Untitled 1
रावण, तैलंग स्वामी आणि खंड-मंड योग
नाथ संप्रदाय, कुंडलिनी योग आणि एकूणच शैव दर्शन विस्मयकारक आणि अचंबित
करणार्या गोष्टींनी भरलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टी ऐकवायला मित्र-मंडळीही तसेच
हवेत. केवळ हौशा-गौशा लोकांबरोबर या गप्पा करण्यात मजा नाही. ज्याप्रमाणे गायकाला
उत्तम जाणकार श्रोते समोर असतील तर गाण्यात आनंद मिळतो त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे
साधनामार्गावरून वाटचाल करणार्या मित्रमंडळीं बरोबर अशा गप्पा आनंद देतात.
नुकताच असा एक योग आला. आम्ही दोन-तीन योगमित्र काही कारणाने अचानक भेटलो.
बर्याच दिवसांनी भेटत होतो त्यामुळे रात्री गप्पांचा फड रंगणार याची खात्री होतो.
भजनाची आवड असणार्या एकाने दत्ताच्या भजनाने सुरवात केली आणि मग गप्पा सुरू
झाल्या. एकामागून एक विषय येत होते. अनुभव, गोष्टी, गमतीजमती असा मस्त सुर जुळला
होता. गप्पांच्या ओघात एकाने माझ्या
श्रीरामाला नाथपंथी दीक्षा या ब्लॉग पोस्टचा उल्लेख केला आणि गप्पांचा ओघ रावण
आणि त्याच्या शिवभक्तीकडे वळला. मी म्हटलं - आज तुम्हाला एका वेगळ्या साधनेविषयी
सांगतो...
तुम्हाला माहीत असेल की रावणाला दहा शिरं होती. अशी कथा सांगतात की रावणाने
भगवान शंकराची अतिशय उग्र तपश्चर्या केली होती. तपश्चर्या करत असताना आहुति म्हणून
त्याने आपले एक-एक शिर अर्पण केले. सरते शेवटी श्रीशंकराच्या आशीर्वादाने त्याला
त्याची सर्व शिरं परत मिळाली. आता दहा डोक्यांचा माणूस ही कल्पना आधुनिक
विद्वानांना पटणारी नाही. त्यामुळे त्यांनी रावणाच्या या दहा डोक्यांचा
आपआपल्यापरीने अर्थ लावला. रावण उच्च कोटीचा ज्ञानी शिवभक्त होता हे सर्वच अभ्यासक
मान्य करतात. काहींच्या मते रावणाची दहा शिरं म्हणजे चार वेद आणि सहा शास्त्रे
यांचे प्रतीक अर्थात त्याच्या विद्वत्तेचे निदर्शक आहेत. काही अन्य अभ्यासकांच्या
मते षडरिपू आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असा हा दहांचा समुदाय म्हणजे रावणाची
दहा डोकी.
रावणाच्या दहा शिरांचा अर्थ अजून एका प्रकारे लावता येईल. रावण हा उच्च कोटीचा
तांत्रिक होता. अघोर तंत्र शास्त्रात शव साधना, शिव साधना, स्मशान साधना अशा अनेक
चित्रविचित्र साधना आहेत. अशीच एक साधना म्हणजे खंड-मंड योग. ही
अतिशय उग्र आणि कठीण साधना आहे. कलियुगात ही साधना करणारा साधक म्हणजे अतिशय
दुर्मिळ गोष्ट. या साधनेत साधक आपल्या शरीराच्या अवयवांचे स्वतः तुकडे करतो (म्हणून
खंड-मंड) आणि हवन कुंडामध्ये त्यांची आहुति देतो. विस्मयाची गोष्ट म्हणजे एका
दिवसात त्या साधकाचे अवयव पूर्ववत होतात (म्हणून योग) असं म्हणतात. शरीरावर जखमेची
कोणतीही खूण रहात नाही. असं शक्य आहे की रावण हा तांत्रिक साधना करणारा असल्याने
त्याने हा खंड-मंड योग आचारला असावा. रावण उच्च कोटीचा साधक असल्याने त्याने थेट
आपले मस्तक हवन कुंडात अर्पण केले. त्याने एकदा मस्तक अर्पण केल्यावर ते त्याला परत
प्राप्त झाले. अशी साधना त्याने दहा वेळा केली असावी त्यामुळे त्याला दहा शिरं आहेत
असे लोक काळाच्या ओघात म्हणू लागले असावेत.
आधुनिक काळात खंड-मंड योग करणारा फारसं कोणी एकण्यात नाही. अपवाद फक्त
वाराणशीच्या तैलंग स्वामीचा. हा तैलंग स्वामी म्हणजे फार भारी प्रकरण होता. असं
म्हणतात की तो जवळ-जवळ दोनशेऐंशी वर्षे जगाला ( इ.स. १६०७ -१८८७ ). त्याच्या नावावर
इतके चमत्कार जमा आहेत की ब्रिटीशांच्या दफ्तरातसुद्धा त्यांची नोंद आढळते. परमहंस
योगानंद यांनीही आपल्या Autobiography of a Yogi मध्ये त्याचे काही चमत्कार वर्णन
केले आहेत.
तैलंग स्वामीना तेलंग स्वामी किंवा त्रिलिंग स्वामी या नावानेही ओळखले जाते.
तैलंग स्वामींची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे. सदासर्वकाळ समाधीत आणि तंद्रेमध्ये
मग्न असणार्या तैलंग स्वामींनी एकदा प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराला आपल्या
मल-मुत्राने अभिषेक केला. त्याच्या या विचित्र वागण्याने मंदिराचा पुजारी खूप
संतापला. त्याने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तैलंग स्वामीला हाकलून दिले. त्या
दिवशी रात्री काशीच्या राजाच्या स्वप्नात स्वतः श्रीशंकर आला आणि त्याने राजाला
आपल्या भक्ताला त्रास दिल्याबद्दल समज दिली. इकडे तैलंग स्वामीच्या
मल-मुत्राचे रूपांतर सोन्यात झाले.
रामकृष्ण परमहंस आणि तैलंग स्वामी यांची एकदा भेट झाली होती. त्यांच्या भेटीत ते
एकमेकाशी एकही शब्द बोलले नाहीत. रामकृष्ण परमहंसांनी तैलंग स्वामीच्या हातावर हात
ठेवला पण कोणी काही बोलले नाही. कल्पना करा. रामकृष्ण परमहंस काली मातेचे उच्च
कोटीचे उपासक म्हणजे शक्तीचे उपासक आणि तैलंग स्वामी शिवाचे उच्च कोटीचे उपासक. या
दोन महात्म्यांना, शिवा-शक्तीच्या उपासकांना शब्दांची गरजच भासली नाही. नंतर
लोकांनी जेंव्हा रामकृष्ण परमहंसाना त्याबद्दल विचारले तेंव्हा ते एवढच म्हणाले की
तैलंग स्वामी चालता बोलता शिवच आहे.
अशा या तैलंग स्वामींनी खंड-मंड योग केला होता असं म्हणतात. हे खरं की खोटं
याविषयी खात्रीलायक माहिती उपमब्ध नसली तरी त्यांचे प्रकांड चमत्कार पहाता ते शक्य
कोटीतले असू शकेल.
या खंड-मंड योगाचा एक उच्च प्रकार म्हणजे - नवखंड योग. यात साधक शरीराचे नऊ
तुकडे करत असे आणि त्यांची आहुति देत असे. या असल्या साधना आज अशक्य कोटीतीलच
वाटतात हे जरी खरे असले तरी त्यात कुठेतरी सूक्ष्म संकेत जाणवतात. आता हा नवखंड योग
बघा. गोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध-सिद्धान्त पद्धतीमध्ये योग्याच्या शरीरात "नऊ खंड"
विराजमान असतात असे म्हटले आहे. आता ही नऊ खंडांची संकल्पना ही पूर्णतः भारतीय आहे.
या खंडांचा आशिया खंड, आफ्रिका खंड वगैरेंशी काही संबंध नाही. प्राचीन काळी संपूर्ण
हिंदुस्तान नऊ खंडांमध्ये विभागला होता. ही नऊ खंडे याप्रमाणे - भारतखंड,
काश्मीरखंड, करैर्परखंड, श्रीखंड, शंखखंड, एकपाद्खंड, गांधारखंड, कैवर्तकखंड आणि
महामेरुखंड. ही नऊ खंड नाथ संप्रदायाच्या "पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते
पिंडी" या तत्वज्ञानानुसार शरीरातच विराजमान आहेत. कदाचित नवखंड योगाचा सूक्ष्म
अर्थ या नऊ खंडानी बनलेल्या शरीराचा अर्थात जड देहाचा साधनेने नाश करणे असा असू
शकेल.
अशा अनेक प्रकारच्या गप्पा करता करता मध्यरात्र कधी उलटून गेली ते कळलेही नाही.
शेवटी एकदाचा गप्पांना आवर घातला. तांब्यातले पाणी घटाघटा पित असताना आठवलं - अरे!
किनाराम अघोरीची गोष्ट सांगायची राहूनच गेली. असो. पुढच्या वेळी.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.