RSS Feed
RSS Feed
Search
AddThis Feed Button
Bookmark and Share




Visit blogadda.com to discover Indian blogs

marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator


Untitled 1

स्पंद दुसरा: योगव्याख्या विवरण

मागील स्पंदात आपण योगाधिकारी शिष्याचे गुण पाहिले. आता या स्पंदात योग म्हणजे काय ते पाहू.

अथ योगानिशासनम् ॥1॥

अर्थ - आता योगशास्त्र आरंभिले जात आहे.

शिवसंहितेमधे भगवान शंकरानी योगशास्त्राचे महत्व विशद केले आले. संसारचक्रातून सुटण्याचे अनेकविध उपाय सांगण्यात आले आहेत. मुक्तीकरता कोणी सत्याची प्रशंसा करतात तर कोणी तप आणि शौच यांची. कोणीकोणी क्षमा तर कोणीकोणी शम यांची प्रशंसा करतात.  त्याच प्रमाणे कोणी श्राद्ध तर्पणादी क्रियांची प्रशंसा करतात. कोणी वेदोक्त काम्य कर्मांची उपासना श्रेष्ठ मानतात. कोणी वैराग्याला पर्याय नाही असे म्हणतात. काही विद्वान एकच आत्मा अनेक बनला आहे असे सांगतात. काही असे म्हणतात की जे इंद्रियांना जाणता येते तेच काय ते खरे! अजून काही पंडीत शून्यवादाचा मार्ग सुचवतात तर अजून काही पुरुष आणि प्रकृति मतात गुरफटलेले असतात. परमात्म्यापासून विन्मुख असलेले हे मताग्रही आपापल्या बुद्धीनुसार आणि ऐकीव ज्ञानानुसार या जगात येजा करत असतात. ज्याला जाणल्यावर सर्व काही निश्चितपणे ज्ञात होते अशा गोष्टीसाठीच परिश्रम करणे योग्य नव्हे काय?  ज्यांनी मागील स्पंदात वर्णन केलेले गुण अंगी बाणवले आहेते त्यांच्यासाठी श्रीशंकराने प्रचलित केलेले योगशास्त्रच मुक्तीसाठी योग्य साधन आहे. अन्य काही नाही. हेच शिववचन आहे. ते कधी खोटे ठरणार नाही.

श्रीशंकराने प्रचलित केलेला योगमार्ग चार प्रकारचा आहे. मंत्र, हठ, लय आणि राज हे ते चार योगमार्ग. यांपैकी कोणत्याची एका अथवा अनेक मार्गांचा अवलंब करून साधक या संसारबंधनातून मुक्त होतो. योगशिखा उपनिषदात या चार योगमार्गांचे सुंदर वर्णन केले आहे. मंत्रयोगात गुरूप्रदत्त मंत्राचा भक्तीपूर्वक अंतःकरणाने जप केला जातो. हठयोगात शुद्धीक्रिया, आसने, प्राणायाम, बंद्ध, मुद्रा यांच्या अभ्यासाने चन्द्र आणि सूर्य नाड्यांचे एकीकरण करावयाचे असते. लययोगात तत्वांचा लय करत करत शेवटी शिवतत्व गाठायचे असते. राजयोग हा शुद्ध ध्यानमार्ग आहे ज्यामधे धारणा-ध्यान-समाधी या त्रिपुटीतून मन परमात्यापर्यंत पोहोचते. या चारही योगांमधे एक समान दुवा आहे. तो दुवा म्हणजे प्राण आणि अपान यांचे सामरस्य. ज्याप्रमाणे नदी, विहीर, तलाव यांमधील पाण्याला 'पाणी' असेच म्हणतात त्याचप्रमाणे मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग यांच्या अभ्यासाने जे प्राप्त होते त्याला 'योग' असे म्हणतात.

योगश्चित्तवृत्तिनिरोधः ॥2॥

अर्थ - योग म्हणजे चित्ताच्या वृतींचा निरोध होय.

चित्त म्हणजे काय? मन, बुद्धी आणि अहंकार यांचा समुच्चय म्हणजे चित्त. मन भावभावनांचे माहेरघर आहे. कामक्रोधादी भावना तेथेच निर्माण होतात. ज्ञानेंद्रियांनी वाहून आणलेले संदेश घेऊन त्यांवर प्रतिक्रिया देणे हेही मनाचेच कार्य. मन उत्फुर्तपणे कार्य करते. बुद्धी मनापेक्षा शहाणी आहे. स्मृतीतील गोष्टी तपासून ती एखादी गोष्ट चांगली की वाईट हे ठरवते. अहंकार म्हणजे मी पणाची जाणीव. 'हे माझे, मी म्हणजे अमुक' असे विचार हे अहंकाराचेच काम.

चित्त कसे असते? वार्‍यापेक्षा चपळ, आकाशापेक्षाही तलम. कधी इकडे तर कधी तिकडे. एकवेळ आकाशाला सामावून घेईल असे वस्त्र निर्माण करता येईल पण चिताला स्थिर ठेवणे कठीण आहे. एकवेळ समुद्राच्या लाटा अडवून त्याला शांत करता येईल पण चित्ताला अचल ठेवणे कठीण आहे. एकवेळ अग्नि जाळणे विसरेल पण चित्त एकाजागी स्थिर राहणे कठीण.

अशा या मरूतवेगाने धावणार्‍या चित्तात उठणार्‍या वृत्तींचा निरोध करणे त्यांना रोखणे म्हणजे योग. चित्तात वृती का उठतात? तम-रज-सत्व गुण त्याला कारणीभूत आहेत. जडता, कार्य व प्रकाश हे अनुक्रमे त्यांचे स्थायीभाव आहेत. त्रिगुणांच्या प्रभावाखाली आल्यामुळे चित्तात विचार उठतात.  या विचारांना प्रतिबंध करणे म्हणजेच योग.

तदा द्रष्टुः स्वरूपेSवस्थानम् ॥3॥

अर्थ - जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध होतो तेव्हा द्रष्टा (आत्मा) स्वतःच्या रूपात स्थित होतो.

वृत्तिसारूप्यमितरत्र ॥4॥

अर्थ - अन्यथा तो चित्तवृत्तींशी एकरूप पावतो.

चित्तवृत्तींचा निरोध का करावा? ज्याप्रमाणे मडक्यातील पाणी काढून घेतल्यावर ते आपोआपच हवेने भरून जाते त्याचप्रमाणे चित्तातील वृत्ती काढून घेतल्यावर ते आपोआप परमात्म्याच्या प्रकाशाने भरून जाते. यालाच जीव आणि शिव यांचे एक्य असे म्हणतात.

काच ज्या ज्या रंगाच्या पृष्ठभागावर ठेवली जाते त्या त्या रंगाची दिसते. पण जर ती हवेत धरली तर पारदर्शक आहे हे कळते. त्याचप्रमाणे आत्मा ज्या ज्या चित्तवृतींच्या सान्निध्यात येतो त्या त्या वृत्तींशी एकरूप झाल्याने स्वतःचे रूप विसरतो. जर चित्तवृत्ती नाहीशा झाल्या तर आत्मा स्वतःच्या खर्‍या रूपात स्थानापन्न होतो.

या स्पंदात योगव्याख्या स्पष्ट केल्यावर आता पुढच्या स्पंदात आपण चित्तात उठणार्‍या वृत्ती कोणत्या ते समजावून घेणार आहोत. 

॥दुसरा स्पंद समाप्त॥

This page is protected by copyright laws. Copying in any form is strictly prohibited. For Copyright notice and legal terms of use click here.

Protected by Copyscape




Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.
Contact Us
Read Terms Of Use
Windows Server Hosting by ORCS Web