विशुद्धी चक्रात अमृतपान करणारा जीवात्मा अमरत्व प्राप्त करतो
लेखमालेच्या मागील भागात आपण सहस्रार चक्रातून स्रवणारी अमृतधारा आणि तिचा उपभोग घेणारे चंद्र आणि सूर्य यांच्याविषयी जाणून घेतले. गुरुमुखातून विपरीत करणी मुद्रा जाणून घेतल्यावर योगी सूर्य वर आणि चंद्र खाली अशी स्थिती साधतो. या उलट स्थितीत अमृतधारेचा प्रवाह सुद्धा उलट दिशेने वाहू लागतो. त्यानंतर पुढे काय घडते ते आता गोरक्ष महाराज आपल्याला सांगत आहेत.
विपरीत करणी मुद्रेच्या अभ्यासाने काय होते तर —
त्रिधा बद्धो वृषो यत्र रौरवीति महास्वनम् ।
अनाहतं च तच् चक्रं हृदये योगिनो विदुः ॥
अनाहतमतिक्रम्य चाक्रम्य मणिपूरकम् ।
प्राप्ते प्राणं महापद्मं योगित्वममृतायते ॥
ज्या प्रमाणे दोरखंडाचे तीन वेढे देऊन बांधलेला बैल पराधीन झाल्यामुळे ओरडतो, त्या प्रमाणे त्रिगुणांनी बद्ध असलेला जीव परा-पश्यंती-मध्यमा या वाणीक्रमाने हृदय स्थानी नाद करू लागतो. या स्थानाला योगीजन अनाहत चक्र म्हणतात. जेंव्हा प्राण नाभी स्थानीचे मणिपूर चक्र आणि हृदय स्थानीचे अनाहत चक्र ओलांडून सहस्रार चक्रात पोहोचतो तेंव्हा योगी अमर बनतो.
वरील श्लोक जरा नीट समजून घ्या. एखाद्या नाठाळ बैलाला वठणीवर आणण्यासाठी त्याच्या नाकात वेसण घातली जाते. वेसण घातलेला बैल त्या बंधनामुळे अगतिक आणि त्रस्त होऊन ओरडू लागतो. येथे गोरक्षनाथांनी जीवाची तुलना त्या बद्ध बैलाशी केलेली आहे. जीवाला खरंतर स्वातंत्र्य हवं असतं, स्वैर वाटचाल हवी असते. प्रकृती अथवा निसर्ग त्याला तसं वागू देत नाही. प्रकृती जीवाला त्रिगुणांनी बद्ध करून टाकते. सत्व-रज-तम या गुणांच्या भक्कम दोरखंडात जीव जखडला जातो. आद्याशक्ती भगवती पिंडामध्ये वाणी स्वरूपाने वास करत असते. ही वाणी बाह्य जगतात एकदम प्रकट होत नाही. ती टप्प्याटप्प्याने परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी अशी क्रमशः बहिर्गामी बनते. अजपा ध्यानामध्ये ही वाणीच दशविध अनाहत नादाच्या रूपाने प्रकट होते. अनाहत नादाचे प्राकट्य स्थान आहे अनाहत चक्र. अजपा जपाच्या आणि ध्यान योगाच्या सहाय्याने जेंव्हा अधोमुखी कुंडलिनी शक्ती उर्ध्वगामी बनते तेंव्हा ती मूलाधार, स्वाधिष्ठान,मणिपूर, अनाहत या मार्गाने थेट सहस्रार चक्रात पोहोचते. तेथेच "अमृताचे तळे" असल्याने जीव अमर होतो असे गोरक्षनाथ म्हणतात. येथे संकेत केलेले अमरत्व हे स्थूल, जड, भौतिक अर्थाने घ्यायचे नाही तर आध्यात्मिक आणि यौगिक अर्थाने घ्यायचे आहे.
प्राण आणि कुंडलिनी सहस्राराकडे जात असताना त्यांच्या प्रवासात एक महत्वाचा टप्पा लागतो तो म्हणजे —
विशब्दः संस्मृतो हंसो निर्मलः शुद्ध उच्यते ।
अतः कण्ठे विशुद्धाख्ये चक्रं चक्रविदो विदुः ॥
विशुद्धे परमे चक्रे धृत्वा सोमकलाजलम् ।
मासेन न क्षयं याति वञ्चयित्वा मुखं रवेः ॥
वि या शब्दाने हंसाकडे निर्देश केला आहे आणि शुद्ध या शब्दाने निर्मलतेकडे संकेत केला आहे. अशाप्रकारे चक्र जाणणारे कंठ स्थानीच्या चक्राला विशुद्धी असे म्हणतात. चंद्रामृताला सूर्याच्या मुखात जाण्यापासून रोखून त्याला विशुद्धी चक्रात धारण करून योगी अमृताचा होणारा ह्रास एका महिन्याच्या आत टाळू शकतो.
अनेक लेखांमध्ये आपण "हंस" म्हणजे काय आणि अजपा गायत्रीशी त्याचा संबंध कसां आहे ते जाणून घेतले आहे त्यामुळे त्या विषयात येथे पुन्हा शिरत नाही. येथे महत्वाचा भाग हा आहे कि गुरूने शिकवलेल्या विपरीत करणी मुद्रेचा अभ्यास करून योगी सूर्य वर आणि चंद्र खाली अशा अवस्थेत येतो तेंव्हा सामान्यतः मणिपूर चक्रातील सूर्यात प्रवेश करणारी अमृतधारा उलट दिशेने वाहाते. मणिपूर, अनाहत ओलांडून ती आता कंठातील विशुद्धी चक्रात येते. विशुद्धी चक्राची देवता आहे जीव अथवा जीवात्मा. कोणत्याही अन्न पदार्थाचे अथवा द्रव प्राशनाचे शारीरिक कार्य विशुद्धीच्या क्षेत्रातच घडत असते. त्यामुळे हा जीवात्मा आता या अमृताचे पान करत असतो. हा जीवात्माच तो "तिसरा" होय. अमृत हे अमरत्व प्रदान करते अशी मान्यता असल्याने तो "तिसरा" अजर-अमर होतो असे गोरक्षनाथ म्हणतात. मागील लेखातील प्रत्याहाराच्या व्याखेची उकल येथे पूर्ण होते.
विपरीत करणी मधील अमृतापानाचा विधी अधिक प्रभावी करण्याचा मार्ग आता गोरक्ष महाराज सांगत आहेत. तो असा —
सम्पीड्य रसनाग्रेण राजदन्तबिलं महत् ।
ध्यात्वामृतमयीं देवीं षण्मासेन कविर्भवेत् ॥
अमृतापूर्णदेहस्य योगिनो द्वित्रिवत्सरात् ।
ऊर्ध्वं प्रवर्तते रेतोऽप्यणिमादिगुणोदयः ॥
योग्याने जिभेच्या अग्राने राजदंताच्या छिद्राला पीडा द्यावी. अमृतमय अशा देवीचे ध्यान करावे. असे केल्याने सहा महिन्यात कवित्वाची प्राप्ती होते. जेंव्हा दोन-तीन वर्षांच्या अभ्यासाने योग्याचा देह अमृताने पूर्ण भरतो तेंव्हा त्याला ऊर्ध्वरेतावस्था प्राप्त होते आणि अणिमादी महासिद्धींचा लाभ घडून येतो.
येथे गोरक्षनाथांनी दुहेरी अमृतपान सांगितले आहे. विपरीत करणी द्वारे अमृतपान तर करायचेच आहे पण त्या जोडीला खेचरी मुद्रेच्या सहाय्याने सुद्धा अमृतपान करायचे आहे. येथे खेचरी मुद्रा असा स्पष्ट शब्द जरी गोरक्षनाथांनी वापरलेला नसला तरी जिभेने राजदंताच्या छिद्रात दाब द्यावा या संकेतावरून ते स्पष्ट आहे. मी या आधी खेचरी मुद्रे विषयी काही लेख लिहिले आहेत ज्यामध्ये राजदंत म्हणजे काय आणि खेचरीसाठी काय काय करावे लागते त्याचां विस्ताराने उहापोह मी केलेला आहे. विस्तारभयास्त्व येथे पुनरावृत्ती करत नाही.
गोरक्षनाथांनी ज्या अन्य दोन-तीन गोष्टींकडे संकेत केला आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. पहिले म्हणजे खेचरी करत असताना त्यांनी एका अमृतमय देवीचे ध्यान करायला सांगितले आहे. हा विषय गुरुगम्य आहे. मला माझ्या श्रीगुरुमंडलाने जसे ध्यान सांगितले तसेच्या-तसे ते अन्य कोणाला लागू होईल असे नाही. विषयाच्या गोपानियतेमुळे येथे त्याविषयी अधिक काही सांगत नाही. या ध्यानाचे फळ आहे कवित्वाची प्राप्ती. कुंडलिनी जागृत झालेल्या आणि उच्च स्तरावर पोहोचलेल्या साधकांमध्ये लेखन कला, साहित्य निर्मिती, कवित्व, वक्तृत्व वगैरे गुण बहरायला लागतात. सगळ्याच साधकांमध्ये असे होत नाही पण इडा नाडी आणि कुंडलिनी शक्ती यांचा एक विशिष्ठ संयोग जुळून आला तर असे गुण आपसूक विकसित होतात. इतकेच नाही तर या गुणांच्या अभिव्यक्तीमध्ये काहीतरी विलक्षण असे दैवी सामर्थ्य आढळून येते.
अमृतपानामुळे योग्याच्या शरीरातील अमृताची मात्रा वाढली की तो वीर्यवान बनतो. त्याला ऊर्ध्वरेतावस्था प्राप्त होते. तो ब्रह्मचर्य सहज सांभाळू शकतो. कौलमार्गी मछिन्द्रनाथांचे शिष्य असलेले गोरक्षनाथ स्वतः मात्र ब्रह्मचर्याचे पुरस्कर्ते होते. संत ज्ञानेश्वरांनी गोरक्षनाथांना "विषय-विध्वंसक-वीरू" अशी उपाधी दिलेली आहे. कुंडलिनी योग प्रणालीतील बिंदू, अमृत, वीर्य आणि ब्रह्मचर्य यांचा अन्योन्य घनिष्ठ संबंध आहे. योगसाधकाणे तो नीट समजून घ्यावा. मूलतः चंचल असलेली शक्ती अधोगामी पटकन होते. तिला ऊर्ध्वगमन करण्यास प्रवृत्त हा साधनेचा महत्वाचा भाग असतो. येथे "यम-नियम" फार उपयोगी पडत्तात.
अमृतपान करता करता देह अमृतमय झाला की योग्याला अष्टमहासिद्धींची प्राप्ती होते असे गोरक्ष महाराज सांगतात. स्वतः गोरक्षनाथ अशा सिद्धींचे जणू भांडार होते. या अष्टमहासिद्धी कोणत्या तर — अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व.
सिद्धी हा एक खूप मोठा विषय आहे. श्रीगुरुमंडलाने परवानगी दिली तर कधीतरी त्या विषयी एक लेखमाला करण्याचा विचार आहे. येथे तूर्तास एवढेच सांगतो की सिद्धींची प्राप्ती चार प्रमुख मार्गांनी होते — जन्म, मंत्र, औषधी आणि योग.
काही योग्यांना पूर्वजन्मींच्या सुकृताच्या आधाराने जन्मतः किंवा अल्पवयात, अल्पावधीत आणि अल्पश्रमात सिद्धींची प्राप्ती होते. अशा योग्यांना "जन्मसिद्ध" म्हणतात. एखाद्या मंत्राच्या सहायाने देवी-देवताना प्रसन्न करून त्यांच्या कडून सिद्धीची प्राप्ती करून घेणे म्हणजे मंत्रसिद्धी. सध्याच्या काळात या प्रकारचीच सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सिद्धी इच्छुक साधक करत असतात. त्यातही ढोबळ मानाने वैदिक मंत्र, तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र असे पोटभेद आहेत. पारद विज्ञान, रसायने आणि जडी-बुटी यांचा वापर करून मिळवलेली सिद्धी म्हणजे औषधीसिद्धी. जुन्या काळी दक्षिणे कडील सिद्ध औषधी पद्धती या साठी विशेष प्रसिद्ध होती. मलमुत्राचे रुपांतर सोन्यात करणे, एखादी गुटिका अथवा जडी-बुटी मुखात धरून अदृश्य होणे, एखाद्या झाडाच्या पाना-फुलांचा रस अंगाला लावून काठीण्य प्राप्त करणे वगैरे सिद्धी या प्रकारात मोडतात.
या तीनही प्रकारच्या सिद्धीं पेक्षा योगाभ्यासाद्वारे मिळणाऱ्या सिद्धीची विशेषता अधिक आहे. सगळेच जण काही जन्मसिद्ध असत नाहीत. मंत्राद्वारे मिळवलेली सिद्धी हमखास आध्यात्मिक प्रगतीत बाधा आणि विक्षेप उत्पन्न करते. ती क्षीण अथवा लुप्त सुद्धा होऊ शकते. औषधी सिद्धी स्थळ-काल-उपलब्धता यांवर अवलंबून असते. योगसिद्धी मात्र योग्याला त्याच्या साधनेचा एक टप्पा म्हणून मिळालेली असते. येथे गोरक्षनाथ ज्या अणिमादी सिद्धींकडे संकेत करत आहेत त्या योग्याला त्याच्या योग साधनेमुळे प्राप्त झालेल्या असतात. आजच्या काळात असे योगसिद्ध महात्मे जरी अत्यंत दुर्मिळ असले तरी योगमार्गाची विशेषता अधोरेखित करण्यासाठी हा संकेत पुरेसा आहे. सिद्धींत - मग ती कोणत्याही प्रकारे मिळालेली असो - स्वतःला गुरफटू दिले की आत्मसाक्षात्कार दुरावतो. परमेश्वर प्राप्तीत अडथळा येतो. याच साठी सर्व संत-सत्पुरुष त्यांच्या अनुयायांना सिद्धींच्या मागे लागू नका अन्यथा मागाहून पश्चात्ताप करण्याची वेळ येईल असे कडकपणे सुनावतात.
गोरक्ष शतकातील प्रत्याहार प्रकरणाचा शेवट करताना गोरक्षनाथ म्हणतात —
इन्धनानि यथा वह्निस्तैलवर्ति च दीपकः ।
तथा सोमकलापूर्णं देही देहं न मुञ्चति ॥
ज्या प्रमाणे अग्नी इंधनाला सोडत नाही अथवा अग्नी तेलात भिजलेल्या दिव्याचा वातीला सोडत नाही त्या प्रमाणे जीवात्मा चंद्रामृताने भरलेला देह सोडत नाही अर्थात तो अजर-अमर होतो.
जाता जाता एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे वरील श्लोकांत गोरक्षनाथांनी दिलेली काळाची मोजमापे - सहा महिने, दोन-तीन वर्षे वगैरे - ही आजच्या काळातील नाहीत. आजच्या जीवनशैलीचा विचार करता बहुतेक साधकांना सफलता मिळण्यासाठी या पेक्षा बराच अधिक कालावधी लागू शकतो. प्रत्याहार साधनेचे विवरण केल्यानंतर पुढे काय करायचे तर —
आसनेन समायुक्तः प्राणायामेन संयुतः ।
प्रत्याहारेण संयुक्तो धारणां च समभ्यसेत् ॥
आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांचा अभ्यास केल्या नंतर योग्याने धारणांचा अभ्यास करावा. गोरक्ष शतकातील धारणा कोणत्या आहेत आणि त्या कशा कराव्यात ते मी गोरक्ष कृपेने पुढील भागात निरुपण करीन.
असो.
अमृतधारा, चंद्र, सूर्य आणि जीवात्मा यांना पिंडात प्रतिष्ठापित करणारा भगवान सांब सदाशिव श्रावण मासात समस्त योगसाधकांवर आपल्या कृपेचा वर्षाव करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
© हा लेख कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे. लेखाची लिंक शेअर करू शकता परंतु कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण किंवा पुनर्प्रकाशन करण्यास परवानगी नाही.
प्रिय वाचकांनो,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या वेब साईटवर योग-अध्यात्म विषयक लेखन प्रकाशित करत आहोत. हे लेखन अन्यत्र वापरण्याची किंवा पुनर्मुद्रित करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून मूळ लेखकाचे नाव व स्रोत न देता प्रकाशित केले आहे. काहींनी तर ते स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे—हे साहित्यचौर्य निंदनीय आणि खेदजनक आहे. भारतीय कायदा योग्य वेळी कार्य करेलच, पण आम्ही आमच्या सुजाण वाचकांना विनंती करतो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रकाशित होण्याचे एकमेव अधिकृत माध्यम आहे.
धन्यवाद.
— वेब टीम