Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


अद्भुत स्वप्न आणि दीक्षा

एका विशाल पर्वताचा चढ मी चढत होतो. सर्वत्र एक विलक्षण शुभ्र  चांदणे पडल्यासारखा आल्हाददायक प्रकाश पडला होता. जाता जाता योगी, साधू, संन्यासी, बैरागी व तांत्रिकांचे जथेच्या जथे मला दिसत होते. कोणी चित्रविचित्र आसने करत होते तर कोणी तंत्र-मंत्रात गर्क होते. कोणी उग्र तपाचरणात मग्न होते तर कोणी भव्य यज्ञ उभारत होते. ते कोण आहेत काहीच कळत नव्हते. सर्वजण आपापल्या कार्यात व्यग्र होते. कोणालाही माझ्याकडे लक्ष देण्यास सवड नव्हती. करता करता चढ संपला. एक अद्भुत दृश्य समोर दिसत होते. श्रीशंकर गिरिजेसह विराजमान झाले होते. मघाचा तो प्रकाश त्या उभयतांच्या मुखमंडलामधूनच प्रकट होत होता. मला आनंदाचे भरते आले. मी त्यांना वारंवार नमस्कार करू लागलो. तोंडाने स्तुतीपर वचने बोलू लागलो. काही काळाने आनंदाचा भर ओसरल्यावर काय करावे हे न सुचून त्यांच्या पायाशी तसाच स्वस्थ बसून राहिलो.

देवीने मला एखाद्या लहान मुलासारखे जवळ घेतले आणि डोक्यावरून ममतेने हात फिरवला. मला एकदम रडूच कोसळले. मी हमसाहमशी रडू लागलो. बर्‍याच दिवसांनी एखाद्या लहान मुलाला आई-वडील भेटले तर तो कसा रडतो तसा मी रडत होतो. देवांनी मला जवळ घेतले, माझे डोळे पुसले व विचारले "काय झाल रडायला?" रडतरडतच मी उत्तरलो, "येताना मी अनेक योगी-तपस्वी पाहिले. ते फार विचित्र व कठीण साधना करत होते. मला असे काहीसुधा येत नाही. माझी तुमच्याप्रत पोहोचण्याची सारी स्वप्ने आज पार धुळीस मिळाली."  त्यांचा चेहरा थोडा गंभीर झाला. माझ्या डोळ्यात पहात ते म्हणले - "तूही असले उपद्व्याप खूप केलेस. आता त्याची गरज नाही. मी जीवाला अन्न, पाणी, प्रकाश दिला तसेच मुक्तीचा मार्गही दिलाय. पण त्या सोप्या मार्गाने जाण्यापेक्षा तुम्ही माणसं फार क्लिष्ट मार्गाने जाता." क्षणभर थांबून त्यांनी विचारले - "तुला माझ्याप्रत पोहोचायचय ना?" माझा होकार जणू गृहीत धरून त्यांनी मला खांद्याला धरून खाली बसवले. आपले दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवले. मी क्षणार्धात निश्चल झालो. माझ्या मनातले सगळे विचार नाहीसे झाले. खाली झुकून त्यांनी माझ्या कानात एक मंत्र फुंकला. माझे सारे शरीर रोमांचित झाले. गात्रागात्रांमधून एक विलक्षण प्रवाह धावू लागला. त्याच वेळेस त्यांचे हात डोक्यावर किंचितसे दाबले गेले. एक सुखद विजेचा प्रवाह माझ्या पाठीतून वाहू लागला. सर्व शरीरातून प्रकाशाचे बारीक बारीक कण प्रचंड वेगाने डोक़्याकडे (की त्यांच्या हाताकडे?) धावू लागले. जाता जाता ते प्रकाशकण जागोजागी क्षणभर थांबत होते. त्या प्रकाशकणांनी सारे शरीर जणू घुसळून निघत होते. डोक्यात सुगंधी फुलांच्या पाकळ्या कुस्करल्यावर जसे वाटेल तसे वाटत होते. मंद मंद काहीतरी घुसळले, कुस्करले जात होते. असे वाटत होते की जन्मोजन्मीची पुटे नाहीशी होत आहेत. श्वासाबरोबर तो मंत्र आपोआप उमटत होता. कालांतराने श्वास थांबला. फक्त मंत्रच उमटू लागला. काही वेळाने तोही थांबला. प्रगाढ शांततेने मन ओतप्रोत भरून गेले. त्या अवस्थेत मी किती वेळ होतो मला माहीत नाही. केव्हा तरी देवांचे धीरगंभीर शब्द कानावर पडले - "आज तुझा नवा जन्म झालाय. या शरीरातच सारी ज्योतीर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. मी देवळांमधे नाही, या देहातच आहे. स्वत:शी प्रामाणीक रहा. मग कोठलेच यम-नियम पाळावे लागणार नाहीत. जगात परत जा, पण कमलपत्रावरच्या पाण्यासारखा अलिप्तपणे जग. आता दिलेली साधना सोडू नको. तसा ती सोडूही शकणार नाहीस."

मग सारे त्या प्रकाशात गुडूप होऊ लागले. तो पर्वत, ते योगी, देव, देवी. सगळेच विरघळू लागले. मी जीवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न केला की "मला सोडून जाऊ नका!"

त्या आक्रोशाबरोबर मला जाग आली. आजूबाजूला मिट्ट काळोख होता. मला धक्का बसला. त्याला दोन कारणे होती. एक म्हणजे माझ्या डोक्यात अजूनही मंद मंद पाकळ्या कुस्करल्या जात होत्या आणि दुसरे म्हणजे मी पद्मासनात बसलो होतो. मला पक्के आठवत होते की मी झोपतांना बिछान्यावर स्वत:ला झोकून दिले होते. मग मी बसलो कसा? तेही पद्मासनात? आता अनुभवले ते काय होते? स्वप्न की सत्य? डोके काम करेना. सकाळपासून घडणार्‍या घटनांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न मन आपसूक करू लागले. मंदिरातला प्रसंग आठवला आणि वेळेची आठवण झाली. घड्याळाकडे नजर टाकली. छातीत धस्स झाले. घड्याळाचा इंडिग्लो रात्रीचे साडेदहा दाखवत होता. मी मंदिरामधून आलो तेव्हा फारच तर सकाळचे सात-साडेसात झाले असतील. मी एवढा वेळ झोपलो? सकाळी मी काहीच खाल्ले नव्हते. तहान, भूक, आवाज या कशानेच मला जाग येऊ नये? ही नैसर्गिक झोप होती की अजुन काही? डोके भंडावून गेले होते. झाल्या प्रकाराचा विचार करणे सोडून अंधारात तसाच बसलो.  काही काळाने जाणीव झाली की प्रचंड तहान लागल्ये. पाण्याची बाटली कुठे ठेवली आहे तेच आठवत नव्हते. तसाच धडपडत उठलो. वॉशबेसीन गाठले आणि आजवर शिकलेले स्वच्छतेचे सगळे नियम बाजूला सारून नळाला तोंड लावले.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.