शिव-पार्वती संवादरूपी श्रीगुरुगीता
गोरक्ष शतका वरील लेखमाला जरा थंडावली आहे. त्याला एक कारण आहे ते म्हणजे आगामी श्रीगुरुपौर्णिमा. काही शिवशंकराचे भक्त असलेल्या साधकांकडून कडून मागच्या महिन्यातील पौर्णिमा ते आगामी गुरुपौर्णिमा या कालखंडात काही साधना / उपासना करवून घेत आहे त्यामुळे त्यात व्यग्र आहे. आजचा हा लेख खरंतर अचानकच लिहायला घेतला. लेखात नक्की काय सांगायचे आहे हे देखील मनात जुळवलेले नाही. पाहूया श्रीगुरुमंडलाच्या इच्छेने लेखणीतून काय उतरतेय ते.
गुरुपौर्णिमा जवळ आली की सर्वच गुरुभक्तांच्या मनात काहीतरी विशेष उपासना करावी अशी इच्छा येत असते. अशा वेळी ज्या एका ग्रंथाचा आश्रय अनेकांकडून घेतला जातो तो म्हणजे श्रीगुरुगीता. मूलतः स्कंद पुराणात ईश्वर-पार्वती अर्थात शिव-पार्वती संवादरूपाने गोवलेली श्रीगुरुगीता ही केवळ गुरुतत्वाचे गुणगानच करते असे नाही तर माझ्या अनुभवात तो एक सिद्ध ग्रंथराजच आहे. हा शिव-पार्वती संवाद एवढा महत्वाचा आहे की श्रीगुरुचरित्रात सुद्धा एकोणपन्नासाव्या अध्यायात त्याचा समावेश केला गेला आहे.
मी भगवान शंभू महादेवाला गुरु म्हणून धारण करून कुंडलिनी योगमार्गाची कास धरली. जेंव्हा तुमचा गुरु आणि तुमचा इष्ट या दोन भिन्न-भिन्न असतात तेंव्हा उपासना थोडी सोपी असते कारण गुरुभक्ती कशी करायची आणि इष्टभक्ती कशी करायची यांच्या रूपरेषा मनात तयार असतात. जेंव्हा तुमचा गुरु आणि इष्ट एकच असतो तेंव्हा मात्र थोडा गोंधळ उडण्याची शक्यता असते. मला गुरुगीतेने तो मार्ग अचूक दाखवला. आपल्या आराध्य दैवतेची गुरु स्वरूपात उपासना कशी करायची आणि इष्ट स्वरूपात उपासना कशी करायची, आपल्या इष्ट दैवतात गुरुतत्व सुद्धा कसे जाणून घ्यायचे ते गुरुगीतेतील तत्वज्ञानाने मला अचूक समजावून सांगितले.
अशी ही गुरुगीता दोन पाठभेदांत उपलब्ध आहे. एक पाठभेद तीन अध्यायांचा मोठा आहे आणि त्यात साधारणतः सहाशे पंच्यांण्णवच्या आसपास श्लोक आहेत. दूसरा पाठभेद छोटा आहे आणि त्यात एकशे ब्याऐंशी श्लोक आहेत. हा छोटा पाठ उपासना म्हणून करायला सोपं आणि आटोपशीर आहे. नवीन साधकांना अधिक उपयोगी आहे. या छोट्या पाठाच्या आरंभीच पाच श्लोकांचे एक फार छान स्तोत्र दिलेले आहे ज्याला म्हणतात श्रीगुरुपादुका पञ्चकम्. पुढे जाण्यापूर्वी ते स्तोत्र येथे देत आहे --
ॐ नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः ।
आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यः ॥१॥
ऐङ्कार ह्रीङ्कार रहस्य युक्त श्रीङ्कार गूढार्थमहाविभूत्या ।
ओङ्कार मर्म प्रतिपादिनीभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् ॥२॥
होत्राग्नि हौत्राग्नि हविष्यहोत्र होमादि सर्वाकृति भासमानाम् ।
यद् ब्रह्म तद्बोध वितारिणीभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् ॥३॥
कामादि सर्पव्रज गारुडाभ्यां विवेक वैराग्य निधि प्रदाभ्याम् ।
बोध प्रदाभ्यां दृतमोक्षदाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् ॥४॥
अनन्त संसार समुद्र तार नौकायिताभ्यां स्थिरभक्तिदाभ्याम् ।
जाड्याब्धि संशोषण वाडवाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् ॥५॥
॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
खरंतर वरील प्रत्येक श्लोकाचा अर्थ विस्ताराने सांगण्याची इच्छा होती पण वेळेअभावी ते शक्य होईल असे दिसत नाही. ज्या गुरुपादुकांचे गुणगान वरील श्लोकांमध्ये केलेले आहे त्या असतात कुठे? बहुसंख्य साधक गुरुपादुका म्हणून स्थूल / जड पादुकांची पूजा वगैरे करतात. ते ठीक आहे पण योग्याच्या गुरुपादुका वेगळ्या असतात. तुम्ही जर माझी घेरंड संहीतेवरील लेखमाला वाचली असेल तर तुम्हाला कदाचित कळलं असेल की मी कशाकडे निर्देश करतोय ते.
योग्याच्या गुरुपादुका असतात सहस्रार चक्रात. सहस्रार चक्र हे कुंडलिनी चक्र संस्थेतील सर्वोच्च स्थान. त्या ठिकाणी योगी आपल्या श्रीगुरूंच्या पादुका स्थापन करतो. त्याच ठिकाणी श्रीगुरु आणि श्रीगुरूंची शक्ति अशा दोघांचाही वास असतो. भगवान शंकराला सांब सदाशिव म्हणतात ते याच कारणाने. जो अंबे सहित आहे अर्थात जो आपल्या शक्ति सहित आहे असा सदाशिव. याच ठिकाणी "हंस" निवास करतो. हा हंस म्हणजेच अजपा गायत्रीचे मूळ स्फुरण. हा "हंस" एवढा महत्वाचा आहे की गुरुगीतेच्या विनियोगाच्या श्लोकात स्पष्ट म्हटले आहे की --
ॐ अस्य श्री गुरुगीता स्तोत्रमन्त्रस्य
भगवान् सदाशिव ऋषिः
नानाविधानि छन्दांसि
श्री गुरुपरमात्मा देवता
हं बीजम् । सः शक्तिः । क्रों कीलकम् ।
श्री गुरुप्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ॥
कोणत्याही मंत्राला ऋषि, छंद, देवता, बीज, शक्ति, किलक, प्रयोजन वगैरे गोष्टी असतात. गुरुगीता सुद्धा मंत्रमय असल्याने तिला ह्या सगळ्या गोष्टी आहेत. येथे गुरुगीतेला "स्तोत्रमंत्र" म्हटले आहे. स्तोत्रमंत्र म्हणजे असे स्तोत्र जे मंत्रमय आहे. गुरुगीता भगवान शंकराच्या मुखातून प्रकटली आहे त्यामुळे या स्तोत्रमंत्राचा ऋषि आहे भगवान सदाशिव. गुरुगीतेत संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने नानाविध छंदांचा वापर झाला आहे. या स्तोत्रची देवता आहे श्रीगुरु. येथे श्रीगुरुला नुसते गुरुदेव किंवा सद्गुरू वगैरे न संबोधता "गुरुपरमात्मा" असे संबोधले आहे. गुरु म्हणजे साक्षात परमात्म्याचा अवतार. परमात्मा, परमपद, परमेश्वर वगैरे शब्दांनी ओळखले जाणारे तत्व सर्वसामान्य बुद्धीला कळणे कठीण आहे. ते तत्व साकार रूपात येते ते गुरुच्या रूपाने.
येथे क्षणभर थांबा आणि विचार करा की गुरुगीतेला किती उच्च कोटीचा गुरु अपेक्षित आहे ते आणि मग तुम्हाला आजच्या काळात गुरुविषयी जो उथळपणा सर्वत्र दिसतो आहे त्याचा आपसूक तिटकारा आणि उबग आल्याशिवाय रहाणार नाही. त्याच बरोबर तुम्हाला श्रीगुरुमंडलाला गुरुस्थानी धारण करण्याचे महत्वही आपसूक कळेल. गुरुगीतेत वर्णन केलेला गुरु कोणी सामान्य गुरु नाही. ज्या गुरुत परमात्मा पाहायचा, ज्याला परामेश्वराचे प्रतिरूप मानायचे तो कसा असला पाहिजे!? फक्त चमत्कार, विद्वत्ता प्रचुर प्रवचने, सिद्धी किंवा स्वैर इच्छांची पूर्तता करणारे साधन एवढीच ज्याची ओळख आहे असा कोणी आदर्शवत गुरु असू शकत नाही. गुरुगीतेतील गुरू या सर्वांच्या पलिकडील परमातम्याशी एकरूप झालेला आहे.
पुढे जाऊ. गुरुगीता स्तोत्रमंत्राचे बीज आहे हं. मंत्रशास्त्रात हं बीज तीन गोष्टींचे द्योतक आहे. पंचमहाभूतांच्या दृष्टीने बघायचे झाले तर हं बीजाने आकाशतत्वाकडे निर्देश केला जातो. दुसरी म्हणजे हं बीजाने शिव किंवा परमपुरुष दर्शवला जातो. तिसरी म्हणजे उच्छ्वासाकडे निर्देश केला जातो. येथे दूसरा आणि तिसरा अर्थच योग्य आहे. गुरुगीता शिव मुखातून बाहेर पडली आहे त्यामुळे बीजरूपाने ती शिवस्वरूपातच समाविष्ट आहे. गुरुगीतेत ज्या उच्च कोटीच्या गुरुतत्वाचे विवरण आणि गुणगान केलेले आहे ते प्रत्यक्ष अनुभवास येण्यासाठी सदाशिवाने दिलेल्या अजपा गायत्रीची कास धरणे हा सर्वात सुलभ मार्ग आहे.
गुरुगीतेची शक्ति आहे सः अर्थात शिवा, कुंडलिनी किंवा अजपा गायत्रीच्या दृष्टीने बोलायचे झाले तर आत येणारा श्वास. थोडक्यात बाहेर जाणारा हं कार आणि आत येणारा सः कार अर्थात "हंस:" रूपी अजपा गायत्री हे या स्तोत्रचे बीज आणि शक्ति आहेत. अजपा गायत्री, मातृका आणि मंत्रशास्त्र हा विषय खूप मोठा आणि गोपनीय आहे. आता त्या खोलात जाणे शक्य होणार नाही. क्रोम बीज सुद्धा असेच गोपनीय आहे. हे बीज सर्वसाधारण मंत्रात फारसे वापरले जात नाही. त्याचा वापर विशिष्ठ प्रकारच्या मंत्रातच केला जातो. त्या विषयी विस्ताराने पुन्हा कधीतरी सांगेन.
अशा या गुरुगीता स्तोत्रमंत्राचा जप किंवा पाठ कशासाठी करायचा आहे तर "गुरुप्रसादसिद्ध्यर्थे". श्रीगुरूंचा प्रसाद सिद्ध व्हावा म्हणून याचा पाठ करायचा आहे. अनेक साधक गल्लत ही करतात की ते आपल्या गुरुकडून आपल्या भौतिक कामनांची पूर्तता होण्याची अपेक्षा ठेवतात. क्षुद्र इच्छांची पूर्तता हा गुरुगीतेच्या पाठाचा उद्देश नाही. गुरुच्या मार्गदर्शनाखाली साधक आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करत असतो. गुरुप्रसाद म्हणजे हा प्रयत्न सुफळ संपूर्ण होणे. हा अनुभव नुसता तोंडदेखला किंवा अल्पशा प्रमाणात येऊन उपयोगी नाही. त्यासाठी हा प्रसाद "सिद्ध" होणे आवश्यक आहे. त्यामुळे गुरुकृपेचा लाभ घडून आंतरीक शाश्वत शांतीचा प्रतिक्षण अनुभव यावा हे प्रयोजन डोळ्यासमोर ठेऊन गुरुगीतेचा मार्ग आचरायचा आहे.
असो.
ज्याच्या मुखातून गुरुगीता पार्वतीच्या कर्णकुहरत प्रवेश करती झाली तो भगवान सांब सदाशिव सहस्रारात विराजमान होऊन सर्व योगसाधकांना योग्य मार्ग दाखवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.