Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


नवी साधना व उत्स्फूर्त क्रिया

घरी परत आल्यावर आता साधना पूर्वीसारखी सुरू करायला हवी होती. साधनेला बसल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, आजवर उत्साहाने केलेली साधना एकदम कंटाळवाणी वाटू लागली. एकाही साधनेत मन लागेना. केवळ सवय म्हणून साधना केली पण त्यात काही जीव नव्हता. असे का होतेय ते कळेना. मनात सहजप्रेरणा होऊ लागली की आता पूर्वीच्या साधना संपल्या. त्या आता काहीच उपयोगी नाहीत. अगदी तासनतास केल्या तरी आता त्यांतून काहीच फायदा होणार नाही. पूर्वीच्या साधना करायच्या नाहीत तर मग काय करायचे ते मात्र कळत नव्हते. बराच प्रयत्न केल्यावर कंटाळा आला. शवासन करून साधना संपवू या असे म्हणून चटई टाकली.

शवासनात गेल्यावर हळूहळू मन शांत झाले. विचार कमी कमी होत गेले. शरीर शिथील झाले. साधारण पंधरा मिनिटे झाली असतील. त्या शिथील अवस्थेतच माझा एक हात जमिनीवरून आपोआप डोक़्याकडे सरकला. परत तोच विजेचा प्रवाह अंगातून खेळू लागला. एव्हाना मला ती संवेदना आवडू लागली होती. पहिल्या वेळी वाटली तशी भीती वा आश्चर्य वाटत नव्हते. तो प्रवाह खेळू लागला म्हणजे 'काहीतरी' घडणार असे समीकरण मनाने नकळत मांडले होते. प्राण धावत होता. मी जे होईल ते केवळ साक्षी भावाने पहात होतो. करता करता एक वेळ अशी आली की झोपलेल्या स्थितीतच पोट आपसूक आत ओढले गेले आणि जालंधर बंध लागला. एवढा सुखद बंध मी कधीच अनुभवला नव्हता. असाच मूलबंधही लागला पण अगदी सैलपणे (कदाचित मी झोपलेलो होतो हे त्याचे कारण असेल). श्वास मंद मंद होत गेला आणि शेवटी जवळजवळ थांबला! आपला श्वास चालत नाहीये ही कल्पनाच जरा धक्कादायक होती. केवल कुंभकाविषयी जरी मी वाचले होते तरी स्वत: तो अनुभवताना काहीसे वेगळे वाटले. या वेगळे वाटण्यानेच मन विचलीत झाले आणि श्वास परत पूर्ववत चालू झाला. हा अनुभव मला काहीच सेक़ंद आला असेल, पण या अनुभवामुळे योगग्रंथातले एक सत्य मला स्वत:ला पूर्णपणे पटले. विचलित झालेले मन परत शिथील होऊ शकले नाही. त्या दिवशीची साधना तेथेच संपवली.

दुसर्‍या दिवशीपासून माझ्या योगजीवनातील एक महत्वाचा टप्पा सुरू झाला. आता साधना काय करायची हा प्रश्न सुटला होता. आजवर मी स्वेच्छेने साधना करत होतो. आता जागृत कुंडलिनी त्या माझ्याकडून करवून घेऊ लागली. जगदंबा कुंडलिनीच माझी गुरू बनली. कुंडलिनी जागृतीतील हा काहीसा गूढ व चमत्कारीक टप्पा होता. ज्यांनी हा अनुभव घेतलेला नाही त्यांना ते नीट कळणार नाही. दुसर्‍या दिवशीपासून मी केवळ शिथील अवस्थेत ध्यानाला बसू लागलो. जागृत कुंडलिनी जे काही करेल ते केवळ साक्षी बनून पहायचे. त्यात काहीही ढवळाढवळ करायची नाही. हे तत्व मी आत्मसात केले. त्या दिवसानंतर माझी साधना पूर्णपणे बदलली. कधी कधी मी अर्धवट ध्यानाच्या तारेत शंकराची स्तोत्रे वा तंत्र ग्रंथातील श्लोक गात सुटे. एकटाच श्रीकंठाशी वा देवीशी बडबडत बसे. कधी त्या तंद्रीमधे तंत्रोक्त देवीरूपांचे आभास होत. कधी रात्री झोपेतून अचानक जाग येई आणि जाणीव होत असे की आपण काही प्राणायाम व बंधसदृश्य क्रिया करत आहोत. साधनेला बसल्यावर प्राणायाम, कुंभक, बंध, मुद्रा, ध्यान आपोआप घडू लागत. काही मुद्रा, ज्यांचा मी कधी अभ्यासही केला नव्हता, त्या होत. त्याविषयी मला येथे फारसे विस्तृतपणे लिहीता येणार नाही, पण एक मात्र नक्की की हठ-ग्रंथातील अशक्य वाटणार्‍या काही क्रिया कुंडलिनी जागरणानंतर अगदी चुटकीसरशी होऊ लागतात. गंमत म्हणजे या क्रिया केवळ साधनेला बसल्यावरच होत असत. साधनेनंतर प्रयत्न करूनही मला त्या करता येत नसत. 'कुंडलिनी ही सर्व योगसाधनेचा पाया आहे' असे योगग्रंथ का म्हणतात ते मला कळू लागले होते.

अशीच एक दिवस स्वप्नात धडलेली 'ती' साधनाही माझ्याकडून करवली गेली. त्या साधनेमुळे माझा ध्यानाविषयीचा दृष्टिकोणच बदलला. प्रगाढ ध्यानात जाणे कठीण असते असा जो सर्वसाधारण समज असतो (त्या दिवसापर्यंत माझाही तसाच होता) तो पार खोटा ठरू लागला. तासनतास गाढ ध्यान लागू लागले. होणार्‍या उत्स्फुर्त क्रिया कालांतराने कमी कमी होत गेल्या. क्रिया कमी झाल्यास मला वाटे की आपले काही चुकत तर नाही ना. करता करता एक दिवस असा आला की स्थूल क्रिया होणे अजिबात थांबले. त्याचबरोबर ध्यानाची तीव्रता मात्र खूप वाढली. त्यामुळे 'आपले काही चुकत तर नाही ना' ही भावना कमी होत गेली आणि आपण योग्य दिशेने प्रवास करत आहोत याची खात्री पटत गेली.  काही उत्स्फुर्त क्रिया म्हणजे सर्वस्व नाही. तो केवळ एक छोटा टप्पा आहे. त्याही पुढे बरेच काही आहे. ही महत्वाची गोष्ट मी यातून शिकलो.

यानंतरची साधना म्हणजे साक्षात आनंदच. रोज साधनेला कधी बसायचे याची मी वाट पाहत असे. रोजच्या वेळेआधीच मी साधनेच्या खोलीत शिरत असे. साधनेचे जे सर्वसाधारण नियम सांगितले जातात (जसे भरल्यापोटी साधना करू नये, स्नानानंतर साधना करावी इत्यादी) त्यांविषयी फारसे काटेकोर राहणे मी सोडून दिले. साधनेचा आनंदच एवढा असे की त्यापुढे बाकीचे सारे तुच्छ वाटे. सहजप्रेरणा मला खात्रीने सांगे की हे नियम पाळण्याची आता गरज नाही. मी माझा आहार निम्य्यावर आणला जेणेकरून चयापचयात फार उर्जा वाया जाऊ नये. त्यामुळे तासनतास ध्यानाला बसले तरी झोपाळल्यासारखे अजिबात वाटत नसे.

काही महिन्यांनी जागृत शक्ती स्थिरावली. नवी साधना व्यवस्थित बसली. त्याबरोबर मनात सहज प्रेरणा होऊ लागली की दुसरी नोकरी करण्याची वेळ जवळ येत आहे. जेव्हा जेव्हा मी तो विचार टाळण्याचा प्रयत्न करी तेव्हा तेव्हा आतूनच जगदंबा कुंडलिनीचा प्रबळ आवाज येत असे - प्रत्येकाला आपापल्या वाटणीची कर्मे करावीच लागतात. तुलाही करावीच लागतील. ती केल्याशिवाय तुझी सुटका नाही.  त्या आज्ञेला शिरसावंद्य मानून मी दुसरी नोकरी शोधण्याच्या मागे लागलो.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.