श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र -- परंपरा आणि फलश्रुती

मागील लेखात आपण महाभारतातील श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राची पूर्व-पीठिका जाणून घेतली. श्रीकृष्णाला शंभू महादेवांची एक हजार आठ नावे कथन केल्यानंतर उपमन्यु ऋषींनी त्याला या स्तोत्राची परंपरा आणि फलश्रुती सांगितली आहे. या स्तोत्राची परंपरा हा जरी सहस्रनामाच्या मूल पाठाचा भाग नसली तरी थेट ब्रह्मदेवा पासून सुरू झालेली ही परंपरा श्रीकृष्णा पर्यन्त कशी वहात आली आहे ते जाणून घेणे नक्कीच उद्बोधक ठरावे. श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राच्या पाठणाने कोणता लाभ घडून येतो ते जाणून घेणेही या स्तोत्राच्या उपासनेच्या उपयोगीतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या लेखात आपण या गोष्टी जाणून घेणार आहोत.

प्रथम आपण या स्तोत्राची परंपरा जाणून घेऊ. ही परंपरा जाणून घेतल्याने तुम्हाला हे लक्षात येईल की हे स्तोत्र अनेक दिग्गज म्हणून ओळखलेल्या ऋषी-मुनींनी आणि देवांनी पठण केले आहे. श्रेष्ठ लोकांचे आचरण सामान्य जनांना आदर्शवत असते त्यामुळे या थोर ऋषी-मुनी-देवतांचे अनुकरण करत श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्यास सामान्य मानवाचा लाभ घडून येईल हे निश्चित. दुसरे असे की या परांपरेकडे नजर टाकल्यास तुम्हाला या स्तोत्राची प्राचीनता जाणवेल. हे काही काल-परवा निर्माण झालेले स्तोत्र नाही. ते अनादि काळापासून देवी-देवता-ऋषी-मुनी-तपस्वी अशा सगळ्यांनी उपयोगात आणलेली एक स्तोत्रमाय रचना आहे. काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली ती एक अद्भुत शिवस्तुति आहे.

एकदा तंडी ऋषी भगवान शंभू महादेवची कठोर तपस्या करत असतांना या शिवनमांचा प्रादुर्भाव झाला. ही नामे ब्रह्मदेवाने नीट ऐकली आणि स्मरणात ठेवली. भगवान शंकराच्या सान्निध्यात असतांना त्याची स्तुति त्याने याच नामांनी केली. श्रीशिवसहस्रनामाच्या परंपरेची सुरुवात त्या स्तोत्राच्या उत्तर-भागात ही अशी दिलेली आहे --

एतद्रहस्यं परमं ब्रह्मणो हृदि संस्थितम् ।
ब्रह्मा प्रोवाच शक्राय शक्रः प्रोवाच मृत्यवे ॥

शिवसहस्रनाम रूपी हे परम रहस्य ब्रह्मदेवाने आपल्या हृदयात धारण केले होते. ब्रह्मदेवाने ते इंद्राला (शक्र) सांगितले. इंद्राने ते मृत्यूला सांगितले.

मृत्युः प्रोवाच रुद्रेभ्यो रुद्रेभ्यस्तण्डिमागमत् ।
महता तपसा प्राप्तस्तण्डिना ब्रह्मसद्मनि ॥

मृत्यूने या स्तोत्रचे ज्ञान रुद्राना / रुद्र गणांना दिले. महान तपस्या केल्याने ब्रह्मदेवाच्या सान्निध्यात / ब्रह्मलोकात हे स्तोत्र रुद्रानकडून तंडी ऋषीना प्राप्त झाले.

तण्डिः प्रोवाच शुक्राय गौतमाय च भार्गवः ।
वैवस्वताय मनवे गौतमः प्राह माधव ॥
नारायणाय साध्याय समाधिष्ठाय धीमते ।
यमाय प्राह भगवान्साध्यो नारायणोऽच्युतः ॥

तंडी ऋषींनी ते शुक्राला, शुक्राने ते गौतम ऋषींना आणि गौतम ऋषींनी ते वैवस्वताला दिले. वैवस्वताने ते समाधिस्थ असलेल्या नारायण ऋषींना दिले. नारायणाने मग ते यमाला प्रदान केले.

नाचिकेताय भगवानाह वैवस्वतो यमः ।
मार्कण्डेयाय वार्ष्णेय नाचिकेतोऽभ्यभाषत ॥
मार्कण्डेयान्मया प्राप्तो नियमेन जनार्दन ।
तवाप्यहममित्रघ्न स्तवं दद्यां ह्यविश्रुतम् ॥

यमाने ते नचिकेताला दिले. नचिकेताने ते मार्कंडेय मुनींना दिले. मला (उपमन्यु ऋषींना) ते मार्कंडेय ऋषी कडून प्राप्त झाले. तेच स्तोत्र मी आता तुला प्रदान केले आहे.

अशा प्रकारे श्रीकृष्णाला उपमन्यु ऋषीकडून श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र प्राप्त झाले.

श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राची परंपरा जाणून घेतल्यावर या स्तोत्राच्या फलश्रुती कडे वळूया. सर्वसामान्य उपासकाची नेहमी ही इच्छा असते की आपण जी उपासना करत आहोत त्याचे काहीतरी फळ आपल्याला प्राप्त व्हावे. कधी हे फळ भौतिक स्तरावरचे असते तर कधी ते आध्यात्मिक स्तरावरचे असते. त्या दृष्टीने श्रीशिवसहस्रनाम स्तोत्रात काय सांगितले आहे ते आता थोडक्यात जाणून घेऊ.

शिवमेभिः स्तुवन्देवं नामभिः पुष्टिवर्धनैः ।
नित्ययुक्तः शुचिर्भक्तः प्राप्नोत्यात्मानमात्मना ॥
एतद्धि परमं ब्रह्म परं ब्रह्माधिगच्छति ।
ऋषयश्चैव देवाश्च स्तुवन्त्येतेन तत्परम् ॥

श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राचा सर्वात मोठा फायदा येथे सांगितला आहे. जो शुद्धी हृदयी भक्त नित्य नेमाने भगवान शिवाची स्तुति या पुष्टीवर्धन करणाऱ्या नामांनी करतो त्याला स्वतःच्या आत्म्याची प्राप्ती होते अर्थात त्याला आत्मसाक्षात्कार घडून येतो. त्याला परब्रहमाची प्राप्ती होते अर्थात त्याला मोक्ष प्राप्त होतो. याच कारणास्तव ऋषी-मुनी आणि देवी-देवता याच स्तोत्राच्या सहाय्याने शंभू महादेवाची स्तुती करत असतात.

स्तूयमानो महादेवस्तुष्यते नियतात्मभिः ।
भक्तानुकम्पी भगवानात्मसंस्थाकरो विभुः ॥
तथैव च मनुष्येषु ये मनुष्याः प्रधानतः ।
आस्तिकाः श्रद्धधानाश्च बहुभिर्जन्मभिः स्तवैः ॥
भक्त्या ह्यनन्यमीशानं परं देवं सनातनम् ।
कर्मणा मनसा वाचा भावेनामिततेजसः ॥
शयाना जाग्रमाणाश्च व्रजन्नुपविशंस्तथा ।
उन्मिषन्निमिषंश्चैव चिन्तयन्तः पुनःपनः ॥
श‍ृण्वन्तः श्रावयन्तश्च कथयन्तश्च ते भवम् ।
स्तुवन्तः स्तूयमानाश्च तुष्यन्ति च रमन्ति च ॥
जन्मकोटिसहस्रेषु नानासंसारयोनिषु ।
जन्तोर्विगतपापस्य भवे भक्तिः प्रजायते ॥
उत्पन्ना च भवे भक्तिरनन्या सर्वभावतः ।
भाविनः कारणे चास्य सर्वयुक्तस्य सर्वथा ॥

या स्तुतीने प्रसन्न झालेला महादेव आपल्या भक्तांना त्यांच्या आत्मस्वरूपात स्थापित करतो अर्थात त्यांना आत्मस्वरूप दर्शन घडवतो. त्यांना मुक्ती प्रदान करतो. परंतु ही अवस्था प्राप्त करण्यासाठी भक्तांच्या अंगी काही गुण असावे लागतात. ते कोणते ते येथे सांगितले आहे.

जो भक्ति अत्यंत आस्तिकतेने आणि श्रद्धेने एकाग्रचित्त होऊन महादेवाचे स्मरण करतात. ज्यांच्या हातून जन्म-जन्मान्तरी शिवभक्ति घडलेली असते. काया-वाचा-मनाने जे शिवभक्तीत तल्लीन झालेले असतात. जागेपाणी, निद्रा घेत असतांना, जाता-येता, उठता-बसता, नेत्रानचि उघडझाप करतांना शिवस्मरण करतात. जे सदैव इतरांपुढे शिवस्तुति करत असतात आणि इतरांकडून शिवस्तुती ऐकतात. अशा सर्व भक्तांना वर सांगितलेले फळ प्राप्त होते आणि ते आनंदी आणि समाधानी जीवन व्यतीत करतात.

जन्मकोटिसहस्रेषु नानासंसारयोनिषु ।
जन्तोर्विगतपापस्य भवे भक्तिः प्रजायते ॥
उत्पन्ना च भवे भक्तिरनन्या सर्वभावतः ।
भाविनः कारणे चास्य सर्वयुक्तस्य सर्वथा ॥
एतद्देवेषु दुष्प्रापं मनुष्येषु न लभ्यते ।

ज्यांचे नाना जीव योनींमध्ये अनेक सहस्रकोटी जन्म होऊन गेलेले आहेत आणि ज्यांनी पापांचा नाश केलेला आहे अशा भक्तां मध्येच वर सांगितल्याप्रमाणे शिवभक्ती प्रकट होते. असे भक्त या जगी दुर्मिळ आहेत. थोडक्यात सांगायचे तर भगवान शिवशंकराची भक्ति करावी अशी इच्छा मनात निर्माण होणे हे परम भाग्याचे लक्षण आहे.

निर्विघ्ना निश्चला रुद्रे भक्तिरव्यभिचारिणी ॥
तस्यैव च प्रसादेन भक्तिरुत्पद्यते नॄणाम् ।
येन यान्ति परां सिद्धिं तद्भागवतचेतसः ॥

आता फार महत्वाच्या गोष्टीकडे उपमन्यु ऋषी संकेत करत आहेत. वर सांगितलेली "अव्याभिचारिणी" शिवभक्ति मनात निर्माण होण्यासाठी शंभू महादेवांची कृपा आणि इच्छा असावी लागते. यांचा सूक्ष्म अर्थ असा की तुमच्या मनात महादेवाची भक्ति करावी अशी इच्छा निर्माण होणे हा ईश्वरी संकेत आहे. महादेवाच्या इच्छेनेच तुमच्या मनात शिवभक्तीचे बीज रोपले गेले आहे. हा संकेत ओळखून त्या बीजाला खत-पाणी घालणे सर्वस्वी तुमच्या हाती आहे. जे भक्त हा संकेत ओळखून महादेवची भक्ति करतात त्यांना परम सिद्धि प्राप्त होते अर्थात त्यांना शिव पदाची प्राप्ती होते.

ये सर्वभावानुगताः प्रपद्यन्ते महेश्वरम् ।
प्रपन्नवत्सलो देवः संसारात्तान्समुद्धरेत् ॥
एवमन्ये विकुर्वन्ति देवाः संसारमोचनम् ।
मनुष्याणामृते देवं नान्या शक्तिस्तपोबलम् ॥

आता उपमन्यु ऋषी वर सांगितलेले फळ पुन्हा अधोरेखित करतात. ते म्हणतात की जे भक्त महेश्वराला भजतात ते संसार सागर तरुन जातात. त्यांचा उद्धार होतो. याच शिवभक्तीच्या मार्गाने देवांनी सुद्धा संसार बंधनातून सुटका करून घेतली. उग्र तपश्चर्या अथवा हठयोगादी शारीरिक क्षमता आवश्यक असलेल्या गोष्टी करण्यास असमर्थ असलेल्या मनुष्य प्राण्यांचे कार्य या सोप्या शिवोपासने द्वारे अर्थात श्रीशिवसहस्रनाम स्तोत्राच्या उपासने द्वारे साधते.

इदं पुण्यं पवित्रं च सर्वदा पापनाशनम् ।
योगदं मोक्षदं चैव स्वर्गदं तोषदं तथा ॥
एवमेतत्पठन्ते य एकभक्त्या तु शङ्करम् ।
या गतिः साङ्ख्ययोगानां व्रजन्त्येतां गतिं तदा ॥
स्तवमेतं प्रयत्नेन सदा रुद्रस्य सन्निधौ ।
अब्दमेकं चरेद्भक्तः प्राप्नुयादीप्सितं फलम् ॥

असे हे श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र पुण्यावर्धन करणारे आणि पापांचा नाश करणारे आहे. हे स्तोत्र योग, मोक्ष, आणि स्वर्ग असे सर्व प्रकारचे सुख प्रदान करण्याचे सामर्थ्य असलेले आहे. या स्तोत्राने भगवान शिवाची भक्तिपूर्वक आराधना केल्याने सांख्य योग्याना जे फळ प्राप्त होते तेच फळ उपासकाला प्राप्त होते. भगवान सदाशिवाच्या सान्निध्यात या स्तोत्राचा पाठ एक वर्ष पर्यन्त केल्याने जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होते.

स्वर्ग्यमारोग्यमायुष्यं धन्यं वेदेन संमितम् ।
नास्य विघ्नं विकुर्वन्ति दानवा यक्षराक्षसाः ॥
पिशाचा यातुधाना वा गुह्यका भुजगा अपि ।
यः पठेत शुचिः पार्थ ब्रह्मचारी जितेन्द्रियः ।
अभग्नयोगो वर्षं तु सोऽश्वमेधफलं लभेत् ॥

पुढे उपमन्यु ऋषी सांगतात की श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र उपासनेने भक्ताला स्वर्गसुखाची प्राप्ती होते. त्याला आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. त्याला धनसंपदा प्राप्त होते. असे हे स्तोत्र सर्व वेदांचे सार आहे. या स्तोत्राच्या उपासकाला यक्ष, राक्षस, दानव, पिशाच, यातुधान, गुह्यक, साप इत्यादी गोष्टींचा उपद्रव होत नाही. जो भक्त इंद्रियांवर ताबा ठेऊन ब्रह्मचर्य पूर्वक या स्तोत्राचा एक वर्ष पर्यन्त अखंड पाठ करतो त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते.

तर असे आहे श्रीशिवसहस्रनाम स्तोत्र उपासनेचे फळ. थोडक्यात सांगायचे तर भोग आणि मोक्ष अशी दोन्ही प्रकारची फलप्राप्ती या स्तोत्राने होते. अर्थात अध्यात्मशास्त्रातील इतर स्तोत्रांप्रमाणे या स्तोत्राची फलप्राप्ती सुद्धा ज्याच्या-त्याच्या श्रद्धेवर, भक्तीवर आणि विश्वासावर अवलंबून आहे. तुमची जशी मनोभूमी असेल, तुमच्या मनात इच्छा-वासनांचे जसे बीज पेरलेले असेल, तुमच्या श्रद्धा-भक्तीचा स्तर जसा असेल त्या प्रमाणे तुम्हाला फळ प्राप्त होईल हे उघड आहे. या स्तोत्राच्या उपासनेची आवड वाटल्यास आणि उपासना करण्यासाठी सवड असल्यास उपासना करून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा हे उत्तम.

असो.

ज्याची भक्ती हीच समस्त स्वर्ग सुखांपेक्षा श्रेष्ठ आहे तो भगवान सांब सदाशिव सर्व अजपा योग साधकांना त्यांचे मनोवांछित अभिष्ट फल प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ भगवान शिव प्रणीत योग विद्येचे आणि अजपा गायत्रीचे उपासक आणि मार्गदर्शक आहेत. व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 19 February 2025