Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


नाडी कंद आणि दश नाडी वर्णनम्

तुम्हा सगळ्या वाचक मंडळींची श्रावणातील उपासना जोमाने सुरू असणार अशी खात्री आहे. बराच काळ झाला गोरक्ष शतकावरील लेखमाला जरा बाजूला पडली होती. आज ती पुन्हा सुरू करूया. गोरक्षनाथ महाराज आता नाडी कंद आणि नाड्या यांच्या विषयी काही सांगणार आहेत. ते काय म्हणतात ते थोडक्यात पाहू --

तन्तुना मणिवत्प्रोतो यत्र कन्दः सुषुम्णया ।
तन्नाभिमण्डलं चक्रं प्रोच्यते मणिपूरकम् ॥
ऊर्ध्वं मेढ्रादधो नाभेः कन्दयोनिः स्वगाण्डवत् ।
तत्र नाड्यः समुत्पन्नाः सहस्राणि द्विसप्ततिः ॥
तेषु नाडिसहस्रेषु द्विसप्ततिरुदाहृताः ।

नाभीमंडला जवळ एक कंद आहे. एखाद्या मण्यामधून दोरी ओवावी त्याप्रमाणे त्या नाडी कंदामधून सुषुम्ना नाडी प्रवाहित झाली आहे. येथेच माणिपूर चक्र आहे. मेढ्रेच्या वर आणि नाभीच्या खाली हा कंद जणू पक्षाच्या अंड्या प्रमाणे वसलेला आहे. त्यांतून बहात्तर हजार नाड्या उत्पन्न झालेल्या आहेत.

पुढे जाण्यापूर्वी येथे थोडे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. येथे कंद म्हणजे गड्डा किंवा चेंडू सदृश्य आकाराची रचना. कोबी, सुरण, बीट यांचा कसा आकार असतो काहीसा तशा आकाराची रचना. प्राचीन योगग्रंथांमध्ये कंद म्हणून जी काही संकल्पना आहे त्यात थोडीशी मतभिन्नता आहे. काही ग्रंथांत कंद हा हृदय स्थानी मानण्यात आलेला आहे. काही ग्रंथांत तो मूलाधार चक्राच्या ठिकाणी मानण्यात आला आहे तर अनेक ग्रंथांत तो मूलाधार चक्र आणि माणिपूर चक्र यांच्या मध्ये मानण्यात आला आहे. येथे गोरक्षनाथ हे तिसरे स्थान कंदस्थान म्हणून सांगत आहेत.

कंद स्थान नक्की कोठे आहे हे कळण्यासाठी त्याचे कार्य काय आहे ते नीट पाहिले पाहिजे. कंदातून बहात्तर हजार नाड्या उगम पावतात ज्या शरीरातील विविध भागांना प्राण ऊर्जा पुरवत असतात. याचा अर्थ हा की कंद हा या प्राण उर्जेचा स्त्रोत असला पाहिजे. आता मानव शरीराला ऊर्जा किंवा प्राण तयार करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टींची गरज भासते -- हवा आणि अन्न. जे योगग्रंथ कंद हृदय स्थानी मानतात त्यांना हवेवाटे मिळणारी प्राणउर्जा अभिप्रेत असावी कारण फुफ्फूसे त्याच भागात असतात. याउलट ज्या योग ग्रंथानी कंदस्थान माणिपूर चक्राच्या आसपास मानले आहे त्यांना अन्नावाटे मिळणारा प्राण अभिप्रेत असावा कारण अन्नपचन करणारा जठराग्नि तेथेच असतो. कंद स्थानात थोडी मतभिन्नता दिसत असली तरी त्याचे कार्य तेच आहे -- नाड्यांच्या माध्यमातून प्राण ऊर्जा शरीरभर पोहोचवणे. बहुतांशी योगग्रंथांत हे "खालचे" क्षेत्रच कंदस्थान मानले आहे त्यामुळे गोरक्ष शतकातील स्थान अचूक आहे असे मानायला हरकत नाही.

कंदस्थानातून बहात्तर नाड्या उगम पावतात असे सांगितल्यावर त्यांतील दहा महत्वाच्या नाड्या गोरक्षनाथ नमूद करतात --

प्राधान्यात्प्राणवाहिन्यो भूयस्तत्र दश स्मृताः ॥
इडा च पिङ्गला चैव सुषुम्णा च तृतीयका ।
गान्धारी हस्तिजिह्वा च पूषा चैव यशस्विनी ॥
अलम्बुषा कुहूश्चैव शङ्खिनी दशमी स्मृता ।
एतन्नाडिमयं चक्रं ज्ञातव्यं योगिभिः सदा ॥

इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हस्तिजिव्हा, पूषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू, शंखिनी अशा या दहा प्रधान नाड्या आहेत. योग साधकाने हे नाडीचक्र नीट माहीत करून घेतले पाहिजे.

वरील दहा नाड्या कंदात उगम पाऊन कुठे-कुठे जातात ते आता गोरक्षनाथ सांगत आहेत.

इडा वामे स्थिता भागे पिङ्गला दक्षिणे तथा ।
सुषुम्णा मध्यदेशे तु गान्धारी वामचक्षुषि ॥
दक्षिणे हस्तिजिह्वा च पूषा कर्णे च दक्षिणे ।
यशस्विनी वामकर्णे चासने वाप्यलम्बुषा ॥
कूहुश्च लिङ्गदेशे तु मूलस्थाने च शङ्खिनी ।
एवं द्वारमुपाश्रित्य तिष्ठन्ति दश नाडिकाः ॥
सततं प्राणवाहिन्यः सोमसूर्याग्निदेवताः ।
इडापिङ्गलासुषुम्णा च तिस्रो नाड्य उदाहृताः ॥

इडा नाडी कंदातून सुरू होते आहे डाव्या नाकपुडीत जाते. पिंगला नाडी कंदातून सुरू होते आणि उजव्या नाकपुडीत जाते. सुषुम्ना मध्यदेशात अर्थात मेरुदंडातून मस्तकापर्यंत जाते. गांधारी डाव्या नेत्रात तर हस्तिजिव्हा उजव्या नेत्रात जाते. पूषा आणि यशस्विनी या दोन नाड्या अनुक्रमे उजव्या आणि डाव्या कर्णात जातात. अलंबुषा नाडी मुखात येते. कुहू नाडी लिंगात तर शंखिनी नाडी मलद्वारात जाते. अशा प्रकारे दशद्वारांचा आश्रय घेऊन या दहा नाड्या प्राणवहनाचे कार्य करतात.

या दहा नाड्यापैकी तीन योगासाधनेच्या दृष्टीने अधिक महत्वाच्या आहेत -- इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या तीन नाड्या सतत प्राणाचे चलनवलन करत असतात. या तीन नाड्याच्या देवता अनुक्रमे चंद्र, सूर्य आणि अग्नि आहेत.

येथे गोरक्षनाथांनी दहा महत्वाच्या नाड्यांकडे निर्देश केला आहे. इडा नाडीची देवता चंद्र आहे. पिंगला नाडीची देवता सूर्य आहे आणि सुषुम्ना नाडीची देवता अग्नि आहे एवढेच त्रोटक सांगून गोरक्षनाथांनी लेखणी आवरती घेतली आहे. चंद्र-सूर्य-अग्नि या तीन योगशास्त्रीय संकल्पना वरकरणी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. त्या केवळ योगशास्त्राशीच संबंधित आहेत असं नाही तर तंत्रशास्त्र आणि मंत्रशास्त्र यांच्याशी सुद्धा त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. तो संबंध काय आहे आणि कसा आहे त्या विषयी गोरक्षनाथांनी येथे मौन पाळले आहे. बहुदा विषय काहीसा गहन आणि गोपनीय असल्याने ते ज्ञान गुरुमुखातूनच दिले जावे असे त्यांना वाटत असावे. विषयांतर टाळण्यासाठी मी सुद्धा फार खोलात विस्ताराने त्या विषयाला आज हात घालत नाही.

असो.

सोळा कलांनी युक्त चंद्र, बारा कलांनी युक्त सूर्य आणि दहा कलांनी युक्त अग्नि ज्या जगदंबा कुंडलिनीच्या आश्रयाने रहातो ती भगवती आपल्या श्रीकंठासह सर्व योग साधकांना योगामार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 19 August 2024