HyperLink HyperLink
Search Blog
See All Tags

RSS Feed
RSS Feed
AddThis Feed Button
Bookmark and Share





Visit blogadda.com to discover Indian blogs


प्रथम स्पंद: योगाधिकारी वर्णन

हे जगद्गुरो शंकरा! तु दयेचा सागर आहेस. या जगतातील झाडाचे पानही तुझ्या इच्छेशिवाय हलत नाही. तू पंचवक्त्र आहेस. तुझी पाच वदने म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि तंत्रशास्त्र होत. तू वेदांत, योग, आयुर्वेद, संगीत, कला, नाट्य यांचा प्रणेता आहेस. तुच या जगाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहेस. आता लवकर प्रसन्न हो आणि तुझ्या या सेवकावर कृपावृष्टी कर. मी योगसूत्रांवर भाष्य करण्याचे धाडस करत आहे. पण तुझ्या आशिर्वादाशिवाय हे कसे घडेल? तेव्हा सत्वर मजवर करुणा कर आणि मला हे भाष्य लिहिण्यची शक्ती दे.

माझी प्रार्थना एकून देवाधिदेव श्रीशंकर प्रसन्न झाला. म्हणाला, "अरे तू का बरे काळजी करत आहेस. तुला हे भाष्य लिहिण्याची प्रेरणा मीच दिली आहे. तेव्हा हे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारीही माझीच आहे. तु केवळ निमित्तमात्र हो. मीच तुझ्या हस्ते हे भाष्य लिहून घेईन. मीच मानवाच्या कल्याणार्थ योगशास्त्र प्रसृत केले. सर्व प्रथम मी ते गिरीजेला प्रदान केले. त्या नंतर पिढ्यानपिढ्या ते चालत आलेले आहे. पतंजलि मुनींनी हे शास्त्र काळाच्या ओघात नष्ट होऊ नये म्हणून सूत्रबद्ध करून ठेवले. तेच आता तू प्राकृतात सांग." देवांचे बोलणे एकून संतोष तर झाला पण मनी एक शंका आली. मी विचारले, "अनेक दिग्गजांनी योगसूत्रांवर भाष्य लिहिले आहे. मी त्यावर काय बोलावे? कशा प्रकारे विवरण करावे?" माझ्या या प्रश्नावर देव स्मितहास्य करत म्हणाले, "अरे हे काय बोलतोस! अनेकांनी त्यावर भाष्ये केली आहेत हे खरे पण प्रत्येकाची विवरण पद्धती वेगवेगळी आहे. ज्या प्रमाणे दोन कवींची एकाच सुन्दर गोष्टीवरील काव्यरचना वेगवेगळ्या प्रकारची असते त्या प्रमाणेच हे आहे. तु विवरण असे कर की ते सामान्य साधकांनाही सुलभ व्हावे. नाना प्रकारचे योगमार्ग शेवटी माझ्यापर्यंतच येतात हे त्यांना समजावून सांग. माझी प्राप्ती कोरड्या बुद्धीने वा तर्काने होत नसून योगयुक्त भक्तीने होते हे तत्व त्यांच्या मनी ठसव. तुझे निरूपण शिवभक्ती वाढवणारे असुदे. त्याच बरोबर ते अचुक आणि स्वानुभवाधिष्ठीत असावे. तेव्हा कोणतीही शंका मनी न ठेवता कार्याला लाग. मी आहेच."

श्रीशंकराला वन्दन करून, त्यांच्याच चरणांशी बसून आता मी योगसूत्रांचे विवरण करीन. प्रत्येक सूत्रातील गुढार्थ मी सुलभ भाषेत प्रकट करीन. या भाष्याच्या केवळ वाचनाने वा श्रवणाने पापे जळून भस्म होतील. मग त्याच्या आचरणाने केवढा लाभ होईल हे वेगळे सांगणेच नको. तेव्हा आता तुमचे सर्व लक्ष इकडे द्या आणि हे योगामृत प्राशन करायला तयार व्हा.

प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी काही पात्रता लागते हे तुम्हाला माहितच आहे. तेव्हा योगशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणते गुण अंगी बाणवणे गरजेचे आहे ते प्रथम पाहुया.

श्रीशंकरानी शिवसंहितेमधे सहा गुण कथन केले आहेत जे योगमार्गावर मार्गक्रमण करु इच्छिणार्‍या प्रत्येक साधकाच्या अंगी असणे गरजेचे आहे. ते सहा गुण असे आहेत -

  1. योगशास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला मुक्ती मिळेलच असा दृढ विश्वास असणे
  2. गुरूप्रदत्त साधने विषयी ओतप्रोत श्रद्धा असणे
  3. आपल्या गुरूविषयी भक्ती असणे आणि गुरूची सेवा करणे
  4. आयुष्यात घडणार्‍या गोष्टींविषयी समत्व भाव असणे            
  5. इंद्रियांवर ताबा असणे
  6. योग्य आहार करणे

ज्या प्रमाणे आडरानातील पडक्या घरात भुते नाहीत असा विश्वास होत नाही तोपर्यंत तेथे निवांत झोप येत नाही त्याच प्रमाणे योगमार्गच आपल्याला संसार सागरातून पार नेऊ शकतो असा विश्वास असल्या शिवाय तो आचरण्याचे बळ कसे मिळणार?

योगमार्गावर गुरू आपल्याला दिपस्तंभाप्रमाणे वाट दाखवतात. त्यांच्या शिकवणीवर श्रद्धा नसेल तर योगमार्ग काटेरी भासेल. ज्या प्रमाणे एखादा रोगी एका वैद्याच्या उपचारांवर श्रद्धा न ठेवता दहा वैद्यांचे दरवाजे ठोठावतो त्या प्रमाणे गुरूप्रदत्त साधेनवर विश्वास नसणारा योगमार्गावर भरकटतो. तेव्हा 'एकदा हे एकदा ते' असे करू नये.

गुरू माते प्रमाणे आपले बोट धरून आपल्याला योगमार्गावरून चालवतात. त्यांच्या विषयी आदर आणि भक्ती प्रत्येक शिष्याने ठेवलीच पाहिजे. काही साधक 'मी गुरू दक्षिणेच्या मोबदल्यात योगशिक्षण विकत घेतले आहे' असा भाव ठेवतात. असे करण्यात मोठा दोष आहे. गुरूच्या शिकवणीचे मुल्य कशानेही करता येत नाही. ज्या शिकवणीच्या आधारे तुम्ही जन्म-मृत्यूच्या बंधनातून कायमचे सुटणार आहात त्याच्या विषयी भक्ती न ठेवण्याचा कृतघ्नपणा केवळ पशूच करू शकतो.

मानवी आयुष्य हे सुखदुःखरुपी लाकडांची एकत्र बांधलेली मोळी आहे. सुख आणि दुःख हे दोन्हीही कायमचे टिकत नाहीत. तेव्हा त्यात मश्गुल होण्यात काय अर्थ आहे? ज्या प्रमाणे आईवडिल आपल्या सर्व मुलांना सारखेच प्रेम देण्याचा प्रयत्न करतात त्या प्रमाणे सुख आणि दुःख सारखेच मानण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे केल्या खेरीज साधनेत मन लागणार नाही. मन सारखे आवडणार्‍या गोष्टी मिळवण्यात आणि नावडणार्‍या गोष्टी टाळण्यातच गर्क राहील.

इंद्रिये महाबळकट असतात. सारखी आपल्याला विषयांशी जखडून ठेवायला बघत असतात. त्यांवर ताबा मिळवण्यास शिकले पाहिजे. एकीकडे योग शिकायचा आणि दुसरीकडे भोगांविषयी आस्था ठेवायची. अशाने योग साध्य होणार नाही. वैराग्य अंगी बाणवण्यासाठी इंद्रिय संयम ही मुलभूत पायरी आहे.  

अंधार्‍या खोलीत शंभर दीप जरी लावले पण जर सोसाट्याचा वारा असेल तर खोलीत प्रकाश पडणार नाही कारण वार्‍याने सर्व दिवे विझून जातील. अगदी तसेच आहाराच्या बाबतीतही म्हणता येईल. बाकीचे सर्व गुण जरी अंगी बाणवले पण जर आहार योग्य नसेल तर ते गुण फुकट जातात. योग्य आहार म्हणजे काय? जो आहार सात्वीक आहे आणि शरिराचे पोषण करण्यास समर्थ आहे तो आहार योग्य होय. कांदा, लसूण, मद्य, मांस असे पदार्थ खावू नयेत. ते तमोगुणाची वृद्धी करतात परिणामी योगसाधनेला मारक आहेत. आहार कीती घ्यावा? याबाबतीत आयुर्वेदाचे सांगणे एकावे. आपल्या उदराचे चार भाग कल्पावे. त्यांपैकी दोन भाग अन्नाने भरावे. एक पाण्याने भरावा आणि उरलेला एक वायूसाठी मोकळा ठेवावा. अति आहारामुळे अन्न पचन करण्यात शारीरिक उर्जा वाया जाते, व्याधी निर्माण होतात, ध्यानाला बसल्यावर झोप येते, ध्यानही नीट लागत नाही. 

वरील सहा गुण अंगी बाणवल्या शिवाय योगसिद्धी कधीही होऊ शकणार नाही हे शिववचन आहे. ते कधीही खोटे ठरणार नाही. ज्या प्रमाणे सूर्य पश्चिमेला उगवला असे कधी होत नाही त्याच प्रमाणे या गुणांच्या अभावी योग साधला असे होणे शक्य नाही.

॥प्रथम स्पंद समाप्त॥

This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape



Copyright (C) bipinjoshi.org. All rights reserved.
Contact Us
Read Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web