HyperLink HyperLink
Search Blog
See All Tags

RSS Feed
RSS Feed
AddThis Feed Button
Bookmark and Share





Visit blogadda.com to discover Indian blogs


सारे काही शाश्वत आनंदासाठी

माणूस जीवन का जगतो? आयुष्यातील प्रत्येक कृतीमागे त्याचे काय लक्ष्य असते? ऊर फुटेस्तोवर धावतो ते कशासाठी? या प्रश्नांचा बारकाईने विचार केला तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल - आनंद. असा आनंद तो कधी कोमेजणार नाही. आयुष्यातील कोणतीही गोष्ट आपण कसला ना कसला आनंद प्राप्त करण्यासाठीच करत असतो. आता तुमच्यातील काहींना हे पटणार नाही. ते म्हणतील जर आपण आनंदासाठीच जगतो तर मग अनेक जण आपल्यासाठी वा आपल्या कुटुंबासाठी त्याग, कष्ट, हालअपेष्टा इत्यादींची दुःखे झेलताना दिसतात ते का? अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी अपार हाल सोसले ते का? अनेकांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याचे आपण ऐकतो ते का?

वरील सर्व उदाहरणांत वरकरणी जरी ती व्यक्ती दुःखाकडे जीणीवपूर्वक धावली असे वाटत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही? एखादा गरीब मनुष्य आपल्या कुटुंबासाठी अपार कष्ट करतो. हे कष्ट करत असताना त्याचे लक्ष्य आपल्या कुटुंबाचा आनंद हे असते. आपल्या कुटुंबाच्या आनंदातच त्याचा वैयक्तीक आनंद सामावलेला असतो. अगदी हेच स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीतही म्हणता येईल. आपल्या मातृभूमीला पारतंत्र्यातून मोकळे करण्यात त्यांचा आनंद सामावलेला असतो. मनुष्य आत्महत्या का करतो? त्याला त्याची सद्यस्थिती अतिशय दुःखद वाटत असते. आयुष्याचा शेवट केल्यास या दुःखातून सुटका होईल असे त्याला वाटत असते. मृत्युनंतरची स्थिती ही सद्यस्थितीपेक्षा जास्त सुसह्य, जास्त आनंददायी असेल असे त्याला वाटत असते. म्हणजे तेथेही आनंदाचाच विचार असतो. 

काही जण असेही म्हणताना आढळतात की दुःख भोगणे हेच मानवी जीवनाचे नैसर्गिक उद्दिष्ट आहे. पण ते तितकेसे बरोबर नाही. जर दुःख भोगणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे तर मग माणूस त्यापासून पळ का काढतो? तेव्हा दुःखभोग ही नैसर्गिक प्रवृत्ती असणे शक्य नाही. असो. तात्पर्य हे की आपण सर्वजण शाश्वत आनंदासाठी धडपडत असतो.

आनंद हे आपल्या सर्वांचे उद्दिष्ट असुनही अनेकजण जीवनाला कंटाळलेले दिसतात. आनंद मिळवण्याचा प्रयत्न तर ते करतच असतात पण हवा तसा आनंद काही त्यांना मिळत नाही. पैसा, गाडी, बंगला, संसार, मुलंबाळं, प्रसिद्धी सर्व पायाशी लोळत असून देखील त्यात असमाधानी असलेली अनेक माणसे आपण बघतो. माणूस आनंद मिळवण्यासाठी आयुष्यभर धाव धाव धावतो. हा आनंद पैसा, नातीगोती, मानसन्मान, प्रसिद्धी इत्यादी मार्गांनी मिळेल असे त्याला वाटते. वरील गोष्टी तात्काळ आनंद देतात हे खरे पण हा आनंद तात्पुरता असतो. क्षणभंगूर असतो. तो काही काळ उपभोगता येतो आणि मग विरून जातो. मग माणूस परत आपली घोडदौड सुरू करतो. असे करता करता आयुष्याचा शेवट जवल येतो. माणसाला उपरती होते की आपण आजवर शाश्वत असे काहीच मिळवले नाही. मिळवलेल्या सर्व गोष्टी आल्या आणि गेल्या. पण खरा आनंद काही गवसला नाही. माणसाचे कोठे चुकते बरे? या प्रश्नाचे उत्तर त्याची चुकीची जीवनपद्धती असेच द्यावे लागेल. लक्षात घ्या. येथे मी जीवनपद्धती हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला आहे. साधारणतः जीवनपद्धती हा शब्द हा स्थुल अर्थाने वापरला जातो. खानपान, दैनंदीन जीवन इत्यादींची शैली म्हणजे जीवनपद्धती असा सामान्य अर्थ घेतला जातो. मला हा स्थुल अर्थ अभिप्रेत नाही. जीवनातील प्रत्येक गोष्ट- शारीरिक, मानसीक, बौद्धीक, भौतीक, सामाजीक, वैयक्तिक, पारिवारीक, आध्यात्मिक - करण्याची शैली आणि या गोष्टींविषयीचा दृष्टीकोन म्हणजे जीवनपद्धती असा व्यापक अर्थ मला अभिप्रेत आहे.       

माणसाची शाश्वत सुखाची आस ही काही नवी नाही. अनादी काळापासून माणूस त्या न संपणार्‍या आनंदाचा शोध घेत आला आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असलेली शास्त्रे, दर्शने, ग्रंथ इत्यादींमधून प्राचीन ऋषीमुनी, योगी, सन्यासी आणि विद्वानांनी चार मुख्य प्रश्न हाताळलेले दिसतात. ते चार प्रश्न असे -

  1. दुःखाचे वास्तविक स्वरूप काय आहे?
  2. दुःख कोठून उत्पन्न होते?
  3. दुःखाचा कायमस्वरूपी अभाव (अर्थात शाश्वत आनंद) असलेली स्थिती काय आहे?
  4. दुःखाचा कायमचा नायानाट क्सा करता येईल?

या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपापल्या पद्धतीने शोधली आणि आपापल्या भाषेत व्यक्त केली. त्यांनी आपल्यासाठी हा जो खजिना मागे ठेवला आहे त्यातूनच काही निवडक रत्ने ही लेखमाला प्रस्तूत करणार आहे. आशा आहे तुम्हाला त्यापासून लाभ होईल आणि जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला समजेल.  

This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape



Copyright (C) bipinjoshi.org. All rights reserved.
Contact Us
Read Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web