अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

शंभूजती गोरक्षनाथ अयोनिसंभव अवतरण

ज्या परम दयाळू परमेश्वराने चौऱ्यांशी लक्ष योनींची टाकसाळ सुरु केली तोच या सृष्टीची देखभाल सुद्धा करत असतो. या देखाभालीचाच एक भाग म्हणून मानव जातीच्या उद्धारासाठी तो वेळोवेळी संत, सत्पुरुष निर्माण करत असतो.

प्रत्येक सत्पुरुषाचे अवतरण हे एका विशिष्ठ उद्देशाने झालेले असते. तो सत्पुरुष जड देहाने या पृथ्वीतलावर किती काळ रहावा आणि त्याने आपल्या लीला कशाप्रकारे सादर कराव्यात याचे दिग्दर्शन परमापिता परमेश्वर करत असतो.

सर्व संत-सत्पुरुष हे आदरणीयचं असतात. वंदनीयच असतात. सामान्य माणसाने त्यांच्या कार्याची तुलना करणे म्हणजे एका प्रकारे त्याच्या मर्यादेचे उल्लंघनच ठरते.

काही सत्पुरुष केवळ चमत्कार किंवा लीलांच्या माध्यमातून आपल्या भक्तांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही सत्पुरुष केवळ लोकशिक्षणाच्या माध्यमातून आपले कार्य संपन्न करतात. तर काही मोजके सत्पुरुष असे अवतरतात की जे चमत्कार, लीला तर दाखवतातच पण त्याच बरोबर शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध असे लोकशिक्षण सुद्धा त्यांच्या अनुयायांना प्रदान करतात.

या तिसऱ्या प्रकारच्या सत्पुरुषांचा विचार करत असतांना दोन नावे पटकन मनात तरळून जातात -- आदी शंकराचार्य आणि शंभूजती गोरक्षनाथ. मागील महिन्यात २५ एप्रिल २०२३ रोजी आदी शंकराचार्यांची जयंती होऊन गेली तर उद्या दिनांक ५ मे २०२३ रोजी गोरक्षनाथ अवतरण दिन काही परंपरांत साजरा होणार आहे.

गोरक्षनाथ नक्की कधी अवतरले याविषयी जाणकार लोकांमध्ये मतभिन्नता आहे. काही परंपरांच्या मतानुसार वैशाख पौर्णिमेला गोरक्षनाथांचे "अयोनिसंभव" अवतरण झाले. असा दाखला दिला जातो की --

वैशाखी शिव पूर्णिमा तिथिवरे वारे शिवे मंगले ।
लोकानुग्रह विग्रह: शिवगुरुर्गोरक्षनाथो भवत ।।

गोरक्षानाथांचे हे अवतरण आयोनिसंभव आहे. ज्याला रूढ अर्थाने जन्मच नाही त्याला रूढ अर्थाने मृतुही नाही हे उघड आहे. गोरक्षनाथ हे सामान्य योगी नव्हते तर ते उच्च कोटीचे सिद्ध होते. भावार्थ दीपिकेत संत ज्ञानेश्वर गोरक्षनाथांविषयी म्हणतात --

मग समाधि अव्युत्थया | भोगावी वासना यया |
ते मुद्रा श्रीगोरक्षराया | दिधली मीनीं ||
तेणें योगाब्जिनीसरोवरु | विषयविध्वंसैकवीरु |
तिये पदीं कां सर्वेश्वरु | अभिषेकिला ||

भगवान शंकराकडून मिळालेला योग मच्छिंदनाथांनी ज्या गोरक्षनाथांच्या हाती सोपवला ते गोरक्षनाथ कसे होते तर "योगाब्जिनीसरोवरु" अर्थात योगरूपी कमळाचे जणू सरोवर आणि "विषयविध्वंसैकवीरु" अर्थात विषयवासनांचा विध्वंस करणारे वीर.

गोरक्षनाथांच्या या योग्यतेमुळेच भगवान दत्तात्रेय एके ठिकाणी त्याना म्हणतात --

स्वामी तुमेव गोरख तुमेव रछिपाल अनन्त सिद्धां माहिं तुमही भूपाल |
तुमही स्वयंभू नाथ निरवाण प्रणव दत्त गोरख प्रणाम ||

अर्थात -- हे स्वामी, आपणच इंद्रियांचे रक्षणकर्ता अर्थात गोरक्ष आहात. अनंत सिद्धांमध्ये श्रेष्ठ असलेले तुम्ही या पृथ्वीचे राजा अर्थात भूपाळ आहात. तुम्ही स्वयंभू नाथ आहात. निर्वाणपद तुम्हीच आहात. ओंकार स्वरूप गोरक्षनाथा दत्ताचा प्रणाम स्वीकार करावा.

गोरक्षनाथांना भगवान शंकराचा योगावतार मानले गेले आहे. त्याविषयी खालील श्लोक प्रसिद्ध आहे --

अहमेवास्मि गोरक्षो मदरूपं तन्निबोधत
योग मार्ग प्रचाराय मया रूपमिदं धृतम

अर्थात मीच (शिव) गोरक्ष आहे. योगमार्गाचा प्रचार करण्यासाठी माझे (शिव) हे अवतरण आहे.

आता गंमत बघा -- भगवान दत्तात्रेयांमध्ये भगवान शंकराचा अंश आहे. आदी शंकराचार्याना सुद्धा भगवान शंकराचा अवतार मानले जाते आणि गोरक्षनाथ सुद्धा भगवान शंकराचाच अवतार आहेत. एकच परमेश्वर कालपरत्वे वेगवेगळ्या रूपांत नटून अवतरतो तो असे.

अजून एक गंमत पहा. जेंव्हा जेंव्हा पृथ्वीवरील गुरुतत्वाचा विषय येतो तेंव्हा तेंव्हा भगवान दत्तात्रेयांचा उल्लेख हमखास येतोच. भगवान दत्तात्रेयां शिवाय गुरुतत्व, योगमार्ग अपूर्ण आहे. त्याच धर्तीवर जेंव्हा जेंव्हा वेदांत, अद्वैत, मायावाद, ब्रह्म आणि माया असे विषय येतात तेंव्हा तेंव्हा आदी शंकराचार्यांचे स्मरण हमखास होतेच. अगदी त्याच प्रमाणे जेंव्हा जेंव्हा हठयोग, कुंडलिनी योग, योगसिद्धी वगैरे गोष्टींचा विषय येतो तेंव्हा तेंव्हा भगवान गोरक्षनाथांचे नाव आदराने घेतले जातेच.

तात्पर्य हे की भगवान शंकराच्या या "अवतारांनी" स्वतःला फक्त चमत्कारां पुरते किंवा लीलां पुरते मर्यादित न ठेवता अध्यात्ममार्गावर अतिशय महत्वाचे, पायाभूत, ठोस असे कार्य केलेले आहे. नंतरच्या काळात या प्रभूतींच्या कार्याच्या भक्कम सोपानावर एक भव्य असा प्रासाद इतर आचार्यांनी, सत्पुरुषांनी आणि परंपरांनी उभा केलेला आहे.

तुम्ही तुमच्या व्यक्तिगत श्रद्धेनुसार वैशाख पौर्णिमेला गोरक्ष अवतरण साजरे करा अथवा करू नका परंतु "गोरक्ष पौर्णिमा" ते "गुरु पौर्णिमा" हा जवळ-जवळ दोन महिन्यांचा कालखंड भगवान शंकराने प्रदान केलेल्या क्रीयाभ्यासाला आणि योगसाधनेला समर्पित होऊन नक्कीच व्यतीत करू शकता. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

असो.

जगद्नियंता श्रीकंठ सर्व योगाभ्यासी वाचकांना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल असे योगामृत प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 04 May 2023