HyperLink HyperLink
Search Blog
See All Tags

RSS Feed
RSS Feed
AddThis Feed Button
Bookmark and Share





Visit blogadda.com to discover Indian blogs


पातंजल योगसूत्रे - संक्षिप्त ओळख

माणसाची शाश्वत सुखाची आस ही काही नवी नाही. अनादी काळापासून माणूस त्या न संपणार्‍या आनंदाचा शोध घेत आला आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या षड्दर्शनांमधून प्राचीन ऋषीमुनी, योगी, सन्यासी आणि विद्वानांनी चार मुख्य प्रश्न हाताळलेले दिसतात. ते चार प्रश्न असे -

  1. दुःखाचे वास्तविक स्वरूप काय आहे?
  2. दुःख कोठून उत्पन्न होते?
  3. दुःखाचा कायमस्वरूपी अभाव (अर्थात शाश्वत आनंद) असलेली स्थिती काय आहे?
  4. दुःखाचा कायमचा नायानाट क्सा करता येईल?

या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपापल्या पद्धतीने शोधली आणि आपापल्या भाषेत व्यक्त केली. वर उल्लेख केलेली षड्दर्शने म्हणजे - मीमांसा, वेदांत, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग. या सर्वच दर्शनांचा उहापोह येथे करतायेणे शक्य नाही. पण सांख्य, वेदांत आणि योग यावर संक्षिप्त भाष्य अस्थानी ठरणार नाही. ही तीन दर्शने एकमेकांशी निगडीत आहेत आणि भारतीय आध्यात्मिक जीवनावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. 

सांख्य दर्शन हे अतिशय प्राचीन तत्वज्ञान आहे. कपिल मुनींना सांख्य तत्वज्ञानाचे जनक मानले जाते. सांख्य दर्शान द्वैताधिष्ठीत आहे. यामधे पंचवीस तत्वांचे विवरण आहे. ही पंचवीस तत्वे म्हणजे - पुरुष, प्रकृती, अहंकार, बुद्धी, मन, शब्द, स्पर्श, रूप, रस, गन्ध, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, कान, त्वचा, नेत्र, रसना, घ्राण, वाणी, हस्त, पाद, उपस्थ आणि गुद. या पंचवीस तत्वांचे स्पष्टीकरण योग्य वेळी देणारच आहे. येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सांख्य दर्शनात परमेश्वराला वेगळे असे स्थान नाही. पुरुष आणि प्रकृती ही अनादि तत्वे आहेत असे सांख्य मानते. पुरुष तत्व हे चेतनस्वरूप, निष्क्रिय आहे तर प्रकृती तत्व हे जड आहे. पुरुष प्रकृतीच्या आधीन झाल्याने बाकीची तत्वे स्फुरतात. सांख्य तत्वज्ञानानूसार मुक्ती म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे वेगवेगळे आहेत असे जाणणे होय. तत्वसमास, सांख्यकारिका, षष्टितंत्र, सांख्यसूत्र इत्यादी ग्रंथ सांख्य तत्वज्ञान विषद करतात.

वेदांत दर्शनाला भारतीय आध्यात्मिक जीवनात सर्वोच्च स्थान दिले जाते. वेदांत शास्त्रात उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता यांचा समावेश होतो. वेदांत दर्शनानूसार सर्व विश्वाचे मुळ ब्रह्म आहे. वेदांत अद्वैताधिष्ठीत शास्त्र आहे. सर्व विश्वात एकच एक ब्रह्म भरून राहिले आहे असे वेदांत शास्त्राचे मत आहे. या मतानूसार आत्मा आणि परमात्मा भिन्न नसून एकच आहेत. केवळ मायेच्या प्रभावाने आत्मा स्वतःचे परमात्म स्वरूप विसरून 'मी म्हणजे शरीर' असे मानू लागतो. सामान्यतः वेदांत म्हटले की शंकराचार्य असे समीकरण केले जाते. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की शंकराचार्यांची शिकवण ही वेदांताचे केवळ एक स्पष्टीकरण आहे. शंकराचार्यांनंतरच्या आचार्यांनीही आपापली स्पष्टीकरणे मांडली आहेत. सांख्यांचा पुरुष-प्रकृती द्वैतभाव सोडला तर बाकीचे सांख्य तत्वज्ञान वेदांतालाही मान्य आहे.

योग दर्शन सर्व सांख्य तत्वे जशीच्या तशी स्विकारते. पण योगशास्त्रानूसार पुरुष हे अनादी तत्व नसून मर्यादीत तत्व आहे (आत्मा). योगशास्त्र परमेश्वराचे स्वतंत्र अस्तित्व मानते. परमेश्वर म्हणजे असा पुरुष की जो अनादी आणि शाश्वत आहे (परमात्मा). आत्म्याचे परमात्म्यामधे विलिनीकरण म्हणजेच योग. पतंजलि मुनींची योगसूत्रे योगदर्शन विषद करतात. अद्वैत वेदांत हे जरी 'आत्मा आणि परमात्मा एकच आहे' हा सर्वोच्च सिद्धांत कथन करत असले तरी सामान्य साधकांना या तत्वाचे आकलन होणे अतिशय कठीण जाते. म्हणून योगशास्त्र परमेश्वराचे वेगळे अस्तित्व स्विकारते ज्या योगे साधकाला आध्यात्मिक प्रगती सुकर होते. योगशास्त्र द्वैताधिष्ठीत भासत असले तरी ते वरकरणीच आहे. साधनेच्या अत्युच्च अवस्थेत योग आणि वेदांत एकाच गंतव्य स्थळी पोहोचतात. असे म्हणता येईल की वेदांत हे साध्य आहे तर योग हे साधन आहे.  

योगशास्त्रावरील उपलब्ध असलेल्या प्राचीन ग्रंथांमधे पतंजलि मुनींची योगसूत्रे अत्यंत महत्वाची मानली जातात. मानवी मनाचा इतका सखोल अभ्यास हजारो वर्षांपूर्वी भारतीय योग्यांनी केला होता ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट तर आहेच पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे ही योगसूत्रे आजही आचरणात आणता येण्यासारखी आहेत. आजही ती तेवढीच टवटवीत आहेत. योग म्हणजे काय, मन म्हणजे काय, मनाचे व्यापार, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, त्यासाठी आवश्यक असणारी मुल्ये कोणती, साधनेतील प्रगतीची लक्षणे, साधनेतील विघ्ने अशा अनेक महत्वाच्या बाबींवर ही सूत्रे प्रकाश टाकतात.

पतंजली मुनी कोण होते, त्यांचा नक्की काळ कोणता याविषयी तज्ञांचे एकमत नाही. हे मुद्दे साधकाच्या दृष्टिकोनातून तेवढे महत्वाचेही नाहीत. साधकांसाठी पतंजलि मुनींची शिकवण महत्वाची आहे. पतंजलिंना शेषाचा अवतार मांण्यात येते. लहानपणी त्यांनी शिवाला प्रसन्न करून घेतले होते. शिवाने त्यांना पाणिनीची सूत्रे आणि कात्यायनाची वार्तिके यांवर भाष्य लिहिले. त्यांनी आयुर्वेदावरही लेखन केले. विद्वानांमधे हे सर्व कार्य एकाच पतंजलि नावाच्या व्यक्तीने केले की वेगवेगळ्या व्यक्तींनी याबद्दल मतभेद आहेत. तरीही हा इतिहास रंजक आहे.   

पतंजलि मुनींनी लिहिलेल्या योगसूत्रांमधे एकशे पंच्याण्णव (195) सूत्रे आहेत. ही सूत्रे चार प्रकरणांमधे विभागण्यात आली आहेत. पहिले प्रकरण समाधिपाद असून त्या मधे एकावन (51) सूत्रे आहेत. समाधिपादाचा विषय मानवी मनाचे विवरण आणि समाधि निरूपण हा आहे. दुसरे प्रकरण साधनपाद असून त्यामधे पंचावन (55) सूत्रे आहेत. साधनापादाचा विषय अष्टांगयोग निरूपण हा आहे. तिसरे प्रकरण विभूतिपाद असून त्यातही पंचावन (55) सूत्रे आहेत. समाधीच्या अभ्यासाने प्राप्त होणार्‍या सिद्धींचे निरूपण हा या प्रकरणाचा विषय आहे. कैवल्यपाद हे चौथे प्रकरण असून त्यात योगसाधनेची फलश्रुती वर्णन केली आहे.

आज पातंजल योगदर्शनावर अक्षरशः डझनावारी पुस्तके उपलब्ध आहेत. अजुनही नवी लिहिली जाता आहेत.यातच पातंजल योगसूत्रांचे महत्व स्पष्ट होते. या लेखमालेद्वारे या सूत्रांवर सुलभ भाष्य लिहिण्याचा हा एक नम्र प्रयत्न. माझे मुख्य उद्दिष्ट पातंजल योगसूत्रांतील ज्ञान सामान्य साधकांच्या दृष्टिने सोपे आणि व्यावहारिक कसे होईल हे आहे. पातंजल योगदर्शन हा काही तार्कीक वादाचा विषय नाही. तो अभ्यासाचा विषय आहे. तेव्हा उगीचच शब्दांचा आणि अर्थछटांचा किस पाडण्यापेक्षा मी मुख्य मुद्दा सुलभपणे विषद करण्यावर भर दिला आहे. आशा आहे की तुम्हाला हे भाष्य आवडेल आणि पातंजल योग आचरणात आणावा अशी सदिच्छा होईल.        

सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape



Copyright (C) bipinjoshi.org. All rights reserved.
Contact Us
Read Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web