साधक प्रश्नावली
1. योग म्हणजे काय?
योग या शब्दाचा अर्थ मिलन घडणे वा जोडले जाणे
असा आहे. अध्यात्मिक दृष्टीने पहाता आत्मा आणि परमात्मा, जीव आणि
शिव यांचे मिलन म्हणजे योग होय. पतंजली योगशास्त्रात योग या
शब्दाची व्याख्या चित्तवृतींचा निरोध होणे अशी केलेली आहे. जेव्हा
चित्तवृतींचा पुर्णपणे उपशम होतो तेव्हाच आत्मा आपल्या खर्या
स्वरूपात स्थित होतो आणि 'जीव तोचि शिव' ही अनुभुती साधकाला मिळते.
प्राचीन योगग्रंथ योगशात्राची विभागणी चार
प्रकारात करतात. ते प्रकार म्हणजे मंत्रयोग, हथयोग, लययोग आणि
राजयोग. या चारही प्रकारांचे उद्दीष्ट मनोलय हेच आहे. अजपा साधना
हा राजयोगांतर्गत येत असला तरी तो खरेतर यात चारही योग शाखांचे सार
सामावलेले आहे.
सर्वच योगप्रकारांमधे आठ पायर्यांचा समावेश होतो. त्या आठ
पायर्या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार,
धारणा, ध्यान आणि समाधी. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह
आणि ब्रह्मचर्य ह्या गुणांचे पालन म्हणजे यम. शौच, संतोष, तप,
स्वाध्याय आणि इश्वरप्रणिधान या गुणांचे पालन म्हणजे नियम. स्थिर
आणि सुखमय शरीरस्थिती म्हणजे आसन. जैवीक
चैतन्यावर ताबा मिळवणे म्हणजे प्राणायाम. पंचेंद्रियांना अंतर्मुख
बनवणे म्हणजे प्रत्याहार. मनाला एखाद्या गोष्टीवर एकाग्र करणे
म्हणजे धारणा. धारणा पक्व झाली की तीचे रुपांतर ध्यानात होते. ध्यान
पक्व होवून मन अमन झाले की समाधी लागते.
2. योग, सांख्य आणि वेदांत यांमध्ये काय फरक वा
साम्य आहे?
सांख्यशास्त्र हे द्वैताधिष्ठीत शास्त्र आहे.
कपिल मुनींना संख्याचे जनक मानले जाते. सांख्यशास्त्रात पंचवीस
तत्वांचा समावेश होतो. ही तत्वे म्हणजे पुरुष, प्रकृती, अहंकार,
बुद्धी, मन, पंच तन्मात्रा (गन्ध, स्पर्श, आकार, चव, ध्वनी), पंच
ज्ञानेंद्रिये (नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ), पंच कर्मेंद्रिये
(हात, पाय, गुद, उपस्थ, वाक्), पंच महाभूते (पृथ्वी, जल, अग्नि,
वायु, आकाश). या पंचवीस तत्वांचे सम्यक ज्ञान हे सांख्यांचे
उद्दीष्ट होय. सांख्यशास्त्राच्या मते मुक्ती म्हणजे पुरुषाचा
प्रकृतीशी वियोग घडवणे. सांख्य शात्रात इश्वर या संकल्पनेला स्थान
नाही.
वेदांतशात्र प्रामुख्याने उपनिषदांवर आधारलेले
आहे. आदि शंकराचार्यांनी प्रतिपादित केलेले वेदांताचे निरुपण
सर्वात जास्त प्रमाणात मान्यता पावले आहे. वेदांतशास्त्र अद्वैताचा
पुरस्कार करते. वेदांतानुसार एक ब्रह्मच सर्व विश्वात भरून राहिले
आहे. देव-देवता या द्वैताधिष्ठीत संकल्पनेला वेदांत
शाश्वत सत्य मानत नाही. एक
ब्रह्मच सर्व रूपे घेत असल्याने सर्व चेतन अथवा अचेतन वस्तू म्हणजे
ब्रह्मच आहेत. वेदांत शात्रानुसार मुक्ती म्हणजे 'सर्वम खलिद्वं
ब्रह्म' अर्थात सर्व ब्रह्मच आहे ही प्रत्यक्ष अनुभुती होय.
ज्याप्रमाणे अंधारात दोरी भ्रमाने सर्पासमान भासते त्याच प्रमाणे
जीव मायेच्या प्रभावाने हे जग सत्य मानतो. मायेचा प्रभाव दुर होताच
आपण ब्रह्मच आहोत असे तो जाणतो. हा मार्ग ज्ञानमार्ग म्हणूनही
ओळखला जातो.
योगशास्त्र सांख्य आणि वेदांत यांचा सुरेख मेळ
घालते. पतंजली मुनींना त्यांनी हे शास्त्र सुत्रबद्ध केल्याने
योगदर्शानाचे प्रणेते मानले जाते. योग सांख्यांची पंचवीस तत्वे
जसीच्या तशी स्विकारते पण या पंचवीस तत्वांपलीकडील इश्वरालाही
मानते. योगशात्राचे उद्दीष्ट पुरूषाला (आत्म्याला) इश्वरामधे
(परमात्म्यामधे) विलीन करणे हे आहे. म्हणजे योग द्वैतातून अद्वैत
असा प्रवास करतो. कलियुगामधे खरा ज्ञानी मिळणे कठीण आहे.
योगशास्त्राची कास धरूनच वेदांतप्रणीत अद्वैतानुभूती घेता येते.
वेदांतशात्रानेही सांख्य आणि योग यांची मते जेथे अद्वैताला बाधा
येत नाही तेथे ग्राह्य धरली आहेत.
थोडक्यात असे म्हणता येईल की वेदांतशास्त्र हे विवेचनात्मक (Theory)
आहे तर योगशास्त्र हे वेदांतातील सत्य अनुभवण्याची प्रत्यक्ष कृती
(Practical) होय.
3. योगमार्गाची कास धरण्यासाठी काय पात्रता
लागते?
योगमार्गाची कास धरण्यासाठी श्रद्धा, सबुरी आणि शिस्त या तीन
गुणांची अत्यंत जरूरी आहे. साधकाची परमेश्वरावर आणि योगमार्गावर
नितांत श्रद्धा अत्यावश्यक आहे . शंका-कुशंका योगमार्गातील अडथळा
आहेत. साधकाजवळ सबुरी असणेही गरजेचे आहे. सर्वच साधक सारख्याच
वेगाने प्रगती करू शकत नाहीत. कर्मांनुसार आणि साधनेच्या
तीव्रतेनुसार त्यांना लागणारा वेळ कमी-अधिक असतो. वर्षोनवर्षे न
कंटाळता साधणारत राहाता येणे आवश्यक आहे. साधकाने जीवनात आणि
साधनेत शिस्तप्रिय असणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजे काही अधून-मधून
करण्याची गोष्ट नाही. साधना तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली
पाहिजे.
4. अजपा ध्यान म्हणजे काय?
अजपा
साधना ही एक श्वासावर आधारीत अत्यंत प्राचीन अशी ध्यान पद्धती आहे
जी मनाला तात्काळ शांत, शिथिल करून गाढ ध्यानावस्थेत घेऊन जाते.
श्वासावर मन ठेवणे हा अजपा साधनेचा केन्द्रबिन्दू आहे. अजपा
साधनेला सोहं साधना असेही म्हटले जाते.
5. अजपा साधना कोण करू शकतो?
अजपा साधना करण्यासाठी कोणतीही जात, धर्म, लिंग, वय इत्यादी अट
नाही. तुम्ही मनुष्य आहात एवढीच गोष्ट अजपा साधनेला पुरेशी आहे.
6. अजपा साधनेचे फायदे कोणते?
अजपा ध्यानाचा नियमीत सराव खालील फायदे मिळवून देतो:
- मन तत्काळ शांत होते
- शरीर-मनाला विश्रांती मिळते
- ताणतणाव, चिंता, काळज्या यांपासून आलेला मानसिक शीण दूर
होतो
- दोनही स्वर समान वाहू लागतात
- रोजच्या आयोष्यातील ताणतणावांना सामोरे जाण्यास उत्साह
मिळतो
- राग, नैराश्य, आळस, भीती इत्यादी मानसिक त्रासांपासून
सुटका होते
- शरीरातील प्राणमय कोष प्रस्फूटीत
होतो
- चक्रे आणि सुषुम्ना नाडी उघडली जाते
- अध्यात्मिक शक्ती (कुंडलिनी) हळूवारपणे आणि आल्हाददायकपणे
जागृत होते
- धारणा-ध्यान-समाधी ही त्रिपुटी साधता येते
7. अजपा साधनेचा उगम केव्हा झाला?
अजपा साधना अत्यंत प्राचीन काळापासून भारतात चालत आली आहे.
अजपा
साधनेचा उल्लेख उपनिषदे, तंत्रे, पुराणे आणि अन्य अनेक योगग्रंथांत
आढळतो. त्यांपैकी काही असे आहेत - योग चूडामणि उपनिषद, योग शिखा
उपनिषद, हंसोपनिषद, विज्ञान भैरव तंत्र, कुलार्णव तंत्र, योगबीज,
घेरंड संहिता, गोरक्षपद्धती, शिव पुराण, स्कन्द पुराण. अनादी काळापासून ऋषी, मुनी, संन्यासी, योगी अजपा साधनेद्वारे आत्मोन्नती
करत आले आहेत.
भगवान शंकारानी पार्वतीला अजपा साधना शिकवल्याचे
आगम ग्रंथांवरून स्पष्ट होते. अत्री मुनींचे
पुत्र
दत्तात्रेय यांनी आपल्या मातेला
अजपा साधनेची
दीक्षा दिली होती आणि आपल्या शिकवणीतून तीचा प्रचारही केला होता.
गोरक्षनाथांसारख्या श्रेष्ठ योग्याने (ज्यानी नाथ
संप्रदायाचा भारतभर प्रसार केला) आपल्या योगबीज नामक ग्रंथात अजपा
साधनेचा उल्लेख 'न भुतो न भविष्यती' असाच केलेला आढळतो. नाथ
संप्रदायाची ती एक महत्वाची साधना आहे. स्वामी समर्थ
रामदासांनी आपल्या दासबोधात एक स्वतंत्र समास अजपा
साधेनेकरता वाहिला आहे. क्रियायोगाचे प्रख्यात गुरू परमहंस
योगानन्द यांनी आपल्या शिकवणीमधे अजपा साधनेचा पुरस्कार
केलेला आहे. स्वामी सत्यानन्द सरस्वतींच्या
क्रियायोग पद्धतीमधेही अजपा साधनेचा वापर केलेला आढळतो. या सर्व
उदाहरणांवरून अजपा साधनेचे महत्व लक्षात
येते.
8. इतर साधनांच्या तुलनेत अजपा साधनेचे वैशिष्ठ
काय?
अजपा साधना ही एक परिपूर्ण साधना आहे. अजपाच्या साधकाला अन्य कोणत्याही
साधनेची गरज लागत नाही. अजपा साधना ही जरी ध्यानाची पद्धती असली तरी खरंतर त्या मधे
मंत्र-हठ-लय-राज या चार मार्गांचा समन्वय सुखकारकरीत्या झालेला आढळतो. अजपा
ध्यानही
आहे आणि प्राणायामही. अजपा सारखी नैसर्गीक, दुष्परिणामरहित साधना क्वचितच आढळते.
जोर-जबरदस्तीने कुंभक, बन्ध वा मुद्रा करण्याने तोटा होवू शकतो. असा प्रकार अजपामधे
होत नाही कारण ती पुर्णतः नैसर्गिक साधना आहे. अजपाचे फायदे साधक काहीच काळात
अनुभवू शकतो. अजपाद्वारे कुंडलिनी जागरण हे सुखकारकपणे, आल्हाददायकपणे होते.
हठयोगासारख्या योगपद्धतींना अनेक नियम काटेकोरपणे पाळावे लागतात जे आजच्या काळात
साधकाला जाचक वाटू शकतात. अजपाचे मात्र तसे नाही. इतर अनेक साधनांच्या तुलनेने
अजपासाठी पाळावे लागणारे नियम अगदी कमी आहेत आणि ते आजच्या काळातही सहज आचरणात आणता
येण्यासारखे आहेत. अनेक साधकांना मनाला काबूत ठेवून ध्यानासाठी लागणारी एकाग्रता
साधणे अतिशय कठीण जाते. अजपा साधनेत प्राणाद्वारे मनावर अंकुश
ठेवला जात असल्याने चंचल मनाचा साधकही यात सफलता मिळवू शकतो. अजपा साधना अबालवृद्ध, स्त्रीपुरूष कोणीही करू शकतो.
अजपाला वय, लिंग, जात, धर्म अशा अटी नाहीत.
9. प्राण म्हणजे काय?
आपले शरीर हे पंच महाभूतांपासून बनले आहे. परंतू हे पंचभुतात्मक
शरीर जड आहे. जोवर त्यात चैतन्य नाही तोवर ते केवळ रक्त मास अस्थी
यांचा गोळाच आहे. या गोळ्याला चेतन करणारी शक्ती म्हणजे
प्राण. शरीराची प्रत्येक क्रिया जसे हृदयाचे धडधडणे,
श्वसन, अन्नपचन, मल-मुत्र विसर्जन हे प्राणाचेच कार्य आहे. प्राण
डोळ्याला दिसू शकत नाही. त्यामुळे प्राणावर ताबा मिळवण्यासाठी
प्राणाद्वारे चालण्यार्या एखाद्या क्रियेवर ताबा मिळवावा लागतो.
काही शरीरक्रियांवर आपला ताबा चालू शकत नाही जसे हृदयाची धडधड.
श्वसन ही अशी गोष्ट आहे ज्यावर आपला ताबा चालू शकतो. म्हणून
योगशास्त्रात प्राणावर ताबा मिळवण्यासाठी श्वासांवर आधारीत
क्रिया केल्या जातात. अशा क्रियांना योगशास्त्रात
प्राणायाम असे म्हणतात.
10. कुंडलिनी आणि चक्रे म्हणजे काय?
सांख्य आणि योगशास्त्राप्रमाणे सृष्टीतील पंचवीस तत्वे कोणती ते
आपण वर पाहिले. इश्वरापासून पृथ्वीतत्वापर्यंत जे सृजन होते त्याला
योगशास्त्रात प्रसव असे म्हणतात. सृजनाचे कार्य संपल्यावर इश्वरी
शक्तीला काहीच कार्य उरत नाही. पण म्हणून ती शक्ती लोप पावत नाही.
ती शरीरातच सुप्त रूपाने वास करते. या सुप्त
शक्तीला कुंडलिनी असे म्हणतात. कुंडलिनी या शब्दाचा अर्थ आहे
वेटोळे घालून बसलेली. समजा तुमच्याकडे एक चटई आहे. जेव्हा त्या चटईची गरज नसेल तेव्हा तुम्ही काय
कराल? तर ती गुंडाळून कपाटात ठेवाल. तसाच प्रकार शक्तीच्या बाबतीत होत असतो. सृजन
करून झाले की शक्तीला काहीच काम नसते आणि ती गुंडाळून ठेवली जाते.
मानवी शरीराचा विचार करता असे दिसते की वर उल्लेखलेले सृजन हे
मेंदू ते पाय या दिशेने असे झालेले आहे. सृजन करताना इश्वरी शक्ती
प्राणरूपाने जणू एखाद्या
नलिकेतून गेल्यासारखी मज्जारज्जूमधून जाते. या नलिकेला योगशास्त्रात सुषुम्ना नाडी
असे म्हणतात. सृजन करीत असताना या
मुख्य नलिकेला असंख्य फाटे फुटतात. पाणी पुरवठा करणार्या एखाद्या जलवाहिनीला
लहान-लहान नलिकांचे कसे जाळे असते, अगदी तसेच हे फाटे असतात. हे फाटे सुषुम्नेला जेथे फुटतात
त्या जागांना चक्रे असे म्हणतात. अशी सहा महत्वाची चक्रे या शुषुम्नामार्गावर
असतात. ही सहा चक्रे पाठीच्या कण्याच्या खालपासून ते भ्रुमध्यापर्यंत असतात.
त्यांना अनुक्रमे मूलाधार, स्वाधिस्ठान, मणिपूर, अनाहत,
विशुद्धी आणि आज्ञा अशी त्यांची नावे आहेत. सातवे चक्र,
सहस्रार, हे मेंदूत असते. आधुनीक
वैद्यकशास्त्राने शोधलेली Plexuses या चक्रांशी बरीच मिळतीजुळती
आहेत.
कुंडलिनी म्हणजे काही दृश्य वस्तू नव्हे की जी चालू अथवा बंद करता येईल. ती एक
शक्ती आहे. शक्ती जागृत करणे म्हणजे काय? समजा, एक लाकडाचा ओंडका आहे. त्यामधे
अग्नि रुपी शक्ती अगोदरपासूनच अस्तित्वात आहे पण सुप्त स्वरूपात. ती सुप्त शक्ती
तुम्ही जागृत कशी कराल? तर तुम्ही बाह्य अग्नीने त्या ओंडक्याला आग लावाल.
कुंडलिनीचेही असेच आहे. निद्रिस्त कुंडलिनीला जागे करण्यासाठी योगरूपी अग्नी
वापरावा लागतो. कुंडलिनी जागृतीचा सरळ अर्थ असा आहे की शरीरांतर्गत
सुप्त ऊर्जेचे (Potential Energy) रूपांतर चल ऊर्जेमधे (Kinetic Energy) करणे. ही
कार्यरत झालेली ऊर्जा मग शरीरमनावर परिणाम करण्यास सुरवात करते.
11. कुंडलिनी जागृतीचा आध्यात्मिक प्रगतीशी संबंध
काय?
आपण आगोदर पाहीले की सृष्टीचे सृजन हे इश्वर ते पृथ्वीतत्व
असे होते. जर इश्वरतत्वात विलीन व्हायचे असेल तर हा क्रम उलट दिशेने करायला हवा.
म्हणजे पृथ्वी ते इश्वर असा प्रवास करायला हवा. या प्रवासाला प्रतिप्रसव
असे म्हणतात.
कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा तिला सुषुम्नेमधून ऊर्ध्व मार्गाने नेले
जाते. म्हणजेच तिचा प्रवास सृजनाच्या उलट्या मार्गाने होऊ लागतो. असा प्रवास सुरू
झाला की लय सुरू होतो. जेवढा लय अधिक तेवढे इश्वरतत्वापासूनचे अंतर कमी. अर्थात तेवढी
आध्यात्मिक प्रगती जास्त. या प्रगतीची हुकमी खुण म्हणजे वैराग्य आणि मनोलय. जसजसे
तुम्ही प्रगत व्हाल तसतसे तुमचे मन अधिकाधिक एकाग्र होत जाईल. चित्तवृत्ती क्षीण
होत जातील आणि एक दिवस पूर्ण थांबतील. हीच समाधी.
12. कुंडलिनी जागृतीचे मार्ग कोणते?
कुंडलिनी अनेक प्रकारच्या साधनांनी जागृत करता येते. अजपा साधनेव्यतिरिक्त
कुंडलिनी जागरणाचे काही मार्ग म्हणजे मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग,
क्रियायोग, शक्तीपात, भक्तीयोग आणि नामस्मरण. अजपा साधना हा कुंडलिनी
जागृतीचा सर्वात सोपा, पुर्णतः नैसर्गीक आणि निर्धोक असा उपाय आहे.
13. साधनेची जागा आणि आसन कसे असावे?
आजपा साधना शक्यतो प्रसन्न जागी करावी. शक्य असल्यास त्या जागी
एकांत असावा. जागा धूळ, कीटक, डास
इत्यादींपासून मुक्त असावी. साधनेच्या जागी फार गोंगाट नसावा.
साधनेचे आसन मऊ आणि सुखकारक असावे. अर्थात त्यासाठी बाजारातून
किमती "योगा मॅट" आणण्याची गरज नाही. एका कांबळ्याची चौपदरी घडी
करावी. त्यावर मऊ सूती पंचाची चौपदरी घडी पसरावी आणि त्यावर
साधनेला बसावे. हे आसन अन्य कशासाठीही वापरू नये वा अन्य कोणालाही
वापरायला देऊ नये.
14. साधनेसाठी योग्य वेळ कोणती?
साधना किती वेळ करावी?
शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा - सकाळी आणि संध्याकाळी - साधना
करावी. जरा ते शक्य नसेला तर सकाळच्या सतराला प्राधान्य द्यावे.
साधना ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी करण्याची सवय करावी. सुटीच्या
दिवशी साधनेचा कालावधी वाढवावा. आजपा साधनेसाठी अमूकाचा असा वेळ
द्यावा असे सांगता येणार नाही. प्रत्येकाने आपआपल्या सोयीनुसार आणि
उपलब्धतेनुसार किती वेळ द्यायचा ते ठरवावे. तरीही ढोबळमानाने असे
सांगता येईल की नवीन साधनांनी 20 मिनीटे तरी साधनेला द्यावी. साधना
पक्की रुजल्यानंतर 1 ते 1 1/2 तासांपर्यंत वेळ वाढवता येईल. प्रगत
साधक आपापला वेळ स्वतःच ठरवू शकतात.
15. साधकाने दैनंदीन
जीवनात कोणती पत्थ्ये पाळावी?
साधकाने खालील पत्थ्ये पाळल्यास नक्कीच फायदा होईल :
- साधकाने आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
मसालेदार, तळलेले पदार्थ टाळावे.
पोटाचे चार भाग कल्पून दोन
अन्नाने भरावे. एक द्रव पदार्थाने
भरावा आणि उरलेला भाग वातासाठी मोकळा ठेवावा.
ताजी फळे, भाज्या, गाईचे दूध अशा पदार्थांचा वापर शक्य
तेव्हा करावा.
- साधनेचे फळ तत्काळ मिळण्याची अपेक्षा करू नये. तुमच्या
पूर्वकर्मानुसार आणि साधनेच्या तीव्रतेनुसार फळ मिळण्यास
कमी-अधिक कालावधी लागू शकतो.
- आपली तुलना अन्य साधकांबरोबर करू नये. व्यक्ती तितक्या
प्रकृती हे लक्षात ठेवावे.
- तीव्र आजारपणात अथवा मन:स्थीती अत्यंत विचलीत असतांना
साधना करू नये.
- आपल्या शरीर-मनाकडे लक्ष द्यावे. स्वतःला प्रमाणाबाहेर
ताणू नये.
- अध्यात्मामार्गावरचे गूढ अनुभव गरज नसताना चारचौघांना
सांगत बसू नये. गुरूला अथवा मार्गदर्शकाला सांगण्यास हरकत
नाही.
- साधणारत असतांना सांसारीक गोष्टींचे चिंतन करत बसू नये.
लक्षपूर्वक केलेली साधना पटकन फायदा देते.
- चांगल्या संगतीत राहावे. तुमच्या विचारांशी मिळत्याजुळत्या
लोकांच्या संगतीत असावे.