही करता करता एके ठिकाणी जायचे ठरवले.

ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी रात्री जवळच्या एखाद्या हॉटेलमध्ये मुकाम करायचा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे देवदर्शन करायचे असा कार्यक्रम ठरवला. रात्र झाली होती. प्रवासाचा शिणवटा आला होता. लवकर झोप लागेल असे वाटले होते. परंतु झाले उलटेच. उकाड्यामुळे म्हणा किंवा परके ठिकाण असल्यामुळे म्हणा पण झोप काही येईना. माझ्या बरोबर असलेला परिचित मात्र ढाराढूर झोपी गेला होता.

झोप येत नव्हती त्यामुळे मी ध्यानाला बसण्याचा निर्णय घेतला. परिचिताला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून दिवा वगैरे न लावता थोडे बाजूला मिट्ट अंधारातच आसन टाकले आणि ध्यानस्त झालो. अपेक्षेपेक्षा फार लवकर आणि फार छान ध्यान लागले.

मी ध्यानातून भानावर आलो तेंव्हा ब्रह्ममुहूर्त सुद्धा उलटून गेला होता. थोड्यावेळाने पहाट होणार होती. परिचित जवळच्या लाकडी बाकड्यावर बसून माझ्याकडे चिंताग्रस्त चेहऱ्याने पहात होता. मला कळेना काय झालं आहे. तो झोपायचे सोडून असा का बसला आहे. ध्यान पूर्ण उतरल्यावर त्याला खुणेने काय झाले म्हणून विचारले.

त्याने सांगितले ते त्याच्याच शब्दांत असे होते -- मी ध्यानस्त झाल्यावर रात्री कधीतरी त्याला जाग आली. पाणी प्यावे म्हणून तो उठला. मिट्ट अंधार होता म्हणून दिवा लावला. त्याला मी पाठमोरा आसनावर बसलेला दिसलो. त्याला कुतूहल वाटले म्हणून तो मी काय करतोय ते बघायला जरा जवळ आला. त्याला असे दिसले की माझा देह एखाद्या कडक काठी सारखा किंवा संन्याशाच्या दंडा सारखा ताठ झाला होता. हात गुढग्यांवर घट्ट रोवलेले होते. माझे डोळे टक्क उघडे होते. परंतु मी कुठेच पहात नव्हतो. जणू माझी नजर शून्यात लागली होती. माझा श्वास चालतोय की नाही हे सुध्दा त्याला कळत नव्हते. त्याने मला हाक मारली. प्रगाढ ध्यानात असल्याने माझ्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने अजून जोराने हाक मारली. जोराने टाळ्या वाजवल्या. तरीही कोणताही प्रतिसाद नाही. मग मात्र तो घाबरला. त्याला वाटले मला ध्यान करत असतांना काहीतरी झालेय. सुमारे दहा-पंधरा मिनिटे तो मला जोराजोराने हाका मारत होता. टाळ्या वाजवत होता. मला अर्थातच यातले काहीही कळत नव्हते. माझ्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो चांगलाच घाबरला होता. माझी एकंदर अवस्था पहाता मला हाताने हलवून भानावर आणण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत काही त्याला झाली नाही. मी भानावर कधी येतोय याची वाट बघत शेवटी तो बिचारा समोरच्या लाकडी बाकड्यावर बसून राहिला.

त्याने माझे ध्यानावस्थेतील केलेले हे वर्णन ऐकून आणि त्याचा भेदरलेला चेहरा पाहून मला खरंतर प्रचंड हसू येत होते. त्याने बहुदा या आधी ध्यानस्त योगी कधी पाहिला नसावा. पुढचे अनेक महिने तो मला खोदून खोदून विचारत असे की डोळे टक्क उघडे असून सुद्धा एवढ्या प्रगाढ ध्यानात कसं काय जाता येतं. त्याला ध्यानमार्गाची विशेष ओळख नव्हती आणि अर्धवट ज्ञान देण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे त्याच्या या प्रश्नावर काहीतरी थातूरमातुर उत्तर देऊन मी त्याची बोळवण करत असे.

असो.

सर्वांसाठी समाधी मार्ग प्रशस्त करणारे शिव-दत्तात्रेय-गोरक्ष आणि अन्य सिद्ध सत्पुरुष समाधी मार्गावरील सर्व साधकांना सदैव मार्गदर्शन करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 November 2023