Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


क़र्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम

नोकरी शोधायला सुरवात केली खरी, पण मी जरा काळजीतच होतो. IT industry अशी आहे की तेथे क्षणाक्षणाला नवे बदल होत असतात. माझे skill set भक्कम असले तरी ते थोडे घासून पुसून काढणे गरजेचे होते. इंटरव्यूची तयारीही करायला हवी होती. पण सुदैवाने थोड्याच अवधीत मला नोकरी मिळाली. एवढ्या लवकर नोकरी मिळाल्याने हायसे वाटले.

माझी नवी नोकरी सुरळीत सुरू झाली. IT industry मधे नोकर्‍या बदलणे ही काही नवी गोष्ट नाही. त्यानंतर काही काळाने मीही काही कंपन्या बदलल्या. आता माझा skill set चांगलाच तगडा झाला होता. Microsoft Technologies मधे चांगलाच आत्मविश्वास आला होता. हे घडत असताना एक गोष्ट जाणवली की नवे तंत्रज्ञान शिकताना आता अजिबात त्रास होत नाहीये. माझ्या बरोबरच्या अनेकांना ते कटकटीचे व त्रासाचे वाटत असे. कसे कोण जाणे, पण नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे मला सहज जमू लागले. याचे सारे श्रेय अर्थातच जगदंबा कुंडलिनीचे आहे. तीच या गोष्टी घडवून आणत होती असा माझा विश्वास होता.

येथे योगशास्त्रातील आणखी एक रहस्य सांगायला हवे. योग साधक जेव्हा ब्रम्हचर्याचे काटेकोर पालन करतो तेव्हा त्याच्या शरीरात 'मेधानाडी' नावाची नाडी सक्रिय होते. साधारणत: अधोगतीने वाहणारी शक्ती या नाडीद्वारे ऊर्ध्वगतीने जाऊ लागते व ओजरूपाने साठू लागते. यालाच उर्ध्वरेतावस्था असे म्हणतात. एकदा रामकृष्ण परमहंसांना विचारणा झाली, "स्वामीजी, काम जाईल कसा?" त्यांचे उत्तर मोठे सूचक व मार्मिक होते. ते म्हणाले, "काम जाईल काय म्हणून रे? त्याची दिशा बदलून टाक की." स्वामी विवेकानंदांसारख्या दिग्गजांमधे हे ओज पुर्णार्थाने विकसित होत असते, पण सामान्य साधकही त्यापासून फायदा मिळवू शकतो. हे ओज ज्ञानार्जनासारख्या कार्यासाठी फारच उपयोगी पडते. असो.

माझे नंतरचे IT Career म्हणजे एक जादूई प्रवास होता. माझ्या क्षेत्रात मी प्राविण्य मिळवले. त्याच सुमारास माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की हे आपले ज्ञान दुसर्‍यालाही द्यावे. माझ्या बरोबरचे अनेक सहकारी प्रोग्रॅमर्स माझ्याकडे शंका घेऊन येत. त्यांना मदत करण्यात माझ्यातल्या 'शिक्षकाला' नेहमी आनंदच वाटे. पुढे मी स्वतःची एक वेबसाईट सुरू केली व त्यावरून Software Development विषयी लेख लिहू लागलो. ASP.NET या विषयातील ती एक महत्वाची वेबसाईट गणली जाऊ लागली. माझे लेखन बघून इंग्लंड मधील WROX Press या नामांकीत प्रकाशन संस्थेने मला लेखनकार्यासाठी विचारणा केली. त्यांच्यातर्फे मला Professional ADO.NET, Professional ADO.NET with VB.NET आणि Professional XML for .NET Developers या पुस्तकांचा एक सहलेखक म्हणून काम करता आले. हा अनुभव फारच महत्वाचा होता. त्यावेळी भारतातल्या फारच थोडया लेखकांची अशी पुस्तके प्रकाशित झाली होती. या अनुभवामुळे माझा आत्मविश्वास तर वाढलाच पण त्याचबरोबर जागतिक पातळीवर .NET Expert म्हणून माझी गणना होऊ लागली. पुढे मी APress या अमेरिकी प्रकाशन संस्थेसाठी Pro .NET XML व Beginning XML with C# ही पुस्तके लिहिली. पूर्णवेळ नोकरी सांभाळून अशी पुस्तके लिहिणे म्हणजे एक तारेवरची कसरतच असते. वेळ कमी असूनही दर्जा व अचूक माहिती यात कमतरता राहून चालत नाही. पुढे मी Developer's Guide to ASP.NET हे पुस्तक लिहून स्वतः प्रकाशित केले. माझ्या जगभरातील वाचकांनी व विद्यार्थ्यांनी त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. अमेरिकेतीलच ASP.NET Pro या मासिकासाठी Code Talk हे सदरही मी बराच काळ लिहिले. माझे .NET क्षेत्रातेल कार्य पाहून Microsoft ने माझी Most Valuable Professional या पुरस्कारासाठी निवड केली. जगभरातील काही निवडक लोकांना त्यांच्या Developer Community मधील कार्याबद्दल व मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानातील कौशल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर ASPInsiders या संस्थेचे सभासद होण्याचा मानही मला मिळाला. हे सभासदत्व ASP.NET मधे प्राविण्य मिळवलेल्या जगभरातील निवडक मोजक्याच लोकांना दिले जाते. मायक्रोसॉफ्टच्या आगामी प्रणालींविषयी या सदस्य तज्ञांचा अभिप्राय जाणून घेणे हे या संस्थेचे महत्वाचे काम आहे.

IT क्षेत्रातील माझे हे कार्य पाहून अनेक जण माझे कौतुक करत. मी जागतिक पातळीवर अभिमानास्पद कार्य केले आहे वगैरे सांगत. मला मात्र याचे काहीच वाटत नसे. ना आनंद ना दु:ख. हे कार्य माझे नाही तर परमेश्वराचे आहे हे मला पक्के ठाऊक होते. मी आदिनाथाला भक्तीपुर्ण अंत:करणाने नेहमी सांगत करत असे की "हे सगळे तुझे श्रेय आहे. मी लोखंड होतो. तू माझे सोने केलेस. मी गारगोटी होतो. तू माझा हिरा बनवलास. मी स्वत:ची काय फुशारकी मारु? सगळे तर तुझेच आहे. मी काहीसुद्धा केलेले नाही.

करता करता अशी वेळ आली की साधनेला वेळ कमी पडत आहे असे वाटू लागले. आठ तास नोकरी व दोन-तीन तास प्रवास यानंतर मिळणारा वेळ कमी वाटू लागला. यावर उपाय म्हणून मी एक महत्वाचा निर्णय घेतला - नोकरीला कायमचा रामराम ठोकायचा. मी परमेश्वराकडे नोकरीतून कायमचे निवृत्त होण्याची परवानगी मागितली. "देवा! आजवर तू सागितल्याप्रमाणे मी नोकरी केली. आता साधनेत पूर्णवेळ लक्ष घालावे असे वाटत आहे. नोकरीत माझे मन आता फारसे रमेल असे वाटत नाही." अशी प्रार्थना केली. या वेळी त्याने मला परवानगी दिली. अनेकांना माझा हा निर्णय चमत्कारीक वाटला. मी एवढया तरूणपणी तेही आपल्या क्षेत्रात एवढी चमकदार कमगिरी करत असताना असे का करतोय हे त्यांना कळत नव्हते. एवढी वर्षे जणू विश्वस्ताच्या नात्याने मी ही जबाबदारी पेलत होतो. या कर्मयोगाधारित प्रवासावर मी मात्र पूर्ण समाधानी होतो.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.