Upcoming masterclass schedule: The Sacred Armour of Shiva starting on 24 October 2026 and The Secret of Breath starting on 25 October 2026


संत ज्ञानेश्वर महाराज आणि सिद्धेश्वराची हाक

कधी कधी काही घटना अशा अनपेक्षितपणे घडतात की त्या घडल्यानंतर "ही ईश्वराचीच इच्छा असावी" असेच वाटते. अशीच एक जुनी आठवण आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगणार आहे.

ज्ञानेश्वरीमुळे मी योगमार्गावर कसा आलो त्याची कहाणी मी देवाच्या डाव्या हातीमध्ये सविस्तारपणे सांगितली आहे. १९९५ साली जेव्हा माझी ज्ञानेश्वरीशी गाठभेट झाली त्या आधी मी आळंदीला कधीच गेलो नव्हतो. त्या घटनेनंतर पहिल्यांदा माझ्या मनात आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला भेट द्यावी अशी इच्छा निर्माण झाली. मी त्यावेळेस नोकरी करत होतो, कामाच्या ठिकाणी नवीन होतो त्यामुळे लगेच सुट्टी घेऊन आळंदीला जाणे शक्य झाले नाही. मनात विचार घोळत असे पण योग काही जुळून येत नव्हता.

त्र्यंबकेश्वरला महादेव बाबांकडून स्वप्नदीक्षा आणि शक्तिपात मिळाल्यानंतर मात्र आता आळंदीला भेट द्यायचीच असा विचार वारंवार मनात येऊ लागला. मला ज्ञानेश्वर माऊलींना भेटून शतशः धन्यवाद द्यायचे होते. त्यांनी जर मला ज्ञानेश्वरीमार्फत कुंडलिनी योगमार्गावर आणले नसते तर कदाचित मला हा मार्ग कधीच कळला आणि फळला नसता. त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ समाधी मंदिरात मला आदिनाथ ते ज्ञाननाथ अशा समग्र गुरुपरंपरेचे ज्योतिर्मय दर्शन घडले असले तरी एकदा त्यांची संजीवन समाधी डोळे भरून पहावी आणि त्यांच्या चरणी लोटांगण घालून तेथील चैतन्याने कृतकृत्य व्हावे असे वारंवार मनात येत होते.

शेवटी एक दिवस तसा संयोग जुळून आला. आधी सिद्धबेटाचे दर्शन घेऊन मी संजीवन समाधी मंदिरात पोहोचलो. सुदैवाने गर्दी फारशी नव्हती. संजीवन समाधीच्या परिसरात प्रवेश करताच मला एकदम शांतता आणि आनंदाची अनुभूती झाली. आत प्रवेश करण्यापूर्वी मी हार, फुले-पाने, गंध वगैरे बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या. येथे येण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि परत-परत येणे शक्य होईल की नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे आत्ताच जेवढे चांगले आणि संस्मरणीय दर्शन घेता येईल तेवढे घ्यावे असे ठरवले होते. त्यामुळे हार-फुले-पाने-गंध असा सगळा जामानिमा घेऊन मी मंदिरात प्रवेश केला.

संजीवन समाधीचे दर्शन घ्यायला आणि सोबत आणलेल्या सर्व गोष्टी अर्पण करायला मी उत्सुक झालो होतो. दोन्ही हात अर्पण करण्याच्या विविध गोष्टींनी भरले होते. मी संजीवन समाधी मंदिरात प्रवेश करून, हार-फुले आदि गोष्टी अर्पण करणार तोच वेशभूषेवरून पुजारी वाटावा अशा एका व्यक्तीने स्पष्ट शब्दात सांगितले की — येथे आत्ता समाधीवर काहीही अर्पण करायचे नाही कारण समाधीवर कसलातरी अभिषेक / पूजा किंवा तत्सम काही विधी होणार होता.

मन प्रचंड खट्टू झाले. एवढ्या उत्साहाने आणलेल्या सर्व गोष्टी अर्पण न करताच परत घेऊन जाव्या लागणार होत्या. करणार काय. दुसरा काही उपायच नव्हता. डोळे भरून समाधीचे दर्शन घेतले, समाधीपुढे डोकं टेकवले, समाधी मागील विठ्ठल-रखुमाईला हात जोडले. आनंदाश्रू भरून आले होते. दर्शन तर मनसोक्त झाले होते परंतु सोबत आणलेल्या हार-फुलांपैकी काहीच अर्पण करता न आल्याने मन खूप हिरमुसले झाले होते. ज्ञानेश्वर माऊलींना आपण दर्शनासाठी आलेले आवडले नाही की काय अशी शंका मनात येऊ लागली.

तसाच बाहेर पडलो. का कोण जाणे तेथून बाहेर येताच मन सुन्न झाले होते. बधिर झाले होते. प्रत्येक वेळी मनासारखे देवदर्शन घडतेच असे नाही असे मनाचा एक कोपरा स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत असतांनाच उर्वरित मन मात्र सुन्न आणि बधिर झाले होते. समोरचे दोन-पाच लोक जिथे जातील तिथे मागोमाग मी जात होतो. मंदिर परिसरातील अन्य दर्शने करण्याची इच्छाच जणू मरून गेली होती.

पाय नेतील तिकडे घुसलो. समोर नंदी दिसला आणि त्याच्या पुढे गाभारा. प्रवेशद्वाराशी लिहिलेल्या माहितीवरून कळले की हा सिद्धेश्वर महादेव आहे. काहीसा भानावर आलो होतो. मनाचा बधीरपणा काहीसा कमी झाला होता. गाभाऱ्यात प्रवेश केला आणि सिद्धेश्वराच्या शिवलिंगातून कानावर प्रेमळ शब्द अगदी स्पष्टपणे ऐकू आले — "ये रे बाळा! मी इकडे आहे."

हे शब्द मला अनपेक्षित होते. मी जवळ जवळ दचकलोच. त्याच बरोबर मनात एक नि:संदिग्ध विश्वास निर्माण झाला की हे शब्द साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचेच आहेत. अंतर्मनाला कोणत्याही पुराव्याची गरज नव्हती. मगाच्या घटनेने मनाला आलेली खिन्नता कुठच्याकुठे पळून गेली. आता घटनांची संगती ध्यानी येऊ लागली. ज्ञानेश्वर महाराज आत्ता या क्षणी तरी "तिकडे" नव्हतेच. महाराज "इकडे" सिद्धेश्वराकडे येऊन बसले होते. त्या क्षणी माझ्या अंतर्मनाला स्पष्ट जाणवले की ज्ञानेश्वर माऊलींचे चैतन्य समाधीपुरते मर्यादित नव्हते; ते सिद्धेश्वरातही तितक्याच जिवंतपणे प्रकट होते.

मी आनंदातिशयाने आणलेले सर्व हार-फुले-गंध वगैरे जे काही होते ते सर्व सिद्धेश्वराच्या शिवलिंगावर अर्पण करून टाकले. ज्याच्यासाठी हे सगळे आणले होते ते सिद्धेश्वराच्या साक्षीने त्याच्या चरणी वाहून टाकले. मला अगदी शंभर टक्के खात्री होती की ज्ञानेश्वर महाराज स्वतः ते स्वीकारत होते. मन अक्षरशः कृतार्थ झाले.

सद्गदित अंतःकरणाने सिद्धेश्वरापुढे डोके टेकले. डोळ्यांपुढे एक तेजस्वी धुनी आणि त्या धुनी शेजारी बसलेल्या दोघांचे — सिद्धेश्वर आणि ज्ञानेश्वर - ज्योतिर्मय देह तरळून गेले. अग्नीची लाल, पिवळी, पांढरी स्फुल्लिंगे त्यांच्या ज्योतिर्मय देहांतून बाहेर पडत होती. माझे डोळे बंद असले तरी अंतःचक्षू त्या दिव्य दर्शनाने दिपून गेले. फार काही सांगत नाही. हे लिहिताना सुद्धा जुन्या आठवणींनी अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.

त्या अनुभवाचा सखोल तार्किक अर्थ लावण्याचा प्रयत्न मी कधीही केलेला नाही. काही प्रसंग हे समजून घेण्यासाठी नसतात; ते फक्त जपून ठेवण्यासाठी असतात. श्रद्धेच्या मार्गावर चालताना अनेकदा आपल्याला वाटते की आपण ईश्वराचा शोध घेत आहोत. पण कधी कधी असेही घडते की ईश्वरच आपल्याला हाक मारतो.

मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण अनेकदा कृपेचा मार्ग आधीच ठरवून ठेवतो; पण कृपा आपल्या कल्पनेपेक्षा वेगळ्याच दाराने येते. त्या दिवशी मी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर हार-फुले अर्पण करू शकलो नाही, पण त्याच हार-फुलांचा स्वीकार सिद्धेश्वराच्या साक्षीने झाला. या घटनेनंतर देवाच्या कृपेचे मार्ग आपल्या अपेक्षांपेक्षा कितीतरी व्यापक असतात, यावरचा माझा विश्वास अधिकच दृढ झाला.

तूर्तास इतकेच. तुमचा संकल्प स्पष्ट असो आणि मन शांत. या मनःपूर्वक सदिच्छेसह, मी लेखणीला विराम देतो आणि पुन्हा मौनाच्या अथांगतेत विलीन होतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक असून मायक्रोसॉफ्टच्या वेब डेव्हलपमेंट तंत्रज्ञानात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. मायक्रोसाॅफ्टतर्फे त्यांना "मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी योगाधिष्ठित जीवनशैलीचा अंगीकार केला असून निवडक साधकांना ते अजपा गायत्री व ध्यान-धारणा यांबाबत मार्गदर्शनही करतात. तंत्रज्ञान आणि योगमार्ग या दोन भिन्न वाटांचा सुवर्णमध्य साधत, ते गेली ३१ वर्षांहून अधिक काळ प्रोग्रामिंग, ध्यान-धारणा, लेखन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांत सक्रिय आहेत. आपल्या लेखनाद्वारे ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसोबतच योगविद्या आणि अंतःप्रज्ञेचे सूक्ष्म पैलू स्वतःच्या संकेतस्थळांवरून उलगडतात.

Posted On : 29 July 2026

Protected by Copyscape