प्रत्याहाराची एक गोपनीय आणि विलक्षण व्याख्या
गोरक्ष शतका वरील या लेखमालेत आपण प्राणायाम विधी आणि त्या संबंधीचे काही नियम जाणून घेतले. आता आसन आणि प्राणायामाला मागे टाकून आपण मनाच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहोत. हा आणि पुढील भाग योगशास्त्रातील प्रत्याहार साधनेला समर्पित असणार आहे. गोरक्ष महाराजांनी केलेली प्रत्याहाराची व्याख्या प्रचलित व्याख्येला छेद देणारी तर आहेच परंतु ती विलक्षण योगगम्य, गूढगम्य आणि गुरुगम्य आहे. चला. सुरू करू या.
गोरक्ष शतकातील योग हा षडंग आहे हे मी आगोदारच्या भागात सांगितले आहे. या षडंग योगाची अंगे आहेत आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यांपैकी आसन आणि प्राणायाम यांवर गोरक्ष महाराज काय म्हणतात ते आपण जाणून घेतले आहे. आसन आणि प्राणायम विवेचन आटोपल्यावर ते म्हणतात --
आसनेन रुजो हन्ति प्राणायामेन पातकम् ।
विकारं मानसं योगी प्रत्याहारेण सर्वदा ॥
याचा अर्थ असा की योगी योगासनांच्या सहाय्याने रोगांचा नाश करतो, प्राणायामाच्या सहाय्याने पापांचा नाश करतो आणि मनाच्या विकारांचा प्रत्याहाराच्या सहाय्याने नाश करतो.
येथून पुढे मनाचा विचार प्राधान्याने केला जाणार आहे आणि त्यांत प्रत्याहार ही महत्वाची पायरी आहे. पुढे जाण्यापूर्वी येथे पतंजलि योगसुत्र आणि गोरक्ष शतक यांतील प्रत्याहाराची अल्पशी तुलना केल्यास ते विषय समजण्यासाठी उपयोगी ठरेल.
पतंजलि योगसुत्र अष्टांग योगाचे प्रतिपादन करतो आणि गोरक्ष शतक षडंग योगाचे. पतंजलि योगसुत्रात यम आणि नियम ही सुरवातीची दोन अंगे गोरक्ष शतकात गृहीत धरलेली आहेत. ती निराळी सांगितलेली नाहीत. पतंजलि योगासुत्रातील प्रत्याहार हा इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्याशी संबंधित आहे. मानव पिंडातील पाच ज्ञानेंद्रिये अर्थात कान, नाक, नेत्र, जिव्हा आणि त्वचा ही अनुक्रमे श्रवण, गंध, दृष्टी, रस आणि स्पर्श या त्यांच्या विषयांशी संलग्न असतात. पतंजलीच्या प्रत्याहारात या इंद्रियांना त्यांच्या विषयांचा आस्वाद किंवा भोग घेण्यापासून परावृत्त करणे म्हणजे प्रत्याहार होय. पतंजलि योगसुत्र हा राजयोगावरील ग्रंथ आहे. त्यामुळे साहजिकच पतंजलि मुनींनी त्यांत राजयोगाला अनुसरून प्रत्याहाराची व्याख्या केली आहे. मनावर ताबा मिळवण्या आगोदार इंद्रियांवर ताबा मिळवणे आवश्यक आहे अशी त्यांची भूमिका आहे.
गोरक्ष शतकात गोरक्ष महाराज प्रत्याहाराची एक अगदी वेगळी वाटेल अशी व्याख्या करतात. तुमच्यापैकी जी वाचक मंडळी पतंजलीच्या वरील प्रत्याहार संकल्पनेशी परिचित असतील त्यांना गोरक्षनाथांची प्रत्याहाराची व्याख्या वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही. कदाचित कोणती व्याख्या बरोबर असावी असा तुमचा गोंधळही उडेल. हे मी मुद्दाम गोरक्षनाथांची व्याख्या देण्या आगोदार सांगितलं म्हणजे मग तुम्हाला पूर्वकल्पना मिळेल आणि तुम्ही गोरक्षनाथांची व्याख्या वाचताना कोणताही पूर्वग्रह ठेवणार नाही.
गोरक्ष महाराजांची प्रत्याहाराची व्याख्या अशी आहे --
चन्द्रामृतमयीं धारां प्रत्याहारति भास्करः ।
तत्प्रत्याहरणं तस्य प्रत्याहारः स उच्यते ॥
यांचा भावार्थ असा की चंद्रामृताच्या धारेचा आहार भास्कर ग्रहण करतो. त्याला तसे करण्यापासून वंचित करणे म्हणजे प्रत्याहार होय.
क्षणभर थांबा. आधी दिलेली पतंजली मुनींची व्याख्या पुन्हा एकदा वाचा आणि मग वर दिलेली गोरक्षनाथांची व्याख्या वाचा. त्यांत तुम्हाला काही साम्य आढळल का? साम्य तर सोडाच पण या दोन व्याख्या जरातरी जुळतात असं तुम्हाला वाटतं का? पतंजलि योगसुत्र इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्याबद्दल बोलत आहेत. येथे गोरक्षनाथ चंद्रामृत, भास्कर आणि भास्कराचा आहार यांच्याबद्दल बोलत आहेत.
ही काहीशी गोंधळात टाकणारी व्याख्या कमी म्हणून की काय गोरक्षनाथ पुढे म्हणतात --
एका स्त्री भुज्यते द्वाभ्यामागता सोममण्डलात् ।
तृतीयो यो भवेत्ताभ्यां स भवत्यजरामरः ॥
याचा अर्थ असा की सोममंडलातून आलेल्या एका स्त्रीला दोघे जण भोगतात आणि तिसराच कोणीतरी अजर आणि अमर होतो.
आता ही स्त्री कोण बरं? तिचा भोग घेणारे ते दोघे कोण? आणि त्यांच्या भोग घेण्याने हा तिसराच कोणी कसा काय अजरामर होतो? या सर्व कुंडलिनी योगशास्त्रातील गुरुगम्य रहस्याचा उलगडा लेखमालेच्या पुढील भागात शिव आणि गोरक्ष कृपेने करणार आहे.
असो.
मानव पिंडातील सर्व इंद्रिये आणि त्यांची कार्ये ज्याच्या आदेशाने घटित होतात तो जगदनियंता सांब सदाशिव सर्व कुंडलिनी योग साधकांना प्रत्याहार सिद्धि प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
© हा लेख कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे. लेखाची लिंक शेअर करू शकता परंतु कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण किंवा पुनर्प्रकाशन करण्यास परवानगी नाही.
प्रिय वाचकांनो,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या वेब साईटवर योग-अध्यात्म विषयक लेखन प्रकाशित करत आहोत. हे लेखन अन्यत्र वापरण्याची किंवा पुनर्मुद्रित करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून मूळ लेखकाचे नाव व स्रोत न देता प्रकाशित केले आहे. काहींनी तर ते स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे—हे साहित्यचौर्य निंदनीय आणि खेदजनक आहे. भारतीय कायदा योग्य वेळी कार्य करेलच, पण आम्ही आमच्या सुजाण वाचकांना विनंती करतो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रकाशित होण्याचे एकमेव अधिकृत माध्यम आहे.
धन्यवाद.
— वेब टीम