Untitled 1
भाग 8 : मी परत येतो
एका दिवसात आयुष्य केवढे बदलून गेले होते. असे वाटत होते की अनेक वर्षांचा काळ
लोटला आहे. आताच्या स्वप्नानंतर तर आजवर योगशास्त्रा संबंधी असलेल्या अनेक कल्पना
पार पुसल्या गेल्या होत्या. मी आताच्या अनुभवाला स्वप्न असे म्हणत होतो करण आधुनिक
विज्ञानाकडे त्याला काही स्पष्टीकरण नव्हते. माझ्यासाठी तो प्रत्यक्ष अनुभवच होता.
मनात विचार आला - मी परत गेल्यावर लोक यावर विश्वास ठेवतील? मनानेच उत्तर दिले -
लोकांना काय वाटत ते फारस महत्वाचे नाहीये. एक गोष्ट आठवली व हसू आले...
एकदा शंकर
आणि पार्वती कोठेशी जात होते. शंकर नेहमी प्रमाणे नंदीवर बसला होता व पार्वती
त्याच्या बरोबर पायी निघाली होती. त्यांना असे जाताना पाहून वाटेतले लोक कुजबुजू
लागले "काय स्वार्थी पती आहे. स्वत:च्या सुकोमल पत्नीला पायी चालायला लावून स्वत:
मात्र बैलावर बसला आहे." शंकर पार्वतीला म्हणाला "प्रिये! लोक म्हणतात ते बरोबर
आहे. तुला पायी चालायला लावून मी असे बसणे योग्य नाही." मग पार्वती नंदीवर बसली व
शंकर चालू लागला. थोड्यावेळाने लोक म्हणू लागले "काय निष्ठूर स्त्री आहे. स्वत:च्या
नवर्याला चालायला लावून स्वत: शेठाणी सारखी बसली आहे." ते ऐकून पार्वती म्हणाली
"नाथ! त्यांचे बरोबर आहे. मी असे बसणे उचीत नाही." पार्वतीही शंकराबरोबर पायी चालू
लागली. वाटेतले लोक चेष्टा करू लागले "काय मुर्ख जोडपं आहे. एवढा बैल असून देखील
पायी चालत आहेत." त्यांचे बोलणे ऐकून शंकर-पार्वती दोघेही नंदीवर स्वार झाले. ते पाहून लोक
बोलू लागले "काय दुष्ट माणसे आहेत. तो बैल बघा कसा या दोघांचे ओझे वाहून दमला आहे. याना मात्र
त्याची काही फिकीर आहे का पहा."
थोडक्यात काय तर दुसर्याला नावे ठेवणे, दुसर्याची टिंगल करणे हा जगाचा
स्थायीभावच आहे. त्यांच्या बडबडीकडे लक्ष दिले तर फायद्यापेक्षा मनस्ताप मात्र होईल.
मला मिळालेला उपदेश आठवला - "स्वत:शी प्रामाणीक रहा." आपण आपल्या ध्येयाशी
प्रामाणीक असल्यावर दुसरा काय म्हणतो त्याला फारसा काही अर्थ नाही.
मला दुसरीच काळजी भेडसावू लागली होती. आजवर कुंडलिनी जागृत करणे हे ध्येय होते.
ती अशी अकस्मात जागृत झाल्यावर मोठी पोकळी जाणवत होती. आता पुढे काय करायचे? "मी
दिलेली साधना सोडू नको" हे ठीक होते पण स्वप्नात अनुभवलेली प्रगाढ ध्यानाची स्थिती
कशी प्राप्त करून घ्यायची ते काही नीटसे उमगत नव्हते. कारण जी साधना मी स्वप्नात
केली होती ती मी केली नसून माझ्याकडून करवण्यात आली होती अशी माझी पक्की धारणा
होती. आजवर वाचलेल्या एकाही योगग्रंथात कुंडलिनी जागृतीनंतर काय करायचे किंवा जागृत
शक्तीचा पुढील वाटचालीशी नक्की संबंध काय याचा स्पष्ट उल्लेख नव्हता. मी
विचित्र परिस्थितीत सापडलो होतो. जाऊ दे. पहाट व्हायला अजून बराच अवकाश होता. उद्या याचा विचार करू असे मनाशी ठरवत
झोपायला गेलो.
मी झोपून तास दीड तास झाला असेल. माझा हात बिछान्याच्या फळीवर जोरात
आपटला. मला जाग आली. चांगल्या गाढ झोपेतून जाग आल्यामुळे मी वैतागलो. तेवढ्यात
जाणवले की माझ्या शरिरातून काहीतरी फिरतय. प्राण? हो प्राणच. ही हालचाल मला काहीशी
ओळखीची होती. प्राणायामाचा अभ्यास बराच काळ केल्यावरही असाच अनुभव येतो. हा अनुभव
थोडा तीव्र होता एवढेच. क्षणाक्षणाला प्राणाचा जोर वाढत होता. माझे हात-पाय उसळ्या
मारू लागले. सकाळ पासून घडणार्या घटना लक्षात घेता मला अजिबात आश्चर्य वाटले नाही
वा धक्काही बसला नाही. प्राण एका जागेवरून दुसरीकडे जणू धावत होता. त्या बरोबर एक
गरम स्त्रोत फिरतोय असे वाटत होते. अशा स्थितीत
बाहेरगावी फार दिवस थांबणे योग्य नाही असे वाटू लागले. उद्याच परतीच्या प्रवासाला
निघायचे असा निश्चय केला. हात-पाय फार उसळ्या मारू नयेत म्हणून गुढगे छातीशी घेऊन अंगाची मुटकुळी करून झोपलो.
केव्हातरी झोप लागली. मग मात्र काही त्रास झाला नाही. डोळे उघडले तेव्हा उन्हे
चांगलीच वर आली होती.
सकाळच्या सत्रात आजूबाजूची मोजकी ठिकाणे पाहून दुपारी किंवा संध्याकाळी ठाण्याला
परत जायचे असे नक्की केले. आता खरतर कोणतीही ठिकाणे पाहण्यात रस नव्हता. नाश्ता
करून परत त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात गेलो. आवारात थोडावेळ बसलो. त्या जागेशी एका
दिवसात अनेक जन्मांचा संबंध आहे असे वाटत होते. शिवलिंग व मंदिर मनात जेवढे साठवता
येईल तेवढे साठवून घेतले. जाण्यापुर्वी निवृत्तीनाथांचे समाधी मंदीर पहायचे असे
ठरवले. मंदीर फारसे गजबलेले नव्हते त्यामुळे दर्शन शांतपणे घेता येणार होते.
निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे थोरले भाऊच नव्हते तर गुरूही होते. नाथ संप्रदायाचे
कुंडलिनी जागृतीचे तत्वज्ञानाचा गीतेच्या सहाव्या अध्यायाशी समन्वय साधणार्या
ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या गुरूंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असा विचार करत
नमस्कार केला. गाभारा एका अनोख्या दैवी प्राकाशाने भरून गेला होता. त्या प्रकाशात
ज्ञानेश्वरांची संपूर्ण गुरू परंपरा अवतरली. आदिनाथ, मत्स्येन्द्रनाथ, गोरक्षनाथ,
गहिनीनाथ, निवृत्तीनाथ व ज्ञाननाथ अशी ही दिव्य परंपरा गाभार्यात भरून राहीली
होती. त्यांचे दिव्य दैदिप्यमान देह डोळे दिपवून टाकत होते. मस्तक आपोआपच झुकले.
त्या दिव्य परंपरेच्या दर्शनाने जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मंदिरातच
थोडावेळ बसून राहीलो. घड्याळाचे काटे वेगाने धावत होते. सामानाची आवराआवर करायची
होती. थोडी खरेदीही करायची होती. तेव्हा तेथून उठणे भागच होते. रात्रीपुर्वीच
ठाण्याला थडकायचे असा माझा विचार होता.
संध्याकाळी ठाण्याला पोहोचलो. गेल्या काही दिवसात आलेल्या अनुभवांनी
मन गच्च भरले होते. प्रवासाचा शीण आला होता. का कोण जाणे घर, आजुबाजुची माणसे,
वस्तू सगळेच खुप परके-परके वाटत होते. जणूकाही मी बर्याच वर्षांनी घरी परतत होतो
वा त्या गोष्टी माझ्या नव्हत्याच. कोणाशीही विषेश काही न बोलता जेवलो आणि
बिछाना गाठला.
~~~~~~
कुंडलिनी विषयी साधकांमधे एवढे गैरसमज असतात की त्या जंजाळामधे कुंडलिनीचे खरे
स्वरूप त्यांना कळतच नाही. स्वत:ला योगशास्त्रातील तज्ञ म्हणवणारे लोकही हा गुंता
स्वानुभवाच्या जोरावर सोडवण्याचा प्रयत्न करताना फारसे दिसत नाहीत. कुंडलिनीवरील बहुतांशी
मराठी पुस्तकांमधे लेखक एकच गोष्ट घोळवताना दिसतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधे
कुंडलिनी जागृतीचे वर्णन कसे बहारदार केले आहे हेच ही मंडळी घोळवून घोळवून सांगत
बसतात. ज्ञानेश्वरांनी केलेले काव्यात्मक वर्णन बहारदार आहे यात शंकाच नाही
पण तुमचा स्वत:चा अनुभव म्हणून काही आहे की नाही. त्याच्या जोरावर नवशिक्या
साधकांसाठी समजेल अशा भाषेत हे गुढ उकलायला नको का? दुर्दैवाने हा विचार करताना
फारसे कुणी दिसत नाही. कदाचीत स्वानुभवाची कमतरता हे त्याचे एक कारण असु शकेल किंवा
आपण शास्त्रप्रंथांपेक्षा काही निराळे सांगितले तर लोकांना ते रुचणार नाही ही भीती
त्यामागे असेल.
या लेखात मी असे काही प्रश्न निवडले आहेत की ज्यांची उत्तरे योगग्रंथांत
सहजासहजी सापडत नाहीत. अनेक तज्ञांनी ह्या प्रश्नांची उत्तरे आपापल्या
परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांच्या उत्तरांमधे एकवाक्यता नाही.
ते साहजिकच आहे. कोणताही योगतज्ञ आपल्या अनुभवाच्या जोरावर ही उत्तरे देण्याचा
प्रयत्न करतो. योगमार्गावर प्रत्येकाचे अनुभव सारखेच असतील असे नाही. त्यामुळे या
प्रश्नांची उत्तरेही वेगेवेगळी असू शकतात. आकाशातला एकच ढग एका लहानमुलाला
राक्षसासारखा वाटतो तर दुसर्याला जहाजासारखा तर तीसर्याला बंगल्यासारखा वाटतो.
असे का होते? प्रत्येकाच्या जडणघडणी प्रमाणे प्रत्येकाच्या अनुभवात थोडीफार तफावत
असायचीच. अर्थात या अनुभवांमधे समान दुवेही असतात. जसे वरील उदाहरणातल्या मुलांना
आकार निरनिराळे दिसले तरी ते काळ्या रंगाचेच दिसतील.
येथे देण्यात आलेली उत्तरे मी माझ्या
अनुभवांच्या आधारे देत आहे. ती इतर कोणी दिलेल्या उत्तरांशी जुळतीलच असे नाही. माझा
तसा प्रयत्नही नाही. मी कोणा एका विशिष्ठ संप्रदायाचे वा तज्ञाचे मत तेवढे
बरोबर व बाकीच्यांचे चुक असे मानत नाही. माझेच मत बरोबर आहे असे तुम्ही मानावे
असाही माझा आग्रह नाही. माझ्या साधनेच्या व स्वानुभवाच्या अनुषंगाने कुंडलिनी
योगशास्त्राविषयी माझी काही ठाम मते आहेत. ती स्वाभ्यासातून व स्वानुभवातून बनलेली
असल्यामुळे ती इतर कोणाशी जुळतात अथवा नाही याची मला विषेश फिकीर नाही. याच
मतांच्या आधाराने काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
कुंडलिनी म्हणजे काय?
कुंडलिनी म्हणजे काहीयरी गूढ आहे, फक्त काहीच मोजक्यांना तीचा अनुभव मिळणे शक्य
आहे, कुंडलिनी सर्पाप्रमाणे असते, ती मुद्दाम जागृत करून घेऊ नये असे कितीतरी
गैरसमज अस्तित्वात आहेत. कुंडलिनीविषयी आज मुबलक साहित्य उपलब्ध असुनही हे गैरसमज
टिकून आहेत हे विषेश. कुंडलिनी म्हणजे काय हे नीट जाणून घेण्यासाठी
योगशास्त्रानुसार सृष्टीची
निर्मिती कशी होते यांच्याविषयी थोडी माहीती असणे आवश्यक आहे.
सृष्टीची निर्मिती कशी होते? शिव-शक्ती यांच्या लीलेतून महत, अहंकार, बुद्धी,
मन, पंच तन्मात्रा, पंच महाभूते, पंचेंद्रिये व कर्मेंद्रिये निर्माण होतात. हा
सृष्टी क्रम नीट विचार केल्यास कोणासही कळण्यासारखा व पटण्यासारखा आहे. तुम्हा
सर्वांना विज्ञानचा एक नियम माहीतच असेल. तो नियम असा - उर्जा निर्माण करता येत
नाही वा नष्टही करता येत नाही. ती केवळ रुपांतरीत करता येते (Energy
can neither be created nor destroyed. It can be only converted from one form to
another). याच नियमानुसार असे म्हणता येईल की
शक्ती वा प्रकृतीचे महत ते पंचमहाभूते ते कर्मेंद्रिये हेही एकाच शक्तीचे रुपांतर
आहे. एक सोपे उदाहरण घेऊ. आपण कपडे कसे बनवतो? प्रथम कापसाचे बी पेरले जाते. बीतून
झाड उगवते. ते झाड बीया व कापसाची बोंडे देते. कापसाच्या बोंडांपासून कापूस बनतो.
कापसापासून धागा बनतो. धाग्यापासून वस्त्र तयार होते. वस्त्रापासून कापड बनते.
शेवटी कापडापासून कपडे शिवले जातात. या उदाहरणावरून तत्वत: असे म्हणता येईल की
कापसाचे मुळ बीच कपडे या रूपाने दृश्य होते. अगदी हाच
प्रकार सृष्टी घडताना होत असतो. सुक्ष्म ते स्थुल असे हे रुपांतर आहे हेही आपल्या
लक्षात आले असेल.
आता समजा की तुमच्याकडे एक चटई आहे. जेव्हा त्या चटईची परज नसेल तेव्हा तुम्ही
काय कराल? तर ती गुंडाळून कपाटात ठेवाल. तसाच प्रकार शक्तीच्या बाबतीत होत असतो.
सृजन करून झाले की शक्तीला काहीच काम नसते व ती गुंडाळून ठेवली जाते. ही
गुंडाळलेली शक्ती म्हणजेच जगदंबा कुंडलिनी! कुंडलिनीच्या 'वेढ्यांचे'
रहस्य हे असे आहे. पंचभूतांच्या दृष्टीने पहायचे झाल्यास हे सृजन पृथ्वीतत्वानंतर
थांबते. म्हणूनच कुंडलिनी मूलाधार चक्र जे पृथ्वीतत्वाचा केंद्रबिंदू आहे त्यापाशे
वेटोळे घालून बसते असे योगग्रंथ सांगतात. आता कोणी विचारील की हे वेढे साडेतीनच का?
हे साडेतीन वेढे ॐ काराचे प्रतीक आहेत. ॐ काराचा आकार पहा. तो
साडेतीन वेटोळ्यांसारखाच दिसेल. हे साडेतीन वेटोळे जागृतावस्था, स्वप्नावस्था,
सुषुप्ती अवस्था व तुर्यावस्था यांचे प्रतीक आहेत. ते त्रिगुणांचेही (तम, रज, सत्व)
प्रतीक आहेत. उत्पत्ती, पालन, संहार व त्यापलिकडील अव्यक्त यांचेही ते प्रतीक आहेत.
कुंडलिनीची तुलना सर्पाशी का बरे केली जाते? वर सांगितलेले सृजन हे मेंदू ते पाय
या दिशेने होते हे तुमच्या सहज लक्षात येईल. सृजन करताना शक्ती जणू एखाद्या
नलिकेतून वा बिळातून गेल्यासारखी मज्जारज्जू मधून जाते. तेव्हा तीला सर्पाकार का
म्हटले आहे ते लक्षात येईल. ही नलिका म्हणजेच सुषुम्ना नाडी. सृजन करीत असताना या
मुख्य नळीला असंख्य फाटे फुटतात. पाणी पुरवठा करणार्या एखाद्या जलवाहीनीला
लहान-लहान नलिकांचे कसे जाळे असते अगदी तसेच हे फाटे असतात. हे फाटे जेथे
फुटतात त्या जागांना चक्रे असे म्हणतात. या असंख्य नलिकांमधून प्राण वा
जीवनशक्ती वाहून नेली जाते. चक्रे म्हणजे काही स्थिर बिंदू नव्हेत. चक्र या
शब्दानेच गती सुचीत केली आहे. चक्रांमधून सतत प्राण फिरत असतो. आधुनीक
वैद्यकशास्त्राने शोधलेली Plexuses या चक्रांशी बरीच
मिळतीजुळती आहेत. अर्थात वैद्यकशास्त्राची Plexuses ही
शरिराचे केवळ स्थुल भाग आहेत.
काही तज्ञ कुंडलिनी व प्राण हे एकच आहेत असे मानतात. पण त्यात थोडा फरक आहे.
कोणता ते पुढे कळेलच.
प्राण म्हणजे काय?
प्राण म्हणजे श्वास ही एक चुकीची समजूत साधकांमधे आढळते. त्यातुनच प्राणायाम
म्हणजे श्वासाचे व्यायाम प्रकार असा चुकीचा समज ते करून घेतात. प्राण ही
चैतन्यशक्ती आहे. ही शक्तीच शरिराला जीवंत ठेवत असते व शरिराची सर्व कार्ये करते.
श्वासोच्छ्वास हेही प्राणशक्तीमुळेच घडतात. येथे कोणी असा प्रश्न उपस्थित करेल की
जर श्वासोच्छ्वास हे प्राणशक्तीमुळे घडतात तर श्वासाअभावी प्राण का जातो?
प्राणशक्ती श्वासामार्फत स्वत:ला इंधन पुरवत असते. ज्याप्रमाणे गाडी स्वत:च्या
फिरणार्या चाकांनी स्वत:चीच बैटरी चार्ज करते त्याप्रमाणेच हे कार्य चालते.
सामान्य माणसाची प्राणशक्ती श्वासाअभावी क्षीण होते पण अतिशय प्रगत
योग्याच्या बाबतीत श्वासोच्छ्वासाच्या अभावीसुद्धा (केवल कुंभक) प्राणशक्ती
अस्तित्वात असू शकते.
कुंडलिनी ही न वापरलेली शक्ती आहे तर प्राण ही वापरात असलेली
शक्ती आहे. प्राणाचे त्यांच्या कार्यानुसार असंख्य प्रकार आहेत. त्यातील
दहा महत्वाचे मानले जातात. त्यातीलही पाच मुख्य असून पाच गौण आहेत. कुंडलिनी विषयी
सर्वच योगग्रंथ एकमुखाने असे सांगतात की कुंडलिनी निद्रिस्त असते
व तीला जागे करण्यासाठी योगमार्गाची कास धरावी लागले. प्राण शरिरात कायम
कार्यरत असतात म्हणज़ेच प्राण निद्रिस्त नसतात. जर प्राण हेच कुंडलिनी असे
गृहीत धरले तर येथे विसंगती होईल. वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की जरी
तत्वार्थाने कुंडलिनी व प्राण ही एकाच शक्तीची दोन रुपे असली तरी स्थुलार्थाने
कुंडलिनी म्हणजे प्राण नव्हे.
कुंडलिनी व प्राण यांचा संबंध काय?
जर कुंडलिनी व प्राण हे वेगळे आहेत तर सर्व योगग्रंथ प्राण शुषुम्नेमधे नेण्यास
का सांगतात बरे? प्राण हा वायूरूप आहे. प्राणाचे कार्य शरीर घटक एकी कडून दुसरीकडे
नेणे हेही आहे. रक्ताभीसरण, अन्न पाचन व उत्सर्जन ही त्याचीच काही उदाहरणे. आता
समजा की एका खोलीत गुलाबाची फुले ठेवली आहेत पण ती खोली निर्वात केलेली आहे.
तुम्हाला त्या फुलांचा वास येईल का? अर्थातच नाही. गुलाबाच्या फुलांचे सुगंधी पराग
जोवर पुमच्या नाकात पोहोचत नाहीत तोवर त्यांचा वास येणे शक्य नाही. हे सुगंध कण
तुमच्या नाकात कोण पोहोचवतो? हवा किंवा वायू. अगदी हाच प्रकार प्राणाच्या बाबतीत
खरा आहे. सुषुम्ना ही जणूकाही निर्वात नळी आहे ज्यातून तुम्हाला कुंडलिनी
सहस्राराकडे न्यायची आहे. प्राणरूपी हवा असल्याशिवाय कुंडलिनीरुपी सुगंध
सहस्राराकडे वाहीला जाणारच नाही. प्राण शुषुम्नेमधे शिरण्याची आवश्यकता ही
अशी आहे.
कुंडलिनी जागृती म्हणजे काय?
कुंडलिनी म्हणजे काही दृश्य वस्तू नव्हे की जी चालू अथवा बंद करता येईल. ती एक
शक्ती आहे. शक्ती जागृत करणे म्हणजे काय? समजा एक लाकडाचा ओंडका आहे. त्यामधे
अग्निरुपी शक्ती आगोदरपासूनच अस्तित्वात आहे पण सुप्त स्वरूपात. ती सुप्त शक्ती
तुम्ही जागृत कशी कराल? तर तुम्ही बाह्य अग्निने त्या ओंडक्याला आग लावाल.
कुंडलिनीचेही असेच आहे. निद्रिस्त कुंडलिनीला जागे करण्यासाठी योगरूपी अग्नि लावावा
लागतो. आपण आधी बघितले की कुंडलिनी ही वैश्वीक शक्तीचाच एक सुप्त भाग आहे. उर्जा
एकदा का जागी झाली की मग ती वापरावीच लागते. वरच्या उदाहरणात एकदा का ओंडक्याला आग
लावली की उष्णता निर्माण होणारच आणि ओंडका जळणारच. जर तुम्ही त्या तोंडक्यावर पाणी
ओतलेत तर उर्वरीत उर्जा तशीच राहील. त्याचप्रमाणे कुंडलिनी जागृत झाली की तीचे
अध:गमन तरी होते अथवा उर्ध्वगमन तरी होते. जर तीचे अध:गमन झाले तर वासना बळावतात व
आध्यात्मिक प्रगती दुरच रहाते. जर ती उर्ध्वगामी झाली तर मात्र साधकाची आध्यात्मिक
प्रगती सुरू होते. त्या ओंडक्याप्रमाणेच जागृत कुंडलिनी अयोग्य बैठकी अभावी परत
सुप्त होवू शकते. कुंडलिनी जागृतीचा सरळ अर्थ असा आहे की शरिरांतर्गत सुप्त
उर्जेचे (Potential Energy)
रुपांतर चल उर्जेमधे (Kinetic Energy)
करणे. ही कार्यरत झालेली उर्जा मग शरिरमनावर परिणाम करण्यास सुरवात करते.
प्राणोत्थान व कुंडलिनी जागृती यांतील फरक काय?
हा एक अजून सुक्ष्म मुद्दा आहे. काही वेळेला असे होते की साधकाचा प्राणमय कोष
जागृत होतो. प्राणायामाचा दिर्घ अभ्यास, अपुरा शक्तीपात वा इतर साधना यांमूळे असे
होते. अशा वेळी साधकाला थोड्या मुंग्या आल्यासारखे वाटते. एखाद्या चक्रापाशी
गुदगुल्या होताहेत असे वाटते. शरीरात काही हालचाल होतेसे वाटते. हे
कुंडलिनी जागरण नव्हे हे पक्के लक्षात ठेवावे. हे अनुभव प्राणाच्या
हालचालीमुळे येतात. ते जरी साधना योग्य दिशेने जात असल्याचे द्योतक असले
तरी ते अनुभव म्हणजे उद्दीष्ट नव्हेत. तुम्ही काही अश्या व्यक्तींबद्दल
ऐकले असेल की जे दुसर्याला प्राण शक्तीद्वारे रोगमुक्त करतात (Pranic
Healing). अशा लोकांचा प्राणमय कोष
प्रस्फुटीतहोऊन कार्य करत असतो. त्यांची कुंडलिनी जागृत झालेली असेलच असे नाही.
कुंडलिनी जागृतीचा अनुभवच असा असतो की तो तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकतो.
तो अनुभव आल्यावर तुम्हाला त्या विषयी शंका रहातच नाही. त्यामुळे
कुंडलिनी जागृत झाली पण तुम्हाला कळलेच नाही वा अस्पष्ट कळले असे घडत नाही.
प्राणोत्थान (प्राण + उत्थान) म्हणजे प्राण उर्ध्व दिशेने नेणे. वर
सांगितल्याप्रमाणे प्राण शुषुम्नेमधे नेल्यानंतर तो उर्ध्व गतीने जायला हवा तरच तो
आपल्या बरोबर कुंडलिनीला उर्ध्व दिशेने नेवू शकेल. त्यासाठी प्राणाला उर्ध्व दिशेने
वाहण्याचे शिक्षण द्यावे लागते. आता तुम्हाला मूलबंध, उडीयान बंध, खेचरी मुद्रा,
शांभवी मुद्रा, महामुद्रा, महाबंध, महावेध ह्या सगळ्या 'वरती नेणार्या' का असतात
ते कळेल. बर्याचवेळा प्राणोत्थान व कुंडलिनी जागरण हे एकाच वेळी होऊ लागते
त्यामुळे साधकांना यांमधील फरक नीट ध्यानात येत नाही.
कुंडलिनी जागृती व आध्यात्मिक प्रगती यांतील संबंध काय?
पहील्या प्रश्नाच्या उत्तरात आपण पाहीले की सृष्टीचे सृजन हे शिव ते पृथ्वीतत्व
असे होते. जर शिवतत्वात विलीन व्हायचे असेल तर हा क्रम उलट दिशेने करायला हवा.
म्हणजे पृथ्वी ते शिव असा प्रवास करायला हवा. हा कपड्यापासून कापड,
कापडापासून सूत, सूतापासून कापूस, कापसापासून बोंड, बोंडापासून बी असा उलटा प्रवास
म्हणजे लय. कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा तीला शुषुम्नेमधून
उर्ध्व मार्गाने नेले जाते. म्हणजेच तीचा प्रवास सृजनाच्या उलट्या मार्गाने होऊ
लागतो. असा प्रवास सुरू झाला की लय सुरू होतो. जेवढा लय अधिक तेवढे शिवतत्वापासूनचे
अंतर कमी. अर्थात तेवढी आध्यात्मिक प्रगती जास्त. ह्या प्रगतीची हुकमी खुण
म्हणजे मनोलय. जस जसे तुम्ही प्रगत व्हाल तस तसे तुमचे मन अधिकाधिक एकाग्र
होत जाईल. चित्तवृत्ती क्षीण होत जातील व एक दिवस पुर्ण थांबतील. हीच
समाधी. हे लय तत्व समजल्यावर आता तुम्हाला पतंजलीने सांगितलेल्या
निरनिराळ्या समाधीस्थिती चांगल्या उमगू शकतील.
वरील प्रश्नोत्तरे काळजीपुर्वक वाचा. नुसते वाचून थांबू नका. त्यांवर विचार करा.
स्वत:च्या बुद्धीला ती तार्कीकदृष्ट्या पटतात का ते पहा. सर्वात महत्वाची
गोष्ट म्हणजे साधनेद्वारे ही उत्तरे पडताळून पहा. यातील काही उत्तरे आज
कदाचीत तुम्हाला स्पष्टपणे कळणार नाहीत पण साधनेत जसजशी प्रगती होईल तसतशी तुमची खात्री पटत जाईल.
(क्रमश:)
जर इच्छा असेल तर
आपण आमच्या
Mailing List चे सभासद होऊ शकता. त्यासाठी तुमचा
Email address आम्हाला
Contact Us Page द्वारे
पाठवा. जेंव्हा नविन लेख उपलब्ध होतील तेंव्हा तुम्हाला
Email द्वारे कळवण्यात येइल. कृपया आपल्या मित्रांना,
ओळखीच्यांना व या विषयाची आवड असणार्या इतर साधकांना या लेखमाले विषयी अवश्य
सांगा. कुंडलिनी योग यथार्थ स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आमच्या छोटयाशा
प्रयत्नात मदत करणार्या प्रत्येकाचे आम्ही शतश: आभारी आहोत.
|
About the Author
|
|
Bipin Joshi |
|
You can read more about the author here. |
|