गुरुमुखी विपरीत करणी द्वारे अमृतपान
प्रत्याहाराची काहीशी गोंधळात टाकणारी आणि सांकेतिक व्याख्या केल्यानंतर आता गोरक्षनाथ प्रत्याहार साधनेची सुरुवात करणार आहेत. ही साधना काय आहे ते जाणून घेत असतांना आधी केलेल्या व्याख्येचे निरूपणही होणार. कुंडलिनी योग हा जेवढा उथळ स्वरूपात आज चघळला जातो आहे तेवढा तो उथळ नाही. कुंडलिनी योग हा एक गूढ आणि रहस्यमय विषय आहे. त्यातले प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक वचन हे सांकेतिक अर्थाने ओतप्रोत भरलेले असते. त्यामुळे कुंडलिनी योगाच्या साधना शिकतांना त्या खरोखर मूळ अभिप्रेत अर्थाने समजून घेणे आवश्यक आहे. त्या तशा ग्रहण झाल्या नाहीत तर मग फायदाही मिळत नाही आणि शिव-शक्ति मिलन, ईश्वरप्राप्ती, आत्मसाक्षात्कार वगैरे वगैरे गोष्टी निव्वळ पुस्तकी ज्ञान म्हणून बौद्धिक स्तरावर चघळण्याच्या गोष्टी बनून राहतात.
गोरक्ष शतकातील प्रत्याहार साधनेकडे जाण्या आगोदार भौतिक जगतातील काही सामान्य गोष्टींची उजळणी करणार आहे. ही उजळणी करत असतांना तुम्हाला कदाचित ती अनावश्यक आणि अस्थानी वाटेल परंतु नंतरचे निरूपण वाचताना त्यांची सुसंगती आणि उपयोगीपणा तुम्हाला लक्षात येईल.
आपली पृथ्वी ही सूर्यमालेतील एक ग्रह आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आपल्या मानवी जीवनासाठी सूर्य खूप आवश्यक आहे कारण सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो. चंद्र हा परप्रकाशी आहे. तो स्वतःचा प्रकाश निर्माण करत नाही, तर सूर्यप्रकाश परावर्तित करतो. सूर्याच्या प्रकाशामुळेच चंद्र रात्री चमकतो. आता गंमत पहा एकच प्रकाश पण तो दोन भिन्न पद्धतींनी आपल्यापर्यंत पोहोचतो. सूर्याचा प्रकाश थेट पृथ्वीवर येतो आणि त्यामुळे तो प्रखर आणि तेजस्वी भासतो. चंद्राचा प्रकाश परावर्तनामुळे पृथ्वीवर येतो आणि तो आपल्याला मंद, सौम्य आणि शीतल वाटतो. सूर्याच्या प्रखरतेमुळे आपल्याला तो कधीकधी नकोसा सुद्धा वाटतो पण चंद्र मात्र सहसा नकोसा वाटत नाही. चंद्राची शीतलता आणि सौम्यता आपल्याला नेहमीच आवडते.
योगमतानुसार "यथा पिंडे तथा ब्रह्मांडे" किंवा "पिंडी ते ब्रह्मांडी" असे म्हटले जाते. म्हणजेच आपल्या मानवी पिंडातील घटक आणि गुणधर्म हे संपूर्ण ब्रह्मांडातील घटक आणि गुणधर्म यांचे प्रतिबिंब असतात. सूर्य आणि चंद्र यांचे गुणधर्म आपल्या मानवी पिंडातही आढळतात. उदाहरणार्थ, योगमतानुसार मानवी मन हे चंद्रतत्व आहे तर बुद्धी आणि आत्मा हे सूर्यतत्व आहे. डाव्या नाकापुडीतून वाहणारी इडा नाडी ही चंद्रतत्व आहे तर उजव्या नाकापुडीतून वाहणारी पिंगला नाडी ही सूर्यतत्व आहे. चंद्रतत्वाचा संबंध शक्तिशी आहे तर सूर्यतत्वाचा संबंध शिवाशी आहे. शरीराची डावी बाजू ही चंद्रतत्वाची आहे तर उजवी बाजू ही सूर्यतत्वाची आहे. मानव पिंडात अजून एक चंद्र-सूर्य जोडगोळी आहे आणि त्याविषयीच आता गोरक्षनाथ महाराज काही सांगत आहेत --
नाभिदेशे भवत्येको भास्करो दहनात्मकः ।
अमृतात्मा स्थितो नित्यं तालुमूले च चन्द्रमाः ॥
वर्षत्यधोमुखश्चन्द्रो ग्रसत्यूर्ध्वमुखो रविः ।
ज्ञातव्यं करणं तत्र येन पीयूषमाप्यते ॥
नाभी स्थानी एक भास्कर अर्थात सूर्य आहे जो उष्णता देणारा किंवा दहनाची क्षमता असलेला आहे. तसेच ताळूच्या मुळाशी एक चंद्र स्थित आहे जो अमृताने ओतप्रोत भरलेला आहे. एवढेच नाही तर हा चंद्र अधोमुखी असून तो आपल्या अमृतांच्या धारांचा वर्षाव करत असतो. ऊर्ध्वमुखी असणारा सूर्य हा त्या अमृतधारा ग्रहण करतो. योग्याने अशी साधना किंवा क्रिया प्राप्त केली पाहिजे की ज्या योगे तो हे अमृत प्राशन करू शकेल.
साधारणतः टाळू आणि मेंदूच्या वरच्या भापर्यंत जो प्रदेश आहे तो आज्ञा, सहस्रार आणि चंद्राच्या अधिपत्याखाली येतो. आधी सांगितल्या प्रमाणे चंद्र हा सौम्य आणि शीतल आहे. या चंद्र प्रदेशातून अमृताचा स्त्राव होत असतो. या अमृताला कुंडलिनी योगात बिंदु असे सुद्धा म्हणतात. हे अमृत किंवा बिंदु शरीरभर पसरते आणि देहाचे पोषण घडते अशी योगशास्त्रीय संकल्पना आहे.
सामान्यतः गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार कोणत्याही गोष्टीची स्वाभाविक गती ही वरुन खाली अशी असते. त्यामुळे चंद्र हा अधोमुखी मानला गेला आहे कारण त्यातील अमृत ताळूकडून खाली वाहाते. हे वरुन खाली वहाणारे अमृत माणिपूर चक्राच्या ठिकाणी वसणारा सूर्य ग्रहण करतो. सूर्य जणू आ वासून हे अमृत ग्रहण करण्यासाठी टपुनच बसलेला असतो म्हणून त्याला ऊर्ध्वमुखी म्हटले आहे. चंद्र अमृत स्त्राव करतो आणि सूर्य ते गिळंकृत करून टाकतो. जोवर बिंदुरूपी अमृत शरीरात आहे तोवर मानव पिंडाला पोषण मिळते. रोग-जरा-व्याधी यांपासून त्याचे रक्षण होते परंतु बिंदुनाश म्हणजे परिणामी अमृताचा ह्रास आणि अर्थातच जरा-व्याधी-वार्धक्य वगैरे जीवनाचा नाश करणाऱ्या गोष्टींचा प्रारंभ होतो.
योग्याला आपल्या साधनेत सिद्धता जोवर येत नाही तोवर आपला देह टिकवून ठेवायचा असतो. स्वतः गोरक्षनाथांनी अशा प्रकारची कायासिद्धी प्राप्त केली होती आणि दीर्घकाल सदेह जीवन जगले होते हे सर्वश्रुत आहे. जर हे साधायचे असेल तर वरुन पडणाऱ्या अमृताचा ह्रास होऊ न देणे आवश्यक ठरते आणि त्यासाठी योग्याने योग्य ती साधना माहीत करून घेणे आवश्यक ठरते. ही साधना कोणती तर --
ऊर्ध्वनाभिरधस्तालु ऊर्ध्वभानुरधः शशी ।
करणं विपरीताख्यं गुरुवक्त्रेण लभ्यते ॥
ज्यात नाभी वर आणि टाळू खाली अर्थात सूर्य वर आणि चंद्र खाली अशी शारीरिक स्थिति धारण केली जाते ती सुप्रसिद्ध विपरीत करणी मुद्रा केवळ गुरुमुखातूनच प्राप्त होते.
विपरीत करणी ही कुंडलिनी योगातील एक सुपरिचित मुद्रा आहे. साधारणतः सर्वांगासना सारखी भासणारी आणि शारीरिक स्तरावरचे फायदे सर्वांगासना प्रमाणेच देणारी विपरीत करणी ही मुद्रा आहे. आसन नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे अन्य मुद्रां प्रमाणेच विपरीत करणीत प्राणशक्तीला अधिक महत्व आहे.
येथे मी विपरीत मुद्रेच्या शारीरिक कृतीच्या खोलात शिरत नाही कारण कोणत्याही योगासनांच्या पुस्तकांत तुम्हाला ती सहज मिळून जाईल. गोरक्ष महामुनी काय म्हणतात त्याकडे लक्ष असू द्या -- गुरुवक्त्रेण लभ्यते. विपरीत मुद्रा कित्येक योगाभ्यासक करतात परंतु त्यांना कुंडलिनी योगातील चंद्र-सूर्य रहस्य काही उलगडत नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे विपरीत करणीचे सूक्ष्म विधी-विधान हे जाणकार गुरुच्या मुखातूनच श्रवण करायला हवे. खरंतर या लेखात मला माझ्या श्रीगुरुमंडला कडून मिळालेला या संबंधीचा उपदेश प्रकट करण्याची खूप इच्छा होती परंतु त्यांतील बराचसा भाग हा रूढ विपरीत करणीच्या कृतीला छेद देणारा आहे आणि त्यांत परत काही मंत्र समाविष्ट आहेत जे येथे प्रकट करणे शक्य नाही. त्यामुळे येथे केवळ विपरीत करणीचे महत्व आणि त्याचे अमृतपान साधनेतील स्थान यावरच मर्यादित भाष्य करतो आहे.
मागील लेखात गोरक्ष महाराजांनी प्रत्याहाराची जी व्याख्या सांगितली होती ती जरा आठवा. त्या व्याख्येतील "ती" स्त्री म्हणजे टाळू स्थानातील अमृताची "धारा". त्या अमृतधारेचा आस्वाद घेणारे "ते" दोघे म्हणजे टाळू स्थानीचा "चंद्र" आणि नाभी स्थानचा "सूर्य". प्रत्याहार या संस्कृत शब्दाची फोड प्रति + आहार अशी आहे. पातंजल योगानुसार इंद्रियांना त्यांच्या विषयांचा "आहार" घेण्यापासून रोखणे म्हणजे प्रत्याहार. गोरक्ष शतकातील कुंडलिनी योगानुसार विपरीत करणी मुद्रे द्वारे अमृतधारा सूर्यमुखात पडण्यापासून रोखणे म्हणजे प्रत्याहार. आता राहिला प्रश्न त्या "तिसऱ्या" अजरामर होऊ पहाणाऱ्याचा. "तो" कोण त्याविषयी लेखमालेच्या पुढील भागात जाणून घेऊ.
असो.
सोळा कलांनी बहरलेल्या तालूमुलातील चंद्राला जिच्या आभामंडलापासून अमृत प्राप्त होते ती परांबा पराशक्ती परमेश्वरी सकल योग साधकांना चंद्र-सूर्याचे योगविज्ञान प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
© हा लेख कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे. लेखाची लिंक शेअर करू शकता परंतु कोणत्याही स्वरूपात पुनर्मुद्रण किंवा पुनर्प्रकाशन करण्यास परवानगी नाही.
प्रिय वाचकांनो,
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या वेब साईटवर योग-अध्यात्म विषयक लेखन प्रकाशित करत आहोत. हे लेखन अन्यत्र वापरण्याची किंवा पुनर्मुद्रित करण्याची कोणालाही परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून मूळ लेखकाचे नाव व स्रोत न देता प्रकाशित केले आहे. काहींनी तर ते स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे—हे साहित्यचौर्य निंदनीय आणि खेदजनक आहे. भारतीय कायदा योग्य वेळी कार्य करेलच, पण आम्ही आमच्या सुजाण वाचकांना विनंती करतो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींशी आमचा कोणताही संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रकाशित होण्याचे एकमेव अधिकृत माध्यम आहे.
धन्यवाद.
— वेब टीम