Untitled 1
भाग 6 : कुंडलिनी जागृती
पहाटे तीन वाजता उठलो. स्नान करून साधनेला बसलो. आज साधनेत एक आगळाच उत्साह
ओसंडत होता. साधना आटपून नाश्ताही न करता दर्शनासाठी बाहेर पडलो. हवा अगदी सुखद
होती. चहावाले, फुलवाले व फेरिवाले मांडामांड करत होते. मंदीरात पोहोचल्यावर हायसे
वाटले कारण गर्दी फार कमी होती. चपला देवेळाबाहेरच काढून रांगेत उभा राहीलो. रांग
जसजशी पुढे सरकत होती तसतशी भक्ती उचंबळून येत होती. आज प्रथमच भक्तीने अंत:करण
एवढे चिंब झालेले मी अनुभवत होतो. काल या जागेविषयी वाटलेली आपुलकी आणि आजची ही
उचंबळणारी भक्ती. माझेच मला आश्चर्य वाटले.
करता करता रांग संपली. पुजारी पुजाकरण्यात, फुले-धूप सारखे करण्यात मग्न होते.
त्र्यंबकेश्वरचे शिवलिंग सामान्य शिवलिंगांपेक्षा वेगळे आहे. ते खोलगट असुन तीन
पायर्यांनी बनलेले आहे. या तीन पाय़र्या म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश ही
त्रिमूर्ती असे मानले जाते. गर्दी कमी असल्याने डोळे भरून दर्शन घेता आले. या
मंदिरात दर्शनासाठी काही विशिष्ठ दिवसांखेरीज गाभार्यात जाऊ देत नाहीत. तेव्हा
बाहेरूनच गाभार्याच्या उंबरठयावर डोके ठेवले. एक क्षण शंकराची सर्वांगसुंदर मुर्ती
डोळ्यासमोर तरळली. दुसर्याच क्षणी एक प्रचंड विजेचा लोळ माझ्या पाठीतून डोक्याकडे उठला. त्या
अनपेक्षीत धक्क्याने मी जवळजवळ कोलमडलोच. केवळ पायर्यांचा आधार असल्याने पडलो नाही
इतकच. मन केव्हाच सुन्न झाले होते. शरिरभर झिणझिण्या पसरल्या होत्या. डोळ्यासमोर
शेकडो सूर्य चमकल्यासारखा प्रकाश पसरला होता. काय होतय ते कळतच नव्हते. "चला! चला
लवकर" कोणीतरी खेकसले. कसातरी स्वत:ला सावरत मी बाजूला झालो. माझी अवस्था
कोणाला कळणार नाही इतपत काळजी घेत मंदिराच्या दुसर्या दाराने बाहेर पडलो.
मंदिराच्या आवारातच एक कुंड आहे, बर्यापैकी मोकळी जागा आहे. थोडा आडोसा बघून मी
जमिनीवरच फतकल मारली. काही काळाने चित्त थोडे थार्यावर आले. आजवर केवळ पुस्तकात
वाचलेली आणि ऐकलेली 'कुंडलिनी जागृती' आपण अनुभवत आहोत हे एंव्हाना कळून चुकले
होते. होणार्या गोष्टी चांगल्या आहेत वा नाहीत हे मात्र कळत नव्हते. किंबहुना त्या
विचाराला आता काही अर्थही उरला नव्हता. "लॉज गाठायला हवा" मनात विचार आला. तसाच
धडपडत उठलो, अंगात पुन्हापुन्हा खेळू पाहाणारी विज कशीतरी दाबून धरली व परतीच्या
वाटेला लागलो. सर्व गोष्टी त्या प्रकाशाने वेढलेल्या दिसत होत्या. जणूकाही सारे जग
त्या प्रकाशातूनच जन्माला आले होते. समजा एखाद्या पाण्याच्या भांड्यात दोन चेंडू
टाकले आहेत. ते चेंडू जरी स्वत:चे वेगळे अस्तित्व राखून असले तरी एकाच पाण्याने ते
एकमेकांशी जणू जोडलेले असतात. अगदी तशाच प्रकारची जाणीव तो प्रकाश पाहतांना होत
होती. तो प्रकाश जणू सार्या जगाला जोडणारा समान दुवा होता. सारे जग जणू त्या दैवी
प्रकाशात तरंगत होते. कसातरी लॉज गाठला. थरथरत्या हातांनी कुलुप उघडले. दार मागे
ढकलून कडी सरकावली. अंगात अजिबात त्राण नव्हते. आता पर्य़ंत कसातरी दाबून धरलेला
विजेचा प्रवाह मोकळा सोडत स्वत:ला बिछान्यावर झोकून दिले.
~~~~~~
कुंडलिनी जागृतीचे अनेक मार्ग़ आहेत. त्यापैकी काही महत्वाचे मार्ग खालील
प्रमाणे:
- मंत्रयोग
- हठयोग
- लययोग
- राजयोग
- क्रियायोग
- भक्तीयोग
- तांत्रिक साधना
- शक्तिपात
वरीलपैकी कोणत्याही मार्गाने कुंडलिनी जागृत होत असली तरी प्रत्येक मार्गाची
स्वत:ची अशी काही वैशिष्ठे आहेत. त्याचप्रमाणे त्यांत समान दुवेही आहेत. वरीलपैकी
कोणताही एक मार्ग निवडताना त्या विषयी पूर्ण माहीती करून घ्यावी असे आवर्जून
सांगावेसे वाटते. अन्यथा कालांतराने "हा मार्ग नको तोच बरा" अशी स्थिती होण्याची
शक्यता आहे. इथे अर्थातच या सर्वांची इत्यंभूत माहीती देणे शक्य नाही. तरीही एक
तोंडओळख म्हणून थोडा परिचय देत आहे.
मंत्रयोग
मनन करणार्याला तारुन नेतो करतो तो मंत्र. भारतीय माणसाला मंत्र म्हणजे काय हे
निराळे सांगण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन पुजाअर्चांमधेही अनेक मंत्रांचा समावेश
असतो. मंत्र साधारणत: वैदीक, उपनैषदीक, पौराणिक आणि तांत्रीक अशा प्रकारे विभागले
जातात. मंत्रयोगामध्ये कोणत्याही एका मंत्राचा हजारो लाखो वेळा जप केला जातो.
मंत्राचे प्रत्येक उच्चारण मनात एक विशिष्ठ स्पंदन उमटवत असते. अशा हजारो लाखो
स्पंदनांमुळे मनाचा पोत बदलतो. ते क्रमश: धारणा-ध्यान-समाधी या त्रिपुटी मधून जाऊ
लागते. मंत्रयोग हा कुंडलिनी जागृत करण्याचा त्यामानाने संथ पण सुरक्षित मार्ग आहे.
ज्यांना उपास्याविषयी भक्ती आहे व ज्यांना कुंडलिनी जागृतीचे संभाव्य धोके नको आहेत
त्यांच्यासाठी हा मार्ग चांगला आहे. मंत्र हा गुरूने दिलेला असावा. स्वत:च तो निवडू
नये कारण मंत्र निवडण्याचेही एक शास्त्र आहे. कोणालाही कोणताही मंत्र उपयोगी पडत
नाही. निवड चुकल्यास त्रासच होण्याची शक्यता अधिक. विशेषत: तांत्रीक मंत्रांच्या
बाबतीत जास्त काळजी घ्यावी.
हठयोग
चंद्र आणि सूर्य अर्थात इडा-पिंगळा, प्राण-अपान यांचे एक्य करणारा तो हठयोग.
हठयोगात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा व ध्यान यांवर भर असतो. विशेषत: कुंभक व
बंधयुक्त प्राणायाम हा हठयोगाचा अविभाज्य घटक आहे. या अभ्यासाने कुंडलिनी फार लवकर
जागृत होते. पण अशी जागृत झालेली कुंडलिनी बर्याचदा तीव्र स्वरुपाची असते. जागी
झालेली शक्ती हाताळण्यास कठीण असते. आहार-विहाराचेही काटेकोर पालन साधकाला करावे
लागते. हठयोग हा सर्वांसाठी नाही. ज्यांना या मार्गातील गुरू भेटला आहे, ज्यांची
त्याची सर्व अंगे काटेकोरपणे अभ्यासण्याची तयारी आहे त्यांनीच हा मार्ग चोखाळावा.
लययोग
मनाचा लय करण्याचा अभ्यास म्हणजे लययोग. षण्मुखी मुद्रेद्वारे नादश्रवण करणे हा
लययोगाचा महत्वाचा अभ्यास आहे. श्रीशंकराने सांगितलेल्या मनोलयाच्या सव्वालाख
साधनांपैकी षण्मुखी मुद्रा ही एक. सुषुम्नांतर्गत अनाहत ध्वनी एकणे म्हणजे
नादश्रवण. अनाहत म्हणजे दोन वस्तू एकमेकांवर आपटल्याशिवायच होणारा ध्वनी. हा मार्ग
मंद व सुरक्षित स्वरूपाचा आहे. ज्यांचे मन थोडे ताब्यात आलेले आहे व ज्यांना
संगीताविषयी आवड आहे त्यांना हा मार्ग जास्त लवकर साध्य होतो. लययोगाने जागृत
झालेली कुंडलिनी शरिरावर फारसे तीव्र परिणाम करत नाही. हे जागरण
बर्याचसंशी सुखकारक असते.
राजयोग
योगांचा राजा तो राजयोग. राजयोग हा शुद्ध ध्यानमार्ग आहे. परंतु फारच थोडे लोक
मनावर ताबा ठेऊ शकतात. त्यामुळे बहुतेकांना सुरवातीपासूनच हा मार्ग चोखाळणे कठीण
जाते. सगूणध्यान, निर्गूणध्यान, प्रकाशध्यान, ॐ कार ध्यान अशा कितीतरी साधनांचा
राजयोगामधे समावेश होतो. राजयोगाने कुंडलिनी जागृत होण्यास बहुतेकांना खुप वेळ
लागतो कारण साधकाचा बराचसा वेळ बेलगाम मनाला वेसण घालण्यात वाया जातो. कुंडलिनी
जागरणा नंतर राजयोगाचा अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे करता येतो.
क्रियायोग
निरनिराळ्या श्वास व ध्यान प्रक्रियांचा अथवा क्रियांचा अभ्यास म्हणजे
क्रियायोग. बर्याचदा साधक हठयोग आणि क्रियायोग यांमधे गल्ल्त करताना आढळतात.
क्रियायोगामधे आसनांचा व शुद्धीक्रियांचा (धौती, नेती, बस्ती इत्यादी) विशेष समावेश
नसतो. बंध-मुद्रा ह्याही हठयोगासारख्या तीव्र स्वरूपात केल्या जात नाहीत. हठयोग
प्रदिपीका, हठरत्नावली, घेरंड संहीता हे हठयोगाचे ग्रंथ आहेत तर शिवसंहीता,
योगशिखोपनिषद, योगचूडामणी उपनिषद हे क्रियायोगाचे वा कुंडलिनी योगाचे ग्रंथ आहेत.
क्रियायोग हे नाव परमहंस योगानंद, योगीराज श्यामचरण लाहीरी, परमहंस सत्यानंद
सरस्वती यांसारख्या प्रभूतींमुळे प्रसिद्ध पावले आहे. क्रियायोगामधे मंत्र, हठ, लय
व राज या चारही योगांचा उत्तम मेळ घातलेला आढळतो. क्रियायोगाने जागृत झालेली
कुंडलिनी ही मध्यम तीव्रतेची असते. जागरणा नंतरचे परिणाम साधकाच्या आवाक्यातले
असतात. त्यामुळे आजच्या काळात क्रियायोग हा हठयोगाला चांगला पर्याय आहे.
भक्तीयोग
तीव्र भक्तीनेही कुंडलिनी जागृत होऊ शकते. परंतु फारच कमी साधकांकडे अशी तीव्र
भक्ती असते. भक्तीने जागृत झालेली कुंडलिनी मंद व सुखद स्वरुपात परिणाम
करते. आनंदाने डोळ्यात अश्रु उभे राहणे, शरिराला भक्तीने कंप सुटणे, अंगावर रोमांच
उभे राहणे अशी लक्षणे दिसतात. तुम्ही कुंडलिनी जागृतीचा कोणताही मार्ग़
अवलंबा भक्ती त्यासाठी पोषकच ठरते. आपल्या उपास्य दैवताचे पूजन, भजन, किर्तन, श्रवण
या मार्गातून भक्ती वाढण्यास मदत होते.
तांत्रीक साधना
तंत्रशास्त्र हे एक उपेक्षीत व गैरसमजांच्या जंजाळात गुरफटलेले शास्त्र आहे.
केवळ काही वाममार्गी साधकांमूळे तंत्रशास्त्र म्हणजे जादूटोणा, जारण-मारण, भोगवाद
असा चुकीचा समज झाला आहे. अती गूढतेमुळे बर्याच तंत्र साधना लोप पावल्या आहेत वा
विकृत झाल्या आहेत. ज्यांनी तंत्रशास्त्राचे ग्रंथ अभ्यासले आहेत त्यांना माहीत
असेल की नाथ संप्रदायचे मूळ हे शैव तंत्रशास्त्रात आहे. म्हणूनच गोरक्षनाथांसारख्या
विभूतींनी आपल्या ग्रंथांमधे जागोजगी तंत्र ग्रंथांचा उल्लेख केला आहे. असो.
सांगण्याचा मुद्दा असा की तांत्रीक साधनांनीही कुंडलिनी जागृत करता येते.
तांत्रीक दिक्षेद्वारा अत्यंत शीघ्रगतीने शक्ती जागृत होते. तंत्रशास्त्रात असे
वारंवार म्हटले आहे की कुंडलिनी जागृत झाल्या शिवाय कितीही जप केला तरी तो व्यर्थ
आहे. आज तांत्रीक गुरू मिळणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यामूळे हा मार्ग
सर्वांसाठी नाही. या मार्गाचे नियमही कडक आहेत. तेव्हा सामान्य साधकाने योग्य
गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय या मार्गावर जाऊ नये हे बरे.
शक्तिपात
शक्तीपात म्हणजे गुरूच्या कृपेने शिष्याची कुंडलिनी जागृत होणे. शक्तिपाताचे
महत्व तंत्रशास्त्रातात व पुराणांतही जागोजाग पहावयास मिळते. शक्तीपातामधे
गुरू स्पर्शाने, दृष्टीक्षेपाने वा केवळ मानसीक संकल्पाने शिष्याची निद्रीस्त
कुंडलिनी जागृत करतो. अर्थातच असा गुरूही विरळाच असतो.
शक्तीपातानंतर साधक आपोआप आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा करू लागतो (या
क्रिया का होतात हे नंतर सांगणारच आहे). शक्तीपात परंपरेमधे साधारणत: तीन विचारधारा
आढळतात:
- शिष्याची पात्रता बघून त्याला शक्तीपात देणे अथवा न देणे
- शिष्याची पात्रता असली वा नसली तरी त्याला शक्तीपात देणे
- शिष्याला शक्तीपातासाठी पात्र बनवून मग त्याला शक्तीपात देणे
शक्तीपातासंबंधी एक चुकीचा समज असा असतो की शक्तीपात मिळाला की सर्व झाले. हे
निखालस चुकीचे आहे. कुंडलिनी जागृती ही आध्यात्मिक जीवनाची केवळ सुरवात असते शेवट
नव्हे. शक्तीपाताने कुंडलिनी जागृत होते हे खरे पण ती जागृत ठेवणे व तीला
योग्य मार्गाने सहस्रारापर्यंत पोहचवणे यासाठी साधकाचे प्रयत्न लागतातच.
आज शिष्याची पात्रता असली वा नसली तरी त्याला शक्तीपात देणारे गुरू जास्त आढळतात.
इतर गुरू परंपरांशी स्पर्धा, आपला शिष्यसमुदाय वाढवणे, प्रसिद्धी मिळवणे हे यामागचे
हेतू असू शकतात. याचा परिणाम असा होतो की शक्तीपात मिळालेल्यां शंभर साधकांपैकी
केवळ बोटावर मोजण्या एवढेच साधक उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचू शकतात. बाकीच्यांचे
अनुभव सुरवातीला होणार्या काही उत्स्फुर्त क्रियांबरोबरच संपतात. कित्येक त्या
क्रियांनाच आध्यात्मिक लक्ष मानून आपले हात आकाशाला पोहचल्यासारखे वागू लागतात.
शक्ती जशी जागृत होते तशी ती पुन्हा निद्रिस्तही होऊ शकते. तात्पर्य हे की
तुम्हाला जर शिष्याला शक्तीपातासाठी पात्र बनवून मग शक्तीपात देणारा व
शक्तीपातानंतरही शिष्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारा गुरू भेटला तर जरूर त्याला
शरण जा.
तुम्ही मार्ग कोणताही निवडा जर तुमची प्रामाणीक व अथक़ प्रयत्न करण्याची तयारी
असेल तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
(क्रमश:)
जर इच्छा असेल तर
आपण आमच्या
Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा
Email address आम्हाला
Contact Us Page द्वारे
पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला
Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना,
ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य
सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा
प्रयत्नात मदत करणार्या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.
|
About the Author
|
|
Bipin Joshi |
|
You can read more about the author here. |
|