Upcoming masterclass schedule: The Sacred Armour of Shiva starting on 24 October 2026 and The Secret of Breath starting on 25 October 2026


श्रावणातील शिवोपासना

उद्यापासून आपल्याकडे श्रावणमास सुरु होत आहे. जर तुम्हाला शंभू महादेवाची अथवा माझ्या श्रीगुरुमंडलाची उपासना करायची असेल तर एक सुलभ उपासना विधी मी दिलेला आहे. सोशल मिडीया, युटयूब वगैरे ठिकाणी तर श्रावणात करण्याच्या साधना-उपासनांचा अक्षरशः पाऊस पडलेला तुम्हाला आढळेल. कदाचित तुम्ही तुमच्या श्रद्धे नुसार एखादी शिवोपासना करायचे ठरवून सुद्धा ठेवले असेल. त्यामुळे श्रावानासाठी म्हणून अजून काही निराळी उपासना मी देणार नाहीये. जर तुम्हाला ध्यानमार्गाचा लळा लागलेला असेल तर तुमच्यासाठी काही गोष्टी येथे सांगत आहे.

अजपा गायत्री — ध्यान-धारणेच्या असंख्य पद्धती योग आणि तंत्र शास्त्रात दिलेल्या आहेत. या पूर्वी घेरंड संहितेतील ध्यान प्रकार मी वर्णन केले आहेत. सध्या चालू असलेल्या गोरक्षनाथांच्या गोरक्ष शतका मधील ध्यान प्रकार लवकरच विषद करणार आहे. अजपा गायत्री हा सर्व ध्यान प्रकारांचा जणू मुकुट मनी आहे. विज्ञान भैरव तंत्र सारखा आगम ग्रंथ असो किंवा योग चूडामणी उपनिषद सारखा यौगिक ग्रंथ असो. सर्वानीच अजपा गायत्रीला "न भूतो न भविष्यती" असे गौरविलेले आहे.

शिव षडाक्षर मंत्र — श्रावणातील शिव उपासना म्हटली की शिव मंत्रांचा जप ओघाने आलाच. शंभू महादेवाचे सुद्धा अनेकानेक मंत्र आणि मंत्र्भेद शास्त्रात उपलब्ध आहेत. असे असले तरी महादेवाचा तारक मंत्र असलेला शिव पंचाक्षर मंत्र सर्वाधिक प्रचलित आणि लोकप्रिय आहे. वरील आकृतीत मी मुद्दाम षडाक्षर असं लिहिलंय कारण काही वेळा लोकं मन मानेल त्या प्रमाणे मंत्राचा मागे-पुढे तांत्रिक बीजाक्षरे, पल्लव, संपुट वगैरेंची जोडणी करतात. पंचाक्षर मंत्राच्याच आरंभी प्रणव लावून षडाक्षर मंत्र बनतो. पंचाक्षर कोणी जपावा, षडाक्षर कोणी जपावा, नमः पद आधी कोणी लावावे आणि नंतर कोणी लावावे, मंत्राला शक्ती संपुट कधी लावावे या संबंधीचे मार्गदर्शन शिव महापुराणात आणि अन्य शास्त्र ग्रंथांत विस्ताराने केलेले आहे. तुम्हाला जर या सर्व नीती-नियमांच्या विस्तृत चर्चा-चर्वणात आणि अभ्यासात रस असेल तर गोष्ट वेगळी पण अन्यथा शिव षडाक्षर हा सर्वात सोपा आणि सात्विक मार्ग आहे.

शिव सहस्रनाम स्तोत्र — शंभू महादेवाची अनेकानेक स्तोत्रे आहेत आणि त्यातील बरीचशी शिवभक्तांमध्ये लोकप्रिय सुद्धा आहेत. साधारणतः साधक आपल्याला जो कार्यभाग साधायचा आहे त्यानुसार स्तोत्राची निवड करतात. महादेवाकडून रक्षणाची अपेक्षा असेल तर शिवरक्षा अथवा अमोघ शिवकवच, सुखसमृद्धीची अपेक्षा असेल तर दारिद्र्यदहन स्तोत्र, आरोग्य हवे असेल तर मृत्युंजय स्तोत्र, प्रसन्नता हवी असेल तर शिवमहिम्न अशी फलप्राप्तीच्या अनुषंगाने निवड केली जाते. तुम्ही जर शिवसहस्रनाम स्तोत्रावरील लेखमाला वाचली असेल तर स्तोत्राच्या फलश्रुती वरून तुम्हाला लक्षात येईल की शिवसहस्रनाम स्तोत्र हे साधकाच्या सर्वांगीण प्रगतीला पोषक आहे. तुमच्या संकल्पानुसार फल प्रदान करण्याची ताकद त्यामध्ये आहे. आधुनिक काळात वेळेची असलेली कमतरता लक्षात घेती पाच-दहा निरनिराळी स्तोत्रे म्हणणे सगळ्यानाच शक्य होते असे नाही. शिवसहस्रनाम स्तोत्राच्या नित्य उपासनेने अद्भुत लाभ घडून येतो.

कुंडलिनी शक्ती — अनेक लेखांमधून आपण शिव आणि शक्ती यांमधील अभेदभाव जाणून घेतला आहे. श्रावण हा शंकराचा महिना असला तरी एकट्या शिवाची अथवा एकट्या शक्तीची उपासना करू नये. तुमच्या श्रद्धेनुसार तुमच्या उपासनेत शिव प्रधानता असायला हरकत नाही पण शक्ती तत्वाची उपासना अल्पशी का होईना पण अवश्य केली पाहिजे. ज्याला योगमार्गाची आवड आहे त्याला कुंडलिनी उपासनेपेक्षा श्रेष्ठ अशी शक्ती उपासना नाही. शिव आणि शक्ती यांनी एकमेकाचा अंगीकार केलेला आहे. जगदंबा पार्वतीला महादेवाची अर्धांगिनी म्हणतात ते त्याचमुळे. कुंडलिनी शक्ती म्हणजे जणू समस्त शाक्त दर्शनाचा अर्क. तो ज्याला समजला तो अध्यात्म मार्गावर वेगाने पुढे जातो. सहस्रारातील शिव आणि मुलाधारातील कुंडलिनी यांचे मिलन म्हणजेच योग.

शांभवी अवस्था — श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जे काही मार्ग अवलंबिले जातात त्यात शिवलिंगार्चन एक प्रमुख भाग असतो. ज्याला कर्मकांडात्मक विधीने शिवोपासना करायची आहे तो स्थूल शिवलिंगाच्या विग्रहावर अभिषेक, बिल्व पत्रे, पुष्प, भस्म वगैरे उपचारांचा आश्रय घेतो. ज्याला अशा गोष्टींत रस आहे त्यांनी त्या जरूर कराव्यात. मला महादेव बाबा आणि गौरा माई यांनी नेहमी आंतरिक उपासानेचाच उपदेश केला आणि त्याच मार्गाची शिकवण दिली. शंभू आणि शांभवी यांची कृपा त्यांनी प्रदान केलेल्या पिंडाच्या सहाय्याने कशी प्राप्त करायची हा योगशास्त्राचा गाभा आहे. ध्यानाच्या अनेक वर्षांच्या अवस्थेने जी एक आनारिक स्थिती विकसित होते ती म्हणजे शांभवी अवस्था. ही अवस्था साधण्यासाठी शांभवी मुद्रा वगैरे सारखे विधी उपयोगात आणले जात असले तरी महत्वाची आहे ती त्या धाय्न साधानेमधून प्राप्त होणारी अवस्था. जोवर तुमची साधना तुम्हाला शांभवी अवस्थेप्रत पोहोचवत नाही तोवर स्वस्थ बसायचे नाही.

आत्मज्ञान म्हणजेच अध्यात्म — आजकाल आध्यात्मिक साधना, आध्यात्मिक उपासना या लेबल खाली एवढ्या चित्रविचित्र गोष्टी उपलब्ध आहेत की नक्की आध्यात्मिक साधना म्हणजे काय तेच नवीन साधकांना कळत नाही. अध्यात्म या शब्दाचा अर्थच मुळात आत्म्यावर आधारित, आत्म्याशी निगडीत, आत्म्याशी संबंधित असा आहे. जर तुमची साधना तुम्हाला आत्म्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी उपयोगी पडत नसेल, जर तुमची साधना तुम्हाला शरीर, मन, आणि इंद्रियांच्या पलीकडील शाश्वत सत्याचा शोध घेण्यास साहाय्य करत नसेल तर तिला आध्यात्मिक साधना म्हणता येणार नाही. आध्यात्मिक नसलेल्या साधना-उपासना काही सर्वच्या सर्व वाईट आहेत असं नाही पण तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीत रस असेल तर त्यांचा फारसा उपयोग होणार नाही हे नीट समजून घ्यावे आणि त्यानुसार आपली साधना निवडावी.

असो.

जीव-शिव ऐक्याची गोपनीय शिकवण जगदंबा पार्वतीच्या कर्णकुहरात ओतणारा शंभू महादेव सर्व योगसाधकांवर आपल्या कृपेचा वर्षाव करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक असून मायक्रोसॉफ्टच्या वेब डेव्हलपमेंट तंत्रज्ञानात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. मायक्रोसाॅफ्टतर्फे त्यांना "मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी योगाधिष्ठित जीवनशैलीचा अंगीकार केला असून निवडक साधकांना ते अजपा गायत्री व ध्यान-धारणा यांबाबत मार्गदर्शनही करतात. तंत्रज्ञान आणि योगमार्ग या दोन भिन्न वाटांचा सुवर्णमध्य साधत, ते गेली ३१ वर्षांहून अधिक काळ प्रोग्रामिंग, ध्यान-धारणा, लेखन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांत सक्रिय आहेत. आपल्या लेखनाद्वारे ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसोबतच योगविद्या आणि अंतःप्रज्ञेचे सूक्ष्म पैलू स्वतःच्या संकेतस्थळांवरून उलगडतात.

Posted On : 24 July 2025

Protected by Copyscape