Ajapa Gayatri : Meditative breath for the modern mind. Rediscover the sacred rhythm of your breath. Awaken inner silence that guides, heals, and transforms.


स्वागत

प्रिय वाचकांनो,
भारतवर्षामध्ये हजारो वर्षांपासून ऋषी, मुनी, तपस्वी, योगी, संन्यासी, बैरागी शाश्वत सत्याचा शोध घेण्यात मग्न होत आलेले आहेत. या सर्व लोकांनी या जगाविषयीचे आणि शाश्वत सत्याविषयीचे आपापले मत निरनिराळ्या पद्धतीने मांडले आहे. अशा एकुण सहा विचारप्रवाहांना महत्वाचे मानले जाते. त्यांना षडदर्शने असे म्हटले जाते. ही षडदर्शने म्हणजे सांख्य, योग, वेदांत, मीमांसा, न्याय आणि वैशेषिक. षड्दर्शनांमधून मुख्यतः चार महत्वाचे प्रश्न हाताळलेले दिसतात. ते चार प्रश्न असे:

  • दुःखाचे वास्तविक स्वरूप काय आहे?
  • दुःख कोठून उत्पन्न होते?
  • दुःखाचा कायमस्वरूपी अभाव ( अर्थात शाश्वत आनंद ) असलेली स्थिती काय आहे?
  • दुःखाचा कायमचा नायानाट कसा करता येईल?

षडदर्शनांपैकी सांख्य, वेदांत आणि योग अधिक प्रचलित आणि लोकप्रिय आहेत. योगदर्शन हा साधनाप्रधान आणि अनुभवगम्य विषय आहे. केवळ पुस्तकी पांडित्य तेथे चालत नाही. अन्य दर्शनांचे अनुयायी साधनामार्ग म्हणून योगमार्गच चोखाळताना दिसतात यातच योगमार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.

योगमार्गावरही अनेक भेद आणि उपप्रकार आहेत. त्या सगळ्यांमध्ये कुंडलिनी योग एक मुख्य मार्ग आहे. परंतु कुंडलिनी योग अनावश्यक गुढतेच्या आणि चमत्कारांच्या फाफटपसार्‍यात गुरफटलेला दिसून येतो.  बर्‍याचदा नवीन साधकांचा असा समज असतो की हठयोग किंवा तत्सम क्लिष्ट आणि जटिल पद्धतींतूनच कुंडलिनी जागरण शक्य आहे. परिणामी सामान्य साधक या राजमार्गापासून दुरावतो. हे सर्व लक्षात घेऊन येथे सहज, सुलभ आणि शीघ्र परिणामकारक असा अजपा योग प्रस्तुत केला आहे.

आधुनिक काळात योग सर्वसामान्यांना देखील अत्यंत उपयोगी आहे. योगसाधनेद्वारा आरोग्यावर आणि एकूणच शरीर-मनावर होणारे सुपरिणाम आता आधुनिक विज्ञानाद्वारे सिद्ध झाले आहेत. पाश्चात्य देशांतही योगमार्गाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अजपा साधनेची प्राचीनतम प्राणायाम आणि ध्यान पद्धती अंगिकारल्यास साधकांना एक ना एक दिवस आत्मसाक्षात्कार रूपी सिद्धि प्राप्त होईल यात शंका नाही.  अशा या सत-चित-आनंद स्वरूपाची ओळख करून देणार्‍या पद्धतीची माहिती सर्वसामान्य साधकाला करून देणे हे या संकेतस्थळाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. फार क्लिष्ट तार्किक गोष्टींत न शिरता लवकरात लवकर साधनारत होऊ इच्छिणार्‍या साधकांसाठी येथे देण्यात आलेली माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या नाथ संकेतीचा दंशु या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.




Protected by Copyscape