गोरक्ष शतकातील पंचमहाभूत धारणा विधी
गोरक्ष शतकात आतापर्यंत गोरक्षनाथ महाराजांनी आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या अंगां विषयी आपल्याला विवेचन केले आहे. आता त्या पुढे जाऊन धारणा या महत्वाच्या पायरी विषयी जाणून घेण्याची वेळ आली आहे. धारणा ही प्रत्याहार आणि ध्यान यांच्या मधली स्थिति आहे. ही ध्यानाच्या आधीची अवस्था असली तरी ती अत्यंत महत्वाची आहे. धारणा अवस्था न साधता ध्यानावस्था साधणे कठीण आहे.
धारणा म्हणजेच मनाची एकाग्रता साधणे. धारणा साधण्यासाठी मनाला एक ठिकाणी स्थिर करणे आवश्यक आहे. धारणा साधण्यासाठी अनेक उपाय आहेत. गोरक्ष शतकात भगवान गोरक्षनाथांनी पंचमहाभूत धारणा विधी विषयी विवेचन केले आहे. गोरक्षनाथांनी वर्णन केलेला धारणा विधी हा काही एकमेव विधी नाही. अन्य योगग्रंथांमध्ये वेगेवेगळे धारणा विधी आपल्याला पाहायला मिळतात. गोरक्षनाथांचा विधी हा मानसिक एकाग्रतेचा एक विशिष्ठ प्रकार आहे. या विधीच्या खोलात जाण्यापूर्वी या प्रकारच्या धारणेची काही पार्श्वभूमी तुम्हाला असणे आवश्यक आहे. ही पार्श्वभूमी गोरक्ष शतकात दिलेली नाही कारण शंभर श्लोकांत गोरक्षनाथांना ग्रंथाचा समग्र विषय मांडायचा आहे. तुमच्यापैकी बरेच वाचक कदाचित ध्यानमार्गावर नवीन असतील आणि या पार्श्वभूमी बद्दल अनभिज्ञ असतील. त्यांच्यासाठी म्हणून येथे ही पार्श्वभूमी थोडक्यात निरूपण करत आहे.
मानवी देह हा पंचमहाभूतांनी अर्थात पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश यांनी बनलेला आहे. पंचमहाभूतांपासून मानव पिंड बनण्याची जी प्रक्रिया आहे तिला पंचीकरण असे म्हणतात. मागे एका लेखात मी त्या विषयी विस्ताराने लिहिले आहे त्यामुळे येथे पुनरावृत्ति करत नाही. केवळ मानव पिंडच पंचमहाभूतांनी बनलेला असतो असे नाही तर आपल्या आजूबाजूच्या जवळजवळ सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी या पंचमहाभूतांपासूनच बनलेल्या असतात.
पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्व हे सर्वात जड आणि स्थूल आहे. पृथ्वी तत्व तुमच्या देहाचा आकार, ठेवण आणि स्थिरता यांवर अंमल गाजवते. हाडे, दांत, स्नायू, त्वचा, केस, नखे, मांस, मेद आणि मल यांसारख्या गोष्टी पृथ्वी तत्वा पासून बनतात. व्यक्तिमत्वातील स्थिरता, धैर्य, सहनशक्ती, आत्मविश्वास आणि दृढनिश्चय यांवरही पृथ्वी तत्वाचा प्रभाव असतो.
जल तत्व मानव पिंडातील सर्व द्रव गोष्टींचे प्रतिनिधित्व करते. रक्त, लाळ, घाम, कफ, श्लेष्मा, पाचकरस, लघवी आणि वीर्य यांसारख्या द्रव गोष्टी जल तत्वाच्या प्रभावाखाली असतात. व्यक्तिमत्वातील संवेदनशीलता, भावुकता, प्रेम, करुणा आणि सहानुभूती यांवरही जल तत्वाचा प्रभाव असतो.
अग्नि तत्व मानव पिंडातील उष्णता, उर्जा आणि चयापचय यांचे प्रतिनिधित्व करते. अग्नि तत्वामुळेच शरीरातील अन्नाचे पचन होते आणि शरीराला आवश्यक असलेली उर्जा मिळते. शरीराचे आणि शरीर आवायवांचे तेज अग्नितत्वावर अवलंबून असते. हार्मोन्सचे कार्य आणि वैचारिक स्पष्टता सुद्धा अग्नीच्या प्रभावाखाली असते. व्यक्तिमत्वातील उत्साह, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, विवेक, आक्रमकता आणि कार्यक्षमता यांवरही अग्नि तत्वाचा प्रभाव असतो.
वायु तत्व मानव पिंडातील गती, हालचाल आणि श्वसन यांचे प्रतिनिधित्व करते. वायु तत्वामुळेच शरीरातील रक्ताभिसरण, श्वसन आणि स्नायूंची हालचाल होते. वायु तत्वामुळेच शरीरातील उर्जा प्रवाह नियंत्रित राहतो. एवढेच नाही तर मनातील विचारांची गती आणि मनाची एकूणच चंचलता वायु तत्वावर अवलंबून असते. व्यक्तिमत्वातील लवचिकता, चपळता, उत्साह, साहस आणि सृजनशीलता यांवरही वायु तत्वाचा प्रभाव असतो.
आकाश तत्व मानव पिंडातील पोकळी, शून्य आणि अंतर यांचे प्रतिनिधित्व करते. आकाश तत्वामुळेच शरीरातील अवयवांना जागा मिळते आणि त्यांच्यातील संबंध साधला जातो. वाणी, बुद्धी, चित्त यांवर सुद्धा आकाश तत्वाचा अंमल चालतो. आकाश तत्वामुळेच मनाला विचार करण्याची, कल्पना करण्याची आणि सृजनशीलतेची क्षमता मिळते. व्यक्तिमत्वातील शांतता, समर्पण, चित्ताची स्तब्धता आणि आध्यात्मिकता यांवरही आकाश तत्वाचा प्रभाव असतो.
तुम्ही जर पंचमहाभूतांचे वरील विवरण वाचले तर तुम्हाला असे लक्षात येईल की तुमच्या केवळ जड देहाशीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमतवाशी त्यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात काही बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी त्या बदलाशी संबंधित तत्वा मध्ये फेरफार करावा लागेल. हा फेरफार करण्यासाठी तुमचा त्या तत्वावर ताबा चालायला हवा आणि हा ताबा मिळवण्यासाठी तुम्हाला त्या तत्वाशी संबंधित धारणा विधीचा उपयोग करावा लागेल. पंचमहाभूतांचा आणि धारणेचा संबंध हा असा आहे.
पंचमहाभूतांचा संबंध केवळ जड देहाशीच आहे असं नाही तर तो कुंडलिनी चक्र प्रणालीतील खालील पांच चक्रांशी सुद्धा आहे. पृथ्वी तत्वाचा संबंध मूलाधार चक्राशी, जल तत्वाचा संबंध स्वाधिष्ठान चक्राशी, अग्नि तत्वाचा संबंध मणिपूर चक्राशी, वायु तत्वाचा संबंध अनाहत चक्राशी आणि आकाश तत्वाचा संबंध विशुद्ध चक्राशी आहे. या पाचही चक्रांमध्ये धारणा विधीचा उपयोग करून तुम्ही त्या त्या चक्रांशी संबंधित पंचमहाभूतांवर ताबा मिळवू शकता. गोरक्ष शतकात गोरक्षनाथ महाराजांनी जो धारणा विधी दिलेला आहे तो मात्र थोडा भिन्न आहे. त्यांनी चक्रांपेक्षा तत्वांना अधिक महत्व दिलेले आहे आणि तत्वधारणा करण्यासाठी खालील विधी सांगितला आहे —
हृदये पञ्चभूतानां धारणाश्च पृथक् पृथक् ।
मनसो निश्चलत्वेन धारणा च विधीयते ॥
याचा अर्थ असा की — हृदयात पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाचही तत्वांची धारणा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. मनाला निश्चल करून त्या त्या तत्वाची धारणा केली जाते.
वरील गोरक्ष वचनाचा अर्थ थोडा व्यापकपणे समजून घ्यायला हवा. कुंडलिनी आणि चक्र प्रणाली नुसार मानवी मनाचे स्थान आहे अनाहत चक्र आणि अनाहत चक्राचे स्थूल शरीरातील क्षेत्र आहे हृदय किंवा छातीचा भाग. येथे हृदय या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. येथे हृदय म्हणजे मनाची एकाग्रता जिथे साधली जाईल असे शरीरांतर्गत अथवा चिदाकाशातील स्थान. गोरक्षनाथ म्हणतात की या स्थानी मनाला निश्चल करून, स्तब्ध करून, शांत करून त्या त्या तत्वाची धारणा करावी. पुढे आता ते आपल्याला प्रत्येक तत्वाची धारणा करण्यासाठी कोणते चिन्ह, दृश्य, आकृति अथवा विग्रह वापरावे ते सांगतील. लेखमालेच्या पुढील भागात श्रीगुरुमंडलाच्या कृपेने मी ते सादर करीन.
तूर्तास येथेच थांबतो.
पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार यांच्या पलिकडे निवांत विश्रांती घेणारा आत्मा ज्या शिवतत्वाचा अंश आहे ते शाश्वत शिवतत्व सर्व योगसाधकांना ब्रह्ममार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
© हा लेख कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे. लेखाची लिंक शेअर करू शकता परंतु कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण किंवा पुनर्प्रकाशन करण्यास परवानगी नाही.
प्रिय वाचकांनो,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या वेब साईटवर योग-अध्यात्म विषयक लेखन प्रकाशित करत आहोत. हे लेखन अन्यत्र वापरण्याची किंवा पुनर्मुद्रित करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून मूळ लेखकाचे नाव व स्रोत न देता प्रकाशित केले आहे. काहींनी तर ते स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे—हे साहित्यचौर्य निंदनीय आणि खेदजनक आहे. भारतीय कायदा योग्य वेळी कार्य करेलच, पण आम्ही आमच्या सुजाण वाचकांना विनंती करतो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रकाशित होण्याचे एकमेव अधिकृत माध्यम आहे.
धन्यवाद.
— वेब टीम