Untitled 1
भाग 5 : त्र्यंबकेश्वरला दाखल
राजिनामा तर दिला. आता पुढे काय? एरवी चुटकीसरशी सरणारा दिवस आता आ वासून उभा
होता. पहिले काही दिवस काहीच केले नाही. मनाला जरा विश्रांती दिली. त्यानंतर असे
ठरवले की ज्योतिर्लिंगांना भेट द्यायची. या भेटी मागे माझे दोन हेतू होते. एक
म्हणजे साधु, संन्यासी, बैरागी, योगी यांच्या जीवनाबद्दल असलेले कुतुहल शमवणे. अशा
धार्मिक ठिकाणी त्यांच्याशी भेटता-बोलता येईल अशी माझी समजुत होती. दुसरे म्हणजे
जरी मी माझ्या साधनेवर समाधानी असलो तरी एखाद्या अनुभवी साधकाला वा तज्ञाला माझी
साधना दाखवावी, आपल्यासारखेच अनुभव त्यालाही आलेत का ते पहावे असे वाटत होते. सुरवात अर्थातच महाराष्ट्रापासून करायची असे ठरवले.
त्र्यंबकेश्वर व भिमाशंकर यापैकी जाण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर जास्त सोयीचे
वाटले. तेंव्हा शुभारंभ त्र्यंबकेश्वर पासूनच करायचा असे ठरले. किती दिवस लागतील?
पुढे कुठे व कसे जायचे? या प्रश्नांची उत्तरे माहित नव्हती. प्रवास मोठा होण्याची
शक्यता असल्याने तयारी साठी दहा-पंधरा दिवस द्यावेत असे ठरवले.
या दहा-पंधरा दिवसांच्या काळात प्रवासाच्या तयारी बरोबरच शरिर-मनाचीही तयारी
केली. आता परत कधी येईन हे माहित नव्हते तेंव्हा काही मित्रांच्या भेटी घेतल्या.
उगाच गवगवा नको म्हणून त्यांना नोकरी सोडल्याचे वगैरे सांगितले नाही. अशाच एका
संघ्याकाळची गोष्ट. काही मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो. करियर प्लानिंग, घराचे
कर्ज, लग्न, सेटल होणे या विषयां भोवती त्यांच्या गप्पा घोटाळत होत्या. मला त्यात
काहीसुद्धा रस नव्हता. तरी पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून गप्पांत भाग घेतल्या
सारखे दाखवत होतो. काही काळाने एकाला माझे लक्ष नाही हे कळलेच. मला बक़ेबळे गप्पांत
ओढण्यासाठी तो म्हणाला - "काय कॉंप्युटर (मी संगणक प्रेमी असल्याने काही मित्र मला
कॉंप्युटर म्हणत असत)! पुढे काय ठरवलेय? काय प्लॅन आहे पाच-सात वर्षांचा?" मी
तंद्रितच होतो. "मला योगी व्हायचेय" उत्सुर्तपणे शब्द बाहेर पडले. त्यांच्या
डोळ्यातील "काय चक्रम आहे" हा भाव मला कळत होता. फार वेळ मी बसू शकलो नाही. काही
कामाचे निमित्त सांगून मी त्यांचा निरोप घेतला. मनात विचार आला - आयुष्यात
प्रत्येकजण काही ध्येय उराशी घेऊन धावत असतो. माझे ध्येय इतरांच्या ध्येयाशी विसंगत असले
म्हणून काय झाले. परमेश्वराची इच्छा असेल तर मी माझ्या ध्येयापर्यंत नक्कीच
पोहोचीन.
करता करता त्र्यंबकेश्वरला जायचा दिवस उजाडला. सकाळची बस होती. प्रवासात मुद्दाम
झोपलो जेणेकरुन विचारांचे वादळ घोंगावनार नाही. गडी
नाशिकला पोहोचली. एका छोट्याशा हॉटेलमधे सुप व सॅलड खाल्ले. बाहेरचे अरबट चरबट
खाण्यापेकक्षा हे बरे असा विचार केला. त्यानंतर दुसर्या बसने त्र्यंबकेश्वर गाठले.
वाटेत अंजनेय पर्वताचे ओझरते दर्शन झाले. गोरक्षनाथांच्या गोष्टी आठवल्या.
त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर एका अनामिक भावनेने भरून आल्यासारखे वाटले. या जागेशी
माझा पूर्वसंबंध आहे का? प्रथम दर्शनातच ही जागा एव्हढी आपलीशी का वाटतेय? मनाशीच
आश्चर्य करत लॉज शोधण्याच्या मागे लागलो. फारशी अडचण आली नाही पण त्यानंतरचा
संध्याकाळपर्यंतचा वेळ सेटल होण्यात व थोड्या विश्रांतीत गेला.
पाण्याच्या बाटल्या,
संध्याकाळचे जेवण इत्यादींची सोय केल्यावर बाजारातून एक फेरफटका मारला. धार्मिक
सामानांनी भरलेली अनेक दुकाने होती. भक्तांचा तोटा नव्हता. भारतातल्या कोणत्याही
तीर्थक्षेत्रात गर्दी नाही असे कधीच नसते. मंदिरात डोकावले तर ही भलीमोठी रांग.
त्याक्षणी रांगेत उभे राहण्याची उर्जा वाटेना. चौकशी केल्यावर कळले की पहाटेपहाटे
गर्दी जरा कमी असते. तेव्हा दुसर्या दिवशी पहाटे दर्शन घ्यायचे ठरवले. उद्या
नेहमीपेक्षा लवकर उठावे लागणार असा विचार करत लॉज गाठला. लॉजवाल्याशी घासाघीस करून
सकाळी लवकर गरम पाणी मिळावे अशी व्यवस्था केली. आजची संध्याकाळची साधना या
गडबडीत राहीली होती. ती आटपली व दिवा घालवला. उद्या येणारा दिवस माझ्या आयुष्यातील
सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक असणार होता याची पुसटशीही कल्पना त्यावेळी नव्हती.
~~~~~~
नवख्या साधकांना असा प्रश्न पडतो की योगशास्त्रात असणार्या असंख्य साधनांपैकी
कोणत्या निवडाव्यात. साधनांची योग्य निवड अतिशय महत्वाची आहे. केवळ दुसरा करतो
म्हणून किंवा पुस्तकात वाचून निवडलेल्या साधना तुम्हाला उपयोगी पडतीलच असे नाही.
प्रत्येकाची शारिरीक व मानसीक बैठक वेगवेगळी असते. त्यामुळे सर्वांसाठीच साच्यातून
साधना निवडणे कठीण आहे. तरी देखील एक अंदाज येण्याकरता काही महत्वाचे मुद्दे खाली
देत आहे.
योग-वेदांता शास्त्रांत शरिर-मनाची विभागणी पंचकोषांमधे केलेली आहे. अन्नमय कोष,
प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष हे ते पाच कोष. तुमची साधना
(सुरवातीच्या काळात तरी) अशी असली पाहिजे की जी ह्या पाचही कोषांना व्यायाम आणि
पोषण देईल. मी या वेब साईटद्वारे ज्या सात साधनांची शिफारस करतो त्या अशाच
काळजीपूर्वक निवडलेल्या आहेत (या सांत पैकी सहा साधना या वेब साईटवरच कोणालाही
उपलब्ध आहेत. सातवी साधना - आत्मदर्शन क्रिया - ही केवळ माझ्या योगवर्गामधे सहभागी
होणार्या साधकांना शिकवली जाते). जर तुम्ही कुंडलिनी जागृती साठी योग साधना करत असाल तर तुमच्या
साधनेद्वारे खालील गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत.
- नाडी शोधन
- प्राण प्रालब्य
- चक्र व भूत शुद्धी
- सुषुम्ना मोकळी होणे
- कुंडलिनी जागरण व आरोहण
- ध्यानाची परिपक्वता
मी असे साधक पाहिलेत की जे केवळ योगासनेच करतात अथवा प्राणायामच करतात वा फक्त
ध्यानच करतात. ते फारसे बरोबर नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर प्राणायामाचे देता
येईल. बर्याचदा प्राणायामाने कुंडलिनी जागृत होते असे कोठेतरी वाचून साधक सर्व
प्रकारचे प्राणायाम करतात. त्याची गरज नाही. शितली आणि सित्कारी याकामी कमी उपयोगी
आहेत. कुंडलिनी जागृतीसाठी सर्वात महत्वाचा प्राणायाम म्हणजे नाडीशोधन क्रिया. पण
त्याचा अतिरेक करू नका. तुमची प्राणायामाची साधना ऋतुमानानुसार लवचिक असु द्या.
उन्हाळ्यात नाडीशोधन क्रिया कमी प्रमाणात करा. गरज भासल्यास शितली वा सित्कारी
सारखे थंडावा देणारे प्राणायाम करा. हिवाळ्यात नाडीशोधन वाढवू शकता व शितली
वा सित्कारी बंद करू शकता. पण हे सर्व काळजीपूर्वक करा.
आसनांचेही असेच आहे. उगाच भारंभार आसने करू नका. आसने अशी निवडा की जी पाठीच्या
कण्याला पुढे, मागे व दोन्ही बाजूंना व्यायाम देतील. कमीतकमी बारा सुर्यनमस्कार
अवश्य घाला. त्याने रक्ताभिसरण सुधारते, दुषित पदार्थ बाहेर टाकले जातात. मुख्य
म्हणजे त्याने दोन्ही स्वर सारखे वाहू लागतात. बरेच साधक तक्रार करतात की नाडीशोधन
क्रिया करतांना त्यांची एक नाकपुडी नेहमी बंद असते. सुर्यनमस्कार घातल्यावर दोन्ही
स्वर समान वाहू लागतील व प्राणायाम सुकर होईल.
आता ध्यानाचा विचार करू. मला काही असे साधक भेटतात की जे सुरवातीपासूनच
निर्गुणध्यान करू पहातात. असे साधक बर्याच
वेळेला ध्यान साधण्यात अपयशी ठरतात. ही चुक करू नका. वार्यासारख्या वाहणार्या
मनाला काबूत आणण्यासाठी बर्याच युक्त्या वापराव्या लागतात. प्रथम त्राटक, जप, सगुण
ध्यान करा. त्यानंतर ॐ सारखे एखादे प्रतीक घ्या. शेवटी निर्गुण ध्यान घ्या. हे सर्व
लक्षात घेता मला आत्मदर्शन क्रिये सारखी संपूर्ण ध्यान पद्धती अतिशय महत्वाची
वाटते. आत्मदर्शन क्रियेविषयी यथावकाश लिहीनच.
"आम्ही बरीच वर्षे साधना केली पण काहीच फायदा झाला नाही" ही एक नेहमीची तक्रार.
या तक्रारीचे मूळ चुकीच्या आहार-विहारात दडलेले असते. विशेषत: कुंडलिनी योगसाधनेत
आहाराला अतिशय महत्व आहे. आहार असा असावा की जो पोषण देईल फाजील पोषण नव्हे!
ठरलेल्यावेळी ठरलेल्या प्रमाणात आहार घ्या. विशेषत: जर
तुम्ही प्राणायामावर भर देत असाल तर आहाराकडे बारकाईने लक्ष द्या. प्राण हा वायूच
आहे. शुष्कता आणणे हा वायूचा गुणधर्मच आहे. तेंव्हा भरपुर पाणी प्या. घरी बनवलेल्या
साजुक तूपाचा (वनस्पती तूपाचा नव्हे!) वापर वाढवा. मसालेदार पदार्थ टाळा. याशिवाय
उष्णता अधिक होते आहे असे वाटल्यास सकाळी जलबस्ती (एनिमा) घ्या. त्याने
आतड्यांमधील अतिरीक्त उष्णता नाहीशी होण्यास मदत होते.
यम-नियमांचे पालन हे साधनेचेच एक अंग आहे. अनेकजण यम-नियम पाळतात तर खरे पण ओझे
बाळगल्यासारखे किंवा कोणीतरी सक्ती केल्यासारखे. बर्याच नवीन साधकांकडून होणारी
चूक म्हणजे पहिल्या दिवसांपासून यम-नियमांच्या बाबतीत टोकाची भुमिका घेणे. बहुतांशी
साधकांचे मन सांगत असते की एखादी गोष्ट करावी पण यम-नियम सांगत असतात की ती गोष्ट
करू नये. या मानसिक द्वंद्वातच त्यांची बरीच शक्ती वाया जाते. एक व्यावहारीक उदाहरण
देतो. वजन कमी करू इच्छिणार्या लोकांकडूनही डाएटच्या (आहार नियमन) बाबतीत अशीच चुक
होते. मन सांगते खा आणि बुध्दी सांगते खाऊ नका. एका ठरावीक मर्यादे पर्यंत त्यांची
बुद्धी जिंकते पण एक क्षण असा येतो की मन बुद्धीचे सांगणे झुगारून देते व परत येरे
मागल्या चालू होते. या मानसिक पराभवा नंतर एक प्रकारचे नैराश्य येते, चिडचिड होते,
चुकल्याची भावना निर्माण होते. हे टाळता येऊ शकते. लक्षात घ्या तुमचा स्वभाव काही
एका दिवसात बनत नाही. तसाच तो एका दिवसात बदलतही नाही. तसा प्रयत्नही करू नका.
प्रथम आपल्या व्यक्तिमत्वातील दोष खुलेपणाने शोधा आणि मान्य करा. त्यानंतर एक एक
दोष घेऊन त्यांवर उपाययोजना करा. अशा प्रकारचा बदल हा कायमस्वरूपी असेल. एकदा हा
बदल झाला की नैसर्गिकरित्या तो तुमच्या स्वभावात ठसून जाईल.
(क्रमश:)
जर इच्छा असेल तर
आपण आमच्या
Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा
Email address आम्हाला
Contact Us Page द्वारे
पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला
Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना,
ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य
सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा
प्रयत्नात मदत करणार्या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.
|
About the Author
|
|
Bipin Joshi |
|
You can read more about the author here. |
|