Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


पौर्णिमेची प्रज्ञा

मनुष्य आणि पशू यांमध्ये फरक काय असा विषय जेंव्हा चर्चेस येतो तेंव्हा पहिली गोष्ट आपल्याला आढळते ती म्हणजे माणसाची बुद्धी. पशू हे सुद्धा हुशार असतात, त्यांनाही बुद्धी असते परंतु माणसाच्या बुद्धीच्या झेपेपूढे पशुबुद्धी अत्यल्प भासते.

मानवी बुद्धी ही सुद्धा अनेकानेक कंगोरे असलेली गोष्ट आहे. एखादा व्यक्ति त्याच्या शालेय जीवनात परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत असेल तर त्याला त्याच्या आजूबाजूचे लोक बुद्धिमान समजतात. एखादा व्यक्ति व्यवहार ज्ञानात चतुर असेल, हजरजबाबी असेल तर तो बुद्धिमान म्हणून मान्यता पावतो. एखादा माणूस सामान्य ज्ञान, शब्दसंग्रह, गणिती कौशल्य इत्यादी गुणांनी युक्त असेल तर त्याला लोकं बुद्धिमान म्हणतात.

वरील बुद्धीचे विविध आविष्कार महत्वाचे आणि भौतिक जीवनाच्या दृष्टीने उपयोगी असले तरी अध्यात्म जीवनात बुद्धीची एक वेगळीच ऊंची साधकाला आवश्यक असते. अध्यात्म मार्गावर अशा प्रकारच्या बुद्धीसाठी एक विशिष्ठ शब्द वारंवार वापरलेला आढळतो. तो शब्द म्हणजे प्रज्ञा. कोणताही साधक जेंव्हा योगमार्गावर पाऊल ठेवतो तेंव्हा त्याच्याकडे ही प्रज्ञा अल्प प्रमाणात असते. निरंतर साधणारत राहिल्याने या प्रज्ञेचा स्तर उंचावतो. त्याची सत आणि असत यांतील भेद जाणण्याची खमता कमालीची वाढते.

सामान्य बुद्धिवर कित्येकदा पूर्वग्रह, पूर्वानुभव, एकलेल्या-वाचलेल्या ज्ञानाचा प्रभाव पडलेला असतो. या प्रभावाच्या पडद्या आडून बुद्धी समोर प्रस्तुत केलेल्या गोष्टीकडे पहाट असते. पतंजलि योगसुत्रांत प्रज्ञेचा एक अतिउच्च कोटीच्या अविष्काराचा उल्लेख आहे --

निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसाद: ।।
ऋतम्भरा तत्र प्रज्ञा ।।

निर्विचार समाधीचा निरंतर अभ्यास केल्यानंतर त्याच्या साधनेच्या फलस्वरूप त्याला "अध्यात्म प्रसाद" प्राप्त होतो. दैनंदिन जीवनात देवाची पूजा तुम्ही करत असाल. साधारणतः गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पाच उपचारांनी दैनंदिन पूजा केली जाते. देवाला गंध, फुले वगैरे अर्पण करून झाल्यावर आपण त्याला नैवेद्य दाखवतो. तो स्थूल स्वरूपातला नैवेद्य त्याच्या सूक्ष्म तन्मात्रांच्या स्वरूपात दैवतेकडून ग्रहण केला जातो. देवाने ग्रहण केलेला तो पदार्थ आता नैवेद्य राहिलेला नसतो तर तो आता प्रसाद झालेला असतो. थोडक्यात सांगायचे तर आपण देवाला जो पदार्थ अर्पण करतो तो नैवेद्य आणि आपल्या पूजेने प्रसन्न झालेल्या देवाने तो ग्रहण करून जो शेष रहातो तो "देवाने दिलेला" प्रसाद.

योगसाधकांची पूजा ही स्थूल उपचारांनी बनलेली नसते. ती असते यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा अंगांनी घोटलेली योगसाधना. या साधनेने प्रसन्न झालेला ईश्वर मग त्याला "अध्यात्म प्रसाद" प्रदान करतो. हा प्रसाद म्हणजे "चित्त वृत्ती निरोध:" किंवा चित्त वृत्तींचा पूर्ण उपशम. हा अध्यात्म प्रसाद प्राप्त झाला की साधकाच्या प्रज्ञेला एक वेगळीच झळाळी मारू लागते. त्यांची प्रज्ञा आता ऋत्तंभरा प्रज्ञा म्हणून ओळखली जाते. या ऋत्तंभरा प्रज्ञेचे वैशिष्ठ म्हणजे ती नेहमी समोरील गोष्ट तिच्या यथार्थ स्वरूपात जाणण्यास सक्षम असते. एखादी वस्तु जशी आहे तशी, कोणत्याही पूर्वग्रहांच्या किंवा पूर्वानुभवांच्या पडद्याशिवाय ती वस्तु तिच्या खऱ्या, शुद्ध स्वरूपात जाणली जाते.

आत्मा पंचकोषानी झाकलेला असतो. अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष, आनंदमय कोष यांच्या आवरणांखाली गाडल्या गेलेल्या आत्म्याला जाणण्यास ऋत्तंभरा प्रज्ञाच आवश्यक असते. सामान्य बुद्धीने आत्मा जाणता येत नाही. सामान्य हुषारीने, चलाखीने, चाणाक्षपणाने आत्म्याला ओळखता येत नाही. आत्म्याला जर त्याच्या वास्तविक स्वरूपात ओलाखायचे असेल तर या ऋत्तंभरा प्रज्ञेचा विकास करायला हवा. आज कार्तिक पौर्णिमा आहे. शिवपुत्र कार्तिक स्वामी महाराजांना अभिप्रेत असलेली "प्रज्ञा" ही अशी आहे. सुयोग्य मार्गाने तिचे "विवर्धन" कसे करायचे ते अवश्य शिकून घेतले पाहिजे.

असो.

पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे जो शिवज्ञानात आणि शैवागम शास्त्रात परिपूर्ण आहे असा तो शिवपुत्र कार्तिकेय सर्व अजपा योग साधकांना प्रज्ञा विवर्धन करण्यास सहाय्य करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 15 November 2024