श्रीदत्त माला मंत्राच्या अंतरंगात
श्रीदत्त जयंतीच्या दोन दिवस आधी समाधीत मग्न असतांना श्रीदत्तात्रेय महाराजांनी "माझ्या माला मंत्राविषयी काहीतरी लिही" अशी सुचना केली. काही अपवाद वगळता मी माझ्या लेखांतून मुद्दामच तांत्रिक मंत्र किंवा तांत्रिक मंत्रसाधनेविषयी फारसे लिहित नाही. या गोष्टी कुठेतरी वाचून किंवा व्हिडीओ पाहून करण्यापेक्षा एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करणे केंव्हाही श्रेयस्कर असते. परंतु दत्तात्रेयांचा आदेश आल्याने या लेखाची गणना त्या अपवादांत करावी लागेल.
योग-अध्यात्म शास्त्रात देवी-देवतांचे अनेकानेक मंत्र आहेत. तंत्रशास्त्रामध्ये बीज मंत्र आणि बीज संपुटीत मंत्र जसे प्रचलित आहेत तसंच निरनिराळ्या देवी-देवतांचे माला मंत्र सुद्धा प्रचलित आहेत. साधारणतः बीज मंत्र आणि संपुटीत मंत्र हे आटोपशीर आणि छोटेखानी असतात. याउलट माला मंत्र चांगले मोठे आणि विस्तृत असतात. विशेष म्हणजे माला मंत्रांत भक्तीरसापेक्षा शक्ती, रक्षा, उर्जा, आवेश, तांत्रिक षटकर्म आणि उग्र स्वरूपाची कर्म यांवर भर दिलेला असतो. याच कारणामुळे क्रमदीक्षा पद्धतीमध्ये माला मंत्र सर्वसाधारण उपासनेकरता आरंभी दिला जात नाही. असाच एक प्रभावी आणि सामर्थ्यशाली माला मंत्र म्हणजे श्रीदत्त माला मंत्र. माझा या मंत्रा संबंधीचा एक अनुभव मी या आगोदर एका लेखात सांगितला आहे. त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही.
श्रीदत्त माला मंत्र हा काही गोपनीय किंवा दुर्लभ वगैरे नाही. अनुभवी आणि जाणकार दत्तभक्तांमध्ये तो सर्वज्ञात आणि सुपरिचित आहे. दत्तात्रेय उपनिषद, दत्तात्रेय कल्प यांसारख्या ग्रंथांमधून तो प्रकट करण्यात आलेला आहे. इंटरनेटवर तर तो सहज उपलब्ध आहेच परंतु बाजारात पोथ्या-पुराणे विकणाऱ्या दुकानांमध्ये सुद्धा तो सहज मिळण्यासारखा आहे. श्रीदत्त माला मंत्राच्या फायद्यांविषयी मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा किंवा टोलेजंगी दावे करण्यापेक्षा दत्तात्रेयांच्या आदेशाने आज या लेखातून श्रीदत्त माला मंत्राकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा आणि त्याच्या अंतरंगात जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
श्रीदत्त माला मंत्र सुमारे 357 अक्षरांनी आणि बीजांसहित सुमारे 87 शब्दांनी बनलेला आहे. अक्षरांच्या आणि शब्दांच्या संख्येत पाठभेदानुसार आणि संस्कृत संधीविच्छेदा नुसार अल्पसा भेद असू शकतो. येथे केवळ एक ढोबळ कल्पना यावी या माफक उद्देशाने ही गणना देत आहे (लेखाच्या शेवटी मी गणना करण्यासाठी बनवलेला एक तक्ता दिला आहे. सहज कुतूहल वाटले तर पहा.). या लेखात मी इंटरनेटवर सहज मिळणारा श्रीदत्त माला मंत्राचा पाठ घेतला आहे. माझी श्रीदत्त माला मंत्राची साधना या पाठाशी मिळत्या जुळत्या पाठानेच झाली होती परंतु नंतर साधनाकालात दत्तात्रेयांनी त्यांत बरीच अधिकची बीजे आणि मंत्र जोडून दिले होते. त्यामुळे माझा व्यक्तिगत पाठ बराच भिन्न आणि मोठा आहे. कोणत्याच ग्रंथांत तो मिळणारा आणि जुळणारा नाही. दत्तात्रेयांनी गोपनियतेची सुचना केली असल्याने माझा व्यक्तिगत पाठ आजतागायत मी कागदावर कधी लिहून ठेवलेला नाही.
या मंत्राची सुरवात होते परम सात्विक अशा दत्तात्रेय नाममंत्राने :
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय
वरील मंत्रात दत्तात्रेयांना नमस्कार तर आहेच परंतु समर्पणाचा आणि शरणागतीचा भाव सुद्धा आहे. दत्तात्रेय "भगवान" आहेत अर्थात ते ज्ञान, बल, ऐश्वर्य, यश, धर्म, वैराग्य इत्यादी गुणांनी परिपूर्ण आहेत. त्या नंतर दत्तात्रेयांची अकरा विशेष नामे मंत्रात गुंफण्यात आली आहेत. ही नामावली खालीलप्रमाणे :
स्मरणमात्रसन्तुष्टाय
महाभयनिवारणाय
महाज्ञानप्रदाय
चिदानन्दात्मने
बालोन्मत्तपिशाचवेषाय
महायोगिने
अवधूताय
अनघाय
अनसूयानन्दवर्धनाय
अत्रिपुत्राय
सर्वकामफलप्रदाय
भगवान दत्तात्रेय फक्त स्मरण करण्याने भक्तावर संतुष्ट होणारे आहेत. ते केवळ सामान्य भयाचेच नाही तर महाभयाचे निवारण करणारे आहेत. ते भक्ताला महान ज्ञान प्रदान करणारे आहेत. ते सात-चित-आनंद स्वरूप आहेत. त्याचे आचरण अवधुत वृत्तीला अनुसरून बालाकवत, उन्मत्तवत आणि पिशाचवत भासणारे आहे. ते केवळ योगी नसून ते महायोगी आहेत. ते अवधूत अवस्थेत रममाण होणारे आहेत. ते परम पवित्र आहेत. ते अनुसया मातेचा आनंद वाढवणारे आहेत. ते अत्री मुनींचे पुत्र आहेत आणि भक्ताच्या सर्व कामानांचे फळ देणारे आहेत.
श्रीदत्ता माला मंत्राच्या पुढील भागात बीजमंत्रांची एक मोठी यादीच आहे. या यादीत अठरा बीजमंत्र आणि तांत्रिक पदे आहेत. मंत्राचा हा भाग खाली देत आहे :
ॐ भवबन्धविमोचनाय
आं असाध्यसाधनाय
ह्रीं सर्वविभूतिदाय
क्रौं असाध्याकर्षणाय
ऐं वाक्प्रदाय
क्लीं जगत्रयवशीकरणाय
सौः सर्वमनःक्षोभणाय
श्रीं महासम्पत्प्रदाय
ग्लौं भूमंडलाधिपत्यप्रदाय
द्रां चिरंजीविने
वषट् वशीकुरु वशीकुरु
वौषट् आकर्षय आकर्षय
हुं विद्वेषय विद्वेषय
फट् उच्चाटय उच्चाटय
ठः ठः स्तंभय स्तंभय
खें खें मारय मारय
नमः सम्पन्नय सम्पन्नय
स्वाहा पोषय पोषय
वरील बीजमंत्र आणि तांत्रिक पदे हा श्रीदत्त माला मंत्राचा सर्वात सामर्थ्यशाली आणि प्रभावी भाग आहे. त्याच बरोबर तो सर्वात जास्त्र क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा भाग सुद्धा आहे. यातील प्रत्येक बीजमंत्र आणि पद यथायोग्य प्रकारेच उच्चारले गेले पाहिजे. जर उच्चारणात चूक झाली तर मंत्राची उर्जा कमी-अधिक होऊन दुष्परिणाम होऊ शकतात. असे दुष्परिणाम कित्येकवेळा लक्षात सुद्धा येत नाहीत आणि अनेक वर्षानंतर ते प्रकटपणे जाणवू लागतात. त्यामुळे त्रिवार सावधान!
वरील बीजमंत्र कोणते-कोणते कार्य करतात ते बीजमंत्राच्याच पुढील पदाने निर्देशित केलेले आहे. उदाहरणार्थ, ओंकार भवबंधनातून सुटका करतो अर्थात मोक्ष प्रदान करतो. आं-बीज असाध्य गोष्टी साध्य करते. ह्रींकार सर्व प्रकारच्या विभूती प्रदान करतो. क्रों-बीज असाध्य गोष्टी आकर्षित करते. ऐंकार वाकसिद्धी देतो. क्लींकार त्रैलोक्य वशीकरण करतो. श्रीं-बीज महासंपत्ती प्रदान करते. ग्लौं-बीज भूमंडलावर अधिपत्य प्राप्त करून देते. द्रां-बीज चिरंजीवत्व प्रदान करते वगैरे वगैरे वगैरे. यातील प्रत्येक बीज एवढे सामर्थ्यशाली आहे की प्प्रत्येक बीजावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. विस्तार भयास्तव येथे सर्वच काही सांगत बसत नाही. पुढे जाण्यापूर्वी लक्षपूर्वक पहा की या यादीत तांत्रिक षटकर्मे जसे वशीकरण, आकर्षण, विद्वेषण, उच्चाटन, स्तंभन, मारण सुद्धा समाविष्ट आहेत.
श्रीदत्त माला मंत्राच्या पुढील भागात काही शक्तीमंत्र आहेत ज्यांद्वारे काही विशिष्ठ कार्ये संपन्न करण्याची आग्रहपूर्वक विनंती दत्तात्रेयांना केलेली आहे. सुमारे सात शक्तीमंत्राचा हा भाग पुढील प्रमाणे आहे :
परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिंधि छिंधि
ग्रहान्निवारय निवारय
व्याधीन् विनाशय विनाशय
दुःखं हर हर
दारिद्र्यं विद्रावय विद्रावय
देहं पोषय पोषय
चित्तं तोषय तोषय
वरील शक्तीमंत्रांद्वारे भगवान दत्तात्रेयांना सांगितले जाते की - दुष्ट तांत्रिकांनी आणि तंत्र-मंत्रांचा परपीडेसाठी वापर करणाऱ्यांनी केलेले अभिचारादी प्रयोग विच्च्छेदुन टाका. ग्रहजनीत पीडांचे आणि दोषांचे निवारण करा. रोग-व्याधी यांचा विनाश करा. दु:ख-दारिद्र्याचे हरण करा. त्यांचा नाश करा. देहाचे पोषण करा आणि चित्ताला आनंद प्रदान करा. अनेक देवी-देवतांच्या माला मंत्रांमध्ये अशा स्वरूपाचे शक्तीमंत्र असतात. ते साधकाच्या संरक्षणासाठी, साधनेतील यशासाठी आणि साधकाच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी असतात.
आता एक सूक्ष्म गोष्ट सांगणार आहे. आधी दिलेल्या बीजमंत्राच्या यादीतील आणि वर दिलेल्या शक्तीमंत्राच्या यादीतील मंत्रांकडे काळजीपूर्वक पहा. तुम्हाला असे आढळेल की यांतील विनंती ही सर्वसाधारण भक्तिपूर्ण स्तोत्रांतील याचना किंवा काकुळतीला येऊन केलेली नम्र विनवणी नाही. ती एकदम थेट, आग्रहपूर्वक काहीशा जोरकस हट्टाने केलेली विनंती आहे. त्यासाठी प्रत्येक विनंतीला दोनदा सांगितले आहे. उदाहरणार्थ, नुसतं स्तम्भय नाही तर स्तम्भय स्तम्भय. नुसतं विद्रावय नाही तर विद्रावय विद्रावय. या रचनेमुळे मंत्राला जोर येतो. मंत्रांतील उर्जा वाढते.
श्रीदत्त माला मंत्र हा एक तांत्रिक मंत्र आहे. तो काही सर्वसामान्य भक्तीरसाने ओथंबलेले स्तोत्र नाही. तंत्रशास्त्रात साधकाच्या मनोभूमिचे तीन प्रकार सांगितले आहेत - पशुभाव, वीरभाव आणि दिव्यभाव. हा मंत्र म्हणण्यासाठी खरंतर वीरभाव किंवा दिव्यभावच आवश्यक आहे. एखाद्या दैवतेला काही आग्रहपूर्वक सांगायचे असेल तर तुमची उपासना तगडी असायला हवी. ते येराबगाळ्याचे काम नाही. इथेच साधक चुकतात. स्वतःला तयार न करता कुठेतरी वाचून किंवा ऐकून अशा साधनांना हात घालतात.
दत्तात्रेयांकडे एवढ्या सगळ्या गोष्टी मागितल्यानंतर ते तंत्रशास्त्रातील दिग्गज कसे आहेत ते अजून चार विशेष नामांनी सांगितले आहे :
सर्वमन्त्रस्वरूपाय
सर्वयन्त्रस्वरूपाय
सर्वतन्त्रस्वरूपाय
सर्वपल्लवस्वरूपाय
भगवान दत्तात्रेयांना योग, तंत्र, शैव, शाक्त, नाथ, अघोर अशा अनेक पंथांत आणि संप्रदायात सद्गुरूचे अढळ स्थान आहे. वरील चार विशेषणे सांगतात की दत्तात्रेय सर्व मंत्रांचे स्वरूप आहेत. ते सर्व यंत्रांचे स्वरूप आहेत. ते सर्व तंत्रांचे स्वरूप आहेत. ते सर्व मंत्रपल्लवांचे स्वरूप आहेत. म्हणजेच दत्तात्रेय हे सर्व संप्रदायांचे जणू मूळ आणि सारभूत गुरुतत्व आहेत. साक्षात शंभू महादेवाचा अंश ज्यांच्यात प्रखर तेजाने तळपत आहे अशा भगवान दत्तात्रेयांना "महासिद्ध" असे संबोधून श्रीदत्त माला मंत्र संपुष्टात येतो :
ॐ नमो महासिद्धाय स्वाहा ।
तांत्रिक मंत्रांच्या उपासनेत हवन आवश्यक असते. हवानाशिवाय तुमच्या मंत्रांतील उर्जा पूर्णपपणे विकसित होत नाही. त्यामुळे श्रीदत्त माला मंत्राच्या उर्जीकरणासाठी "स्वाहा" हे तांत्रिक पद मंत्राच्या शेवटी जोडले आहे (याच मंत्रात सांगितल्याप्रमाणे 'स्वाहा' कशासाठी आहे तर 'पोषय पोषय' अर्थात मंत्राला पुष्टीदायक करण्यासाठी). साधारणतः मंत्राच्या एक-दशांश संख्येने हवन करण्याचा प्रघात आहे.
असो.
श्रीदत्त माला मंत्र नवख्या साधकांसाठी नाही. साधनेची, बीजमंत्रांची, मनोभूमीची मशागत ज्यांनी काही वर्षे तरी केलेली आहे अशाच साधकांनी तो एखाद्या जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शिकावा हे उत्तम.
भगवान दत्तात्रेयांच्या निर्देशाने हा लेख लिहिला तेंव्हा वाचकांना या मंत्राच्या साधनेसाठी आवश्यक असलेली पात्रता मिळवण्यासाठी त्यांनीच प्रेरित करावे अशी त्यांच्या चरणी नम्र विनवणी करतो आणि लेखणीला विराम देतो.
श्रीदत्त माला मंत्रातील शब्द आणि अक्षर गणना
| मंत्राचा भाग |
शब्द संख्या |
अक्षर संख्या |
| ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय | 4 | 12 |
| स्मरणमात्रसन्तुष्टाय | 1 | 9 |
| महाभयनिवारणाय | 1 | 9 |
| महाज्ञानप्रदाय | 1 | 7 |
| चिदानन्दात्मने | 1 | 6 |
| बालोन्मत्तपिशाचवेषाय | 1 | 10 |
| महायोगिने | 1 | 5 |
| अवधूताय | 1 | 5 |
| अनघाय | 1 | 4 |
| अनसूयानन्दवर्धनाय | 1 | 10 |
| अत्रिपुत्राय | 1 | 5 |
| सर्वकामफलप्रदाय | 1 | 9 |
| ॐ भवबन्धविमोचनाय | 2 | 10 |
| आं असाध्यसाधनाय | 2 | 8 |
| ह्रीं सर्वविभूतिदाय | 2 | 8 |
| क्रौं असाध्याकर्षणाय | 2 | 8 |
| ऐं वाक्प्रदाय | 2 | 5 |
| क्लीं जगत्रयवशीकरणाय | 2 | 11 |
| सौः सर्वमनःक्षोभणाय | 2 | 9 |
| श्रीं महासम्पत्प्रदाय | 2 | 8 |
| ग्लौं भूमंडलाधिपत्यप्रदाय | 2 | 11 |
| द्रां चिरंजीविने | 2 | 6 |
| वषट् वशीकुरु वशीकुरु | 3 | 11 |
| वौषट् आकर्षय आकर्षय | 3 | 11 |
| हुं विद्वेषय विद्वेषय | 3 | 9 |
| फट् उच्चाटय उच्चाटय | 3 | 10 |
| ठः ठः स्तंभय स्तंभय | 4 | 8 |
| खें खें मारय मारय | 4 | 8 |
| नमः सम्पन्नय सम्पन्नय | 3 | 10 |
| स्वाहा पोषय पोषय | 3 | 8 |
| परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिंधि छिंधि | 3 | 17 |
| ग्रहान् निवारय निवारय | 2 | 11 |
| व्याधीन् विनाशय विनाशय | 2 | 11 |
| दुःखं हर हर | 3 | 6 |
| दारिद्र्यं विद्रावय विद्रावय | 2 | 11 |
| देहं पोषय पोषय | 3 | 8 |
| चित्तं तोषय तोषय | 3 | 8 |
| सर्वमन्त्रस्वरूपाय | 1 | 8 |
| सर्वयन्त्रस्वरूपाय | 1 | 8 |
| सर्वतन्त्रस्वरूपाय | 1 | 8 |
| सर्वपल्लवस्वरूपाय | 1 | 9 |
| ॐ नमो महासिद्धाय स्वाहा | 4 | 10 |
© हा लेख कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे. लेखाची लिंक शेअर करू शकता परंतु कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण किंवा पुनर्प्रकाशन करण्यास परवानगी नाही.
प्रिय वाचकांनो,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या वेब साईटवर योग-अध्यात्म विषयक लेखन प्रकाशित करत आहोत. हे लेखन अन्यत्र वापरण्याची किंवा पुनर्मुद्रित करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून मूळ लेखकाचे नाव व स्रोत न देता प्रकाशित केले आहे. काहींनी तर ते स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे—हे साहित्यचौर्य निंदनीय आणि खेदजनक आहे. भारतीय कायदा योग्य वेळी कार्य करेलच, पण आम्ही आमच्या सुजाण वाचकांना विनंती करतो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रकाशित होण्याचे एकमेव अधिकृत माध्यम आहे.
धन्यवाद.
— वेब टीम