गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र २०२४
सर्व प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा, नूतन वर्ष आणि चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आपण जसं जसं लहानाचे मोठे होतो तसं तसं आपल्या मनावर कळत नकळत एक गोष्ट बिंबत जाते ती म्हणजे -- आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर कोणत्या ना कोणत्या देवी-देवतेची भक्ति करणे आवश्यक आहे. कोणत्या ना कोणत्या देवी-देवतेची साधना-उपासना करणे आवश्यक आहे.
आपल्या मनावर हे एकदा बिंबले गेले की मग आपसूकच ढीगभर देवी-देवतांची स्वरूपे, पूजा-पाठ, कर्मकांड, उपासनेची विधी-विधाने, नीती-नियम, रूढी-प्रथा-परंपरा यांचा एक मोठा डोंगर आपल्यापुढे उभा ठाकतो. त्या पसाऱ्यातून मग आपण आपल्या बुद्धीला पटतील, जूणे-जाणते-अनुभवी लोकं सुचवतील त्या गोष्टी स्वीकारतो. आता या स्वीकारलेल्या उपासना मार्गावरून आपली वाटचाल सुरू झालेली असते. या उपक्रमात आपापल्या कुवती नुसार आपल्याला कमी-अधिक प्रमाणात यश मिळत असते.
खरंतर वरील गोष्टी काही अर्थहीन असतात किंवा कुचकामी असतात असं बिलकुल नाही. जुन्या जाणत्या ऋषी-मुनींनी, साधू-संन्यास्यानी, जाणकारांनी त्या आपापल्या आकलनानुसार सांगितलेल्या असतात. सर्व सामान्य लोकांना आचरणात आणण्यासाठी एक रूपरेखा असावी जेणेकरून त्यांची वाटचाल आखीव-रेखीव आणि शिस्तबद्ध पद्धतीने होईल या भावनेने त्या तयार झालेल्या असतात. त्या नक्कीच उपयोगी असतात परंतु त्यांचे अनुसरण करत असतांना या गोष्टींचा मूळ उद्देश कित्येकदा दुर्लक्षित होतो किंवा विसरला जातो. कित्येकदा तर काळानुसार या गोष्टींत प्रचंड भेसळ किंवा तफावत सुद्धा आढळून येते.
मागच्या एका लेखात आपण चौर्यांशी लक्ष जीवयोनी विषयी जाणून घेतले. क्षणभर विचार करा की झाडे-झुडपे, किडे-मुंगी, पशू-पक्षादी जीव, आसुरी जीव, देवी-देवता आणि मानव यांमध्ये नक्की काय भेद आहे बरं? जर तुम्ही सखोल विचार कराल तर तुम्हाला असे आढळेल की या भिन्न-भिन्न जीव योनीत मूलभूत फरक आहे तो त्यांच्यातील जीवशक्तीचा स्तर, जीवशक्तीचा दर्जा आणि जीवशक्तीची अभिव्यक्ति यांचा. अन्यथा या सर्व योनी पंचतत्वे आणि जीवशक्ती यांच्याच आधाराने बनलेल्या आहेत. योगशास्त्रात या जीवशक्तीलाच प्राण, प्राणशक्ती किंवा प्राणउर्जा असे म्हणतात.
सर्वसाधारण साधक देवी-देवतांची उपासना करतो त्या मागे मूळ कारण असते ते म्हणजे त्याच्याकडे कशाचा तरी अभाव असतो आणि उपासीत देवी-देवता तो अभाव भरून काढेल किंवा निदान तो अभाव भरून काढायला सहाय्य करेल, मार्ग दाखवेल अशी त्याची अपेक्षा असते. विषय समजण्यासाठी दोन टोकाची उदाहरणे घेऊ. समजा प्रवृत्ती मार्गावरील एखाद्या व्यक्तीला गाडी-बंगला वगैरे भौतिक सुखांची आस आहे. आज त्याच्या कडे त्या गोष्टी त्याच्या अपेक्षेनुसार नाहीत आणि हा अभाव भरून काढण्यासाठी मग तो उपासनेच्या माध्यमातून देवाला साकडे घालतो. दूसरा कोणी एक निवृत्ती मार्गावरील व्यक्ति आहे ज्याला भक्ति, पूजा-पाठ, मंत्र, स्तोत्रे, उपासना वगैरे माध्यमांतून आपल्या आराध्य देवतेचे दर्शन-आशीर्वाद प्राप्त करण्याची आस आहे. हा व्यक्ति साधना करतच असतो परंतु त्यांत म्हणावे तसे यश अजून त्याला मिळालेले नसते आणि मग तो देवाकडे अध्यात्मसुखाचा हा अभाव भरून काढण्यासाठी प्रार्थना करतो. थोडक्यात सर्वसाधारण साधकाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर त्याच्याकडे आजच्या घडीला "काहीतरी" नाही आणि ते "काहीतरी" प्राप्त करण्यासाठी त्याचा उपासना नामक खटाटोप सुरू आहे.
उद्देश कोणताही असो साधकाने हा उपासनेचा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यात त्याला यश मिळणे अथवा न मिळणे कशावर बरं अवलंबून असते? या पूर्वी काही लेखांतून आपण प्रारब्ध, पुरुषार्थ, गुरुकृपा अशी काही कारणे जाणून घेतली आहेत. परंतु अजून एक कारणही महत्वाचे आहे ते म्हणजे उपासित देवी-देवता आणि साधक यांमधील प्राणशक्तीच्या "ट्यूनिंग" चा अभाव. हजारो-लाखों साधक मंत्र रटत असतात, स्तोत्र घोकत असतात, पूजा-पाठ, होम-हवन करत असतात पण त्यांतील ज्या साधकांचे आपल्या उपासीत देवी-देवते बरोबरचे प्राणशक्तीचे ट्यूनिंग चांगले आहे त्यांना लाभ लवकर आणि कमी कष्टात होतो. बाकीच्या असंख्य साधकांची अध्यातमसुखाची तळमळ शांत होऊ शकत नाही.
साधक आणि उपासीत देवी-देवता यांच्यामधील प्राणशक्तीचे ट्यूनिंग सुधारायचे असेल तर प्रथम साधकाला आपला स्वतःचा प्राणमय कोष सुधारावा लागतो. साधकाचा प्राणमय कोष आणि प्राणशक्तीचे आभामंडल सुधारले की मग आपल्या आराध्य देवी-देवतेशी प्राण ऊर्जेच्या स्तरावर साधक स्वतःला जोडू शकतो. प्राणशक्तीचे महत्व हे असे अनन्यसाधारण आहे. ज्या साधकांना ते कळते त्यांचा आध्यात्मिक उत्कर्ष शीघ्र गतीने होतो. योगशास्त्राचा मूळ सिद्धांतच मुळी आहे -- यथा पिंडे तथा ब्रह्मांडे किंवा पिंडी ते ब्रह्मांडी.
प्राणशक्तीचा स्तर सुधारण्याचे जे काही मार्ग योगशास्त्रात उपलब्ध आहेत त्यांतील एक सुलभ आणि अत्यंत परिणाम कारक मार्ग म्हणजे अजपा जप आणि शांभवी मुद्रा. शंभू महादेवाने दिलेल्या या दोन योग क्रियांचा अंगिकार केला तर मग उपासना मार्ग, साधना मार्ग सुलभ होतो. आपल्या आराध्य देवतेची उपासना करण्यासाठी जे काही मंत्र, स्तोत्र, पूजा-पाठ वगैरे यत्न तुम्ही करत आहात त्यात सफलतेची शक्यता कित्येक पटींनी वाढते. उपासना मार्ग आनंददायी बनतो. शीघ्र फलदायी बनतो. तुम्ही जर कोणत्याच विशिष्ठ देवी-देवतेची उपासना करत नसाल तरी या ध्यान क्रियांचा अभ्यास तुम्हाला "आत्मारामाचा" आशीर्वाद मिळवून देतो. जीव-शिव ऐक्याची अवीट गोडी चाखायला मदत करतो. "मनःशांती" रूपी प्रसाद अलगद तुमच्या पदरात टाकतो.
येऊ घातलेल्या चैत्र नवरात्राकडे केवळ एक उत्सव किंवा पर्व म्हणून न पहाता शरीरस्थ प्राणशक्तीचा जागर, जगदंबा कुंडलिनीचा उत्सव या दृष्टीने पहा असे आवर्जून सांगावेसे वाटते.
असो.
ज्या शंभू महादेवाने मानव पिंडात जगदंबा कुंडलिनीची घटस्थापना केली आहे तो सांब सदाशिव सर्व वाचकांना प्राणशक्तीची उपासना करण्याची प्रेरणा देवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.