अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

योगजीवनातील काही मुलभूत धडे

महाशिवरात्रीमुळे गेले काही आठवडे घेरंड संहिते वरील लेखमाला काहीशी बाजूला पडली होती. महाशिवरात्रीचे पावन पर्व तुम्हा सर्वांनी आपापल्यापरीने आनंदात आणि उत्साहात साजरे केले असणार याची मला खात्री आहे. घेरंड संहितेवरील रेंगाळलेली लेखमाला पुन्हा सुरु करण्याची वेळ आता आली आहे. आतापर्यंत आपण स्थूल ध्यानाविषयी घेरंड मुनींचे विचार जाणून घेतले आहेत.

स्थूल ध्यान ओलांडून ज्योतीध्यानाकडे वळण्यापूर्वी योगजीवनाविषयी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. या गोष्टी घेरंड संहितेशी किंवा लेखमालेच्या मूळ विषयाशी थेट संबंधित नसल्या तरी त्या नवीन ध्यानसाधकांसाठी उपयोगी ठरतील अशा काही मुलभूत गोष्टी आहेत. त्यामुळे आज त्यांविषयी थोडक्यात काही सांगतो आणि मग आपण लेखमालेच्या मूळ विषयाला पुन्हा हात घालू.

पहिली गोष्ट. एखादा शाळकरी मुलगा दोन प्रकारांनी आपला अभ्यास करू शकतो. पहिला प्रकार म्हणजे तो स्वतःला आपल्या स्टडीरूम मध्ये बंद करून घेईल. मोबाईल वगैरे बंद करेल. मित्र-मैत्रीणीं कडून अभ्यासात काही व्यत्यय येणार नाही अशी व्यवस्था करेल आणि मग शांत चित्ताने आपल्या अभ्यासात गढून जाईल.

अभ्यासाचा दुसरा प्रकार म्हणजे समोर टीव्ही सुरु आहे. क्रिकेटची मॅच सुरु आहे. बाल्कनीतून खाली काय चाललंय याकडे सुद्धा लक्ष आहे. आजूबाजूला घरातील अन्य सदस्यांचा गोंगाट सुरु आहे. हे सगळं सुरु असतांना एकीकडे अभ्यास सुद्धा सुरु आहे.

अभ्यासाच्या या दोन प्रकारांपैकी कोणता चांगला हे निराळे सांगायला नको. तुलना केली तर स्टडीरुममध्ये बसून शांतपणे केलेला अभ्यास हा अर्थातच उजवा ठरणार आहे. परंतु अभ्यासाचा दुसरा प्रकार कनिष्ठ दर्जाचा असला तरी अगदीच टाकाऊ आहे असं म्हणता येणार नाही. काहीच अभ्यास न करण्यापेक्षा असा उडत-उडत केलेला अभ्यास बरा म्हणावा लागेल.

योगाभ्यासाच्या बाबतीत सुद्धा अभ्यासाचे असेच दोन प्रकार लागू पडतात. ध्यान साधनेच्या पहिल्या प्रकारात तुम्ही दैनंदिन कार्यामधून स्वतःला बाजूला करून एखाद्या निवांत जागी कोंडून घेत असता. मोबाईल बंद करून, सर्व प्रकारचे व्यत्यय टाळून तुम्ही मग आसन टाकून त्यावर जप साधना, अजपा ध्यान किंवा तुमच्या आवडीची जी काही साधना आहे ती करायला बसता.

योगसाधनेच्या दुसऱ्या प्रकारात तुम्ही दैनंदिन कार्ये करता करता संधी मिळेल तशी साधना करण्याचा प्रयत्न करत असता. चालता-फिरता मनातल्या मनात मंत्रजप किंवा नामजप करणे, टीव्ही बघायला बसल्यावर हस्तमुद्रा लावून बसणे, जेवतांना घासाघासाला परमेश्वराचे नाम घेत-घेत भोजन करणे. ऑफिस मध्ये लंच टाईम मध्ये थोडा अजपा जप किंवा मंत्र जप करणे अशा मार्गांनी तुम्ही स्वतःला साधनेशी कनेक्टेड ठेवण्याचा प्रयत्न करत असता.

वरील दोन प्रकारातील साधनेचा पहिला प्रकार अर्थातच अत्यंत महत्वाचा आहे. तो "स्टडीरुममध्ये बसून केलेला अभ्यास" आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने योगसाधक बनायचे असेल तर तुम्हाला अशी साधना करावीच लागेल. त्याला अन्य पर्याय नाही. साधनेला किती वळ द्यायचा हे अर्थातच तुमच्या लाईफ स्टाईल नुसार ठरेल पण पहिल्या प्रकारची साधना टाळून चालणार नाही.

कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडेल की मग दुसऱ्या प्रकारची साधना फुकट की काय? नाही. तसं बिलकुल नाही. दुसऱ्या प्रकारची चालता-बोलता केलेली साधना व्यर्थ बिलकुल जात नाही. ती साधना तुमची पहिल्या प्रकारची साधना अधिक चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी अत्यंत उपयोगी पडते. पहिल्या प्रकारची साधना जर तुम्ही तासभर करत असाल तर दिवसातील उरलेल्या तेवीस तासांत ही दुसऱ्या प्रकारची साधना तुमच्या मनाचा यौगिक पोत चांगला ठेवण्यास सहाय्यक ठरते. परंतु अशी उडती साधना पहिल्या प्रकारच्या साधनेला पर्याय कधीच ठरू शकत नाही.

दुसरी गोष्ट. आपल्याकडची शिक्षण पद्धती आपल्याला प्रामुख्याने पुस्तकी ज्ञान देते. एखादा विद्यार्जन करणारा तरुण आयुष्यातील २०-२५ वर्षे शिक्षणात खर्ची घातल्यावर जेंव्हा प्रत्यक्ष त्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करतो तेंव्हा त्याला असे आढळते की आजवर शिकलेले पुस्तकी ज्ञान प्रत्यक्ष जीवनात कुठेच आढळत नाहीये किंवा खूप वेगळ्या स्वरूपात ते वापरलं जातंय. मग पुस्तकात वाचलेलं आणि प्रत्यक्ष वापरातलं यांची जुळवाजुळव त्याच्या मनात सुरु होते. प्रसंगी या दोन्हींमधील विरोधाभास सुद्धा त्याला अनुभवायला मिळतो.

योगजीवनात देखील असे प्रसंग पदोपदी येत असतात. एक तर होतं काय की अनेक नवीन साधकांची अशी समजून असते की अध्यात्मज्ञान पुस्तकांतून मिळेल. त्या अनुषंगाने मग ढीगभर पुस्तकाचं वाचन, इंटरनेट वरील उपलब्ध माहितीचं वाचन सुरु होतं. जोडीला चमत्कारांनी ओतप्रोत भरलेले लीलाग्रंथ असतातच. असा साधक ज्यावेळी प्रत्यक्ष ध्यान साधना सुरु करतो त्यावेळी त्याच्या असं लक्षात येतं की पुस्तकात वाचलेलं प्रत्यक्षात काही केल्या घडत नाहीये किंवा प्रत्यक्ष साधनेचा अनुभव पुस्तकी वाचनाच्या पूर्णतः भिन्न आहे.

अध्यात्म ग्रंथांचं वाचन, मनन, चिंतन निरर्थक ठरत नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ग्रंथ केवळ विषयाची ढोबळमानाने रूपरेषा व्यक्त करू शकतात. योग किंवा ध्यान ही मुळातच व्यक्ति सापेक्ष गोष्ट आहे. तुमचं मन आणि तुमची अनुभूती ग्रंथ ठरवू शकत नाहीत. ग्रंथकर्ता विषयातील त्याच्या अनुभूतीनुसार आणि विषयाच्या त्याच्या आकलनानुसार काही गोष्टी शब्दबद्ध करत असतो. त्त्यांच्या शब्दशः अर्थालाच जर चिकटून बसलं तर हाती निराशाच येण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे ध्यानमार्गावरील यशस्वी वाटचालीकरता एक महत्वाची गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे पूर्वग्रहरहित ज्ञानार्जनाला आसुसलेलं असं मोकळं मन. मनात कथा, दंतकथा, पूर्वग्रह, ऐकीव-वाचीव गोष्टी खचाखच भरलेल्या असतील तर मनात एक साचेबद्ध अपेक्षा तयार होते. मग ध्यानमार्गावरील अनुभवसुद्धा त्या अपेक्षेनुसार येऊ लागतात. सुरवातीला साधकाला आनंद होतो खरा पण असे अनुभव असतात निव्वळ भ्रांती किंवा मित्थ्या ज्ञान. हे सहज टाळता येण्यासारखं आहे.

तिसरी आणि शेवटची गोष्ट. परत शालेय जीवनातील उदाहरण घेऊ. एखादा शाळकरी मुलगा ज्या इयत्तेत शिकत असतो त्या इयत्तेचाच अभ्यास करण्याकडे लक्ष देत असतो. फार क्वचित तो आपल्या इयत्तेचा अभ्यास सोडून तीन-चार इयत्ते नंतरचा अभ्यास करतो. कदाचित उन्हाळ्याच्या सुट्टीत तो पुढील इयत्तेची पुस्तके चाळेल इतकाच. त्यांच्या चालू इयत्तेचा अभ्यासच त्याला कठीण वाटत असतो तेथे पुढील इयत्तांचा अभ्यास कसा करणार?!

नवीन साधकांनी अगदी हाच प्रकार योगसाधनेच्या बाबतीत पाळायला हवा. ध्यानमार्गावर नुकतंच पाउल ठेवलेल्या साधकांच्या वाचनात आत्मसाक्षात्कार, मोक्ष, मुक्ती, समाधी, समाधीचे प्रकार अशा अनेक संकल्पना येत असतात. एक माहिती म्हणून अशा गोष्टी ठीक असल्या तरी नुकतीच ध्यानसाधना सुरु केलेल्या व्यक्तीसाठी त्या फार उच्च कोटीच्या गोष्टी असतात. त्याबद्दल निव्वळ पुस्तकी चर्चा किंवा शाब्दिक काथ्याकुट करून फारसं काही हाती लागण्यासारखं नसतं. त्यापेक्षा साधकाने त्याच्या सध्याच्या "इयत्तेकडे" लक्ष देणे अधिक महत्वाचे असतं. चालू ध्यान "इयत्तेचे" परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील ध्यान "इयत्तेत" कसा प्रवेश मिळवता येईल इकडे त्याचे सगळे लक्ष असायला हवे.

वर मी मुद्दामच आपण शालेय जीवनाशी निगडीत उदाहरणे घेतलि आहेत. शालेय जीवनात आपण विद्यार्थी असतो तसेच योगमार्गावर नुकतेच पाउल ठेवलेला साधकही विद्यार्थीच असतो. कोणत्याही विद्यार्थ्याकडे ज्ञानार्जनासाठी आवश्यक असलेलं कुतूहल, शिकण्याची ओढ, नवीन काही आत्मसात करण्याची जिद्द भरपूर प्रमाणात असते. तशीच ती ध्यानाभ्यासकाकडे सुद्धा असायला हवी. मरगळलेल्या मनाने, तमोगुणप्रधान अंतःकरणाने, फाजील आत्मविश्वासाने माखलेल्या बुद्धीने ध्यानमार्गाचे नीट आकलन होऊ शकत नाही आणि मग वाटचालही कंटाळवाणी आणि दुष्कर होऊन बसते.

असो.

आदिगुरु भगवान शिव आणि त्याची प्रथम शिष्या जगदंबा पार्वती सर्व वाचकांना योगमार्गावर वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेली जिज्ञासा, ओढ आणि जिद्द प्रदान करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 13 March 2023