महादेव बाबा आणि गौरा माईने शिकवलेला समाधीचा पाढा
नवीन योग साधकांच्या मनात हमखास एक प्रश्न असतो की आपली साधना फलीभूत कधी होणार. मी साधकदशेत असतांना सुरवातीला मलासुद्धा हा प्रश्न पडला होता. एक दिवस संधी साधून मी महादेव बाबा आणि गौरा माईला विचारले की साधनात्मक योग क्रियांची अंतिम अवस्था समाधी असते असे मी वाचले आहे. ते खरं आहे का आणि मला तिथे पोहोचायला किती वेळ लागेल?
माझ्या प्रश्नांच्या उत्तरादाखल महादेव बाबांनी नेहमीच्या शांत पण धीरगंभीर स्वरात मला एक समीकरण शिकवले. मी त्याला "समाधीचा पाढा" असे म्हणतो. हा पाढा तुम्हाला कोणत्याही पुस्तकात अथवा ग्रंथांत सापडणार नाही. दूसरा कोणी तो तुम्हाला शिकवू शकणार नाही. आज मी तुम्हाला तो पाढा सांगणार आहे. नीट लक्ष द्या.
१. इष्टमंत्राचे परावाणीतील एक स्पंदन प्राणांच्या साक्षीने अनुभवल्यास एक अजपा गायत्री प्राणायाम होतो.
२. अशा बारा अजपा गायत्री प्राणायमांचा एक प्रत्याहार होतो.
३. अशा बारा प्रत्याहारांची एक अजपा गायत्री धारणा होते.
४. अशा बारा धारणांचे एक अजपा गायत्री ध्यान होते.
५. अशा बारा ध्यानांची एक अजपा गायत्री समाधी होते.
थोडक्यात सांगायचे तर...
१ प्राणायाम = परावाणीतील इष्टमंत्र + प्राण चेतना
१ प्रत्याहार = १२ प्राणायाम
१ धारणा = १२ प्रत्याहार
१ ध्यान = १२ धारणा
१ समाधी = १२ ध्यान
वरील पाढा सांगून महादेव बाबा काहीसे स्तब्ध झाले. मला वाटले "पाढा" संपला कारण पतंजलीच्या अष्टांग योगाचे शेवटचे अंग समाधी आहे. प्राणायाम ते समाधी अशी पाच अंगे पूर्ण झाली. हा पाढा ऐकून मी अवाक झालो होतो कारण आजवर वाचलेल्या कोणत्याही ग्रंथांत एवढ्या सुस्पष्टपणे अष्टांग योगातील पायऱ्यांचा परस्पर संबंध आणि गती मी पाहिली नव्हती. अजपा गायत्रीच्या अनुषंगाने तर अजिबातच नाही. मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मी काही बोलणार तोच महादेव बाबांनी गौरा माईकडे निर्देश केला. गौरा माईने नेहमीप्रमाणे डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत पुढचा पाढा सांगायला सुरवात केली...
गौरा माईने सांगितलेल्या पाढयातील पुढच्या पायऱ्या काही मी येथे आज देत नाही कारण त्या सर्वांनाच कळतील असे नाही. त्यामुळे हा "समाधीचा पाढा" येथेच थांबवतो. वर दिलेला समाधीचा पाढा पाठ होण्यास कोणाला किती काळ लागेल हे काही सांगता येत नाही. कोणाला काही वर्षे लागतील. कोणाला उभा जन्म घालवावा लागेल तर अजून कोणाला एकापेक्षा अधिक जन्म वाट पहावी लागेल. वरील पाढा ज्याला समजला आहे आणि ज्याने त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे अशा "पाढा पाठ झालेल्या" साधकाला अजपा गायत्री आणि योगमार्ग खऱ्या अर्थाने कळला असे म्हणायला हरकत नाही.
तुम्ही प्राणायामाची मोजदाद करण्यासाठी मात्रांचा उपयोग केला असेल किंवा वाचला असेल. काही वेळा डोळ्यांची पापणी उघडझाप करायला लागणारा वेळ मात्रा म्हणून दिला जातो. काही वेळा तीन टाळ्या वाजवण्यासाठी लागणारा वेळ सांगितला जातो. काही वेळा तीनदा टिचकी वाजवण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे मात्रा असे मानले जाते. हाताची करंगळी गुडघ्याभोवती तीन वेळा फिरविण्यास जितका कालावधी लागतो, तोही एक मात्रा समजला जातो. तर्जनी गुडघ्याभोवती फिरवून ती अंगठ्याने टिचकी वाजविण्यास जितका वेळ लागतो, तोही एक मात्रा मानला जातो. ओंकाराच्या साडेतीन मात्रा मानल्या जातात त्याचाही वापर काहीवेळा कालावधी मोजण्यासाठी करतात. तात्पर्य हे की मात्रा म्हणजे नक्की किती कालावधी याचे काही सुनिश्चित मोजमाप नाही.
महादेव बाबांनी मला या समाधीच्या पाढयासाठी वरील पाढयात मोजमापाचे जे परिमाण सांगितले आहे ते आहे — परावाणीतील इष्टमंत्राचा स्पंद. ही व्याख्या वाटते तेवढी सोपी नाही. हा कालावधी सुद्धा वर सांगितलेल्या सामान्य प्राणायामच्या मात्रेसारखाच अनिश्चित आहे. प्रत्येकाचा इष्ट मंत्र वेगळा. त्यांतील अक्षरे आणि अक्षरसंख्या भिन्न-भिन्न. प्रत्येकाची परावाणीची स्पंदन-गती अथवा फ्रिक्वेन्सी सुद्धा भिन्न. कित्येकजण मानसिक जपाच्या स्तरापर्यंतच कसेबसे पोहोचतात; परावाणी पर्यन्त पोहोचणे तर दूरची गोष्ट. त्यामुळे योगमार्गावर अनेक वर्ष घालवलेल्या मंडळींना सुद्धा ही व्याख्या गोंधळात आणि कोड्यात टाकेल. त्यामुळे आज फारसे खोलात जात नाही. पुन्हा कधीतरी विस्ताराने त्याविषयी सांगेन.
हा समाधीचा पाढा तुम्हाला सांगण्यामागे माझे उद्दिष्ट एवढेच आहे की एक अजपा गायत्रीची साधना तुम्हाला योगमार्गाच्या प्रथमपासून ते शेवटापर्यंतच्या प्रवासात आणि त्यानंतरही पुढे नेण्यास कशी सक्षम आहे ते कळावे.
असो.
शंभू महादेव आणि गिरिजा माई तुम्हा सर्वांना हा समाधीचा पाढा शिकण्यासाठी उद्युक्त करोत या शुभेच्छेसह लेखणीला येथेच विराम देतो.
© हा लेख कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे. लेखाची लिंक शेअर करू शकता परंतु कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण किंवा पुनर्प्रकाशन करण्यास परवानगी नाही.
प्रिय वाचकांनो,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या वेब साईटवर योग-अध्यात्म विषयक लेखन प्रकाशित करत आहोत. हे लेखन अन्यत्र वापरण्याची किंवा पुनर्मुद्रित करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून मूळ लेखकाचे नाव व स्रोत न देता प्रकाशित केले आहे. काहींनी तर ते स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे—हे साहित्यचौर्य निंदनीय आणि खेदजनक आहे. भारतीय कायदा योग्य वेळी कार्य करेलच, पण आम्ही आमच्या सुजाण वाचकांना विनंती करतो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रकाशित होण्याचे एकमेव अधिकृत माध्यम आहे.
धन्यवाद.
— वेब टीम