अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

कुंभकाद्वारे प्राप्त होणारी मनोमुर्च्छा समाधी

लेखमालेच्या मागील भागात आपण घेरंड मतानुसार भक्तियोग समाधी कशी प्राप्त करून घ्यायची ते विस्ताराने जाणून घेतले. आज आपण मनोमुर्च्छां समाधी विषयी काही जाणून घेणार आहोत.

योगशास्त्रात प्राणायामाचे महत्व वारंवार अधोरेखित केलेले आहे. प्राणायामाची प्रक्रिया ही तीन क्रियांनी बनलेली असते -- पूरक, कुंभक, रेचक. या तीन प्रक्रियांतील कुंभक हा मानसिक स्थैर्य प्रदायक मानला जातो. घेरंड मुनींनी कुंभकाच्या या गुणधर्माचा वापर समाधी साधण्यासाठी कसा करायचा ते सांगितले आहे. ते म्हणतात --

मनोमूर्च्छां समासाद्य मन आत्मनि योजयेत् ।
परात्मनः समायोगात्समाधिं समवाप्नुयात् ॥

योगसाधकाने मनोमुर्च्छां कुम्भ्काच्या सहाय्याने मनाला आत्म्या बरोबर संलग्न करावे. अशा प्रकारे मन आणि परमात्मा यांचा संयोग साधल्याने समाधी अवस्था प्राप्त होते.

वरील विवेचन अर्थातच अत्यंत त्रोटक आहे. त्याचा अर्थ कळण्यासाठी प्रथम तुम्हाला मनोमुर्च्छां प्राणायाम किंवा मूर्च्छा प्राणायाम कसा करतात ते माहित असणे आवश्यक आहे. मनोमुर्च्छां प्राणायामाचा विधी माहित असेल तरच त्याचा वापर समाधी लाभासाठी कसा करावा ते उमगेल.

वेगवेगळ्या योगग्रंथांत मनोमुर्च्छां प्राणायामाचा विधी काहीसा भिन्न-भिन्न प्रकारे दिलेला आहे. हा प्राणायामाचा प्रकार काहीसा उच्च कोटीचा आहे त्यामुळे एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा सराव करावा. घेरंड संहितेनुसार मनोमुर्च्छां कुंभक किंवा मूर्च्छा कुंभक खालील प्रकारे केला जातो --

सुखेन कुम्भकं कृत्वा मनश्च भ्रुवोरन्तरम् ।
सन्त्यज्य विषयान्सर्वान्मनोमूर्च्छा सुखप्रदा ।
आत्मनि मनसो योगादानन्दो जायते ध्रुवम् ॥

सुखपूर्वक कुंभक करून मनाला भ्रूमध्यापाशी एकाग्र करावे. मनातील सर्व विषयांचा त्याग करून मन आणि आत्मा यांचा संयोग करावा. असे केल्याने सुखद अशी मूर्च्छा येते आणि योगानंद प्राप्त होतो.

मनोमुर्च्छां प्राणायामाच्या वरील विधीत पूरक आणि रेचक कशाप्रकारे करावा याचा उल्लेख नाही. त्यामुळे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे असा विधी करायला हरकत नाही. महत्वाचा आहे तो कुंभक. हा कुंभक कसा असायला हवा तर सुखकारक. हे विवेचन वाचल्यावर कदाचित अगदी सोप्पे वाटेल. पण त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. मूर्च्छा म्हणजे सोप्या भाषेत बेशुद्धी किंवा भोवळ आल्यावर होणारी अवस्था. मूर्च्छा किंवा भोवळ आल्यावर जसे मनाला आजूबाजूचे काही उमगत नाही त्या प्रमाणे मनोमुर्च्छां प्राणायामात मनाची जागृत अवस्था लयास जाऊन ते परमात्म्यात विलीन होते.

या कुंभकात मनाला भ्रूमध्यापाशी एकाग्र करायचे आहे. सर्वसामान्य अनुलोम-विलोम किंवा नाडीशोधन प्राणायामात कुंभकाचा कालावधी हा तसा कमी असतो. येथे कुंभकाचा कालावधी जास्त असायला हवा. केवळ काही सेकंद किंवा मिनिटभर एवढाच कालावधी असेल तर मन एकाग्र होऊ शकणार नाही. समाधीसाठी जी आत्यंतिक एकाग्रता आवश्यक असते ती साधता येणार नाही. हठयोगात कुंभक अर्थात श्वास रोकून धरण्याचा कालावधी हळू हळू वाढवला जातो. हा अभ्यास अर्थातच अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. वाघ-सिंह यांसारखी जंगली श्वापदे हाताळताना जशी खबरदारी घ्यावी लागते तशीच सावधानता पूरक, कुंभक आणि रेचकाच्या सरावात घ्यावी लागते असे हठ ग्रंथ सांगतात. काही हठ ग्रंथांत तर कुंभकाचा कालावधी अडीच-तीन तासां पेक्षा जास्त असावा असे सांगितले आहे. मूर्च्छा कुंभकाचा अभ्यास काय फळ प्रदान करतो तर --

एवं नानाविधाऽऽनन्दो जायते नित्यमभ्यासात् ।
एवमभ्यासयोगेन समाधिसिद्धिमाप्नुयात् ॥
मूर्च्छाप्राणायामतोऽस्मात्प्रत्याहारः सुसिध्यति ।
वासनायाः क्षयस्तत्त्वज्ञानकार्यं मनोलयः ॥
अनेन प्राणायामेन मनोनाशो भवत्यलम् ।
सर्वाधिव्याधिविलये महौषधमयं ध्रुवम् ॥

मूर्च्छा प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने नानाविध प्रकारचा आनंद योग्याला मिळतो. अभ्यास दृढावला की समाधी सिद्धी प्राप्त होते. याशिवाय मूर्च्छा प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने प्रत्याहाराची स्थिती येते. प्रत्याहार म्हणजे सर्व इंद्रिये (डोळे, नाक, कान वगैरे) त्यांच्या विषयांपासून (दृष्टी, गंध, श्रवण वगैरे) अलग करणे अर्थात इंद्रियांना पूर्णतः अंतर्मुख करणे. ध्यानासाठी प्रत्याहार ही अत्यावश्यक पायरी आहे. मूर्च्छा प्राणायामाच्या अभ्यासाने मनातील वासानंचा क्षय होतो आणि मनाचा लय साधतो. अंततः मूर्च्छा प्राणायामाच्या अभ्यासाने मनाचा नाश होतो अर्थात अमनस्क स्थिती प्राप्त होते. असा हा मूर्च्छा प्राणायाम सर्वव्याधी नष्ट करणारी महौषधी आहे असे घेरंड मुनी सांगतात.

थोडेसे विषयांतर वाटले तरी बलपूर्वक कुंभकाचा अंतर्भाव असणारा मुर्च्छां प्राणायाम आणि बलपूर्वक कुंभक बिलकुल नसणारा अजपा जप यांची अल्पशी तुलना करू यात. अजपा जपात हेतुतः कुंभक नसतो हे जरी खरे असले तरी अजपा जप नित्य केल्यावर श्वसनाची गती कमी-कमी होत जाते. श्वसनाची गती कमी होते याचा अर्थ पूरक-रेचक अत्यंत संथ गतीने होऊ लागतात. असे झाले की आश्चर्यकारक अशा केवल कुंभकाची उत्पत्ती होते. त्यामुळे अंतिम उद्दिष्टाच्या दृष्टीने बलपूर्वक केलेला कुंभक आणि स्वयमेव घटीत होणारा केवल कुंभक एकच ठरतात. दोन्ही प्रकार अंततः समाधी प्रदान करतात.

असो.

सदा समाधीत निजबोध चाखण्यात मग्न असणारा सुरेश्वर शंकर सर्व ध्यानयोग साधकांना सुखमय असा मनोलय प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 24 July 2023