ध्यान आणि योगक्रियांच्या माध्यमातून शिवोपासना : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

शंभूजती गोरक्षनाथांची कुंडलिनी योगसूत्रे अर्थात -- गोरक्ष शतक

योगाभ्यासात रस असलेल्या साधकांना गोरक्षनाथांचे नाव अपरिचित नाही. हठयोग किंवा कुंडलिनी योग हा विषय असा आहे की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरु-शिष्यांच्या जोडगोळीशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. या क्षेत्रातील गोरक्षनाथांचे योगदान एवढे मोठे आहे की एके काळी भारतच नव्हे तर तिबेट, नेपाळ वगैरे भागांतही त्यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. हठयोग, कुंडलिनी योग, राजयोग, नादयोग, समाधी योग, अमनस्क योग, कायासिद्धी, शाबरी विद्या, मंत्रशास्त्र वगैरे गोष्टींमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

महाराष्ट्रात नवनाथांची जीवन चरित्रे वर्णन करणारे दोन ओवीबद्ध ग्रंथ प्रसिद्द्ध आहेत. ते म्हणजे नवनाथ भक्तिसार आणि नाथलीलामृत. या दोनही ग्रंथांनुसार गोरक्षनाथ हे अनुक्रमे ऋषभदेव पुत्र हरी नारायण आणि भगवान विष्णू यांचे अवतरण मानले जातात. असे जरी असले तरी नाथ संप्रदायाच्या बहुतांश साहित्यात गोरक्षनाथांना एक तर शंभू महादेवाचा अवतार तरी मानले जाते किंवा या ना त्या प्रकाराने भगवान शंकराशी त्यांचा संबंध जोडला जातो. शिव महापुराण, स्कंद पुराण, पद्म पुराण वगैरे पुराणांतही त्यांचा उल्लेख आढळतो. जुन्या काळच्या नाथ योग्यांची वेशभूषा आणि साधना पद्धती अभ्यासली तर ती भगवान शिवाशीच अत्याधिक मिळतीजुळती असल्याचे दिसते. महादेव शंकर आदिनाथ अर्थात मूळ / प्रथम नाथ म्हणून प्रसिद्धच आहेत. खुद्द भगवान शंकर कल्पद्रुम तंत्रात श्रीगोरक्षनाथ आपलाच योगावतार असल्याचे सांगतात. खालील प्रसंग त्यादृष्टीने बोलका आहे.

एकदा भगवान श्रीकृष्णाने गर्ग मुनींना विनम्रपणे विचारले --

हे मुनिवर, गोरक्षनाथ म्हणजे नक्की कोणती देवता? गोरक्षनाथांचे मंत्र कोणते? त्यांची उपासना कशी करावी? कृपया हे सर्व मला विस्ताराने सांगा.

श्रीकृष्णाच्या या प्रश्नांवर प्रसन्न होऊन गर्गमुनी म्हणाले -- श्रीकृष्णा ऐक. एकदा सर्व ऋषींनी भगवान शंकराला गोरक्षनाथांच्या चरित्राविषयी विचारले. तेंव्हा देवांचे देव महादेव उत्तरले :

स्वयं ज्योतिस्वरूपोऽयं शून्याधारो निरञ्जनः
समुद्भूतो दक्षिणास्यां दिशि गोरक्षसंज्ञकः
अहमेवास्मि गोरक्षो मदरूपं तन्निबोधत
योग मार्ग प्रचाराय मया रूपमिदं धृतम

ऋषींनो, मीच (शिव) गोरक्षनाथ आहे. माझेच एक रूप म्हणजे साक्षात गोरक्षनाथ असे जाणा. योगमार्गाचा प्रसार करण्यासाठी मी हे रूप धारण केले आहे. स्वतः ज्योतिस्वरूप असणारा, शून्य, निराधार, निरंजन अशा माझ्या या अवताराला गोरक्ष असे नामाभिधान आहे.

त्यानंतर सर्व ऋषींनी भगवान शंकराला गोरक्षनाथांची उपासना कशी करायची त्याबद्दल विचारणा केली.

भगवान शंकर त्यांना म्हणाले की -- माझ्या गोरक्षरुपाचे सदासर्वकाळ ध्यान केल्याने योगसाधक योगींद्र होतो अर्थात योग्यांमध्ये श्रेष्ठ होतो. गोरक्षनाथांची विधिवत उपासना केल्याखेरीज योग सिद्ध होत नाही. गोरक्ष मंत्राच्या प्रभावाने सर्व योगसिद्धी प्राप्त होतात अर्थात योगमार्गात यश मिळते.

त्यानंतर गर्गमुनींनी श्रीकृष्णाला भगवान शंकराने ऋषींना जे विधीविधीन सांगितले होते तेच मंत्र, ध्यान आणि अन्य विधिविधान सांगितले. त्याशिवाय हे ही सांगितले की जे योगसाधक विधीपूर्वक गोरक्षनाथ उपासना करतात त्यांना गोरक्षकृपेने योगमार्गावर यश अवश्य मिळते.

नाथपंथाच्या साहित्यात तर गोरक्षनाथांना शिवावतार मानले जातेच परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे गोरक्षनाथांच्या मंत्रांवरून सुद्धा ते शंभू महादेवाचा अवतार असल्याचे स्पष्ट दिसून येते. उदाहरणार्थ, गोरक्षनाथांच्या नाममंत्रात त्यांना "शिव गोरक्ष" असेच म्हटले जाते. गोरक्ष गायत्री मंत्राच्या एका प्रकारात त्यांना भगवान शंकराचेच "तत्पुरुष" हे विशेषण लावून पुढे "शिव गोरक्ष" असे संबोधले आहे. अनेक स्तोत्रांमध्ये त्यांना "शंभू जती" अर्थात शिवस्वरूप यती-संन्यासी-योगी असे संबोधले जाते.

गोरक्षनाथ आणि भगवान शंकराचे हे नाते अधोरेखित करण्याचे कारण असे की ज्या योगमार्गाचा गोरक्षनाथांनी प्रसार आणि प्रचार केला तो शिवयोग किंवा कुंडलिनी योगच आहे. त्यामुळे शिव-शक्ती उपासना हा या मार्गाचा अविभाज्य घटक आहे. गोरक्षनाथांनी योगशास्त्रावर अनेक ग्रंथ रचले आहेत. त्या सर्वांचेच स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. असाच एक ग्रंथ म्हणजे गोरक्ष शतक. नावावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की या ग्रंथात सुमारे शंभर श्लोक आहेत. हा ग्रंथ वाचतांना मला नकळत पतंजली योगसूत्रांची आठवण होते.

पतंजली योगसूत्रे त्यांच्या आटोपशीर आणि शास्त्रशुद्ध आखीव-रेखीव मांडणीसाठी ओळखली जातात. पतंजली मुनींनी आपल्या अष्टांग योगाची रूपरेषा सुमारे १९५ सूत्रांमध्ये मांडली आहे. त्याच धर्तीवर गोरक्ष शतक कुंडलिनी योगशात्रावरील शंभर श्लोक प्रस्तुत करते. कुंडलिनी योग हा खरं तर विस्तृत विषय आहे. एवढ्या कमी श्लोकांत तो स्पष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे सुमारे शंभर श्लोकांमधून गोरक्षनाथांनी तो धावत्या स्वरूपात मांडला आहे. गोरक्षनाथांनी या ग्रंथात मांडलेला कुंडलिनी योग हा षडांग आहे. त्यात पतंजलीच्या अष्टांग योगातील यम आणि नियम ही दोन अंगे वगळून अन्य सहा अंगे -- आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी -- तशीच आहेत.

पतंजली योगसूत्रे आणि गोरक्ष शतक यांची थेट तुलना करता येण्यासारखी नसली तरी एक गोष्ट लगेच लक्षात येते ती म्हणजे पतंजलीची योगसूत्रे ही बरीचशी विषयाची मूळ संकल्पना व्यक्त करतात. त्यांत प्रत्यक्ष कृती किंवा प्रत्यक्ष साधनेचे विवरण अत्यल्प आहे. उदाहरणार्थ, स्थिर आणि सुखकारक ते आसन एवढेच पतंजली मुनी म्हणतात. परंतु नक्की कोणती आसने उपयुक्त आहेत त्याविषयी ते काही सांगत नाहीत. गोरक्ष शतक त्यादृष्टीने प्रत्यक्ष साधनेच्या अधिक जवळचे आहे. गोरक्षनाथांनी प्रत्यक्ष साधनात्मक क्रीयांकडे धावता का होईना पण निर्देश केला आहे.

गोरक्ष शतका मधील शंभर (खरंतर एकशे एक) श्लोक योगसाधनेचा अधिकारी व्यक्ती, योगसाधनेचे फळ, षडंग योगाची अंगे, षटचक्र निरुपण, दशनाडी वर्णन, दशवायू वर्णन, बंध, मुद्रा, प्रणावाभ्यास, प्राणायाम, पंचतत्व धारणा, ध्यान, समाधी वगैरे विषयांचे धावते विवरण करतात. या ग्रंथांत केवळ शंभर श्लोकच आहेत हे लक्षात घेता हे विवरण अर्थातच त्रोटक आहे. परंतु ते वाचल्यावर कुंडलिनी योगाभ्यासकाला विषयाचा एकूण आवाका सहज ध्यानी येतो.

आपल्या या षडांग योग प्रणालीची फलश्रुती काय ते सांगतांना गोरक्षनाथ म्हणतात --

भवभयवने वह्निर्मुक्तिसोपानमार्गतः ।
अद्वयत्वं व्रजेन्नित्यं योगवित्परमे पदे ॥

अर्थात या योग साधनात्मक खटाटोपाची फलश्रुती आहे -- अद्वय. अद्वय म्हणजे दोन गोष्टींमधील अभिन्नत्व. मुलाधारातील शक्ती जेंव्हा सहस्रारातील शिवाशी एकरूप होते तेंव्हा ही अद्वय अनुभूती प्रत्ययास येते. गोरक्षनाथांनी येथे "अद्वैत" हा शब्द वापरलेला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. अद्वय आणि अद्वैत यामध्ये जरा फरक आहे. नवीन साधकाच्या दृष्टीने जरी हा फरक फारसा महत्वाचा नसला तरी अंतिम उद्दिष्टाच्या दृष्टीने तो आपापल्या गुरुकडून नीट समजावून घेणे महत्वाचे आहे. आपल्याला या लेखात त्या चर्चेत जाण्याची गरज नाही त्यामुळे विषयांतर करत नाही.

संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दिपिकेच्या अठराव्या अध्यायात तंतोतंत हाच शब्द वापरलेला आहे. आपली गुरुपरंपरा सांगतांना संत ज्ञानेश्वर म्हणतात --

मग तिहीं तें शांभव | अद्वयानंदवैभव |
संपादिलें सप्रभव | श्रीगहिनीनाथा ||

गोरक्षनाथांनी अद्वय आनंद हे ज्याचे वैभव आहे असा शांभव योग / शिव योग गहिनीनाथांना प्रदान केला. पुढे तोच शांभव योग निवृत्तीनाथ आणि त्यानंतर ज्ञानेश्वर असा प्रवाहित झाला.

मागील वर्षी घेरंड संहीतेवरील लेखमाला पूर्ण झाली. मागच्या श्रीदत्त जयंतीच्या दिवशीच गोरक्ष शतका वरील लेखमाला करावी असा विचार मनात आला होता. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर या लेखाच्या माध्यमातून लेखमालेचा श्रीगणेशा करत आहे. आशा आहे तुम्हाला ही लेखमाला आवडेल आणि गोरक्ष कुंडलिनी योग प्रत्यक्ष आचरणात आणावा अशी प्रेरणा गोरक्षकृपेने होईल.

असो.

संत ज्ञानेश्वरांनी ज्यांचे वर्णन "विषयविध्वंसैकवीरु" अर्थात विषय-वासनांचा विध्वंस करणारा वीर असे केले आहे ते शंभूजती श्रीगोरक्षनाथ सर्व योगसाधकांना अद्वय आनंदाची चव चाखण्यासाठी अग्रेसर करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 January 2024